Home > मॅक्स ब्लॉग्ज > अंधश्रद्धेच्या महारोगातून समाज कसा बाहेर येईल?

अंधश्रद्धेच्या महारोगातून समाज कसा बाहेर येईल?

समाजाला अंधश्रद्धेचा महारोग झालेला आहे का? महारोगाप्रमाणे हा रोग कसा बरा करता येऊ शकतो? आपल्या समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची ट्रीटमेंट का नको असते? वाचा डाॅ प्रदीप पाटील यांचा लेख

अंधश्रद्धेच्या महारोगातून समाज कसा बाहेर येईल?
X

कोल्हापूरच्या अलकाला मूल होत नव्हतं. आईवडिलांनी तिला घेतलं. ते पोहोचले एका मांत्रिकाकडे. मुख्य रोडवर असलेल्या एका कौलारू घरात ते शिरले. चोहोबाजूंनी उसाने वेढलेल्या त्या घरात शिरल्यावर अलकाला समोर दिसला.... मांत्रिक.

आणि अलका प्रचंड भ्याली !

चादरीत संपूर्ण लपेटून बसलेला, दात बाहेर आलेले, आणि डोळ्यातून घाण गळत असलेला, सद्गुरू शिष्य तात्या उर्फ भीमराव महाराज.

नाक नाहीसे झालेले आणि डोळ्यांच्या बुबुळात पांढरा रंग चढलेला.

होय, तात्या महाराजांना महारोग झालेला आहे. आणि ते देवॠषी आहेत.

खूप लांबून लोक येतात. दर मंगळवारी दरबार भरतो. अलकाला चार वर्ष लग्न होऊनही मूल नव्हतं. तात्या महाराजांना घाबरलेली अलका गर्दीत जाऊन बसली. तिच्या आई बाबांनी तात्या महाराजांना नमस्कार केला...

" कुठनं आला?- महाराजांनी विचारले.

" कोल्हापूरहून "- ते म्हणाले. एक बाई आत आली आणि तात्या महाराजांचे पाय धरण्यासाठी वाकली. बसलेल्या महाराजांनी चादर बाजूला करून पाय पुढे केले...

पायाची सर्व बोटे गळून गेलेली...

त्या बाईने ते थोटे पाय धरले. आणि ती मागे जाऊन बसली.

ऊस तोडकर्यांपैकी एका बाईचा नंबर आला.

" काय होतंया?"- तात्या महाराजांनी विचारले.

एक वर्षाचे मूल समोर ठेवलं.

" ताप आल्याला हाय पोराला"- ती म्हणाली.

" गुरुवार केला का?"- महाराजांनी विचारले.

" न्हाई."

" आसं कुठंतरी चुकता" असे म्हणत तात्या महाराजांनी शेजारी बसलेल्या लक्ष्मणला अंगारा द्यायला सांगितला. लक्ष्मण तात्या महाराजांचा शिष्य आणि लहान भाऊ. तोसुद्धा महारोगी. एका डोळ्यातून सतत पांढरा स्त्राव गळत असलेला. त्याने देव्हाऱ्यासमोर बैठक मारलेली. देव्हाऱ्यात १४ फोटो लावलेले. उदबत्त्या, कापूर, इकडेतिकडे पसरलेले. कोपर्‍यात चार पुस्तकं.

लक्षमणनं वाकड्या झालेल्या बोटाने त्या बाईच्या हातावर अंगारा ठेवला. तात्या महाराजांनी तो अंगारा पोराला लावायला सांगितला. ताप तीन तासात उतरेल म्हणाला.

पुढचा नंबर होता सांगलीच्या मोरेचा. घरात भांडणं होत होती.

" हजरी लावतो. बघतो कुठंचं काय हाय त्ये "

- आणि तात्या महाराजांनी डोळे मिटले.. अंग थरथरून हलविले... मग पुन्हा भानावर येऊन म्हणाले...

" जतंकडच्या यल्लूआईचं हाय. परडी सोडावं लागल. घरात सगळी बोंब तिच्यामुळेच हाय. तिलाच घातल्या तुमच्यावर. काडावी लागंल. धा मंगळवार करावं लागत्याल. म्होरल्या अमावस्यला या. काडून देत्यो."

अंगाराच्या पुड्या मोरेच्या हातात ठेवल्या.

