Home > मॅक्स ब्लॉग्ज > IAS भाग्यश्री बानायत:अतूट प्रेरणा

IAS भाग्यश्री बानायत:अतूट प्रेरणा

IAS भाग्यश्री बानायत:अतूट प्रेरणा
X

जगभर कोरोनाने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. जगात या पूर्वी विविध देशात विविध प्रकारच्या साथी, नैसर्गिक आपत्ती, मानव निर्मित आपत्ती येऊन गेल्या आहेत. पण त्यांनी सर्व जग कधी व्यापले नव्हते. अशा परिस्थितीला तोंड देण्याचा कुणालाच अनुभव नाहीय. त्यामुळे ही परिस्थिती खूपच आव्हानात्मक ठरलीय. खबरदारीचे, वेगवेगळे उपाय सरकार आणि विविध यंत्रणानी हाती घेतले. भारत सरकारने २४ मार्च २०२० पासून लॉकडाऊनचा निर्णय घेऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. अशा परिस्थितीत काही अधिकारी अत्यन्त कल्पकतेने, धडाडीने निर्णय घेऊन त्याची तत्परतेने अंमलबजावणी करत आहेत.

सर्व सामान्य माणसाला मोठा दिलासा देत आहेत. भारतीय संस्कृतीत रेशीम वस्त्राला अत्यन्त मानाचं स्थान आहे. त्यामुळे त्यास नेहमी मागणी असते. शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती किफायतशीर ठरत असते. दुरदर्शनमध्ये असताना “आमची माती,आमची माणसं” या कार्यक्रमात आम्ही रेशीम शेती वर एक माहितीपट तयार केला होता. रेशीम शेतीचा , रेशीम उद्योगाचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने रेशीम संचालनालय स्थापन केले आहे. या संचालनालयाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.सध्या रेशीम संचालनालयाच्या संचालक म्हणून भाग्यश्री बानायत धिवरे कार्यरत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्याने महाराष्ट्रातील रेशीम शेतकऱ्यांपुढे फार मोठे संकट उभे राहिले.

[gallery td_select_gallery_slide="slide" size="medium" columns="1" ids="84793,84792,84791,84790,84789"]

सरकारने रेशीम पीक म्हणून अजून घोषित केले नाही. त्यास अजून जीवनावश्यक वस्तूचा दर्जा प्राप्त झालेला नाहीय. त्यामुळे लॉक डाऊनमुळे तयार रेशीम कारखान्यांकडे कसे पोहोचवायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. ते जर वेळीच कारखान्यांना पोहोचवल्या गेले नसते शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असते. रेशीम संचालक भाग्यश्री बानायत धिवरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. तात्काळ सरकारशी संपर्क साधला. रेशीम शेतकऱ्यांना वाहतूक परवाने उपलब्ध करून दिले. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे रेशीम संबंधित कारखान्यात पोहोचू शकले. त्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळले. आता जेव्हा लॉक डाऊन उठेल तेव्हा कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल त्यांच्याकडेच उपलब्ध असल्याने ते लगेच काम सुरू करू शकतील. मॅडमच्या याच अंगभूत धडाडीने घरची काही पार्श्वभूमी नसताना, ग्रामीण भागातील असूनही त्या भारतीय प्रशासकीय अधिकारी होऊ शकल्या.

मॅडमचं शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. तर मोर्शी येथील महाविद्यालयातुन त्या बीएस्सी झाल्या. आई तुळसाबाई,वडील भीमराव हे दोघेही शिक्षक असल्याने घरी शैक्षणिक वातावरण होतं. त्यामुळे बीएस्सी नंतर त्या बीएड झाल्या. पुढे एक वर्ष एमएससी केलं. त्याच दरम्यान वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. खरं म्हणजे अशा दुर्दैवी परिस्थितीत जवळच्या नातेवाईकांनी साथ द्यायला हवी होती. पण तसं न करता प्रॉपर्टी वरून वडिलांच्या मृत्यूनंतर विसाव्या दिवशी मॅडमना आईसह कोर्टात हजर रहावं लागलं. त्यातून पुढील संघर्षाची त्यांना जाणीव झाली. आथिर्क दृष्टीने सक्षम व्हायचं त्यांनी ठरवलं.

