Home > Top News > ज्याला अधिक मित्र, तोच जगायला पात्र!

ज्याला अधिक मित्र, तोच जगायला पात्र!

ज्याला अधिक मित्र, तोच जगायला पात्र!
X

माणूस प्राणी आपण समजतो, तसा नि तेवढा दुष्ट नाही. 'स्पर्धा आणि स्वार्थ' हा जगाचा मूळ स्वभाव नाही. 'सहजीवन, संवाद आणि सहकार्य' यावर आपलं जग उभं आहे. हे सोपं जग आपण अवघड करून टाकलंय. विखार ही नव्या जगाची मातृभाषा होत असताना, माणूस नावाचा प्राणीच त्यामुळं संकटात आला आहे.

हे कवी- लेखक नाही. तर, समाजशास्त्रज्ञ सांगू लागले आहेत. डार्विननंतरचे जीवशास्त्रज्ञ- मानववंशशास्त्रज्ञही तशी 'थिअरी' मांडू लागले आहेत. 'ज्याला अधिक मित्र, त्याचाच निभाव लागेल' असं हे नवं सूत्र आहे. 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' नव्हे, तर 'सर्व्हायव्हल ऑफ द फ्रेंडलिएस्ट' हे आता अभ्यासक मान्य करू लागलेत. तशी 'थिअरी' मानववंशशास्त्रज्ञ मांडू लागले आहेत.

अगदी 'फिट' आणि बळकट असणा-या अनेक जाती संपुष्टात आल्या. पण, सहजीवनानं जगणा-या जाती मात्र तगून राहिल्या. 'कुत्रा' हे त्यासाठीचं उत्तम उदाहरण शास्त्रज्ञ देतात. लांडगा अधिक दमदार आणि हुशार खराच. पण, त्याच्या हिंस्त्र लबाडीनं तो एकटा पडला आणि संपत गेला. कुत्रा मात्र, त्याच्या 'फ्रेंडली', प्रेमळ स्वभावानं सर्वांच्यासोबत जगत राहिला!

माणूसही इथवर आलाय, ते त्याच्यातल्या स्पर्धेमुळं नाही. सहजीवनामुळं. संवादामुळं. याउलट, आताच्या माणसापेक्षाही तगडा असणारा 'माणूस' (निअंदरथल) संपला तो एकटेपणामुळं. आपला माणूस टिकून राहिला ते द्वेषामुळं नाही, प्रेमामुळं. वाईटपणामुळं नाही, चांगुलपणाची मूलभूत ओढ असल्यामुळं.

'संस्कृती' उभी करताना- नव्या संस्था उभारताना आपण 'माणूस स्वार्थी आणि नालायक आहे', हेच सूत्र ठेवलं. त्यामुळं गडबड झाली. संस्कृतीसोबत विषमता आली. भेदभाव आले. माणूस गर्दीतला प्राणी खराच, पण स्वतःचा शोध घेण्याची भूक, हेही त्याचं वैशिष्ट्य आहे. 'स्वतःला ओळखा' असं प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान म्हणालं. 'को अहम्?' असं हिंदू तत्त्ववेत्त्यांनी विचारलं. 'अत्त दीप भव' असं बौद्ध तत्त्वज्ञानानं सांगितलं.

हा 'माणूस' समजून घेण्याचा प्रयत्न, नव्या व्यवस्था उभारताना आपण केला नाही. त्यामुळं संस्कृतीच्या- शिक्षणाच्या- कुटुंबव्यवस्थेच्या नावानं गडबड झाली. शाळा असोत वा तुरूंग, ऑफिस असो किंवा घर, आपण 'माणूस हा मुळात दुष्ट आहे', असं गृहीत धरलं. ही धारणा बदलण्याची वेळ आलीय. कारण, चांगुलपणाची ओढ हाच मानवी स्वभाव आहे. आणि दुष्टावा हे विचलन आहे. कोरोनासारख्या आपत्तीच्या वेळीही तेच तर अधोरेखित झालं.

नव्या माध्यमांनी मात्र, बाजारपेठेशी युती करून, हे जग एकसुरी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय. जगातला घाणेरडेपणा ज्या बटबटीतपणे माध्यमं मांडतात, भीती, हिंसा आणि विखार विकतात, त्यामुळं समाज संकटात आहे. लोकांना खरं जग दाखवण्याचा प्रयत्न करणं, सत्तेला सत्य सांगणं आणि लोकांचं आकलन रूंद करणं, हे माध्यमांचं काम आहे. पण, ते जे करताहेत, ते भयंकर आहे. त्यामुळे, चिंताग्रस्तता वाढतेय. माणसं 'सिनिकल' होत चालली आहेत. नैराश्य वाढतंय. दोन समूहांमध्ये तेढ वाढतेय. हे असंच पुढं जात राहिलं तर उद्याचं जग चिंताजनक असणार आहे.

म्हणून, मानवी समुदायाबद्दलच्या धारणांचीच फेरमांडणी करावी लागणार आहे. निराश न होता, नव्या उमेदीनं चांगुलपणाची स्वप्नं बघणं हे माणसाचंच लक्षण आहे. ऑस्कर वाइल्ड म्हणतो तसं: प्रगती म्हणजे दुसरं काय? स्वप्नांचं जे जग आपल्या मनात आहे, ते वास्तवात येऊ शकतं, याची खात्री म्हणजे प्रगती! असं नवं जग हवंय आपल्याला, जिथं सगळेजण फक्त माणसं असतील. विखार नव्हे, प्रेमाच्या भाषेत सारे बोलतील.

कारण, तू आहेस; म्हणून मी आहे.

म्हणून आपण सारे आहोत!

'माणसं मुळात वाईट आणि स्वार्थी असतात', या आजवरच्या गृहितकाला रत्गर ब्रेग्मन या डच इतिहासकारानं जोरदार तडाखा दिलाय. त्याचं

Humankind: A Hopeful History

या नावाचं पुस्तक नुकतंच आलंय.

अवघ्या ३२ वर्षांच्या या तरूणानं विचारवंत म्हणून मोठा ठसा जगावर उमटवलाय. त्याची मुलाखत रविवारच्या 'द हिंदू'मध्ये वाचली.

'Believing in the good of humanity is a revolutionary act'

त्यातील तपशील आणि पुस्तकातील मांडणीच्या आधारे हे लिहिलंय.

बाय द वे,

मग, इचार काय हाय तुमचा!

आहात ना तुम्ही जगायला पात्र?

किती आहेत मैत्रिणी आणि मित्र?

Updated : 7 Sep 2020 5:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top