बरेच भक्त झाल्यावर अलकाचा नंबर आला. तिला उभं राहायला सांगितलं आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली...

" काय हुतंय?"

" मूल होत नाही" अलकाच्या आईने सांगितलं.

" किती वर्सं झाली?"

" चार वर्ष झाली."

" कुनाला दावलं हुतं का"

" होय सर्व डॉक्टरांना दाखवलं."

" डाकटरचं सोडा. भायेर दुसरीकडं कुनाला दावलं हुतं का?"

" होय. इचलकरंजीला एका ठिकाणी दाखवलं."

" काय सांगिटलं?"

" देवाचं आहे म्हणुन सांगितलं. भंडारा खाल्ला पण काही उपयोग नाही झाला.

" न्हाई हुनार. ह्ये येगळं हाय. नाव काय पोरी तुझं?"

" अलका"

" शाळेत लहानपनी असताना भायेर कुठं जाऊन लघवीला बसल्यास का?"

अलका लाजून गप्प.

" खरं सांग "- दरडावून तात्या महाराजानं विचारलं.. आणि चादर बाजूला सारली..

बोटें नसलेले दोन्ही हात दिसू लागले. उजव्या हाताचा नुसता पंजा. सापासारखा वळवळणारा. हातवारे करीत त्याने अलकाला पुन्हा विचारले..

" सांग, मग करतू बंदोबस्त"

घाबरून ती म्हणाली,

" होय "

" हांsss!आश्शी. बरोबर हाय. जिथं लघवीला बसली हुतीस ततला मुंजाबा झपाटल्याला हाय. पाळी कशी हुते?"

" बरोबर येते "- लाजून घाबरलेल्या अलकाने त्या गर्दीत कसेबसे सांगितले.

" न्हाई, रगत काळं जातं का न्हाई?"- तात्या महाराज.

अलका काही बोलेना.

" हा. काळच जातं रगत. मला ठाव हाय तर."

मग त्याने लक्ष्मणला पोथी काढायला सांगितली. अलकाला म्हणाला,

" १८ पर्यंत कुटलाबी नंबर सांग."

अलका म्हणाली "चौदा. "

"१४ नंबरचा श्लोक वाच"- तात्यामहाराज लक्ष्मणाला म्हणाला. लक्ष्मणाने तो श्लोक वाचून काढला.

"बरोबर हाय." असे म्हणून तात्यामहाराज उठला. अलका जवळ आला. अलकाच्या डोक्यावर त्याने तो संपूर्ण थोटा झालेला हात ठेवला. काही मंत्र पुटपुटले. मंत्र पुटपुटताना नाकातून गेंगाना आवाज येत होता. तोंडातून थुंकी उडत होती. अलकाच्या कानात तात्या महाराजांनी जोरात फुंकर सोडली. असे तीन वेळा केले !!

अलकाला चक्कर येऊ लागली.

" बोल मुंजाबा, जातुस का न्हाई? लई वंगाळ केलस आजपतुर." - तात्या महाराज वरडला.

मग त्याने अलकाच्या छातीवरून थोटा हात फिरविला.!

अलकाच्या डोळ्यासमोर अंधारी येऊन ती कोसळली.

" बगा.. निगला मुंजाबा. गेला निघून. तिच्या तोंडावर पाणी मारा"- तात्या महाराजांनी सूचना दिली. पाणी मारून झाल्यावर अलका उठली ती थेट बाहेर पडली. तिच्या आई-वडिलांना तात्या महाराज म्हणाला,

" दुसरी पाळी आता येनार न्हाई. दिस गेल्यावर सातव्या महिन्यात करणी उलटू नये म्हनुन परडी बांधायची. तवा खर्च येईल. काय काळजी करू नगासा. पुन्यांदा उलटणार न्हाई. ह्ये माज्याकडं लागलं."

सर्व रोगांवर कोकणातली ईटलाई, कोकुटणुरची यल्लम्मा, मुंजाबा, वगैरे देवाचा 'विलाज' करणारा तात्या महाराज स्वतःच्या 'महारोगा'वर इलाज करीत नव्हता. करूही शकणार नव्हता. कारण तो ज्या कारणासाठी देवऋषी झाला होता ते कारण उघड आहे. समाजात या रोगावर तो विज्ञानाने सांगितलेलेच औषध खात होता, देवाचे न्हवे ! लोकांना मात्र तो देवाचे औषध देत होता.