अमरावती महानगरपालिकेत त्यांना विषयतज्ञ म्हणून काम मिळालं. आईचं आजार पण, तिची सेवा शुश्रुषा, घरकाम सांभाळून त्या गावाहून अमरावती ला जा – ये करत. त्याच्या जोडीला मुळे त्या स्पर्धा परीक्षा द्यायला लागल्या. अमरावती येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या संस्था किंवा खाजगी कोचिंग क्लास नव्हते. त्यामुळे त्यांना सर्व भर स्व अध्ययन पद्धतीवर द्यावा लागला. वडिलांचं निधन, आईचं आजारपण, स्वतःच्या काही वैद्यकीय समस्यावर मात करत, त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ त्यांना मिळू लागलं.

[gallery columns="1" td_select_gallery_slide="slide" ids="84787,84788,84786,84785,84784"]

प्रथम २००५ साली प्रकल्प अधिकारी, २००६ साली तहसीलदार, २००७ साली सहाय्यक आयुक्त, विक्रीकर विभाग अशा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत त्यांच्या सलग निवडी होत गेल्या. पण या निवडींवर त्यांनी समाधान मानलं नाही. २००६ साली त्यांची नायब तहसीलदार व प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभाग या दोन्ही वर्ग २ च्या पदांसाठी निवडी झाल्या. आईला सल्ला विचारला, तर मॅडमना अपेक्षा होती की, आई शिक्षक असल्याने शिक्षण विभागाची नोकरी स्वीकारण्याविषयी सांगेल. पण तसं न सांगता, आई म्हणाली,तुला योग्य वाटेल ते कर.

मॅडमना आयएएसच व्हायचं होतं. म्हणून त्यांनी दोन्ही पदं नाकारली.दुसरीकडे सततच्या गैर हजेरीमुळे त्यांची अमरावती महानगरपालिकेची नोकरी गेली. तीन पदं हाती असताना नंतर एकही पद राहिलं नाही! परंतु त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा त्या देत राहिल्या. २०१० साली थोडक्यात अपयश आलं. पण अपयशामुळे खचून न जाता २०११ साली अधिक जिद्दीने, चिकाटीने अभ्यास केला. त्यांची अभ्यासुवृत्ती, परिश्रम, जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा फलद्रूप झाली. २०१२ साली त्या भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडल्या गेल्या. ही परीक्षा देत आहे, म्हणून त्यांनी कुणालाच कळू दिलं नव्हतं. ही सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण होणं. हे त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं होतं. मुख्य परीक्षेसाठी त्यानी मराठी साहित्य आणि इतिहास हे विषय घेतले होते. निवडीसाठीची त्यांची मुलाखत सुध्दा खूप आव्हानामक झाली. त्यांनी वरवरची नाही तर, मोकळेपणाने, मनापासून सर्व उत्तरं दिली. त्या अमरावती जिल्ह्यातील असल्याने एक प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातील प्रमुख समस्या काय आहे ? असा त्यांना विचारला गेला.

bhagyashree banayat ias

त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही सर्वात मोठी समस्या आहे, असं सांगितलं. पुढचा प्रश्न विचारला गेला, आपण तिथे जिल्हाधिकारी झालात तर हा प्रश्न कसा सोडवाल ? मॅडमना असं सांगायचं होतं की शेत तळी बांधून, पाण्याची सोय करून हा प्रश्न सोडविता येईल. पण त्यांना शेत तळी या शब्दाला योग्य हिंदी किंवा इंग्रजी शब्द आठवेना. म्हणून त्यांनी दुभाषी मागितला. त्याप्रमाणे तो लगेच मिळालाही. पण त्यालाही नीट सांगता येईना.उलट परिस्थिती बिगडतच आहे, हे पाहून त्यानी सरळ कागद घेतला. उभं राहून मुलाखत मंडळाला शेत तळ्याचं चित्र काढून आपली शेत तळ्याची संकल्पना स्पष्ट केली.त्या निवड मंडळाच्या प्रमुख एक वरिष्ठ महिला अधिकारी होत्या. त्या खूप कडक असून खूप कमी गुण देतात, असा त्यांचा लौकिक होता. त्यामुळे आपली निवड होईल की नाही ? या विषयी मॅडम साशंक होत्या. पण त्यांची निवड झाली. इतकंच नव्हे तर,त्या वर्षी निवड झालेल्या त्या महाराष्ट्र राज्यातील एकमेव महिला अधिकारी ठरल्या.

