इजाजत…

काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांमधील एक चित्रपट म्हणजे 'इजाजत'... 'इजाजत' केवळ एक सिनेमा नाही तर जीवनातील नात्यांचा हळुवार उलगडा करून दाखवणारी एक हळवी कविता आहे. वाचा इजाजत आणि नात्यांचा बंध सांगणारा समीर गायकवाड यांचा लेख

इजाजत…
X

बाहेर रोमँटिक पाऊस पडतोय आणि मी जाऊन पोहोचलोय त्या रेल्वे स्टेशनवर जिथे कधीकाळी रेखा आणि नसिरुद्दीन त्या गदगदून आलेल्या, घनगर्द अंधारात दडलेल्या स्टेशनवर एक रात्र घालवण्यासाठी अकस्मात एकत्र येऊन थांबले आहेत. एकमेकाला पाहून त्यांच्या मनात अनेक भावना दाटून आल्यात. मागच्या जखमा ताज्या झाल्यात अन काही जुन्या खपल्या देखील निघाल्यात. त्याच्या जीवनात आलेल्या 'दुसरी'ची आता काय अवस्था आहे? हे तिला जाणायचेय अन् आपण कसे वाहवत गेलो, आपली चूक नव्हती हे त्याला सांगायचेय....

रात्रभर तो तिच्या कडे बघत बोलत राहतो. मात्र, ती अधून मधून नजर चुकवत राहते. त्याला खरे तर माफी मागायचीय पण एकाच दमात सारं सांगण्याची त्याची हिंमत होत नाहीये. तिलाही आठवत्येय की, सुरुवातीला आपण किती सुखी होतो. मात्र, त्याने आपल्याशी प्रतारणा करावी. याचा धक्का कसा पचवावा, हे तिला उलगडलेले नाही. त्यांची अबोल तगमग पाहून रात्रभर तळमळत असणारा अंधार तिच्या अंगावरच्या शालीत तिला अलगद लपेटून चिंब झालाय अन मंद पिवळसर उजेड त्याच्या ओलेत्या डोळ्यात झिरपतोय.

निर्मनुष्य स्थानकावरच्या प्रतिक्षागृहाच्या खडबडीत दगडी भिंती त्या दोघांना रात्रभर अनुभवून सुन्न होऊन गेल्या आहेत. ते ज्या टेबलभोवती बसले होते. तिथल्या खुर्च्या त्यांना जवळ आणण्यासाठी आसुसल्या आहेत. तर पहाटेच्या गारव्याला त्यांना एकत्रित बाहुपाशात घ्यायचे आहे. मात्र, ज्या बाकावर ते दोघे बसून आहेत. त्याला मात्र त्यांचा अबोला भावतो आहे. स्थितप्रज्ञ होऊन त्या दोघांना तो आपल्या कवेत घेऊन बसला आहे. तिथल्या हेडलॅम्पला त्या दोघांना डोळे भरून पाहायचेय तर प्लॅटफॉर्मवरील लांबसडक कॉरिडॉरला त्यांचे खाली पडणारे अश्रू झेलायचे आहेत.

गुलाबाची एकेक पाकळी हळूहळू अल्वारपणे बाजूला काढावी तशा एकेक घटना तो तरलपणे तिच्या पुढ्यात मांडतोय, त्याचं दुखणं ऐकता ऐकता ती आतूनच धुमसून निघत्येय, आपण कुठे कमी पडलो याचा तिचा शोध संपत नाहीये अन रातकिड्यांची किर्रर्र देखील सरत नाहीये.

तिला जाणून घ्याययचेय ती घरात नसताना 'त्या' रात्री घरात नेमके काय झाले होते ? तो तसं का वागला होता ? त्यालाही सत्य सांगायचेय, मात्र सत्य सांगताना त्याला तिचं मन पाकळीवरच्या दवबिंदूसारखं जपायचं आहे. तो जीवापाड प्रयत्न करतोय, त्या बंद खोलीची काचेची पिवळसर तावदाने डोळ्यात पाणी आणून त्याच्या चेहऱ्याकडे पाहतायत अन शिसवी दरवाजा भिंतीत तोंड खुपसून मूक अश्रू ढाळतोय!

