Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > गडकरी सद्या काय करतात ?

गडकरी सद्या काय करतात ?

गडकरी सद्या काय करतात ?
X

कोरोना जगात सर्वत्र थैमान घालतो आहे. भारतातही परिस्थिती चिंताजनक बनलेली आहे. मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या संपूर्ण देशात येणाऱ्या संख्येच्या ४५ टक्के एवढी आहे. शिवाय मुंबई हे शहर देशाची आर्थिक राजधानी आहे. धारावी सारखी प्रचंड मोठी झोपडपट्टी देखील मुंबईतच आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेता मुंबईला या महामारीपासून वाचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारच नव्हे, तर केंद्र सरकारचा सुद्धा अग्रक्रम असायला हवा होता.

पण परिस्थिती काय सांगते? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार अतिशय निष्ठेनं आणि तेवढ्याच गांभीर्यानं आपलं काम करतांना दिसत आहे. उद्धवजी ठाकरे स्वतः जनतेशी सतत संपर्क साधत आहेत. विश्वासात घेत आहेत. सत्य परिस्थिती सांगत आहेत. केंद्र सरकारच्या आधी योग्य ती पावलं उचलत आहेत. कुणावरही टीका टिप्पणी करत नाहीत. आणि त्यांच्या ह्या सरळमार्गी नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनता देखील विश्वास ठेवताना दिसत आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला एका कुटुंबाचं स्वरूप देण्यात उद्धवजी यशस्वी ठरले आहेत. शरदचंद्र पवार हे भीष्म पितामह आहेत तर उद्धवजी अर्जुनाच्या भूमिकेत समर्थपणे संकटाशी दोन हात करण्यात गुंतलेले आहेत. अशा वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांचे त्यांना मनापासून सहकार्य मिळणे आवश्यक होते.

माणुसकीच्या नात्यानं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला हवे होते. फडणवीस त्यांच्यासाठी देखील ही सेवेची चांगली संधी होती. पण या लोकांना राज्यावर आलेलं हे संकट सत्ता मिळवण्यासाठी सुवर्णसंधी वाटत आहे. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जाऊ नये, यासाठी राज्यपाल महोदयांना हाताशी धरून चालवलेला खेळखंडोबा संतापजनक आहे. लाजिरवाणा आहे. बांद्रा येथे अशीच गर्दी जमवून सरकारला अडचणीत आणणे, अफवा आणि गैरसमजातून घडलेल्या हत्याकांडाला धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करणे, त्या निमित्ताने दलाल मीडियाची आगलावी भूमिका, भाजपा नेत्यांचे एकाचवेळी मीडियावर ठरवून सक्रिय होणे, कधी नव्हे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन येणे, ह्या साऱ्या गोष्टी सत्तेसाठी गिधाडं कशी टपून बसली आहेत, याचं बीभत्स उदाहरण आहे.

यावरही ताण म्हणजे पंतप्रधान मोदी यांची भूमिका किळस यावी अशीच आहे. ‘महाराष्ट्रातून केंद्राला जाणारा जी एस टी चा वाटा १,८५,९१७ कोटी आहे. आणि त्या बदल्यात केंद्राने महाराष्ट्राला परत दिलेली रक्कम आहे २८२४.५७ कोटी रूपये.’ या उलट उत्तर प्रदेशचा जी एस टी चा वाटा आहे ६५,२८१ करोड़ आणि बदल्यात केंद्राने उत्तर प्रदेशला परत दिलेली रक्कम आहे ८,२५५.१९ करोड ! ह्या मनोवृत्तीला काय म्हणायचे ? शिवाय केंद्राकडे महाराष्ट्र सरकारचे १६,००० करोड पडलेले आहेत. ते पण द्यायची नियत दिसत नाही. म्हणजे यांना महाराष्ट्र बरबाद व्हावा अशीच इच्छा आहे का ? देशात सर्वत्र ही महामारी पसरावी अशाच केंद्र सरकारचा प्रयत्न आहेत का ? संशयाला बरीच जागा आहे. येवढे तांडव सुरू असताना देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत. मात्र बांद्रा प्रकरण आणि पालघर प्रकरण होताच ते लगेच कसे सक्रिय झालेत ?

