Home > मॅक्स ब्लॉग्ज > #SoniaGandhi अपराधी आहेत का? :तुषार गायकवाड

#SoniaGandhi अपराधी आहेत का? :तुषार गायकवाड

भाजप सरकार सोनिया गांधींना (sonia gandhi) का टार्गेट करत आहे? नॅशनल हॅरल्ड (National Herald) प्रकरण काय आहे? सोनिया गांधींचा कुठे चुकलं? त्या खरंच दोषी आहेत का? ED च्या कारवाईमध्ये काय राजकारण शिजतंय याची सखोल आणि सडेतोड विश्लेषण केलं आहे तुषार गायकवाड यांनी..

#SoniaGandhi अपराधी आहेत का? :तुषार गायकवाड
X


महाभारतात सर्वात जास्त दुःख कुंतीने भोगलं. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात महात्मा गांधी यांच्यानंतर सर्वात जास्त दुःख सोनिया गांधी यांनी भोगलेय. अजूनही त्यांच्या मागचे भोग सरलेले नाहीत. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जनमानसातील विश्वासार्हता पूर्णपणे संपलेल्या सक्तवसुली संचालनालय (ईडी) या स्वायत्त (?) संस्थेने नुकतेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना नोटीसा बजावल्या आहेत.

८ जून रोजी सोनिया गांधी ईडीच्या चौकशीला ताठ मानेने सामोऱ्या जाणार आहेत. 'मी इंदिरा गांधी यांची सून आहे. मी कोणाला घाबरणार नाही.' अशा उद्गाराद्वारे त्यांनी सुडापोटी केल्या जाणाऱ्या कारवायांना उत्तर दिले आहे. त्यांचे हे उद्गारच उरल्यासुरल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मतदारांसाठी आशेचा शेवटचा किरण आहे.

देशासाठी शहिद झालेल्या इंदिरा गांधींची सून, देशासाठीच शहिद झालेल्या राजीव गांधींची पत्नी, भारतीय सून म्हणून नांदायला आल्यापासूनच विरोधक व आप्तस्वकीयांच्या टोमण्यांचा, शेरेबाजीचा आणि राजकीय सुडाचा सामना करत आलेल्या आहेत. या ही सुडाच्या कारवाईला त्या पुरुन उरतील यात शंका नाही.

असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या कंपनीतर्फे उत्तर प्रदेशातील हेराल्ड हाऊस मुख्यालयातून इंग्रजी भाषेतील नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र प्रसिद्ध व्हायचे. येथूनच हिंदी भाषेतील दैनिक नवजीवन व उर्दू भाषेतील दैनिक कौमी आवाज हि वृत्तपत्रे प्रसिद्ध व्हायची.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ब्रिटीश राजवटीला काटशह देण्यासाठी सन १९३८ मध्ये नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र सुरु केले. आज जसे संघाचे मुखपत्र आहे तसेच हेराल्ड काँग्रेसचे मुखपत्र होते. हेराल्ड हाऊसशी काँग्रेसचा थेट संबंध होता. पण आजच्या घडीच्या गोदी मेडीया ज्याप्रमाणे वर्तन करते असे वर्तन हेराल्ड हाऊस कडून कधी झाले नाही. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या काळातही हेराल्ड हाऊस निस्पक्षता टिकवून होते, झुकले नव्हते.

तेव्हा काँग्रेसची सत्ता असतानासुद्धा हेराल्ड वरचेवर बंद पडायचे. मग विविध उपाययोजना राबवून पुनश्च सुरु करण्याचे प्रयत्न केले जायचे. पुढे डिजीटल युगात वृत्तपत्रांची अवस्था बिकट होत गेली. कालांतराने कारभारातील त्रुटी, बदलत्या समाजाची मानसिकता आणि सामाजिक मानसिकता बदलानुसार 'मागणी तसा पुरवठा' हे सूत्र अंमलात न आणल्याने हेराल्डची वाटचाल खडतर झाली.

सन २००८ मध्ये नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आर्थिक तोटा हाताबाहेर गेल्याने बंद पडले. नेहरुंनी सुरु केलेले हेराल्ड वाचवण्यासाठी काँग्रेसने, सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला. काँग्रेस पक्षाच्या निधीतून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) कंपनीस ९० कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली. सदर रक्कम ही बिनव्याजी होती. मात्र वृत्तपत्राचे पुनरुज्जीवन शक्य झाले नाही. एजेएल कॉंग्रेसचे कर्ज फेडू शकले नाही.