[gallery columns="1" td_select_gallery_slide="slide" ids="84783,84781,84780,84779,84778,84777,84776,84775,84774,84773,84772,84771,84768"]

आपण प्रशासकीय अधिकारी व्हायचं का ठरवलं ? असं विचारल्यावर मॅडमनी त्यांच्या जीवनात घडलेला एक प्रसंग सांगितला. एकदा एक अत्यन्त रुबाबदार, वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याच्या वर्दीत मॅडमच्या घरी आले. त्यांनी मॅडमच्या वडिलांची चौकशी केली.वडील बाहेर येताच कॅप ते वडिलांच्या पाया पडले. त्यांना अश्रू अनावर झाले होते. वडिलांनी आपल्या विद्यार्थ्याला ओळखलं. गावातील तो एक उनाड मुलगा होता. आयुष्यात तो काही होईल, अशी आशा त्याच्या वडिलांनी सोडून दिली होती. तसं त्यांनी मॅडमच्या वडिलांना बोलून दाखवलं होतं. मॅडमच्या वडिलांनी त्या मुलाला असा धडा शिकवला की, परत त्याने कधी शाळा बुडवली नाही. पुढे तो पोलीस अधिकारी झाला. तो भेटायला आला तेव्हा सीआयडीत मोठ्या पदावर कार्यरत होता. त्याची जाण म्हणून तो आवर्जून त्याला घडविणाऱ्या सरांना भेटण्यासाठी आला होता. या प्रसंगामुळे मॅडमना आपण ही पोलीस अधिकारी व्हावं असं वाटलं. आपली इच्छा त्यांनी वडिलांकडे बोलून दाखवली. पण वडील म्हणाले, मोठा विचार कर.

त्यामुळे प्रशासकीय अधिकारी बनण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. विदर्भाच्या ग्रामीण भागातील भारतीय प्रशासकीय अधिकारी झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत. मॅडमची निवड नागालँड कॅडर साठी झाली. त्यामुळे मसुरी येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या नागालँड सरकारच्या सेवेत रुजू झाल्या.तिथे रुजू न होण्यासाठी खूप जणांनी त्यांना परावृत्त केलं. पण स्वतःचा आत्मविश्वास आणि पती, भारतीय महसूल सेवेतील अधिकारी संजय धिवरे यांचं प्रोत्साहन, यामुळे त्यानी तिथे जायचं ठरवलं. त्या दरम्यान, आईची तब्येत खूप बरी नव्हती. आईकडे घरी बघण्यासाठी कुणी नव्हतं. ती जबाबदारी पतीनं सहजपणे स्वीकारली. नागालँडमध्ये मॅडमनी उपविभागीय अधिकारी -फेक,अतिरिक्त जिल्हा आयुक्त-कोहिमा, उपसचिव- गृह विभाग, सचिवालय अशी पदं समर्थपणे भूषविलीत. एका दौऱ्यात त्यांच्या सन्मानार्थ भोजन देण्यात आलं.

भोजनापूर्वी एक पेय सर्वांना देण्यात आलं. मॅडम ते पिणार, तेव्हढ्यात मॅडमचा ड्रायव्हर जोराजोरात ओरडून सांगू लागला, की ते पिऊ नका. म्हणून मॅडम ते पेय पिल्या नाहीत. मग कळालं,ती शोरा (दारू) आहे म्हणून ! सर्वांनी जेवणापूर्वी शोरा घेणं हा नागा संस्कृतीचा भाग आहे. पुढे मॅडम जेवायला सुरुवात करणार ,तेवढ्यात ड्रायव्हर सूचना देऊ लागला,हे खाऊ नका,ते खाऊ नका म्हणून. कारण त्याला हे चांगलं माहिती होतं की मॅडम पूर्णपणे शाकाहारी आहेत. मग त्यांनी सहकारी अधिकाऱ्यास विचारले, की काय खाऊ ? तर त्यानं सुचवलं की भात खा म्हणून.कारण त्यात फक्त मासे असतात!शेवटी स्वतःच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या भोजनात मॅडमनाच उपाशी रहावं लागलं ! नागालँडमध्ये काम करणं हे अत्यन्त मोठं आव्हान आहे. पण ते त्यांनी निर्धाराने पेलून दाखवलं.

