Home > मॅक्स ब्लॉग्ज > हॅलो, मी मजूर बोलतोय…

हॅलो, मी मजूर बोलतोय…

लॉकडाऊननंतर नाका कामगारांची संख्या वाढली आहे का? उद्योगधंदे ठप्प पडले असताना वाढलेल्या या बेरोजगारांच्या हाताला काम कसं मिळणार? पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झालेली असताना मजुरांच्या सामाजिक आणि आर्थिक वस्तुस्थितीचा आढावा घेणारा डॉ. सोमिनाथ घोळवे यांचा हा लेख नक्की वाचा...

हॅलो, मी मजूर बोलतोय…
X

लॉकडाऊनपासून असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांची चालू झालेली होरफळ अजूनही थांबलेली नाही. विशेषतः शहरातील चौकात आणि एमआयडीसी परिसरातील मजूर अड्ड्यावर थांबून काम मिळवणाऱ्या मजुरांची स्थिती कामाअभावी गंभीर झालेली आहे. अनलॉकमध्ये मजुरांना काम मिळण्याची स्थिती पूर्ववत होण्याऐवजी गंभीर आणि गुंतागुंतीची झाली असल्याचे पाहण्यास मिळते. त्यामुळे मजुरांचा काम मिळत नसल्याने धीर सुटत चालला आहे. सदर लेखात लॉकडाऊन आणि अनलॉक काळातील मजूर अड्ड्यावर येऊन काम मिळवणाऱ्या मजुरांच्या सामाजिक आणि आर्थिक वस्तुस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

लॉकडाऊनच्या काळातील अनुभव: (दि.२१ मे २०२०) घोटावडे फाटा, (ता. मुळशी. जिल्हा पुणे) येथील मजूर अड्ड्यावर दररोज येऊन बिगारी काम मिळवणारे चंद्रशेखर सिरसाठ. वय ५० वर्ष, शिक्षण १२ वी पास, गाव पालम तालुक्यातील (जिल्हा परभणी). गावाकडे शेती नसल्याने १५ वर्षापूर्वी रोजगारांच्या निमिताने पिरंगुट परिसरात आलेले. एमआयडीसी परिसरातील मजूर अड्ड्यावर थांबून 'मिळेल ते काम करणे' हा त्यांचा दिनक्रम.

कोणत्याही कामाला नाही हा शब्द नाही. एवढेच नाही तर मुलांच्या शिक्षणाला पैसा लागेल. या आशेने, भविष्यातील चिंतेने सिरसाठ यांची पत्नी देखील गेल्या दोन वर्षापासून मजूर अड्ड्यावर येवून काम मिळवत होत्या. (अनेक महिला मजूर ह्या मजूर अड्ड्यावर मजूरी मिळवण्यासाठी येत आहेत. बिगारी कामांच्या माध्यमातून कुटुंबाला हातभार लावतात, मजूर अड्ड्यावर पुरुष मजुरांच्या तुलनेत महिला मजुरांची संख्या कमी आहे. मात्र, अलीकडे महिला मजुरांचीही हळूहळू संख्या वाढत आहे.) या दोन्ही मजुरांना लॉकडाऊनमुळे काम मिळणे बंद झाले. परिणामी हातावर कुटूंब चालत असल्याने पुढचे दिवस असे काढायचे? हा प्रश्न सिरसाठ आणि त्यांच्या पत्नी यांच्या समोर उभा राहिला होता.


लॉकडाऊनमध्ये मजूर शिरसाठ आणि माझी भेट झाली ती अशी, मी दूध घेण्यासाठी दूध डेअरीवर गेलो होतो, तर रस्त्याच्या कडेला दोन व्यक्ती/मजूर उभे राहिलेले दिसले, त्यांच्या हातात पिशवी होती. त्यामुळे ते मजूर होते हे निश्चित. लॉकडाऊनमुळे मजूर अड्डे अजून सुरू झाले नव्हते, त्यामुळे त्यांच्याशी संवाद केला पाहिजे या विचाराने मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी बोलणार तेवढ्यात मजुरांकडूनच (सिरसाठ) संवाद सुरू झाला.

"साहेब कोणतेही काम करण्यास तयार आहे. हजेरी काय द्यायची ती द्या, पण काम द्या".

