Home > मॅक्स ब्लॉग्ज > Bangladesh : खालिदा झिया - एका संघर्षपर्वाचा अस्त!

Bangladesh : खालिदा झिया - एका संघर्षपर्वाचा अस्त!

बांगलादेशाच्या राजकीय इतिहासातील एक संघर्षमय झुंजार आणि धूर्त राजकारणी म्हणून बेगम खालिदा झिया ओळखल्या जातात. त्यांच्या निधनाने बांगलादेशाने एक महत्वाच्या जिद्दी लढवय्या नेत्याला गमावले. एक सामान्य गृहिणी ते बांगलादेशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा प्रवास आणि संघर्ष सांगताहेत लेखक समीर गायकवाड

Bangladesh : खालिदा झिया - एका संघर्षपर्वाचा अस्त!
X

नुकतेच निधन झालेल्या Bangladesh's first female Prime Minister Khaleda Ziaझिया बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया ह्या India भारताच्या बाजूने कधीच नव्हत्या, मात्र त्यांची जन्मतारीख, India's Independence Day भारताच्या स्वातंत्र्यदिनाची 15 ऑगस्ट ही होती; हा योगायोग विलक्षणच म्हटला पाहिजे. बांगलादेशाची राजधानी Dhaka ढाका येथे त्यांचे निधन झाले. त्या दीर्घ काळापासून आजारी होत्या.

देशातून परागंदा झालेले त्यांचे पुत्र तारिक रेहमान 17 वर्षांनी देशात परतले असताना खालिदा झिया यांचे निधन झालेय. महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेश सध्या विलक्षण अस्थिरतेच्या उंबरठयावर आहे. बेगम खालिदा झिया ह्यांचे भारता बरोबरचे राजकीय नीती धोरण कधीच सकारात्मक नव्हते. फरार होऊन भारतात राजाश्रय घेतलेल्या शेख हसीना यांच्या त्या कट्टर प्रतिस्पर्धी होत्या. त्या दोघींत विळ्या भोपळ्याचे वैर होते. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी हा खालिदा यांचा पक्ष तर शेख हसिना यांचा अवामी लीग हा पक्ष, हे दोन्ही पक्ष कायम आमने सामने लढत आलेत. त्यांचे पक्ष संघटन कायम एकमेकांविरोधात हिंसक आंदोलने करत आलेय.

जेमतेम काही महिन्यांपूर्वी शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. बांगलादेशी विद्यार्थी संघटनांनी देशव्यापी हिंसक उग्र आंदोलने करून हसीना सरकारला पळता भुई थोडी केली होती. शेख हसीना भारतात पळून गेल्यावर विद्यार्थी संघटनांच्या प्रथम पसंतीनुसार काळजीवाहू मोहम्मद युनूस सरकार अस्तित्वात आले. यांचेही परराष्ट्र धोरण पाकिस्तान, चीनला अनुकूल आणि भारताला प्रतिकूल असेच राहिलेय.

पाकिस्तान आणि आताच्या बांगलादेश सरकारमध्ये अनेक सहकार्य करार झाले आहेत. त्यांची देवाण घेवाणही वाढली आहे. शिवाय मदती आडून चीनचा हस्तक्षेपही पुरजोर झाला आहे. कोविड पश्चात काळात बांगलादेशने आर्थिक प्रगतीत नवे विक्रम केले आहेत. टेक्स्टाईल क्षेत्रात त्यांनी भारताला मागे टाकून निर्यात वाढवली आहे हे नाकारता येत नाही. मात्र हसीना सरकारच्या अस्तानंतर तिथे राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने अर्थचक्रास खीळ बसली आहे हे ही वास्तव आहे. काही दिवसांपूर्वी कट्टर भारतविरोधी असणाऱ्या आणि शेख हसीना यांच्या अवामी लीगचे कट्टर विरोधक असणाऱ्या ज्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले होते, त्यांचे दोन्ही म्होरके नेते अज्ञात व्यक्तींच्या गोळीबारात मारले गेलेत.

बांगलादेशात येत्या फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि त्याच्या तोंडावर या हत्या घडल्या आहेत. विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत स्वतंत्र राजकीय पक्ष (नॅशनल सिटिझन पार्टी) काढला होता व त्या द्वारे ते देशभरात उमेदवार उभे करणार होते. मात्र विद्यार्थी नेत्यांची हत्या झाल्याने त्या पक्षाचे भवितव्य अंधारात आहे.