दीड वर्षां पूर्वीच मी नागालँडचे तत्कालीन राज्यपाल महामहिम पी बी आचार्य सर यांच्या आमंत्रणामुळे तिथे गेलो होतो. नागालँड हा अतिशय दुर्गम प्रदेश आहे. कधीही दरडी कोसळून वाहतूक बंद पडते. आव्हानामक भौगोलिक, राजकिय, सामाजिक परिस्थिती लक्षात घेता एका मराठी महिला अधिकाऱ्याचं नागालँड कॅडर स्वीकारणं, तिथे हिम्मतीनं काम करणं हे फक्त मॅडमसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावह आहे.

पुढे महाराष्ट्र शासनाकडे प्रतिनियुक्ती मिळून त्या २०१८मध्ये रेशीम संचालक झाल्या. या पदावर त्या भरीव कामगिरी करत आहेत. रेशीम शेतीसाठी अपारंपरिक राज्यात केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विदर्भ कन्या म्हणून २०१६ साली त्यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. या शिवाय त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

bhagyashree banayat ias

लिखाणाची त्यांना आवड आहे. महाराष्ट्र टाइम्स साठी त्या “सहज सुचलं” हा स्तंभ लिहीत असतात.आकाशवाणीच्या दर्पण, युवावाणी साठीही त्यांनी लेखन केलंय. लेखनाबद्दलही त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. साहित्याची उपजतच आवड असल्याने विविध साहित्य संमेलनात त्या भाग घेत असतात. “संचयी विचारधारा”च्या त्या कार्यकारी संपादक आहेत. स्वतः ग्रामीण भागातुन आल्याने ग्रामीण भागातील मुलामुलींना किती कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते, याचा स्वानुभव असल्याने त्या ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा जागृतीसाठी मोफत मार्गदर्शन करत असतात. महिला सक्षमीकरणासाठीही त्या सतत प्रयत्न करत असतात. मुलगी म्हणून मुलींना भेदभावाची वागणूक देऊ नका,असं त्या पालकांना आवर्जुन सांगत असतात. आपल्या वडिलांनी मुलगी म्हणून कधी भेदभाव केला नाही, याचा त्यांना अभिमान आहे.

हा लेख लिहिण्यासाठी मला ज्यांची मोलाची मदत झाली, ते मिशन आयएएसचे प्रमुख प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे सर ,मॅडमविषयी भरभरून बोलताना म्हणाले, मॅडममध्ये कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा नाही. साधेपणा, हसतमुख चेहरा, वागण्या बोलण्यात असलेला सहजपणा,अत्यन्त प्रभावशाली वक्तृत्व यामुळे त्या क्षणात विद्यार्थ्यांना आपलंसं करतात. मॅडमचे पती संजय धिवरे सर हे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत. कन्या सनोजा शाळेत जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना काय संदेश द्याल ? असं विचारल्यावर मॅडम म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांकडे महाराष्ट्रातील तरुणांनी मोठया संख्येने वळलं पाहिजे. अपयश आलं म्हणून लगेच हार मानु नका. जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करत रहा. पुढील सेवा सक्षमपणे बजाविण्यासाठी आवश्यक ती मानसिक तयारी ठेवा. कारण आयएएस सेवा २४ तास बजवायची असते. खरं म्हणजे, मॅडमचं जीवन हा एका पुस्तकाचा विषय आहे. सर्व काही एका लेखात मावणं शक्य नाही. त्यामुळे ज्यांना अधिक जाणून घ्यायची जिज्ञासा आहे,त्यानी यु ट्यूब वर मॅडमच्या प्रेरणादायी कार्यक्रम, मुलाखती अवश्य पहाव्यात. “आधी केले, मग सांगितले” ही उक्ती सार्थ करणाऱ्या मॅडमना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Updated : 11 May 2020 5:42 PM IST
Next Story
Share it
Top