Home > मॅक्स ब्लॉग्ज > "जेएनयू" च्या निमित्ताने....

"जेएनयू" च्या निमित्ताने....

जेएनयू च्या निमित्ताने....
X

आज दुपारी ग्रुपवर शेअर झालेला एक लेख वाचनात आला. "I stand with JNU," या हॅशटॅग बद्दल... संबंधित लेखिकेने त्यातून एक मार्मिक खंत व्यक्त केली, - आपण कॉलेजला असतानाच आवाज उठवला असता तर..? हे असे 'तर' चे सवाल खूपच छळत असतात, आयुष्यभर आपल्याला. पण त्यात काहीच अर्थ नसतो.... वेळ निसटून गेली असल्यानं स्वतःचाच राग करण्याशिवाय दुसरा पर्यायही उरलेला नसतो. असो. माझ्या लेखनाचा मुद्दा मात्र "जेएनयू" नाहीय तर "जेएनयु"च्या निमित्ताने आपण... असा आहे.

(काही प्रामाणिक शिक्षक, व्यवस्था आणि बेडर विद्यार्थी यांच्यासाठी हा लेख नाहीय, हे सुरुवातीलाच नमूद करतो.) कारण 'जेएनयू' हे आता एक व्यापक आंदोलन झालंय. पण तसं पाहिलं तर आपलीही परिस्थिती 'जेएनयू' पेक्षा वेगळी नाहीच. फरक इतकाच की ती मुलं लाठीचार्ज होत असतानाही मागे हटत नाहीय आणि आम्ही आमचे प्रश्न समोरच मांडत नाहीत. तसंही आंदोलनं करावीत तीसुद्धा “जेएनयू” च्याच विद्यार्थ्यांनी. कारण त्यांचे प्रश्न तितके गंभीर आहेत. याची त्यांना नेहमी जाणीव आहे.

आपले प्रश्न गंभीर आहेत की नाहीत याचा शोध घेण्याची गरज नाही. डिग्री घेऊन प्रवासाला निघालं की, पुढील काही वर्षात आपल्याही प्रश्नांचं गांभीर्य समजेल पण वेळ निसटून गेलेली असेल, तेव्हा आपल्याही तोंडून असा उद्गार निघेल - कॉलेजला असतानाच आवाज उठवला असता तर? विनोद वाटावी अशीच शोकांतिका आहे ही.

माझे एक प्राध्यापक मित्र आहेत. महाराष्ट्रातील एका नामांकित संस्थेत कार्यरत आहेत. आम्ही बरेचदा सोबत असायचो. एकदा असेच आम्ही सोबत बसलो असताना, एक विद्यार्थी त्यांना प्रश्न घेऊन आला. त्याने प्रश्न विचारताच त्यांनी त्याच्यावर शब्दांचा अफाट भाडीमार केला. त्यामुळे तो मुलगा घाबरून गांगरून गेला. मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. तोपर्यत या महाशयांनी त्याला हाकलून लावले. काहीतरी वेगळं घडत होतं. हे माझ्या लक्षात आलं परंतू तरीही मी त्यांना विचारलं का रागवले इतकं त्या बिचार्यावर ? तेव्हा ते म्हणाले –

“यालाच तर अनुभव म्हणतात. तुम्ही अजून नवीन आहात. म्हणून सांगतो. Attack is the best defence...” मी पुन्हा सविस्तर विचारलं तेव्हा ते बोलू लागले की, तुम्हाला मुलांनी प्रश्न विचारावे असं वाटत नसेल तर एवढच करा- सुरुवातीलाच त्यांना दम द्या, ज्यामुळे पुढे प्रश्न विचारण्याचं ते धाडसच करत नाहीत.

