Home > मॅक्स ब्लॉग्ज > मालिकांमध्ये बहुजन स्त्रियांचे होणारे विद्रुपीकरण कधी थांबणार?

मालिकांमध्ये बहुजन स्त्रियांचे होणारे विद्रुपीकरण कधी थांबणार?

टीव्ही दररोज दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधून मनोरंजन होणे हा हेतू आहे, पण यामधून बहुजनांवर ब्राम्हणी वर्चस्व राबवण्याचा हेतू कुणालाही न कळत केला जातो आहे, असे विश्लेषण मांडले आहे, वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी...

मालिकांमध्ये बहुजन स्त्रियांचे होणारे विद्रुपीकरण कधी थांबणार?
X

Photo courtesy : social media

नुकतेच स्वामी समर्थ या मराठी मालिकेत स्वामी समर्थ महाराजाने मालोजीराजे भोसले उशिरा आले म्हणून त्यांच्या मुस्काटात मारल्याचे दृष्य दाखवले आहे. या दृष्याला ऐतिहासिक आधार काय ? त्याचे पुरावे काय ? याचा संबंधच येत नाही. आपल्या मनात जे विकृत आहे ते रेटून दाखवलं जाते. समाजमन जाणीवपूर्वक दुषित केले जाते. आपल्या मनातल्या सुप्त विकृती समाजावर थोपवल्या जातात. मालोजी राजेंच्या कानफटात दिलेला प्रसंग दाखवण्यामागेही अशीच विकृती आहे यात शंका नाही. रामदास स्वामींनी शिवाजी राजांना हातातली काठी फेकून मारल्याचे एका चित्रपटात दाखवले होते. हिच विकृती या मालिकेत आहे.

तुम्ही कुणीही असा, राजे असा, विद्वान असा तुमची लायकी आमच्यापुढे नगण्य आहे. आम्हीच श्रेष्ठ, आम्हीच मोठे हा माज यातून व्यक्त होत असतो. रामदास स्वामी, स्वामी समर्थ अशी माणसं म्हणजे या विकृतांसाठी भांडवल. त्यांचा उपयोग करून हे आपल्या विकृती त्यांच्याद्वारे समाजात पेरत असतात. हा पाताळयंत्रीपणा, धूर्तपणा आजही बहुजन समाजाच्या लक्षात यायला तयार नाही. हजारो वर्षे या देशात असेच बहुजनांना वापरले. त्यांची औकाद आमच्यापुढे कवडीमोल आहे हे दाखवत दाखवत त्यांचा, त्यांच्या संपत्तीचा, अधिकारांचा एकतर्फी उपभोग घेतला. देवाच्या व धर्माच्या आड दडत या सर्व समाजाला आपल्या अंकीत ठेवले. त्यातून मुंडी वर करू दिली नाही. ज्यांनी ज्यांनी बंड केले त्यांना संपवले. बहुजन समाजातल्या मुर्खांना व बावळटांना हाताशी धरूनच त्यांना संपवले. या विकृतांच्याविरूध्द बंड करणाऱ्यांचे, वेगळा विचार मांडणाऱ्यांचे त्यांनी मुडदे पाडले. बहुजनांच्यातलीच मुर्खांना हाताशी धरून त्यांचे मुडदे पाडले. ज्यांना असे संपवता आले नाही त्यांचे इतिहासाच्या पुस्तकातून, कथा-कादंब-यातून, मालिका व चित्रपटातून प्रचंड विकृतीकरण केले. यात छत्रपती संभाजी राजे, महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी अशी अनेक मोठमोठी माणसं येतात. त्यांची येथेच्छ बदनामी, थट्टा, टिंगल, टवाळी व अवहेलना केली गेली.

हा विकृत प्रकार आजही चालू आहे. विशेष म्हणजे बहुजन समाजातील गुलाम डोक्याची बांडगुळच यांच्या हातातले हत्यार आहेत. या बांडगुळांच्या जीवावरच हे उद्योग केले जातात. या विकृतीला, वर्ण-श्रेष्ठत्वाच्या माजाला कोणी विरोध केलाच तर त्यांना शिव्या द्यायला, मारहाण करायला, त्यांच्यावर हल्ले करायला हिच बहूजन समाजातली गुलाम बांडगुळ धावून येतात. जन्मजात बुध्दीशी वैर असलेले हे मुर्ख त्यांच्या हातातले हत्यार होतात. हेच गुलाम असलेले कु-हाडीचे दांडे गोतास काळ ठरले आहेत. हा इतिहासही आहे आणि वर्तमानही आहे. या विकृतांच्यावर काय लिहीले किंवा बोलले की पहिले चवताळून उठतात ते हेच मूर्ख गुलाम. देवाच्या आणि धर्माच्या नावावर या विकृतांनी कसाही हैदोस घालावा तो या येड्यांना मान्य असतो. ते डोके लावत नाहीत, चालवत नाहीत. त्यांच्या या अंधपणाचा व गाढवपणाचा फायदा घेत ही मस्तवाल मंडळी आपले जातीयवादी अजेंडे रेटत राहते. बहुजनांच्या जोरावर बहुजनांनाच गुलाम करत राहते. त्यांच्या अस्मितांची टवाळी करत राहाते, थट्टा करत राहते. हे दुष्टचक्र कधी थांबेल का ? मुठभर जातीयवादी, धुर्त व कपटी 'ब्राम्हण्य'वाद्यांच्या अंकीत असणारा बहुजन समाज कधी जागा होईल का?