मजुरांचे हे शब्द ऐकल्यावर मला त्यांच्याशी काय बोलावे हे सुचत नव्हते. नंतर त्यांच्याशी झालेला संवाद मला विचार करायला भाग पाडणारा होता. बिगारी काम करणाऱ्या मजुरांना गावाकडचे नातेवाईक, कंत्राटदार, प्रशासन, शासन, कारखानदार व इतर असे कोणीही समजून घ्यायला तयार नव्हते. मजूर अतिशय पोरकेपणाचा अनुभवत घेत होते.

लॉकडाऊनमध्ये या मजुरांना थोडाही आधार मिळाला नाही. तसेच त्यांना कोणी मदत करेल. ही आशा मजुरांकडे नव्हती. लॉकडाउन किती दिवस राहणार आहे हे देखील माहित नाही. या मजुरांनी (सिरसाठ आणि त्यांची पत्नी) लॉकडाऊनच्या काळातील दिवस एकवेळेच्या जेवणावर काढले. त्यामुळे पूर्वीप्रमाणे काम करण्याची अंगात ताकद नाही की प्रबळ इच्छाशक्ती उरली नाही. भविष्यात पूर्वीसारखे काम मिळेल का नाही? हे देखील माहीत नाही, जीवनात सर्व अंधार, अशी सर्व वस्तुस्थिती सिरसाठ यांच्याशी केलेल्या संवादातून पुढे आली.


गावाकडे का गेले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला असता, सिरसाठ यांनी सांगितले की. आम्हा बिगारी काम करणाऱ्या मजुरांपुढे गावी जाऊन काय काम करणार? असा प्रश्न आहे. काम केल्याशिवाय पोट भरणार नाही. अशी घरची आर्थिक स्थिती. गावाकडे शेती नाही, फारसे चांगले घर नाही, धान्य नाही, धान्य रेशन दुकानावर घ्यावे म्हटले तर बरेच दिवस पुण्यात राहिल्याने रेशन कार्ड नाही. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून शहरात राहत असल्याने गावातील ओळखीचे मदत करतील असा भरोसा नाही.

उलट गावकडंच्यांना शहरात राहत असल्याने मजुरानेच (आम्हीच) मदत करावी ही आशा-अपेक्षा. शेतीतील कामे करण्याची सवय नसल्याने गावी जाऊन शेतीतील कामे करता येतील की नाही याची खात्री नाही. उन्हाळा चालू असल्याने शेतीतील कामे मिळत नाहीत. या सर्वांमुळे गावाकडे जाऊन तरी काय करणार?. पुढे मजूर सिरसाठ म्हणाले

"पोटाच्या तुकड्यासाठी गावी जाता येत नाही. गावी गेलो तर पोटाला तुकडा कोण देणार, भीक देखील मागता येत नाही".....!!! सर्व पोटाच्या तुकड्यासाठी चालू आहे.''(टीप : मराठवाड्यात पोट भरण्यासाठी भाकरीला 'तुकडा' शब्द वापरला जातो) लॉकडाऊनमध्ये सिरसाठ यांच्यासारख्या मजूर अड्ड्यावर येणाऱ्या अनेक मजुरांच्या कहाण्या होत्या. या कहाण्यांना वाचा फुटलीच नाही.

१. दुसरा अनुभव : अहमदनगर ते पुणे हायवे (दि. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी) अनलॉकमधील. अहमदनगर ते पुणे बाईकवर प्रवास करताना सकाळी आठ वाजता सुपा येथील एमआयडीसी परिसरात मजुरांची गर्दी जमायला लागलेली दिसली. मजुरांच्या गर्दीविषयी एका मजुराला विचारले असता कळले की, मजूर आज काम मिळण्याची वाट पाहत आहेत. काही मजुरांना काम मिळते, तर काहींना ११ वाजेपर्यंत थांबून रिकाम्या हाती घरी जावे लागते.

