Home > मॅक्स ब्लॉग्ज > भारत- ऑस्ट्रेलिया १९८१ चा थरार आणि रेडिया कॉमेंट्री

भारत- ऑस्ट्रेलिया १९८१ चा थरार आणि रेडिया कॉमेंट्री

भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्या नावावर केली. मात्र, भारताने 1981 साली देखील ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. कशी झाली होती ही मॅच, वाचा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी शेअर केलेला अनुभव

भारत- ऑस्ट्रेलिया १९८१ चा थरार आणि रेडिया कॉमेंट्री
X

१९८०-८१ सालची गोष्ट. सातव्या- आठव्या इयत्तेत होतो. रेडिओवरच्या क्रिकेट कॉमेंट्रीचा नादखुळा होता. आमच्याकडं रेडिओ नव्हता. गावात एक मेडिकल स्टोअर्स सुरू झालं होतं. इस्लामपूरच्या वाळवेकर नामक गृहस्थांचं ते दुकान होतं. त्यांच्याकडं रेडिओ असायचा आणि ते नेहमी कॉमेंट्री लावायचे. शाळेच्या जवळच दुकान असल्यामुळं लघवीच्या, जेवणाच्या सुट्टीत आणि शनिवार रविवार दिवसभर त्यांच्याकडं कॉमेंट्री ऐकत बसायचो. काउंटरच्या बाहेर एक स्टूल असायचं त्यावर बसून ऐकत राहायचो. कधी कधी त्यांच्याकडं कॉफी प्यायला मिळायची. गावात कॉमेंट्री ऐकणारे पाच सात लोकच होते तेव्हा. त्यात माझ्यासारखा आठवीत शिकणारा पोरगा त्याचं कौतुक असावं त्यांना. हे दिवसाच्या मॅचचं.

दरम्यान ऑस्ट्रेलियाची सीरिज आली आणि भलतंच टाइम टेबल समोर आलं. पहाटे ४ वाजता वगैरे मॅच सुरू होण्याची वेळ असायची. तेव्हा चांदोली धरणाच्या कॅनॉलची कामं सुरू झाली होती. त्या कामासाठी आलेले काही लोक आमच्या घराजवळ भाड्यानं राहायला होते. त्यांच्याकडं रेडिओ होता आणि त्यांनाही क्रिकेटची आवड होती. पहाटे उठून त्यांच्याकडं कॉमेंट्री ऐकायला जात होतो. पहाटे जाग आली की, उठायचं आणि त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावायचा. घड्याळ हातावर किंवा भिंतीवरही नसल्यामुळं किती वाजले काही कल्पना नसायची. जागे झाल्यावर धावत जाऊन त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावायचा. अशातून काहीवेळा मध्यरात्री साडेबारा, एक वाजता त्यांचा दरवाजा ठोठावल्यावर वैतागून त्यांनी, 'जातो का घरी, अजून आमची झोप लागली नाही तोवर आलास उठवायला', असं म्हणून हाकलून लावलंय.

१९८१ ला गावस्करच्या नेतृत्वाखाली बरोबरीत सोडवलेल्या मालिकेचा थरार रेडिओवरील कॉमेंट्रीच्या माध्यमातून अनुभवला आहे, त्याची सर नंतर कुठल्याच मालिकेला, अगदी विश्वचषकालाही आली नाही. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं डावानं विजय मिळवला होता. भारताचा एक डाव २०१ धावांत आटोपला होता आणि एकट्या ग्रेग चॅपेलनं २०५ धावा काढल्या होत्या. पहिल्या कसोटीत मार खाल्ल्यानंतर दुसरी कसोटी अनिर्णित ठेवण्यात भारतीय संघाला यश आलं होतं. तिसऱ्या कसोटीच्या आधी गावस्करनं मालिकेत बरोबरी साधण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. एकूण परिस्थिती पाहता ते उसनं अवसान होतं असंच वाटत होतं. कसोटी सुरू झाल्यानंतर त्याची खात्री वाटू लागली.

गुंडप्पा विश्वनाथ (११४), संदीप पाटील (२३), सईद किरमानी (२५) आणि शिवलाल यादव (२०) यांच्या बळावर भारतानं पहिल्या डावात २३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं ४१९ धावा करून पहिल्या डावात १८२ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात दिलीप दोशीनं तीन तर, करसन घावरी, शिवलाल यादव आणि संदीप पाटीलनं दोन दोन विकेट घेतल्या. कपिल देवला फक्त एक विकेट होती.

भारतानं दुसऱ्या डावात ३२४ धावा केल्या. गावस्कर (७०), चेतन चौहान (८५), वेंगसरकर (४१), विश्वनाथ (३०), संदीप पाटील (३६) अशी सगळ्या प्रमुख फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली, परंतु शतक कुणाला झळकवता आलं नव्हतं. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी फक्त १४३ धावा करायच्या होत्या. ग्रेग चॅपेल, अॅलन बॉर्डर, किम ह्युजेस, रॉड मार्श अशा तगड्या संघासाठी विजयाची औपचारिकता बाकी असल्यासारखं होतं. पण म्हणून कॉमेंट्री ऐकण्याचा उत्साह कमी झाला नव्हता. चमत्कार होईल आणि भारतीय संघ जिंकेल अशी भाबडी आशा होती.

त्या काळात आमच्या शेतीच्या कामासाठी एक बैल हवा होता. आजोळहून बैल आणायला मला आदल्या रात्री पाठवलं. आजोळी एक शांत आणि गुणी बैल होता. तो माझ्यासारख्या शाळकरी पोरालाही घेऊन येणं सहज शक्य होतं. त्यासाठी माझी रवानगी केली होती. मी ती जबाबदारी आनंदानं स्वीकारली होती, कारण आजोळी रेडिओ होता आणि कसोटीच्या शेवटच्या दिवशी हक्काच्या रेडिओवर पहाटे कॉमेंट्री ऐकणं शक्य होतं.

पहाटे उठून कॉमेंट्री लावली. बिनाका गीतमालेच्या फायनलला रेडिओ स्टेशन नीट पकडायचं नाही तसंच महत्त्वाच्या मॅचच्या वेळी व्हायचं. प्रेक्षकांचा दंगा, कमेंटेटरची एक्साईटमेंट आणि रेडिओची खरखर असा तिहेरी संगम म्हणजे ऐकायची सोय नाही. कुठलंच स्टेशन नीट पकडत नव्हता रेडिओ. नुसता दंगा. तेव्हा मामा म्हणाले, 'आरं सगळीकडं म्याचच हाय. भक्तीसंगीताला अजून टाइम हाय.' त्यांना म्हटलं, 'मला म्याचच ऐकायची हाय.'

सुशील दोशी, सुरेश सरैय्या कमेंटेटर असावेत. प्रत्येक बॉलला उत्कंठा शिगेला पोहोचत होती. घावरी, दोशीनं सुरुवातीला जोरदार धक्के दिले. आणि पुढं कपिलदेवनं निम्मा संघ गारद केला. दिलीप दोशी आणि घावरीनं दोन दोन विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलिया संघाला अवघ्या ८३ धावांत गुंडाळून सामना ५९ धावांनी जिंकून मालिका बरोबरीत राखली. आजची मॅच अफलातूनच झाली. पण ती प्रत्यक्ष पहातानाही रेडिओवर अनुभवलेल्या १९८१ च्या थराराच्या जवळपासही पोहोचता आलं नाही.

Updated : 20 Jan 2021 4:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top