कसा विचित्र विरोधाभास!!

आम्ही त्याच्या दरबारात त्याच्या हजरी समोर हजर झालो.

तेच प्रश्न त्याने आम्हाला विचारले. साध्या वेशातल्या पोलिसांना देखील त्याने तीच फसवी उत्तरे दिली. तात्या महाराजांसारखे शेकडो मांत्रिक वेगवेगळ्या किंवा सर्व रोगांवर इलाज सांगत असतात. वैद्यकीय अंधश्रद्धांचे उधाण या समाजात भरपूर आलेले आहे. खुद्द तात्या महाराज ज्या रोगाचा बळी होता त्या रोगाविषयी कित्येक समज-अपसमज समाजात आहेत. महारोग काँग्रेस गवताने होतो, पूर्वीचं केलेलं पाप असतं, म्हणून महारोग होतो वगैरे. खरे तर मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणू मुळे महारोग होतो. प्रत्येक रोगाविषयी भ्रम-संभ्रम समाजात आज अखेर जैसे थे आहेत. लहान मुलाचं पोट 'उडायला' लागलं की पोटातलं झालंय, या भ्रमापासून म्हाताऱ्या माणसाची कंबर दुखायला लागली की इलेक्ट्रिकच्या डांबाला- खांबाला रोज रात्री तीन दिवस कंबर घासली की कंबर दुखी थांबते असे असंख्य भ्रम समाजात पसरले आहेत. शिक्षित समाजातही भात खाल्ल्यावर पू होतो या भ्रमापासून फिट आल्यावर नाकाला चप्पल लावण्यापर्यंतच्या अंधश्रद्धा टिकून आहेत.

याची कारणे काय असावीत?

महारोग कसा होतो व त्याचे शारीरिक परिणाम काय असतात हे जसे तात्या महाराजाला माहिती नसते तसेच समाजाला ही सर्व रोगांविषयीच्या प्राथमिक ज्ञानाचे अज्ञान हे तर कारण असतेच. शिवाय स्वतःच्या शरीराविषयी किंचितही माहिती नसते. डाव्या बाजुला अपेंडिक्स झालंय (जे उजवीकडे असतं) असे म्हणणारे उच्चशिक्षित आणि कानापासून निघणारी पायापर्यंत असलेली लांबडी शीर दुखते म्हणणारा अडाणी यांच्यात काहीच फरक नसतो. शरीर विज्ञानाचे प्राथमिक धडे आजच्या शिक्षण पद्धतीत ज्या भोंगळ स्वरूपात शिकवले जातात आणि चुकीच्या वेळी शिकविले जातात त्याचा हा परिपाक असतो. हिप्पॉक्रेट्स पासून लुई पाश्चर पर्यंतच्या वैज्ञानिकांचे वैद्यक इथल्या समाजात झिरपले नाही. त्यामुळे धार्मिक अधिष्ठानाचे सोंग घेतलेल्या या समाजातून तुरळक वैज्ञानिक निपजले. किंबहुना बहुसंख्य लोकांना आपल्या शरीर रचनेची माहिती करून घेण्याची इच्छाच नसल्याने आंधळेपणाने ऐकीव किंवा अर्धवट माहिती आधारे शरीराविषयी अर्धवट तर्क करायचे हाच प्रकार आज अखेर चालू आहे. गोमूत्र गोबर आणि तंत्र-मंत्राच्या जाळ्यात अडकलेल्या इथल्या समाजातील अर्धवट तर्कांना-भ्रमांना इथले मांत्रिक त्याच अवस्थेत ठेवावयास हातभार लावतात. नव्हे ते तसेच ठेवण्यात त्यांचे पोट भरत असते. बौद्धिक प्रगती मधला मांत्रिक हा सर्वात मोठा अडथळा ठरतो.