शेख हसीना देशातून पलायन करून गेल्यापासून बेगम खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीला देशभरातले राजकीय वातावरण पोषक स्थितीत आहे. त्यांचे पुत्र तारिक रेहमान देशात परतले तेव्हा लोकांनी त्यांना मोठा सपोर्ट जाहीर केला आहे. इतक्या सर्व अस्थिरतेच्या काळात खालिदा झिया मरण पावल्या आहेत.

खालिदांचा मृत्यू, एआयडीएमके सुप्रिमो जयललिता यांच्या अंतिम काळातील घडामोडीशी साम्य दाखवतो. जयललिताही संशयास्पद रित्या कित्येक महिने आजारी पडल्या, त्यांना काय झाले होते याची खरी आणि नेमकी माहिती कधीही समोर आली नाही. त्या मरण पावल्या आणि एक अध्याय संपला. इथे गोष्ट उलटी आहे!

खालिदा झिया यांच्या पक्षाच्या मुख्य प्रतिस्पर्धी शेख हसीना यांना बांगलादेशातील न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे आणि जनमत अजूनही त्यांच्या विरोधात आहे. शिवाय बांगलादेशातील अवामी लीगचे बहुतांश मुख्य नेते एकतर मारले गेलेत वा फरार तरी आहेत. संघटना कमजोर झाली आहे. आंदोलनकारी विद्यार्थी नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या हत्या, अवामी लीगच्या विदयार्थी संघटनांनीच केल्या आहेत अशी आवई सध्याच्या सरकारने उठवलेली असल्याने विद्यार्थी संघटना पोलीस खात्याच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळे त्याही बाबतीत अवामी लीग पिछाडीवर आहे. अनेक विद्यार्थ्यांना नजरकैद केलेले आहे. अवामी लीगच्या कार्यालयांची राखरांगोळी केली गेलीय, देशभरात नेत्यांची घरे जाळली गेलीत. त्यांचे अमानुष खून झालेत.

अशा स्थितीत बेगम खालिदा झिया यांच्या मृत्यूची बातमी येणे ही अवामी लीगसाठी धोक्याची घंटा आहे कारण खालिदा यांच्या बीएनपी पक्षाला लोकांचा भावनिक पाठिंबा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्हे आहेत.

बांगलादेश जमात-ए-इस्लामी, इस्लामी आंदोलन बांगलादेश आणि हेफाजत-ए-इस्लाम या प्रमुख कट्टरतावादी पक्षांनी आधीच बीएनपीसोबत आघाडी करण्याचे सुतोवाच केले आहे. कदाचित ते आता स्वतंत्र एकमेका विरोधात लढू शकतात. सद्य काळात हसिना यांच्या अवामी लीगची राजकीय अवस्था कमकुवत झालीय आणि मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारने भारत द्वेषास इतके खतपाणी घातले आहे की, भारतात आश्रयास असलेल्या हसीना त्यांच्या देशात परतल्या तर आणखी अराजक माजेल, जे चीन आणि पाकिस्तान यांच्या पथ्यावर पडू शकते.

ही सर्व स्थिती पाहू जाता खालिदा झिया यांचा मृत्यू त्यांच्या पक्षाच्या राजकीय भवितव्यास काही काळासाठी तरी प्रचंड बळ देऊ शकतो, त्यांच्या प्रती असणाऱ्या सिंपथीचा फायदा घेऊन त्यांचे पुत्र ही निवडणूक जिंकू शकतात. तसेही तिथली शासकीय यंत्रणा त्यांनी अर्धीअधिक काबिज केली आहे. येत्या पंधरवड्यात जर आणखी राजकीय हत्या घडल्या नाहीत तर बीएनपीसाठी राजमार्ग साफ आहे असेच म्हणावे लागेल.

एकतर त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष हतबल अवस्थेत आहे आणि विद्यार्थी नेतेच मारले गेल्याने त्यांनी काढलेल्या नॅशनल सिटिझन पार्टीचा प्रभाव कदाचित आणखी ओसरू शकतो. हे सर्व बीएनपी आणि कट्टरतावादी पक्षांच्या पथ्यावर पडणारे असेच आहे. ज्या क्रमाने या साऱ्या घटना घडल्या आहेत त्यांची क्रोनोलॉजी पाहिली तर हे सारे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केले असेल असे वाटू लागते! असो. या घडीला तरी बेगम खालिदा यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला पाहिजे.

