Home > मॅक्स ब्लॉग्ज > और कुछ पन्ने कोरे रह गये इरफान

और कुछ पन्ने कोरे रह गये इरफान

अष्टपैलू अभिनेता इरफान खान याच्या जीवनातले वेगवेगळे पैलू मांडणारं 'और कुछ पन्ने कोरे रह गये इरफान'अजय ब्रह्मात्मज यांच्या 'इरफान ' पुस्तकाच्या निमित्ताने...

और  कुछ पन्ने कोरे रह गये इरफान
X

प्रत्यक्ष चित्रपटसृष्टीत फिल्डवर्कवर दीर्घकाळ पत्रकारीता केलेल्याचे लेखन बहुस्तरीय आणि बहुस्पर्षी असते याचा अनुभव मला माझे सिनेपत्रकार मित्र अजय ब्रह्मात्मज यांच्या या .... और कुछ पन्ने कोरे रह गये इरफान" या पुस्तकाच्या माध्यमातून वाचताना येतोय. एकिकडे इरफान खानचे अचानक जाणे आणि दुसरीकडे अजय ब्रह्मात्मज यांचा इरफान खानशी असलेला दीर्घ परिचय या दोन्हीतून हे पुस्तक समोर येते. हे पुस्तक दोन भागांत आहे.

पहिल्या भागांत अजय ब्रह्मात्मज यांनी इरफानच्या घेतलेल्या मुलाखती, त्याच्या काही चित्रपटांची परीक्षणे, त्याच्यावरचे लेख ( इरफान और मनोज वाजपेयी: कहानी 'आऊटसाईडरों की या लेखाचा खास उल्लेख हवाच) आणि दुसर्‍या भागांत इरफान खानवरचे ३७ लेख असे मिळून हे ५३ लेखांचे हिंदीतील पुस्तक आहे. यात इरफानचे काही मित्र, सहकलाकार इत्यादींचा समावेश आहे. त्यांचे इरफानबद्दलचे छोटे छोटे अनुभव आपल्या समोर येतात. आणि वय व करिअरच्या विविध टप्प्यांवरची इरफानची जडणघडण, सुख दु:खे, दृष्टिकोन लक्षात येत जातो आणि आपण इरफानमध्ये अधिकाधिक गुंतत गुरफटत जातो. 'एक कलाकार दिल्लीतील एनएसडीमधील आपले अभिनय प्रशिक्षण पूर्ण करुन चित्रपटात भूमिका साकारायची आहे' असे लक्ष्य निश्चित करुन मुंबईत येतो आणि कसा संघर्ष करीत करीत स्वतःला घडवतो आणि ते करताना प्रस्थापिकांच्या मानसिकतेचा सामना करीत करीत पुढे सरकतो आणि अचानक एका गंभीर आजारात सापडतो हे अतिशय परिणामकारकतणे वाचायला मिळते. वाचता वाचता बरेच काही समजत उमजत जाते. ते हे पुस्तक अनुभवण्यातच गरजेचे आहे.. त्याचा जन्म जयपूरचा.

दिल्लीत एन. एस. डी.त असताना तो क्रिकेटप्रेमी होता. तर अभिनयात नसिरुद्दीन शहा त्याचा आदर्श होता..'बाजार ' चित्रपटाने तो इतका आणि असा प्रभावित झाला की लागोपाठ दोनदा पाहिला. चित्रपटसृष्टीत त्याने दाखवलेली विविधता कौतुकास्पद आहे. सलाम बाॅम्बे, द नेमसेक, मकबूल, हासिल, ये साली जिंदगी, पान सिंह तोमर, लंच बाॅक्स, पीकू, मदारी, स्लमडॉग मिलिनियर, हिंदी मिडियम.....ही नावेच त्याचे अष्टपैलुत्व आणि क्षमता अधोरेखित करते. रंगमंच, चित्रपट ( राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दोन्ही) , मालिका असा इरफानने अनेक प्रकारचे अनुभव घेत केलेला प्रवास यात आहे. विशेष म्हणजे, मनिषा कोईरालाच्या दारुड्या पतीची , जो नंतर सुधारतो अशी इरफानने साकारलेली भूमिका असलेला 'तुलसी' चित्रपट यू ट्यूबवर आहे, अशी वेगळी माहिती या पुस्तकात मिळते.

यशपाल शर्मा त्यात व्हीलन आहे. आम्ही जे प्रत्यक्ष फिल्डवर्कवर घडलेले सिनेपत्रकार चित्रपटसृष्टीतील अनेक घटनांचे कळत नकळत साक्षीदार असतो. बिटविन द लाईन लक्षात येते. एकाद्या कलाकाराचे नवेपण लक्षात येते तसेच एकाद्याच्या स्टारडमचा त्रासही होतो आणि या सरमिसळीतून आमची जी जडणघडण होते ती अशा पुस्तकात डोकावते. ते लिहावेसे वाटते. आणि अशातच या पुस्तकात इतरांनी इरफानवर जे लिहिलंय ते अधिक जवळचे वाटू लागते. हे पुस्तक चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही प्रमाणात नक्कीच बदलू शकते. अर्थात, आपल्या चित्रपटसृष्टीची संस्कृती विसंगती आणि विरोधाभासाने भरली आहे आणि तीच तिची खासियत आहे असे मानले तरच नवं काही गवसेल. प्रकाशक सरस्वती बुक्स, छत्तीसगढ. मूल्य २९९ रुपये. पृष्ठे २७७.



दिलीप ठाकूर

Updated : 21 Dec 2022 7:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top