सन २०१० मध्ये यंग इंडिया लिमिटेड या चॅरिटी ट्रस्टटाईप कंपनीची निर्मिती केली. ज्यामधे सोनिया गांधी यांचा वाटा ३८ टक्के तर राहुल गांधी यांच्या वाटा ३८ टक्के आहे. म्हणजे गांधी कुटुंबाकडे ७६ टक्के वाटा आहे. जे हेराल्डचे झाले तेच यंग इंडिया चे होऊ नये म्हणून घेतलेली ही खबरदारी योग्यच आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांनी काँग्रेसकडून घेतलेली ९० कोटींची रक्कम परत न करु शकल्याने एजेएल चा मालकी हक्क यंग इंडिया कंपनीला दिला.

काँग्रेसची संपत्ती काँग्रेसकडेच राहिली. आणि हे सर्व व्यवहार पारदर्शक असून व्यवहारांची माहिती सार्वजनिक आहे. मग सन २०१२ मध्ये भाजपने सुब्रह्मण्यम स्वामी नावाचे बाजारबुगणं पात्र अण्णा हजारेंप्रमाणेच उभा केले. आणि गांधी कुटुंबावर भ्रष्टाचार, फसवणूकीचे आरोप करत, गांधी कुटुंबांची बदनामी करण्यासाठी न्यायालयात पाठवण्यात आले.

कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे चौकशी करण्यासाठी गुन्हा दाखल झाला आणि सोनिया गांधी व राहुल गांधी यांना जामीन मिळाला.

हेच आरोपकर्ता सुब्रमण्यम स्वामी सध्या भाजपसाठी अडगळीत पडलेले आहेत. गेली दोन वर्षे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर ट्विटर व मेडीया च्या माध्यमातून टीका करत असतात. या प्रकरणामध्ये सुब्रमण्यम स्वामींनी शेपूट घालू नये म्हणून मोदी सुब्रमण्यम स्वामींचा 'बाल भी बाँका' नाही करु शकत.

महत्त्वाचे म्हणजे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी शेठना १ मार्च २०२२ रोजी ट्विटरवरुन 'राजकीय हिजडा' हि उपाधी बहाल केलीय. आणि अशा माणसाच्या तक्रारीवरुन भारताच्या विविधतेतील एकता जपणाऱ्या, आयडिया ऑफ इंडिया समृद्ध करणाऱ्या सोनिया गांधींना केंद्रीय यंत्रणा वापरुन त्रास देऊन काँग्रेस निकामी करण्याचा प्रयत्न होतोय.

महाराष्ट्रात पवार साहेबांनी, पश्चिम बंगाल मध्ये ममतादीदींनी ज्याप्रकारे केंद्रीय यंत्रणांचा नंगानाच थांबवला. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, लाभार्थींनी रस्त्यावर उतरुन सत्तेचा माज उतरवण्याची हि शेवटची संधी उरलेली आहे. पण दुर्दैवाने तसा लढा काँग्रेसकडून दिला जाणार नाही. पक्षाच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये ती धमकच नाही.

एक भारतीय मतदार म्हणून सोनिया गांधींच्या या पडत्या काळातही मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार आहे. कारण राजीव गांधींच्या पश्चात देशाची अखंडता त्यांनी टिकवलीय. २०१४ च्या अगोदरचा पौष्टिक काळ आम्ही अनुभवलाय, उपभोगलाय.

एकवेळ काँग्रेसने, गांधी कुटुंबांने आमदार, खासदार, मंत्री केलेले या काळात काँग्रेस व गांधी कुटुंबांला सोडून जातील. पण, २०१४ पूर्वीचा भारत जगलेले माझ्यासारखे असंख्य फाटके लोक तुमच्या चांगल्या कार्याची कृतज्ञता म्हणून तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. सोनिया गांधी काही ठिकाणी चुकल्या असतील. त्याबद्दल त्यांचेवर टीकाही करता येईल. त्या काहिश्या चांगल्या, काहिश्या वाईट असतीलही! पण त्या अपराधी मात्र नाहीत!!

आणि तुम्हाला सोनिया गांधी इतक्याच सलत असतील? खुपत असतील? तर द्या परत त्यांचा 'राजीव' त्यांना, निघून जातील त्या देश सोडून कायमच्या... द्याल का परत??

- तुषार गायकवाड.

Updated : 2 Jun 2022 4:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top