Home > मॅक्स ब्लॉग्ज > खर्गे रिमोटकंट्रोल अध्यक्ष असतील का?- रवींद्र आंबेकर

खर्गे रिमोटकंट्रोल अध्यक्ष असतील का?- रवींद्र आंबेकर

मल्लिकार्जुन खर्गे हे सोनिया गांधी यांचे रिमोट कंट्रोल असतील, असा सोशल मीडियावर ट्रेंड चालवण्यात आला. पण खर्गे हे काँग्रेसचे रिमोट कंट्रोल अध्यक्ष असतील का? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण...

खर्गे रिमोटकंट्रोल अध्यक्ष असतील का?- रवींद्र आंबेकर
X

काँग्रेस चे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोशल मिडीयावर त्यांच्या विरोधात ट्रेंड चालवण्यात आला. या Trend मुळे काँग्रेस ( Congress ) हायकमांड ने आपल्या सोयीचा अध्यक्ष 'निवडून' आणलाय अशा स्वरूपाचं चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मिडीयाच्या संघटीत स्वरूपाच्या प्रभावामुळे आजकाल सर्वच राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना मुलभूत विचारांसोबतच सोशल मिडीयावरची आक्रमणे ही परतून लावण्याची रणनिती आखावी लागते. खरगे यांच्या समोर पक्षाची राजकीय पुनर्बांधणी सोबतच सोशल मीडीयावर ही आक्रमक संघटन उभारण्याचं आव्हान आहे. त्यांच्या विरोधात चाललेले ट्रेंड ही त्यांना मिळालेली सलामी आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांना ८० व्या वर्षी काँग्रेसने दिलेली ही जबाबदारी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शशी थरूर ( Shashi Tharoor ) आणि मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge ) यांच्यातील लढाई ही तशी एकतर्फीच होती. खरगे यांच्याकडे हायकमांडचा कल होता. तरी सुद्धा एखाद्या राजकीय पक्षात निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडला जातो ही सुद्धा आता महत्वाची गोष्ट झाली आहे. भारता सारख्या लोकशाही व्यवस्था स्वीकारलेल्या देशात लोकांचा कल हुकूमशाहीकडेच असल्याचं दिसतं. त्यामुळे अनेक राजकीय पक्षात अध्यक्ष नियुक्त केले जातात. काँग्रेसने पक्षात अध्यक्षपदावरून सुरू झालेला अनिश्चिततेचा खेळ थांबवून निवडणूक घेतली हा मोठा मुद्दा आहे.

काँग्रेस मुक्त भारत आणि गांधी मुक्त काँग्रेस ची संकल्पना भारतीय जनता पक्षातर्फे मांडली जात आहे. या रणनितीला छेद देण्यासाठी काँग्रेसला सर्वशक्तीनिशी मैदानात उतरण्याची गरज होती. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदापासून दूर राहून जनतेत जाण्याचा निर्णय घेतला. Bharat Jodo च्या माध्यमातून रस्त्यावर आपली ताकद अजून शिल्लक आहे याचा आत्मविश्वास काँग्रेसच्या नेत्यांना-कार्यकर्त्यांना आला. सोशल मिडीयावर ज्या पद्धतीचं रान उठवलं जात होतं, राहुल गांधी यांना पप्पू ठरवलं जात होतं, त्यांच्या पार्ट टाइम राजकारणावर टीका केली जात होती. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तर आता निवडणुका लढणं आणि जिंकणंच अशक्य असल्याची मानसिक तयारी केली होती. भारत जोडो मुळे आता राहुल गांधी संपूर्ण दिवस लोकांसमोर आहेत, ते लोकांना भेटतायत, बोलतायत. ग्रामीण जीवन जवळून पाहतायत. यातून त्यांना किमान देश कळायला लागेल.

राहुल गांधी यांची भारत जोडो, काँग्रेसच्या कनिष्ठ-वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये असलेला विसंवाद, पक्षाची विस्कटलेली घडी, शिस्तीचा अभाव, निवडणूक रणनितीचा अभाव, समाज माध्यमांवरचा घसरलेला प्रभाव, मुख्य प्रवाहातील माध्यमांनी फिरवलेली पाठ, घटलेले आर्थिक मदतीचे स्त्रोत अशा पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे यांनी अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली आहे. खरगे यांनी ब्लॉक पातळीवरून पक्षाचे काम केले आहे. त्यामुळे संघटनेच्या गरजा त्यांना चांगल्याच माहिती आहेत. पक्षाला निवडणुका जिंकाव्या लागतात, आपण निवडणूक जिंकू शकतो हा आत्मविश्वास काँग्रेसने गमावला आहे. त्यामुळे खरगे यांना सर्वांत आधी पक्षाच्या राजकीय बांधणीकडे लक्ष द्यावे लागेल. सर्व राज्यांतील काँग्रेस लोकप्रतिनिधींच्या परफॉर्मन्सचा आढावा घ्यावा लागेल, हायकमांड फक्त पैसे मागतं या समि‍करणाला छेद द्यावा लागेल. काँग्रेसमध्ये पक्षीय पातळीवर ही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार, चापलुसी, घराणेशाही या सर्व मुद्द्यांवर खरगे यांना फार काही करता येईल असं वाटत नाही, मात्र भारतीय जनता पार्टी शी लढायचं असेल तर त्यांना एक आर्थिक कार्यक्रम घेऊन लोकांसमोर जावे लागेल. प्रचार यंत्रणांचा प्रभावी वापर करावा लागेल. मोदींशी सामना करायचा असेल तर केवळ मोदींवर टीका करून उपाय नाही, त्यांना पक्षाचं व्हिजन मांडावं लागेल. लोकशाहीचं रक्षण वगैरे या नंतरच्या गोष्टी आहेत, सध्या लोकांच्या गटर-मीटर-आरोग्य-रोजगार सारख्या मुलभूत समस्यांबाबत बोलावं लागेल, त्यावरचे उपाय समोर आणावे लागतील. शेतकरी-कामगार यांचे प्रश्न हाती घ्यावे लागतील. खरगे स्वतः एक मिल कामगाराच्या घरात जन्माला आले आहेत. त्यांना हे प्रश्न चांगलेच माहिती आहेत. अशा परिस्थितीत पक्षाच्या संघटनेपासून सत्तेपर्यंतचा प्रवास पाहिलेल्या खरगे यांना दिवसरात्र एक करून काम करावे लागेल.

आता मल्लिकार्जुन खरगे हे सर्व करू शकतील का? ते सोनिया गांधी-राहुल गांधी यांच्या हातातील रिमोट कंट्रोल बनून राहतील का? हा महत्वाचा प्रश्न आहे. सध्या देशात सगळ्याच पक्षात रिमोट कंट्रोल पद्धत आहे. मला नाही वाटत खरगे ही याला अपवाद ठरतील. अपवाद ठरण्यासाठी अख्ख मैदान आता त्यांना खुलं आहे. पाहूयात ते कसे खेळतात ते.

Updated : 21 Oct 2022 4:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top