बांगलादेशाच्या राजकीय इतिहासातील एक संघर्षमय झुंजार आणि धूर्त राजकारणी म्हणून बेगम खालिदा झिया ओळखल्या जातात. त्यांच्या जीवनाची कहाणी म्हणजे संघर्ष, धैर्य आणि कथित राष्ट्रभक्तीची एक गाथा आहे, जी त्यांच्या पक्षाकडून नेहमीच सक्सेस स्टोरीप्रमाणे मांडली जाते. त्यांच्या निधनाने बांगलादेशाने एक महत्वाच्या जिद्दी लढवय्या नेत्याला गमावले असले तरी त्यांचा वारसा कायम राहील. एक सामान्य गृहिणी ते बांगलादेशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा प्रवास, या त्यांच्या जीवनात अनेक वळणे आणि आव्हाने होती, या दरम्यानच्या त्यांच्या संघर्षाने त्यांना एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनवले.

15 ऑगस्ट 1945 रोजी दीनाजपूर जिल्ह्यातील जलपाईगुड़ी येथे जन्मलेल्या खालिदा झिया यांचे बालपण साधे आणि शांततेत गेले. त्यांच्या वडिलांचा, इस्कंदर मजुमदार यांचा व्यवसाय होता आणि आई तायबा यांच्याकडून त्यांना घरगुती मूल्यांची शिकवण मिळाली. पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या खालिदा यांनी 1960 मध्ये सरकारी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली आणि नंतर सुरेंद्रनाथ महाविद्यालयात शिक्षण घेतले. जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना राजकारणाची ओढ नव्हती; त्यांचे विश्व घर आणि कुटुंबापुरतेच मर्यादित होते. पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळे भाग्य लिहिले होते.

1959 मध्ये खालिदा यांचा विवाह, झिया उर रहमान यांच्याशी झाला, जे पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात एक प्रमुख नेते होते. १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांना घरात नजरकैद करण्यात आले होते, पण तरीही त्या राजकारणापासून दूर राहिल्या. 1977 मध्ये झिया उर रहमान बांगलादेशाचे राष्ट्रपती झाले, आणि त्यांचा जीवनसाथी म्हणून खालिदा यांचे जीवन अधिक जबाबदारीपूर्ण झाले. पण 1981 मध्ये लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पतीची हत्या केली, ज्याने त्यांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली. या दुःखद घटनेने त्यांना राजकारणात सक्रिय होण्यास प्रेरित केले, आणि त्या एका दुःखी विधवेच्या भूमिकेतून त्या एका राष्ट्रीय नेत्याच्या भूमिकेत अवतरल्या. पतीच्या हत्येनंतर 1984 मध्ये खालिदा झिया यांनी बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला.

ऐंशीच्या दशकात हुसेन मोहम्मद इर्षाद यांच्या हुकूमशाहीविरुद्ध त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगल्या. अखेर त्यांच्या संघर्षाला यशाची फळे चाखता आली! 1991मध्ये त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणून निवडणूक लढवली आणि मोठा विजय मिळवला. त्या बांगलादेशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. 1991 ते 1996 या काळात त्यांच्या सरकारने उद्योगांचे खासगीकरण करून अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला, शिक्षण सुधारले आणि महिलांसाठी आर्थिक संधी वाढवल्या. 1991 च्या चक्रीवादळाने लाखो जीव आणि अब्जावधींचे नुकसान झाले, पण त्यांच्या नेतृत्वाखाली देश त्यातून सावरला.

1996 मध्ये दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांनी निवडणूक जिंकली, पण शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन विरोधी पक्ष अवामी लीगच्या बहिष्कारामुळे आणि मतदानाच्या कमी टक्केवारीमुळे विवाद झाला. अवामी लीगने देशव्यापी धरणे आणि आंदोलने केली. त्याची परिणती खालिदा यांच्या पदच्युतीत झाली. मार्च 1996 मध्ये राजीनामा देऊन त्या सत्तेतून बाहेर पडल्या. 2001 मध्ये त्या पुन्हा सत्तेत आल्या, या खेपेस त्यांनी भ्रष्टाचार आणि दहशतवाद संपवण्याचे वचन दिले होते.

2001 ते 2006 या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांची राजकीय भौगोलिक आव्हाने कायम राहिली, पण त्यांच्या नेतृत्वाने बांगलादेशाने राजकीय स्थैर्य अनुभवले. शेख हसीना यांच्याशी असलेली राजकीय शत्रुता ही त्यांच्या जीवनातील एक प्रमुख वैशिष्ट्य बनून गेली. या दोघींच्या सूडाच्या राजकारणाने देशाच्या राजकारणाला नेहमीच बदल्याच्या आगीत लोटले. 2006 मध्ये सत्ता सोडल्यानंतर खालिदा यांचा जीवन संघर्षपूर्ण राहिला. 2007मध्ये आणीबाणी लागू झाली आणि भ्रष्टाचाराच्या आरोपात त्यांना अटक करण्यात आली.