लॉकडाऊन पूर्वी सर्वांना काम मिळत होते, पण आता तसे नाही. मजुरांची संख्या वाढल्यामुळे मजुरांना काम मिळवण्यासाठी सकाळपासून धडपड-धावपळ करावी लागत आहे. सुप्या सारख्या छोट्या एमआयडीसी परिसरात मजुरांना काम मिळण्याची अशी अवस्था होती. पुढे कारेगाव, रांजणगाव, शिक्रापूर, वाघोली या ठिकाणच्या औद्योगिक परिसरात तर मजुरांची संख्या जास्त असलेले मजूर अड्डे दिसून आले. प्रत्येक चौकात मजूर कामांच्या शोधासाठी हातात पिशवी, हत्यारे, कामाचे उपकरणे घेऊन उभे राहिलेले होते. वाघोलीच्या चौकात तर मजुरांना उभा राहण्यासाठी जागा नव्हती. अंदाजे दीड ते दोन हजार मजूर असतील. येथील काही मजुरांशी संवाद करण्याचा प्रयत्न केला असता, ते सकाळी आठ पासून दहा वाजेपर्यंत उभे होते, त्यांना कोणीही (काम देणारे कंत्राटदार, मालक, मुकादम, इतर) काम देण्याची विचारणा केली नव्हती. त्यामुळे बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मजुरांची काम देता का ही केवळ मागणी होती. काम देत असाल तर बोला, असे अनेक मजुरांनी मत व्यक्त केले. मजुरांमध्ये काम मिळवण्यासाठी तळमळ-धडपड चालू होती. त्याचवेळी काम मिळाले नाही, तर काय करायचे याची देखील चिंता-काळजी चेहऱ्यावर दिसत होती. तरीही धाडस करून बोलण्याच्या मनस्थितीत नसलेल्या मजुरांशी संवाद केला.

वाघोली येथील मजूर अड्ड्यावर बालाजी शिंदे, (उस्मानाबाद), श्रीकांत जाधव (नांदेड) आणि रवींद्र वाघमारे (वाशीम) यांच्याशी सवांद करता आला. शिंदे सांगतात की, लॉकडाऊनमध्ये पुण्यात अडकलो होतो, गेल्या दहा वर्षात जेवढी बचत केली होती, ती सर्व लॉकडाऊनमध्ये खर्च झाली. त्यामुळे अनलॉकमध्ये गावी जाताना रिकाम्या हाती गेलो. पण गावी कामे मिळत नसल्याने पुन्हा मुळ ठिकाणी (वाघोली येथे) आलो. पण आता परिस्थिती पूर्ण बदलेली आहे. कारण पूर्वीप्रमाणे काम नाही की मजुरीचे दर देखील मिळत नाहीत.


मजूर अड्ड्यावर येणाऱ्या मजुरांची आर्थिक स्थितीची घसरण झालेली आहेच. त्याचबरोबर सामाजिक आणि व्यक्ती म्हणून असलेल्या प्रतिष्ठा, मूल्य या घटकांची देखील घसरण झालेली पाहण्यास मिळते. अड्ड्यावरून काम मिळवणाऱ्या मजुरांना आठवड्यातून किमान दोन दिवस तरी काम मिळत नाही. बिना कामाचे राहावे लागते. मजुरांची संख्या वाढल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मजूर सहज उपलब्ध होत असल्याने कंत्राटदार किंवा मालक मजुरांना त्यांच्या श्रमाचा योग्य तो मोबदला देत नाहीत.

अनलॉकपासून मजूर श्रमाचे किती पैसे मिळतील ह्याचा विचार करत नाहीत. केवळ हाताला काम कसे मिळेल याचा विचार करत आहेत, कारण काम मिळाले तर कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळणार आहे. लॉकडाऊनपासूनच कुटुंब कसे जगवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो अजूनही संपलेला नाही. अनलॉकमध्ये कुटुंबाचे आर्थिक प्रश्न सुटेल असे वाटले होते, पण मजुरी अभावी या प्रश्नांची तीव्रता जास्तच वाढली असल्याचे मत बालाजी शिंदे या मजुराने व्यक्त केले. काम मिळवण्यासाठी आणि मिळालेले काम टिकवण्यासाठी मजुरांना लाचारी स्वीकारावी लागत आहे का? हा प्रश्नच आहे. एक प्रकारे मजुरांनी स्वतःहून गुलामगिरी स्वीकारली/अंगिकारली आहे, अशी स्थिती असल्याचे मजुरांशी झालेल्या चर्चेतून दिसून आली. वेठबिगारीचे स्वरूप असल्याप्रमाणे स्थिती आहे.

अनलॉकमध्ये मजूर सर्वत्र फिरू शकतात, एकत्र काम करू शकतात, काम मिळवण्यासाठी मजूर अड्ड्यावर येतात ही वस्तुस्थिती आहे. पण त्या सर्व मजुरांना काम मिळते का? हा प्रश्न गंभीर आहे. मजुरांकडून रोजचे रोज काम मिळवणे हा दिनक्रम आहे. मात्र स्वतःच्या श्रमाला योग्य मोबदला मिळतो का? हा प्रश्न गौण आहे. कारण श्रमाच्या मोबदल्याविषयी फारसा विचार मजूर करत नाहीत असे रवींद्र वाघमारे यांनी सागितले. वाघोली येथील मजुरांशी चर्चा करताना किमान २०० रुपये, तर किमान ६०० रुपये या दरम्यान मजुरी मिळत असल्याचे दिसून आले. मजुरी किती मिळते हे कामाच्या स्वरूपावर अवलंबून आहे. या मिळणाऱ्यां मजुरीवर मजूर समाधानी नसल्याची भावना दिसून आली.