ती अधून मधून नाकावरचा चष्मा मागे सरकावण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे बघत्येय, त्याच्यात काय बदल झालेत. याचा हळूच अंदाज घेतेय. तर तिच्याकडे तिरक्या नजरेने डोळे भरून पाहत ती किती बदलली आहे? याचे गणित तो करतोय. बघता बघता पहाट सरत आलीय, आपल्या मनातलं मळभ त्यानं रितं केलंय. "झालं गेलं विसरून जा अन माझ्याकडे परत ये इतकंच सांगायचे बाकी राहिलंय" असं सांगायचाच अवधी आहे.

दरम्यान रात्रभर झोपी गेलेल्या सभोवतालच्या झाडाच्या पालवीला आत जाग आलीय. अन वाऱ्याचा रात्रीचा सूर देखील बदललाय. 'तो' मनाचा हिय्या करून तिच्याशी आता बोलणारच आहे. इतक्यात तांबड्या पिवळ्या सुर्यकिरणांना सोबत घेऊन "तोही ' तिथे येतो! हा 'तो' म्हणजे तिचा सध्याचा पती ! त्याच्याकडे नजर जाताच ह्याचे शब्द गळ्यात विरतात, अश्रू डोळ्यात विझून जातात. स्तब्ध होऊन जागीच थिजून जातो. रात्रभर दोलायमान झालेलं तिचं मन 'त्याला' पाहून किंचित खुलून उठतं.

तिचं हसू खरं की खोटं याचा अंदाज बांधत हा रडवेला होऊन जातो. त्या दोघांना रात्रभर अनुभवणारे ते प्लॅटफॉर्म, ती खोली, त्या खिडक्या, तो दरवाजा, टांगता हेडलॅम्प, तांबडे पिवळे दिवे, तो बाक, ते टेबल, त्या खुर्च्या साऱ्यांना नियतीने चकवा दिलाय. सारेच हिरमुसले आहेत.

मी देखील चेहरा बारीक करून तिथून निघालो आहे. पाऊस पूर्ण थांबला आहे... बाहेर प्रसन्न संध्याकाळ झालीय अन आकाश निरभ्र झालेय. उंच आकाशात उडणाऱ्या बगळ्यांच्या त्रिकोणी थव्यात मी व्हिक्टरीचे 'व्ही' शोधत शीळ घालत निघतोय....

जीवन असेच आहे. एका हातात काही तरी गवसलेय म्हणेपर्यन्त दुसऱया हातातले काही तरी गळून पडलेले असते. साऱ्यांना सारे मिळत नसते, जो क्षण समोर आहे. त्याला स्वच्छंदीपणे समोर जाताना जीवनाशी व स्वतःशी प्रामाणिक राहिले की दुःखाचा आनंदही सुखाइतकाच घेता येतो.

काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांत 'इजाजत'चे स्थान फार वरचे आहे..... 'इजाजत' केवळ एक सिनेमा नाही तर जीवनातील नात्यांचा हळुवार उलगडा करून दाखवणारी हळवी कविता आहे.

मनात खोल खोल रुतून बसणारी अन उत्तुंग अभिनयाने सजलेली, नटमोगरी नसली तरीही सोज्वळ चाफ्यासारखी दरवळणारी प्रेमपुष्पांची नाजूक गाथा आहे... मी जेंव्हा जेंव्हा 'इजाजत' पाहतो, तेंव्हा नात्यांचे अर्थ नव्याने शिकतो...

जीवनातील सुखदुःखाच्या व्याख्या नित्य नव्याने सांगणार्‍या रुपेरी पडद्यास नम आँखोसे सलाम .....

- समीर गायकवाड.

Updated : 2020-10-13T07:30:54+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top