मित्रांनो हीच शोकांतिका आहे. आपल्या व्यवस्थेची. मुलांनी प्रश्न विचारू नये म्हणून त्यांना दमबाजी केली जाते. त्यांना practical चे मार्क्स देणार नाहीत किंवा internal exam ला पास होऊ दिले जाणार नाही. अशी भीती दाखवली जाते. याला Teachers Psychology म्हणतात. इतकंच नाही तर एकदा विद्यार्थांची मानसिकता लक्षात आली की, त्याचं आपल्या सोयीनुसार विभाजन करून त्यांना गटागटात विभागलं जातं. की ज्यामुळे त्यांनी एकत्रित येऊन आपल्याला कोणतीही मागणी करू नये. इतकं करूनही एखाद्याने काही आवाज उठविण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला सर्वांसमोर उत्तर न देता वेगळ्या मार्गाने कठीण परिस्थितीत अडकवलं जातं.

हे प्रकार सर्वत्र सुरु आहेत. याशिवाय इथं शिक्षक अर्धा तास उशिरा आले तरी चालतं. पण विद्यार्थ्याला एक मिनिट उशीर झाला असताना वर्गात प्रवेश दिला जात नाही. फी वाढ आणि शिष्यवृत्ती संदर्भात विचारणा केली. तर, प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना कधीच सगळी माहिती दिली जात नाही. सध्या “जेएनयू” च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या news तुम्ही पाहात असाल. पोलीस कुत्र्या मांजरासारखं फरपटत ओढून नेतायत मीडिया समोरून तरीही ही मुलं त्यांच्या प्रश्नांवर ठाम आहेत ! विशेष म्हणजे त्यात कित्येक संख्येने मुलीच दिसतायत. मी त्या भगिनींचं विशेष अभिनंदन करेल कुठून आलं हे बेडरपण?

आपल्याकडे बघितलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोलेजात आणि कॉलेजअंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या विभागांत हे सध्या देखील घडत आहे. पण मला राग या व्यवस्थेचा नाहीच आता. राग आहे तो हा अन्याय सहन करणाऱ्या गाफील मुलांचा..! आम्ही सगळे चतुर रामालिंगम आहोत... एखादे शिक्षक समोरून आले की, त्यांना काय देऊ नि काय नको... असं वाटणारे. फक्त शिक्षकांचं गुणगान गायलं की अपोआप डिग्री मिळते. या अंधश्रद्धेने जगणारे....

“मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची?” म्हणून आम्ही कोणालाच काहीच प्रश्न करत नाहीत... म्हणून त्यांनी शिकवल्यासारखं करायचं आणि आम्ही शिकल्यासारखं करायचं हीच योजना सफल होते.

No question, No more explanation...असंच सारं..! syllabus मधील एक मुद्दा होतो न होतो. तोच सरकारचं काय चाललंय? इथपासून तर वेगवेगळ्या नेत्यांवरही शिक्षकांची चर्चा सुरु होते... गम्मत म्हणजे आम्हालाही त्यातच इंटरेस्ट आहे... इथे शिकायचं कोणाला...? म्हणूनच वाटतं प्रश्न फक्त “जेएनयु” च्या विद्यार्थांना नाहीत, ते आपल्याला देखील आहेत. पण त्यांच्या प्रश्नांनी वादळ निर्माण केले, आपण मात्र शांत बसून आहोत.

बलात्कार थांबवता येत नसेल तर त्याची मजा लुटता यायला पाहिजे असं म्हणतात ना तशीच ही लाचारी झाली. पण “बलात्कार हा बलात्कार असतो” आणि “अन्याय हा अन्यायच !” हे न समजण्याइतके आम्ही निर्बुद्ध कसे? खरं तर स्वतःचाच राग येणार असेल तर त्याची ही योग्य आणि अचूक वेळ आहे; पण तसं होणार नाही. कारण आपण षंढ झालो आहोत. इतके की ज्यांच्या समोर प्रश्न मांडायचे. त्यांचेच आम्ही गोडवे गाण्यात दंग आहोत.