सर्वात जास्त संवेदनशील राज्य असूनही केंद्राने दिलेले मदत निधीचे आकडे द्वेष पूर्ण नाहीत का ? महाराष्ट्र म्हणजे मोदी शहा यांच्या नजरेत शत्रू राष्ट्र आहे का ? त्यातही कहर म्हणजे महाराष्ट्रातील फडणवीस यांच्यासह सर्व भाजपा नेते मुख्यमंत्री फंडाला मदत करण्याऐवजी पी एम केअर्स.. या फंडात जमा करा म्हणून जाहिरात करत आहेत !( ज्या फंडाचा हिशेब द्यायला सरकार तयार नाही ) स्वतः देखील तेच करतात आणि त्याबद्दल त्यांनाही जराही काही वाटत नाही. ही विकृती नाही का ? हा महाराष्ट्रद्रोह नाही का ? खोट्या नाट्या बातम्या पसरविणे, धार्मिक उन्माद भडकवण्याचा प्रयत्न करणे, यांच्याच पापातून झालेल्या पालघर हत्या कांडाचे निमित्त करून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे, असले पोरकट चाळे यांनी जोमाने सुरू केलेले आहेत ! सत्तेसाठी हे लोक पिसाळून गेलेले आहेत.

कसलाही विधिनिषेध यांना उरला नाही. याच फडणवीस यांच्या स्वतःच्या शहरात अनेक लोकांचे खून यांच्या कारकिर्दीत झालेत. त्यावेळी त्यांनी का नाही राजीनामा दिला ? उलट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर प्रकरणी तातडीने कारवाई करून शंभर पेक्षा जास्त लोकांना अटक केली. त्यातही भाजपकडे गावाचे सरपंचपद आणि सत्ता गेल्या दहा वर्षांपासून आहे. तरीही यांनी हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा नीच प्रयत्न केलाच. आणि तरीही यांचे लोक अनिल देशमुख यांचा राजीनामा मागण्याचा कोडगेपणा करतात. आपल्या ट्रोल्स द्वारे बदनामीची मोहीम चालवतात. महाराष्ट्राची जनता कोणत्या संकटात आहे, आणि आपण कोणते चाळे करत आहोत, याचेही या लोकांना भान उरले नाही.

वास्तविक याच न्यायानं विचार केल्यास प्रधानमंत्री मोदी यांनी नोटबंदी सारखाच लॉकडाऊन चा निर्णय सुद्धा अविचाराने घेतला. कुणाशी विचार विमर्श नाही, कसले नियोजन नाही, परिणाम किती भयंकर होतील याचे जराही आकलन नाही, मनात आलं आणि दिलं ठोकून. त्याचा परिणाम असा झाला की ३०/३५ लोकांना गावी परत जातांना अन्न पाण्यावाचून जीव गमवावा लागला. याची सर्व जबाबदारी मोदी यांचीच नाही का ? मग या निरपराध लोकांचे जीव घेतल्या बद्दल मोदी यांना तर सरळ फासावरच लटकवायला हवे का ? हाच प्रकार इतरांच्या हातून घडला असता, तर मोदी, फडणवीस आणि कंपूने अख्ख्या मंत्रिमंडळालाच नव्हे तर त्यांच्या परिवाराला सुद्धा फासावर लटकवा अशी मागणी केली असती. देशात गोंधळ निर्माण केला असता.

