जिजाऊ : वर्तमान आणि भविष्य घडवणाऱ्या विचारशक्ती
आई केवळ स्वतःचे घर घडवत नाही, तर ती राष्ट्राचे भविष्यही घडवू शकते हे राजमाता जिजाऊ यांनी त्याकाळी सिद्ध केलं. आजच्या सामाजिक अस्थिरतेत, स्त्रीविरोधी मानसिकता, असमानता आणि मूल्यघसरण यावर उत्तर शोधताना जिजाबाईंचे संस्कार कसे मार्गदर्शक ठरतात सांगताहेत सिरत सातपुते
X
१२ जानेवारी म्हणजे Rajmata Jijabai जिजाऊंचा जन्मदिवस! जन्मदिनानिमित्त जिजामाता यांना विनम्र अभिवादन! जिजाबाईंनी Chhatrapati Shivaji Maharaj शिवाजी महाराजांसारखा एक आदर्श राजा घडवला आणि म्हणूनच जिजाबाई या इतिहासातील फक्त व्यक्ती नाहीत, तर वर्तमान आणि भविष्य घडवणाऱ्या विचारशक्ती आहेत, आजच्या समाजाला दिशा देणाऱ्या प्रेरणास्रोत आहेत. जिजाबाईंच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया.
भारतीय इतिहासात समाजाला नवी दिशा देणाऱ्या स्त्रियांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यामध्ये राजमाता जिजाबाई या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा विशेष उल्लेख करावा लागेल. राजमाता जिजाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री! जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेड (जिल्हा बुलढाणा) येथे झाला. त्या सिंदखेडचे सरदार लखुजी जाधव यांच्या कन्या होत. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्या काळातील राजकीय अस्थिरता, मुघल व आदिलशाही सत्तेचा अन्याय, प्रजाजनांवरील अत्याचार यामुळे जिजाबाईंच्या मनात स्वराज्याची तीव्र आकांक्षा निर्माण झाली.
पुणे येथील लालमहालात जिजाबाईंनी शिवाजी महाराजांचे संगोपन केले. बाल शिवबाला जिजाऊ रामायण, महाभारत तसेच संतकथा सांगत. केवळ कथा सांगून न थांबता, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य, प्रजेबद्दल कर्तव्यभावना आणि स्वराज्यासाठी बलिदानाची तयारी त्यांनी शिवबाला शिकवली. शिवाजी महाराजांच्या बालपणापासूनच त्यांच्या मनावर स्वराज्य, न्याय, धर्मनिरपेक्षता, स्त्री-सन्मान आणि प्रजाहिताचे संस्कार जिजाबाईंनी रुजवले.
राजमाता जिजाबाईंनी आपल्या कर्तृत्वाने आणि विचारांनी इतिहास घडवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता या केवळ आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या पहिल्या शिल्पकार होत्या. बाल शिवबातुन शिवाजी महाराज घडवताना “प्रजेचे रक्षण करणारा, स्त्रीचा सन्मान करणारा, धर्मनिरपेक्ष आणि न्यायप्रिय शासक” अशी आदर्श राजाची व्याख्याच जिजामातेने जगाला दिली. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे केवळ राजकीय सत्ता नव्हते, तर ते लोककल्याणाचे राज्य होते.
जिजामाता स्वतः अत्यंत कणखर, धैर्यवान आणि दूरदृष्टीच्या होत्या. युद्धकाळात आलेली संकटे, पती-पुत्रांचे दुरावणे, राजकीय संघर्ष हे सर्व त्यांनी अपार संयमाने पेलले. स्वराज्याच्या उभारणीसाठी त्यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवले.
इ.स. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, हे स्वप्न जिजामातांनी आयुष्यभर पाहिले होते. मात्र दुर्दैवाने राज्याभिषेकानंतर काही दिवसांतच त्यांचे निधन झाले. आज जिजामाता या त्याग, मातृत्व, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्वाच्या प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी सिद्ध करून दाखवले की आई केवळ स्वतःचे घर घडवत नाही, तर ती राष्ट्राचे भविष्यही घडवू शकते.
आजच्या काळात जिथे सत्ताकेंद्रित राजकारण, नैतिकतेचा ऱ्हास आणि सामाजिक विद्वेष दिसतो, तिथे जिजाबाईंची शिकवण अधिक महत्त्वाची ठरते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनावर न्याय, स्त्री-सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजाहित यांचे संस्कार रुजवले. आज पालक, शिक्षक आणि समाज यांनी बालवयापासूनच मुलांमध्ये लोकशाही मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलता निर्माण करणे आवश्यक आहे. जिजाबाईंचे नेतृत्व हे स्त्री नेतृत्वाबाबतचा पारंपरिक दृष्टिकोन बदलणारे आहे. आज महिलांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढत असताना, त्यांचे धैर्य आणि दूरदृष्टी मार्गदर्शक ठरते. म्हणूनच जिजाबाई या मूल्याधिष्ठित नेतृत्वाच्या प्रतीक आहेत.
आजचा समाज विज्ञान आणि तंत्रज्ञानात पुढे गेला असला, तरी मूल्यांची घसरण, असमानता, स्त्रीविरोधी मानसिकता, अंधश्रद्धा आणि सामाजिक दरी अजूनही दिसते. अशा परिस्थितीत जिजाबाईंचे संस्कार आणि जबाबदारीचे भान आज अधिक महत्त्वाचे ठरतात. जिजाबाई आपल्याला जबाबदार नागरिक घडवण्याची शिकवण देतात. आजच्या सामाजिक अस्थिरतेत, स्त्रीविरोधी मानसिकता, असमानता आणि मूल्यघसरण यावर उत्तर शोधताना जिजाबाईंचे संस्कार मार्गदर्शक ठरतात.
जय जिजाऊ!
सिरत सातपुते






