Home > News Update > मोदी सरकारकडून मार्केटिंग तंत्राचा वापर करुन दिशाभूल?

मोदी सरकारकडून मार्केटिंग तंत्राचा वापर करुन दिशाभूल?

मोदी सरकारकडून मार्केटिंग तंत्राचा वापर करुन दिशाभूल?
X

“शासन आणि राष्ट्र या वेगवेगळ्या बाबी आहेत. राष्ट्राच्या संरक्षणार्थ जनतेने शासनाची कायम चिकित्सा केली पाहिजे.”पण आपल्या देशात असं होतंय का हा प्रश्न आहे.

आपले सरकार मार्केटिंगची तंत्रे वापरून आपल्याला गंडवत आहे का?

कदाचित हो! अगदी साध्या भाषेत तीन टप्प्यांमध्ये हे समजून घेता येईल.

मदतीची विनंती

आपले सरकार अर्थात पंतप्रधान मोदी आपल्याला नेहमी काहीतरी विचित्र विनंती करताना, काहीतरी मागताना दिसून येतात. उदा.

  • नोटबंदी : “आज मी तुम्हा समस्त देशवासियांना एक विनंती करणार आहे, या लढाईमध्ये तुम्ही काही दिवस त्रास सहन कराल ना?”
  • स्वच्छ भारत: “मी तुमच्यापैकी प्रत्येकाला कळकळीची विनंती करतो की वर्षभरात किमान १०० तास तुम्ही स्वच्छतेसाठी द्या, म्हणजे प्रत्येक आठवड्यात दोन तास स्वच्छतेसाठी.”
  • कोरोनावर उपाय: “मला तुमचे काही आठवडे द्या, कृपया जनता कर्फ्यू पाळा, कृपया बाहेर येऊन टाळ्या-थाळ्या वाजवा, कृपया ९ वाजता ९ मिनिटे दिवे मालवा”

या विनंत्या केल्यानंतर काय होत?

बेंजामिन फ्रेन्क्लीनइफेक्ट

मानसशास्त्रातील हा अभ्यास असं सांगतो की, “जेव्हा आपण एखाद्याची विनंती मान्य करतो, त्याला/तिला मदत करतो, आपल्याला ती व्यक्ती जास्त आवडायला लागते.”

तुम्हाला असा अनुभव असेल की काही वेळा तरुण मुली लहान-सहान बाबतीत आपल्या सोबतच्या तरुणांची, मित्रांची मदत घेतात व मदत करता करता मुलं त्यांच्या प्रेमात पडतात.

ही संकल्पना व्यावसायिक जगतात ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी मार्केटिंग व जाहिरात क्षेत्रात सर्रास वापरली जाते. ज्यांच्या नावावर या संकल्पनेला ओळखले जाते ते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बेंजामिन फ्रेन्क्लीन आपल्या राजकीय जीवनात विरोधकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी या संकल्पनेचा वापर सर्रास करायचे. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी असं लिहिलंय की, “ज्याने तुमची एकदा मदत केली आहे तोच तुमची आणखी मदत करू शकण्याची शक्यता जास्त आहे, अगदी तुम्ही ज्याला मदत केली आहे अशा व्यक्तिपेक्षाही जास्त.”

आपल्या सर्वात एक हिरो दडलाय...

पंतप्रधान मोदींनी विनंती केलेल्या या अगदी साध्या साध्या कृती लोकांमध्ये, आपण स्वत: कुणीतरी आहेत, आपल्याला महत्व आहे, आपण एक चांगली व्यक्ती आहोत, अशी भावना निर्माण करतात. आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीचे एका हिरोमध्ये होणारे हे रूपांतर आपल्याला नकळत हवहवेसे वाटते व जेव्हा हे रूपांतर करणारा व्यक्ती इतर कुणी नसून आपले पंतप्रधान आहेत तेव्हा तर याची उपलब्धी कित्येक पटींनी वाढते.