आज एखाद्या व्यक्तीला जन्मदिनाच्या शुभेच्छा द्याव्यात. तसंच आपण “जेएनयू” च्या पोस्ट शेअर करतोय. मनावर काहीच परिणाम न होऊ देता.... किमान आपणसुद्धा त्याच परिस्थितीतून जात आहोत. हे स्वतःला माहित असूनही त्याची जाणीव मनापर्यंत न जाऊ देता... खरंच ग्रेट आहात तुम्ही. कारण तुम्हाला डिग्री पदरात पाडून घ्यायचीय... ती मिळते की नाही. याचीच भीती धास्तावते सतत तुम्हाला. आणि यदा कदाचित आपण काही प्रश्न विचारला तर... हे लोक, ही व्यवस्था आपल्याला डिग्री मिळून देणार नाहीत.. ! बरोब्बर ना? मग स्वतः ला एकदा हेही विचारा की "जेएनयू" च्या आंदोलनात सहभागी असलेल्या मुलांना नकोय का डिग्री?

मुळात 'जेएनयु' ला प्रवेश घेण्यासाठी काय गुणवत्ता सिद्ध करावी लागते. याबद्दलही माहिती घ्या. मग इतके कष्ट घेऊन, इतकी फी भरून देखील त्यांना भीती का वाटत नसेल? डिग्री नाकारण्याची... मित्रांनो भीती प्रत्येकाला असते. फरक इतकाच अन्याय सहन करण्याची सवय प्रत्येकाला नसते. व्यवस्थेची मानसिकता ओळखावी तीही 'जेएनयू' च्याच मुलांनी. पण हेही विसरू नका ती मुलंसुद्धा सामान्य कुटुंबातूनच गेली आहेत. पण आज त्यांच्यावर जनावरांसारखा अन्याय होतोय. काठीने बदडून त्यांच्या अंगाची सालट काढली पोलिसांनी, नव्हे... या व्यवस्थेने... पण तरीही ही मुलं झुकली नाहीत... मुळात आंदोलन उभं करुन बेडरपणे आपले प्रश्न सिस्टिम समोर मांडली, इथेच ही मुलं जिंकली. आणि त्यांच्यावर निर्दयीपणाने लाठीचार्ज करुन त्यांना धमकावणारी यंत्रणा साफ हरली. हेही वेगळं सांगायला नको !

काल या आंदोलनात घायाळ झालेल्या एका मुलीचा video बघितला. अंगावर काठ्या पडत असतानाही ती माघार घेत नव्हती... मला माहित नाही.. "जेएनयु"च्या या आंदोलनाचा शेवट कुठे होईल? हेही माहित नाही की, या मुलांच्या शिक्षणाचं, भवितव्याचं काय होईल...? पण एक नक्की माहितीय.. हीच मुलं आपल्या देशाचं नेतृत्व उत्तम करतील... भविष्यात आपल्यावर अन्याय होणार नाही. याची जबरदस्त काळजी घेतील… सारी बेडर आहेत... इतका अन्याय होत असताना देखील "हे चूकच आहे" हेच सांगत राहिलेत... म्हणून या सर्वांना मनापासून सलाम !

मात्र, त्यांना सलाम करताना देखील आमची लाजच वाटते आम्हाला. कारण आम्ही आमच्यासाठीच काही करू शकत नाही. तर तुमच्या या कठीण काळात तुमच्यासाठी काय करणार? एक खरं की आम्ही इतकं मात्र करू शकतो... नेटकरी म्हणून आम्ही फेसबुक, व्हाट्सअपवर "i stand with JNU' असं हॅशटॅग शेअर करू शकतो... कारण तसंही आम्ही दररोज काहीतरी स्टेटस ठेवतोच.. तर तुमच्या या हॅशटॅगने आम्हालाही थोडेफार लाईक, कॉमेंट्स मिळतील.. !

Sorry! I can’t walk with you; just I stand with you…!

(JNU आंदोलनात घायाळ झालेल्या विद्यार्थी बांधवांची माफी मागून...त्यांनाच समर्पित...

- कृष्णा बेलगांवकर Research Student

Shivaji University, Kolhapur

Updated : 22 Nov 2019 6:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top