Home > मॅक्स ब्लॉग्ज > मी फक्त आंतरजातीय विवाहांना उपस्थित राहणार : विनय काटे

मी फक्त आंतरजातीय विवाहांना उपस्थित राहणार : विनय काटे

आंतरजातीय विवाह हा एक जात निर्मूलनाचा प्रयत्न आहे. आयुष्याच्या सुरुवातीला मवाळ सनातनी असलेले महात्मा गांधीनी आयुष्याच्या उत्तरार्धात आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार कृतीतून केला होता, प्रत्येकाने हा निश्चय केला तर निश्चितपणे जाती निर्मूलनाच्या दिशेने जाऊ असे विश्लेषण केले आहे, डॉ. विनय काटे यांनी..

मी फक्त आंतरजातीय विवाहांना उपस्थित राहणार : विनय काटे
X

आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मवाळ सनातनी असणारे गांधीजी उत्तरोत्तर राजकीय कार्य आणि सामाजिक समज वाढत गेली तसे स्वतःला बदलत गेले. पुणे करार आणि त्याआधी डॉ.आंबेडकरांशी झालेल्या मतभेदांमुळे गांधीजी अस्पृश्यता ह्या प्रथेला विविध सामाजिक कृतींमधून विरोध करू लागले. दोन जातींमध्ये रोटीबेटी व्यवहार न होणे आणि अस्पृश्यता पाळणे यांच्यामुळे हिंदू समाज आणि देश एकसंध होत नाहीये हे गांधींनी जाणले आणि त्यांनी 1930 च्या दशकात आंतरजातीय (आणि नंतरच्या काळात आंतरधर्मीय) विवाहाचे समर्थन सुरू केले. 1937 साली गांधीजींनी स्वतःची नात मनु गांधी हिचे बेळगावमध्ये आंतरजातीय लग्न लावून दिले.

महादेव देसाई हे गांधीजींचे सर्वात जवळचे सहकारी, अनुयायी आणि एका अर्थाने मानसपुत्र. 1942 साली महादेव देसाई यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये निधन झाले. कस्तुरबांचे निधनसुद्धा याच ठिकाणी 1944 साली झाले. बा आणि महादेव देसाई यांची समाधी आगाखान पॅलेसमध्ये शेजारी शेजारी आहे इतके महत्त्वाचे स्थान गांधीजींनी महादेव देसाईंना त्यांच्या आयुष्यात दिले. 1930 च्या दशकातले गांधीजी 1940 च्या दशकात जातीव्यवस्था संपवण्याबाबत अजूनच आग्रही झाले. तेव्हा गांधीजींनी स्वतःला एक नियमच घालून दिला की ते एक पक्ष सवर्ण आणि एक पक्ष हरिजन असा आंतरजातीय विवाह सोडून इतर कुठल्याही विवाहाला उपस्थित राहणार नाहीत.

आगाखान पॅलेस मधील कैद संपल्यानंतर गांधीजी सेवाग्रामला राहिले. त्यावेळी स्वर्गीय महादेव देसाई यांच्या पत्नी दुर्गाबेन आणि त्यांचा मुलगा नारायण हेही आश्रमात राहत होते. एके दिवशी दुर्गाबेन गांधीजींना भेटायला गेल्या आणि त्यांना सांगितले की त्यांनी नारायणचे लग्न ठरवले आहे आणि त्यांनी उपस्थित राहून आशिर्वाद द्यावेत. गांधीजींनी दुर्गाबेनना विचारले की होणारी वधू हरिजन आहे का? त्यावर नकारार्थी उत्तर येताच गांधीजीनी लग्नास उपस्थित राहण्यास नकार दिला. सेवाग्राम आश्रमात ते लग्न होत असताना, नारायण देसाई हे नातवाच्या इतके प्रिय असताना सुद्धा गांधीजी त्या लग्नाला गेले नाहीत आणि आपल्या दैनंदिन कामात व्यस्त राहिले.

1946 साली गांधीजींनी सेवाग्राममधल्या तरुण मुलामुलींना सांगितले की जर वधू-वर पक्षापैकी एक पक्ष हरिजन समाजातील नसेल तर त्यांनी लग्नच करू नये. आज आपल्याला जर खरोखर जाती मोडायच्या असतील, तर गांधीजींनी त्यांच्या शेवटच्या काळात वर उल्लेख केलेले जे बोलले आणि वागून दाखवले ते आपल्यालाही करावे लागेल. मी स्वतः अपवादाने कुठल्या सजातीय लग्नाला जातो, पण आता मी ते बंद करणार आहे. यापुढे फक्त आंतरजातीय विवाहांना उपस्थित राहण्याचा मी माझ्यापुरता निर्णय घेत आहे. तुम्हीही असा विचार करू शकता!


Updated : 10 May 2022 7:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top