2014 मध्ये डोनेशन रकमांच्या निधीच्या गैरव्यवहार प्रकरणात खटला सुरू झाला, आणि फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. ऑक्टोबर 2018 मध्ये अतिरिक्त आरोपांत आणखी दहा वर्षांची शिक्षा झाली. या सर्व आरोपांना त्यांनी राजकीय षडयंत्र म्हटले. त्यांचा राजकीय वारस असणारा त्यांचा मुलगा तारेक रेहमान याला देखील आजीवन कारावासाची शिक्षा झाली. या कठीण काळातही त्या धैर्याने उभ्या राहिल्या, जणू जीवनाच्या वादळातही अटळ राहिल्या कारण त्यांचा मुलगा तारिक, हा 2007 मध्येच देश सोडून परागंदा झाला होता. हा कालखंड खालिदा यांच्यासाठी अनेक आव्हानांनी भरलेला होता.

एप्रिल 2019 पासून त्यांची प्रकृती अधून मधून ढासळत राहिली. त्यांच्या विदेश उपचारासाठी शेख हसीना यांनी कायम परवानगी नाकारली. मार्च 2020 मध्ये वैद्यकीय उपचारांसाठी तुरुंगातून तात्पुरते सोडण्यात आले. या शेवटच्या वर्षांत त्या आरोग्याच्या लढाईत गुंतल्या होत्या, पण त्यांचा आत्मविश्वास कधीही डगमगला नाही. मागील काही महीने त्यांची प्रकृती गंभीर होती असे सांगितले जात होते. आज ढाका येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बांगलादेशाने एका लढवय्या, वादग्रस्त आणि जिद्दी नेत्याला गमावलेय. काही काळासाठी तरी त्यांनी लोकशाही आणि महिलांचे सशक्तीकरण केले होते हे मान्य करावे लागते.

इथे एका वेगळ्या नोंदीची दखल घ्यावी लागते ती म्हणजे बेगम खालिदा झिया यांनीच तस्लिमा नसरीन यांच्या पुस्तकावर बंदी घातली होती. नसरीन पलायन करून भारतात आल्या. खरे तर खालिदा ह्या तिथल्या कट्टरतावाद्यांच्या मुखवटा झाल्या होत्या, त्यांनी नसरीन यांना कधीच सपोर्ट केला नाही आणि अकारण आपल्याला नाराजीचा सामना नको म्हणून शेख हसीना यांनीही या प्रकरणी सोयीस्कर मौन पत्करले होते. बांगलादेशातील तीन महत्वाच्या स्त्रियांची ही तीन टोके होती!

दौलतदिया (Daulatdia) हा बांगलादेशातील इलाखा जगातील सर्वात मोठी वेश्यावस्ती म्हणून ओळखले जातो. दोन शतकांचा डेटा सांगतो की इथे स्त्रियांवर अमानुष अत्याचार केले जातात. मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाचे अनेक प्रकार अनेक दशकांपासून इथे सुरू आहेत. जगातले सर्वांत मोठे आणि भीषण चाइल्ड सेक्सवर्किंग इथे चालते. खालिदा झिया यांच्या तुलनेत शेख हसीना यांच्या काळात इथे मोठ्या प्रमाणावर शोषण आणि दडपशाही झाली, या स्त्रियांचे अतोनात हाल झाले. त्यावरून हसीना सरकारला टीकेचा सामना करावा लागला. चार दशके केवळ स्त्रियाच मुख्य सत्तापदी असूनही हा प्रश्न अधिक बिकट आणि भीषण स्थितीला पोहोचला ही बाब खूपच दुर्दैवी आणि दुःखद म्हणावी लागते.

बांगलादेशचे राजकारण चार दशकांपासून खालिदा झिया आणि शेख हसीना यांच्यातच फिरत राहिलेय. बांगलादेश अराजकाच्या एका विचित्र वळणावर पोहोचलेला असताना या दोघीपैकी एकीला जीव वाचवण्यासाठी देश सोडून पळून जावे लागलेय तर एकीचा मृत्यू झालाय, हा न्याय अजबच म्हणावा लागेल.

एकेकाळी दक्षिण आशियाई देशांचे नेतृत्व करणाऱ्या भारतासाठी सार्क'च्या दृष्टिकोनातून हा काळ कठीण अग्निपरीक्षा घेणारा असू शकतो!

समीर गायकवाड

Updated : 30 Dec 2025 1:38 PM IST
Next Story
Share it
Top