आपल्या सुनेला खूप कामं लावणारी सासू जर हुशार असेल तर ती कायम सुनेचे कौतुक करणार, तिची मदत मागणार, “तुझ्याच हातचा स्वयंपाक चांगला होतो ग..”, “तुझ्या इतकं भारी चिकन नाही गं येत मला बनवता.” पण हे सगळ करताना सुनेची व्यक्तिगत कामे, करिअर, आयुष्य, आरोग्य यांची अक्षम्य हेळसांड होत असते त्यावर सासू मुद्दाम बोलायचे टाळणार, अशा परिस्थितीत हुशार सुनेला यातील राजकारण, स्वार्थ आणि स्वत:चे नुकसान समजायला हवे म्हणजे ती म्हणू शकेल की, “हो, करते मी भाजी, तुम्ही तेवढ मुलांच्या अभ्यासाच पाहा, भाजी निवडून तर ठेवा. इकडे तुमची कामं करताना ऑफिसची कामे अडताय, बॉसची बोलणी खावी लागताय मला. नुसतंच कौतुक नका करू सासूबाई, नव्या साड्या तर माझ्या नणंदेलाच देता तुम्ही, तुमचा मुलगा उठसुठ मारहाण करतोय त्याला आवरा ना”

जादूगाराची तत्वे: दिशाभूल व फसवणूक / Misdirectionand deception

पेन आणि टेलर नावाचे जागतिक कीर्तीचे दोन जादूगार आहेत. जादूगार लोक प्रेक्षकांना कसे फसवतात, कुठल्या तत्वांचा आधार घेतात याबाबत ते उघड विवेचन करतात. त्यातील एक महत्वाचे तत्व म्हणजे प्रेक्षकांची दिशाभूल करणे. महत्वाच्या बाबीवरून प्रेक्षकांचे लक्ष वेगळ्याच गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणे याला ते दिशाभूल करणे म्हणतात. याबद्दल एक मजेशीर जादूची ट्रिक व अंतर्भूत तत्वांचे स्पष्टीकरण इथे पहा.

अगदी याचप्रमाणे मोदीजी जेव्हा हुशार सासुसारखे भाषण करत असतात, महत्वाच्या गोष्टी सोडून इतर गप्पांमध्ये आपल्याला अडकवून ठेवत असतात तेव्हा जनतेने हुशार सुनेसारखे प्रश्न उपस्थित करायला हवेत, की हे गोड गोड बोलणं ठीक आहेत पण कामाचंही बोला, तुमची जी कर्तव्ये आहेत त्याविषयी काय प्रगती आहे ते सांगा, लोकांचे मूलभूत हक्क मारले जाताय, त्यावर काय केलं सांगा.

उदा.

  1. रोहित वेमुला आंदोलनाच्या वेळी सगळा देश पेटलेला असताना त्यावर मोदींनीभाष्य केले की, “हे दु:खद आहे, राजकारण वेगळी बाब आहे, एका आईचा एक मुलगा हरवला आहे हे वाईट झालं” लक्षात घ्या, असे परत होऊ नये यासाठी काय उपाय केले यावर त्यांनी काही सांगितलं नाही, काय कार्यवाही केली ते सांगितले नाही, त्या आंदोलनात ज्या विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला गुन्हे दाखल झाले त्याबद्दल काहीही नाही.
  2. गौरक्षेच्या नावाखाली देशभरात गुंड सुसाट सुटलेले असताना, मुस्लिम नागरिकांचे मूलभूत अधिकार तुडवले जात असताना, कित्येक नागरिकांचा जीव जात असताना फालतू गोष्टींवर मोदींनी ‘मन की बात’ केली, दु:ख व्यक्त केले, पण या सर्व घटना घडू नयेत म्हणून पोलिसांना, राज्य सरकारला, काय निर्देश दिले आहेत याविषयी चकार शब्द ते बोलले नाहीत. अशा घटना खपवून घेणार नाही, लोकांनी आपले गुंड आवरावेत असे काहीही ते बोलले नाहीत.
  3. दि . १४ एप्रिल रोजी कोरोनालॉकडाऊनबद्दल देशाला संबोधित करताना मोदींनी वेगवेगळ्या प्रकारे जनतेला व स्वत:ला केवळ शाबासकी देऊन घेतली. ही परिस्थिती आपण कसे छान हाताळतोय, इतर देश पाहा कसे मागे आहेत इ. पण त्यांनी एका शब्दानेही त्यांच्या कर्तव्यात ते कुठे आहेत, ते काय उपाययोजना करताय याचा उल्लेखही केला नाही. लाखो मजूर कुठे कुठे अडकून पडले आहेत, कित्येक शेकडो किलोमीटर पायी चालत घराची वाट तुडवताय, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी कित्येक दिवसांपासून मूलभूत संरक्षण साधनांची मागणी करताय, अफवांचे पीक आलेय, माध्यमे खोट्या बातम्या चालवताय, मुस्लिम नागरिकांना मारहाण होतेय, उत्तर पूर्वेकडील नागरिकांना त्रास दिला जातोय, पीएम केअरवर कित्येक गंभीर आरोप होताय त्यावर अधिक देखरेख असावी पारदर्शकता असावी, अशी मागणी होतेय, इ. महत्वाच्या कुठल्याही मुद्द्याला त्यांनी स्पर्शही केला नाही. मग मोदीजी म्हणजे हुशार सासू नाहीतर काय?