मालिकांमधून काय काय दाखवले जाईल ? कसले कसले दाखवले जाईल ? याचा नेम नसतो. अत्यंत विकृत, हिन गोष्टी या मालिकामधून दाखवल्या जात आहेत. हे दाखवताना ती कलाकृती, साहित्य म्हणून नाही दाखवली जा,त त्याच्या मागे हेतू, नियोजन आणि धोरण असल्याची जाणीव होते. निव्वळ करमणूक म्हणून 'प्रॉडक्शन हाऊस' वाले हे दाखवत नाहीत हे नक्की. टीव्ही वर लागणा-या प्रत्येक मालिकेचा बारकाईने अभ्यास केल्यावर हे लक्षात येते. या मालिकांमधून बहुजन समाजातल्या स्त्रियांचे प्रतिमाहनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. टी व्ही वर लागणा-या बहुतेक मालिकांमध्ये दाखवल्या जाणा-या बहूजन स्त्रिया कट-कारस्थानी, कपटी, पाताळयंत्री, अहंकारी व मुर्ख दाखवल्या जातात. त्या कुटूंबात कशा आगी लावतात, आपल्याच घरात कशी कट-कारस्थाने करत असतात हे दाखवले जाते. विशेष म्हणजे या कपटी, कारस्थानी व पाताळयंत्री स्त्रिया दाखवताना पाटील, देशमुख, इनामदार, घाटगे-पाटील, शिंदे पाटील, सावकार, सरकार अशा मराठा घराण्यातल्याच दाखवल्या जातात. इतर बहुजन स्त्रिया त्यांच्या हस्तक व मोलकरणी दाखवल्या जातात.

टी व्ही वर दाखवल्या जाणा-या स्त्री पात्रात अपवाद म्हणूनही एखादी कपटी, पाताळयंत्री व धोकेबाज असणारी 'ब्राम्हण स्त्री' व्यक्तीरेखा दाखवली जात नाही. 'स्टार प्रवाह' या वाहिनीवरती लागणारी 'सुख म्हणजे नक्की काय असते ?' ही मालिका अशीच आहे. यात शिर्के पाटील, घाडगे पाटील असलेल्या 'शालिनी व मालिनी' नावाच्या स्त्रिया कपटी व कारस्थानी दाखवल्या आहेत. किरण मानेंना काढून टाकलेल्या 'झी मराठी' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतही हेच दाखवले आहे. 'देवयानी' मालिकेत विखे पाटलांच्या घरातही हेच दाखवले आहे. शेवटी कलाकृती ही कलाकृतीच असते. त्यात जातीयवाद नसतो असे म्हणायचे असेल तर अशा किती मालिका आहेत ज्यात ब्राम्हण स्त्रियांना असे विकृत दाखवले आहे? त्यांना कपटी, कारस्थानी व मुर्ख दाखवले आहे. 'स्टार प्रवाह'' या वाहिनीवर 'इश्काचा नादखुळा' नावाची मालिका दाखवली जाते.

त्या मालिकेत 'ताईजी' नावाचे पात्र आहे. ते पात्र 'ब्राम्हण' स्त्री चे आहे. तिचे आडनाव कुलकर्णी दाखवले आहे. सदर स्त्री पात्र गँगस्टर आहे. पण तीला 'ताईजी' म्हणवले आहे. ही कुलकर्णी असणारी गँगस्टर व्यक्तीरेखा आदबशीर दाखवली आहे. ती मुख्य आहे. म्हणजे ती गँगस्टर असूनही सुसंस्कृत, आदबशीर, चांगली दाखवली आहे. बाकी इतर मालिकांमध्ये दाखवल्या जाणा-या देशमुख, घाडगे पाटील, शिर्के पाटील, शिंदे पाटील आदी आडनावाच्या स्त्री व्यक्तीरेखा अतिशय कपटी, निच, विकृत, पाताळयंत्री दाखवल्या आहेत. हा जातीयवाद आहे की काय आहे ? बहूजन स्त्रीयांना असे पेश करण्यामागे नक्की काय प्रयोजन आहे ? बहूजन स्त्रीयांना असे विकृत व लफडेबाज का दाखवले जाते ? त्यांचे प्रतिमाहनन का केले जाते ? त्यांची पात्रे उद्दात, थोर, कर्तृत्वान, धोरणी का दाखवली जात नाहीत ? त्या केवळ कपटी, कारस्थानी व लफडेबाजच का दाखवल्या जातात ? याचे उत्तर 'प्रॉडॉक्शन हाऊस' देतील का ? विविध वाहिन्यांवर बहूजन स्त्रीयांचे जाणिवपुर्वक सुरू असणारे विकृतीकरण आणि विद्रुपीकरण थांबणार आहे का ? 'प्रॉडॉक्शन हाऊस' च्या मनात असलेली जातीयवादी विकृती थांबणार आहे की थांबवावी लागेल ?

दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी

Updated : 31 Jan 2022 4:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top