एकंदरीत फडणवीस असोत, चंद्रकांत पाटील असोत, रावसाहेब दानवे असोत किंवा भाजपचे इतर नेते असोत, त्यांच्या ज्या कारवाया सुरू आहेत, त्या महाराष्ट्राच्या उदात्त परंपरेला काळीमा फासणाऱ्या आहेत. कुठल्याही प्रकारे समर्थनीय नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात प्रचंड असंतोष या चौकडी बद्दल निर्माण झालेला आहे. आपले फेसबुक लाईव्हचे व्हिडिओ डिलिट करून पळ काढण्याची नामुष्की यांच्यावर येते आहे. तरी हे लोक माणुसकीने वागायला तयार नाहीत. राज्यपाल महोदयांची हालचाल देखील संशय निर्माण करणारी आहे. आगीत तेल ओतणारी आहे. मोदी-शहा यांच्याकडून काही आशा करणे म्हणजे आपलाच मूर्खपणा आहे. आणि त्याची आता साऱ्या देशालाच सवय झाली आहे.

पण एकीकडे महाराष्ट्र असा महामारीच्या तावडीत सापडला असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सद्या काय करतात ? असा प्रश्न मनाला भेडसावतो आहे. गडकरी हे काही साधारण मंत्री नाहीत. ते नागपूरचे आहेत. संघाच्या जवळचे आहेत आणि विशेष म्हणजे ते शेपटी टाकून बसणारापैकी नाहीत, असा पूर्वीचा समज होता. तरीही त्यांचे हातपाय एवढे बांधून ठेवले आहेत का, की ते चूप बसण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत..?

कारणं काहीही असली, तरी देश आणि राज्य संकटात असताना गडकरींचे चूप बसणे योग्य नाही. ते देशालाही परवडणारे नाही, राज्यालाही परवडणारे नाही. खरं तर ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या निमित्ताने गडकरींनी चक्रव्यूहातून बाहेर यायला हवं. देशात नुसती अंदाधुंद चाललेली आहे. सारा देश रामभरोसे आहे. चीन वरून मागवलेल्या किट्स वापरण्याच्या कामाच्या नाहीत. त्यात एवढा मोठा भ्रष्टाचार करण्याची कुणाची हिम्मत झाली असेल ? गडकरींनी यावर जाब विचारला पाहिजे. संघही त्यांच्या पाठीशी उभा राहू शकणार नाही का ?

महाराष्ट्राच्या भल्यासाठी गडकरींनी पुढाकार घेतलाच पाहिजे. त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंधही चांगले आहेत. मुंबई जर उद्ध्वस्त झाली, तर महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. देश उध्वस्त होईल. म्हणून मुंबई वाचवली पाहिजे. त्यासाठी आणखी एक गोष्ट होऊ शकते, नारायणराव राणे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्यासाठी ही अतिशय चांगली वेळ आहे. राणे यांच्या मनातला राग, अढी मी समजू शकतो. पण त्यांनी जर इगो बाजूला ठेवून उद्धवजींच्या दिशेनं दोन पावलं टाकलीत, तर मला खात्री आहे, उद्धवजी देखील मोठ्या मनाने आणि तेवढ्याच उत्साहानं पुढं येवुन त्याचं स्वागत करतील, याबद्दल शंका नाही. उद्धवजी, नितीनजी, राणे साहेब ( कारण त्यांची प्रशासनाची चांगली जाण आहे ) ही त्रिमूर्ती आणि त्यांच्यावर भीष्म पितामह शरदचंद्रजी पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद..! असं स्वप्न माझ्या डोळ्यासमोर आहे. असं झालं तर अख्खा महाराष्ट्र सर्वांना डोक्यावर घेवून नचेल. संपूर्ण देश या घटनेचं मनापासून स्वागत करील. पुन्हा एक नवा इतिहास या निमित्तानं महाराष्ट्राच्या भुमिमधून लिहिला जाईल..!

-

गडकरी सद्या काय करतात..?

माहीत नाही. पण माझा हा निरोप त्यांच्या कानावर जावा, नारायणराव राणे यांच्याही कानावर जावा आणि महाराष्ट्रात एक नवा इतिहास घडावा, ही अपेक्षा करायला काय हरकत आहे ?

-

तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर

अध्यक्ष, लोकजागर अभियान

संपर्क - 9822278988 / 9004397917 /9545025189

Updated : 25 April 2020 7:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top