-आणि मग चुकीची माहिती असलेली मंडळी म्हणू लागतात की डॉक्टर सुद्धा काही ठिकाणी चालत नाही. त्याचे काय? बऱ्याच ठिकाणी डॉक्टरचा उपयोग होत नाही हे खरे आहे. परंतु त्या ठिकाणी इतरही कुठल्याच पद्धतीचा उपयोग होत नसतो. उदाहरणार्थ शेवटच्या टप्प्यातल्या कॅन्सरवर औषध नाही असे खुद्द विज्ञानच सांगते. पण कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात जर उपाय केले तर तो बरा होतो हेही सांगते. कॅन्सरवर औषध शोधून काढण्याचा आपला उद्योग विज्ञान चालूच ठेवते. इथे डॉक्टरचे चालत नाही पण कॅन्सरवर औषध देणाऱ्या कुठल्या भोंदूचेही अजिबातच चालत नाही. दोन हजार रुपयाची एक गोळी कुठल्याही कॅन्सरवर देणारा भोंदू असो वा दुधातून मुळी खायला घालून सर्व कॅन्सर बरा करणारा विजापूरचा मांत्रिक असो, हे सारे पूर्णतः चुकीचे व वैज्ञानिक उपचार असतात.

अशा मानसिकतेतून कित्येक वेळा खुद्द अंधश्रद्ध डॉक्टरच बळी पडतात. मग कित्येक डॉक्टर सत्य साईबाबाचे भक्त होतात तर काही डॉक्टर आधुनिक अंधश्रद्धांचे बळी ठरतात. उदाहरणार्थ पिर्यामिड थेरपी. सतपति नावाच्या माणसाने असा दावा केला की इजिप्तच्या पिरॅमिड्स सारखे छोटे पिरॅमिड लाकडी वा पत्र्याचे करून त्यात बसले की चुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्यामुळे ब्लड प्रेशर, रक्तदाब, फेफरे , अपस्मार, लकवा वगैरे रोग बरे होतात. कित्येक डॉक्टर उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी या तथाकथित पिरॅमिडचा वापर करतात. वैद्यकीय अंधश्रद्धांचे हे आधुनिक रुपडे तुमच्या आमच्यामुळेच निर्माण झालेले असते. मग वैद्यकीय मंत्रीदेखील जडीबुटीचे, कोरोनावरील उपायाचे उद्घाटन करतो.

तात्या महाराजाला जेव्हा विचारले की,

"सर्व रोगांवर तुम्ही उपाय सांगाल काय?"

" तर? कंचा बी प्रश्न असू दे. लगीच सांगतो"- तो म्हणाला.

" डॉक्टरांचे औषध चालू ठेवायचं की नाही अशावेळी? "

" डाकटर काय करणार हाय? कंचा डॉक्टर हाय त्याला घेऊन या. त्येला खाली पाडून तोंड पसरायला लावतो. हिथं डाकटर काय चालत न्हाई. "

आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक आहोत असे सांगितल्यावर मात्र तात्या महाराज गडबडला.

इतक्यात एक माणूस पुढे येऊन विचारू लागला...

" म्हैस धार देत न्हाई. काय ते लवकर सांग. जातो मग मी.." जनावरांच्या रोगावर देखील तात्या महाराज स्पेशालिस्ट होते. " भिमराव उर्फ तात्या महाराज, जनावरं धार का देत नाहीत?" मी विचारले.

तात्या महाराज गप्प !! पोलिसांसमोर त्याने नांगी टाकली.

लेप्रोमेटस लेप्रसी हा महारोगाचा प्रकार तात्या महाराज आणि लक्ष्मण या दोघांना झालेला होता.

ते दोघेही घामाने पूर्ण थबथबले. दरबारातले लोक हळूहळू पसार झाले. लेखी जबाब दिल्यावर तात्या महाराज आणि लक्ष्मणने गळून गेलेला अंगठा उठवताना... मनात विचार उमटले की...

या समाजाला अंधश्रद्धेचा महारोग झालेला आहे. महारोगाप्रमाणे हा रोग बराही होऊ शकतो. पण समाज वैज्ञानिक दृष्टिकोनाची ट्रीटमेंट घेत नाही. दुःख याचं आहे की हे अंधश्रद्धांचे जंतू आज तात्या महाराजांसारखे मांत्रिक आणि माणसं शरीरातच ठेवून रोगाचा प्रसार करत आहेत. असल्या महारोगासाठी अंधश्रद्धा निर्मूलन करणार्‍या कार्यकर्त्यांचा औषधी डोस कुठे पुरणार?

कुठवर पुरणार??

- डाॅ. प्रदीप पाटील

Updated : 1 Oct 2021 4:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top