लोहपुरूष!

लोहपुरूष!
X

लोहपुरूष!स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री व एकसंध भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांचा आज १४५ वा जन्मदिन.

अत्यंत कणखर स्वभाव वैशिष्ट्यामुळे ते 'लोहपुरुष' मानले जाऊ लागले. 'सरदार' हा अनभिषिक्त किताबही त्यांना जनतेनेच बहाल केला होता.

दुर्दैवाने भारत प्रजासत्ताक झाल्यावर एक वर्षाच्या आतच सरदारांचे निधन झाले. त्यांना अधिक आयुष्य मिळाले असते, तर कदाचित काश्मीरची समस्या तेव्हाच संपली असती, असे मानले जाते.

वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या ग्रामस्थांना संघटित करून त्यांनी ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला.

या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते बनले.

१९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. १९४२च्या 'चले जाव' आंदोलनात ते आघाडीवर होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले.

भारतातील ५६५ संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.

काॅन्गेसचे राजकारण व प्रशासन यामध्ये पटेल व जवाहरलाल नेहरू यांच्यात तीव्र मतभेद होते. पण नेहरूंना लोकप्रियता व महात्मा गांधींच्या पाठिंब्याची कवचकुंडले होती. त्यामुळे सरदारांना कायमच दुय्यम भूमिका घ्यावी लागली. पण सरदारांचे काम व निष्ठा यावर त्याचा कधी परिणाम झाला नाही.

प्रखर राष्ट्रभक्ती व कामावरील अजोड निष्ठा हीच त्यांची कमाई. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर नर्मदेवरील सरदार सरोवराच्या प्रांगणात सरदार पटेल यांचा अतिभव्य व जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. अर्थात निर्जीव पुतळ्यापेक्षा त्यांच्या स्मृतीच अधिक जिवंत व तेज:पुंज ठरतात.

सरदारांच्या स्मृतींस आदरांजली !

- भारतकुमार राऊत

Updated : 2 March 2021 4:01 AM GMT
author-thhumb

भारतकुमार

Print & TV Journalist,Political Analyst and formerMember of Parliament (RS). Worked in India & abroad and in English & Marathi. Opinions are strictly personal.


Next Story
Share it
Top