आपली भावनिक गुंतवणूक:

मोदींनी विनंती केलेल्या कृती केल्यानंतर नकळत आपण त्यांच्याशी जोडले जातो. आता पंतप्रधान किंवा शासनावर केलेली टीका किंवा चिकित्सा तुम्ही स्वतःला लावून घेता. त्यांची चूक मान्य करणे म्हणजे स्वतःची चूक मान्य करणे, जे आपल्याला कुणालाच करायला आवडत नाही. हा सर्वात मोठा धोका आपल्यासोबत नकळत घडत असतो.

यशाची व्याख्या बदलणे

दुसऱ्या टप्प्यात ते शासनातर्फे कसलेही ठोस वचन द्यायचे टाळतात. कुठल्याही कृतीच्या अंतिम फलीतापेक्षा, जनतेची कृती हेच शासनाच्या यशाचे मोजमाप होऊन जाते. जाहीर केलेल्या यशाला जनता प्रश्न विचारत नाही कारण ते त्यात कृतीद्वारे भावनिकरीत्या गुंतले आहेत आणि असे प्रश्न विचारणे म्हणजे स्वतःच्या यशावर स्वतः प्रश्न उपस्थित करणे होईल.

निर्लज्ज विनम्रता

समजा त्यांच्या स्वप्नाप्रमाणे (नियोजनाप्रमाणे नव्हे) काही झालं नाहीच तर ते आणखी विनंत्या आणि आवाहन करतात. नेमक्या मुद्द्यांना ते कधीच हात घालत नाहीत, त्यावर उपाय योजना सांगत नाहीत, ते कुठे चुकले ते सांगत नाहीत, ते फक्त आणखी अपेक्षा व्यक्त करतात, आपल्याकडूनच..

थोडक्यात एखाद्या लहरी राजाने चालवावा त्याप्रमाणे देश चालवला जात आहे. त्यासाठी विज्ञानाने प्रस्तुत केलेले ज्ञान, राज्यघटनेत असलेली अस्पष्टता, यांचा गैरवापर करून आपल्या मेंदूला हवे तसे वळवले जात आहे. आधी पोकळ घोषणा आणि मागाहून त्यासाठी नियोजन हे नेहमीचच झालं आहे. साधक बाधक परिणामांचा पुरेसा विचार न करताच निर्णय घेतले जातात, मागाहून बदलले जातात, कधी थोपवले जातात. मधल्या काळात भरडला जाणारा प्रत्येक माणूस, गेलेला प्रत्येक जीव, उगारलेली प्रत्येक काठी, उपाशी राहिलेला प्रत्येक जीव, घरी पोचण्यासाठी उचललेले प्रत्येक अनवाणी पाऊल, यांच्या वेदनेचा, पापांचा भार नियोजनशून्य निर्णय घेणाऱ्या शासनाला उचलावाच लागेल.

ता..: ‘राजा नागडा आहे’ हे सांगायची आता आपणच हिम्मत करायला हवी.

Updated : 19 April 2020 12:24 AM GMT
Next Story
Share it
Top