वाघोली येथील मजूर अड्ड्यावर किती मजूर असतील याविषयी अंदाज विचारला असता, किमान दररोज या अड्ड्यावर दोन हजारापेक्षा जास्त मजूर येत असतील, असे मत मजूर श्रीकांत जाधव यांनी व्यक्त केले. पुढील काही दिवसात अड्ड्यावर येणाऱ्या मजुरांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण अनलॉकमध्ये गावी गेलेले काही मजूर अजून परत आले नाहीत, ते हळूहळू येत आहेत. गावी गेलेले सर्व मजूर आल्यावर काम मिळवण्याची स्थिती अजून गंभीर होणार हे निश्चित.

अड्ड्यावरील मजुरांना काम देणारे मालक, कंत्राटदार/ज्यांच्याकडे काम मिळालेले असे लोक कधीच चांगले बोलत नाहीत. एक प्रकारे मजुरांनी त्यांची व्यक्ती प्रतिष्ठा, मूल्य गहाण टाकलेले आहे का? हा प्रश्न तसाच राहतो. कारण मालक काहीही बोलले तरी प्रतिकार करण्याचा अधिकार मजुरांना नाही. जर मजुरांनी प्रतिकार केला, तर दुसऱ्या दिवशी काम मिळणार नाही याची भीती मजुरांच्या मनामध्ये असते. दुसरी महत्वाची बाब अशी की, या मजुरांचे थोडे देखील संघटन नाही की संघटन करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. शासनाने देखील या मजुरांची दखल घेऊन मुलभूत प्रश्न मांडण्याचे, सोडवण्याचे व्यासपीठ तयार केले नाही, बोर्ड तयार केले नाही की, या मजुरांची नोंद करून घेणारी यंत्रणा बनवली नाही. असे अनेक प्रश्न या मजुरांचे आहेत. या प्रश्नांकडे सर्व बाजूने दुर्लक्ष करण्यात आले आहे.

लॉकडाऊनपासून मजुरांच्या मजुरीचे, उपजीविकेचे प्रश्न खूपच गंभीर आणि गुंतागुंतीचे झाले आहेतच. तसेच मजुरीच्या दरांमध्ये झालेल्या घसरणीमुळे मजुरांच्या श्रमाचे मूल्य देखील घसरले आहे. मजुरांना काम मिळण्याची शाश्वती थोडी देखील राहिलेली नाही. त्यामुळे मजुरांच्या मनामध्ये असुरक्षितेची, भीतीची भावना निर्माण झाली आहे. पूर्वीप्रमाणे कंत्राटदार, काम देणारे मध्यस्थ, मुकादम कामावर ठेवत नाहीत, ही देखील वस्तुस्थिती आहे. कामे कमी आणि मजुरांची संख्या जास्त अशी वाटचाल चालू असल्याने, मजुरांमध्ये आर्थिक असुरक्षिता निर्माण झालेली आहे. शासनाने लॉकडाऊननंतर रोजगाराची स्थिती व्यवस्थित हाताळली नसल्यामुळे आज ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे असे मजुरांना वाटते. शासनाने असंघटीत क्षेत्रातील मजुरांसाठी तयार केलेल्या योजनांचा लाभ, संरक्षण का मिळत नाही? हा प्रश्न निर्माण झालेला आहेच.

त्यामुळे शासनाकडून मजुरांच्या आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक स्थितीचे, असंघटीत मजुरांच्या संदर्भातील योजनाच्या सखोल मूल्यमापन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तसेच असंघटीत क्षेत्रातील मजुरांच्या रोजगार निर्मिती आणि मजुरांमध्ये रोजगार मिळण्याची शाश्वती यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

- डॉ. सोमिनाथ घोळवे

लेखक: डॉ. सोमिनाथ घोळवे हे शेती, दुष्काळ, पाणी प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाउंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत. ([email protected])

Updated : 16 Feb 2021 11:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top