Home > Top News > जात दिसली, अन् हिंदुत्वाची मोट सुटली..

जात दिसली, अन् हिंदुत्वाची मोट सुटली..

जात दिसली, अन् हिंदुत्वाची मोट सुटली..
X

गेली अनेक वर्ष ओबीसी मुख्यमंत्री पाहिलेल्या उत्तर प्रदेशात खूप दिवसांनी ठाकूर मुख्यमंत्री झाला आहे. स्वतः मुख्यमंत्रीच ठाकुर समाजाचे असल्याने त्या जमातीकडुन इतरांवर अन्याय वाढला आहे, त्याला ठाकुर मुख्यमंत्र्यांची सहमती आहे, हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल.

हिंदू राष्ट्र झाले तर इतर धर्मीयांना वाईट दिवस येतील म्हणून आनंदीत झालेले लोकांचे तरी भले झाले का..? हिंदू विरुद्ध मुसलमान या चर्चा अजून किती दिवस चालणार..? ती धार्मिक अफुची नशा कधीतरी उतरणारच होती, अर्थव्यवस्था कोलमडली, अनेक समस्या समोर आल्या आणि खरं रूपही दिसू लागलं. कशाचेही सोंग आणता येईल पण पैशाचे सोंग आणता येत नाही.

रिया चक्रवर्ती ब्राम्हण आहे, गेले काही महीने सुरु असलेल्या आभाळफाड चर्चेत असा उल्लेख वारंवार आला, तरी तिच्या वाटेला काय आले पाहा..! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वेदना बोलुन दाखवली, की ते जातीने ब्राम्हण असल्यामुळेच त्यांना त्रास दिला जातोय. हिंदुत्वाची आरोळी ठोकून सत्तेत आलेलं पुर्ण बहुमताचं सरकार केंद्रात आहे, त्यामुळे सर्वाधिक आनंदी झालेल्या जमातीचे हे सरकार..! आणि तरीही असा अन्याय..! कमालच ना..?

ब्राम्हण सोडा, क्षत्रिय कसे आहेत..? मराठा, राजपूत, जाट समाजाला आरक्षण मिळत नाही, म्हणून त्यांच्यात अन्यायाची भावना आहे. क्षत्रिय अद्यापही समान महत्व देत नाहीत म्हणून इतर मागासवर्गही नाराज. सत्तेत आलेला भाजप-संघ प्यारा वाटू लागल्याने चळवळीला मुठमाती देऊन सत्तेच्या वळचणीला बसलेला तो एक दलित वर्ग आता अपेक्षाभंगाचे दु:ख व्यक्त करु लागला आहे. अनेक मागास जाती- संघपरिवाराने 'नवहिंदु'च्या संकल्पनेत घेतल्या म्हणून खुश होत्या. पण निवडणूका आल्या की हिंदू पण इतर वेळी मात्र, मागास; हे त्यांचे निरिक्षण त्यांना आता अस्वस्थ करीत आहे.

या अशा अनेक घटकांची आशा आता निराशेत बदलू लागली आहे. थोडक्यात हिंदूराष्ट्र संकल्पनेत मुस्लिम-ख्रिश्चन वगळता बाकीच्यांचे सगळं सुजलाम् सूफलाम् होणार, या संकल्पनेला छेद गेलाय. बरं असंही नाही की मुस्लिम-ख्रिश्चन धर्मातले सगळे संघ-भाजपच्या विरोधात आहेत. सत्तेची चटक असलेले समाजाचे स्वयंघोषीत मध्यस्थ, त्यांची सत्ता येताच तिकडेही चिकटलेच. आपण आज 'घर के ना घाट के' राहिलो याची त्यांना जाणीव होऊ लागलीय. विरोधी पक्षातील उरले-सुरलेले आणि मुठभर बुद्धीवादी वगळता सगळा देश आपल्या सोबत आहे,या उभ्या केलेल्या चित्राचे रंग केव्हाच उडालेत, हे चित्र उभं करणारी माध्यमं आता दररोज लोकांच्या शिव्या खात आहेत. हळुहळू मारही खाऊ लागतील, ते दिवसही फार लांब नाहीत..

मुळात देश नव्या सत्ताधाऱ्यांनी सांगितला तसा त्यांच्या सोबत नव्हताच कधी... त्यांच्या सत्तेत येण्याला अनेक पैलू आहेत, तशीच विविध कारणंही... गेली सहा वर्षे लोक वाट पाहत होते, नवीन आहेत, त्यांना पुरेशी संधी द्यावी. अशी त्यांची भूमिका होती. त्यावरुन जनतेला गृहीत धरण्याची चूक सत्ताधा-यांनी केली. अनेकांना ही बनवाबनवी स्पष्ट दिसत होती. अनेकांना आता हे सगळं दिसलं आहे. अनेकांना आणखी काही काळाने समजेल. तरीही एक वर्ग असेल त्याला काहीही झाले तरीही कधीच कळणार नाही. आणखी एक वर्ग आहे, जो सगळं कळूनही कधीच बदलणार नाही. त्यांच्या मेंदूचा 'मनू'ने घेतलेला ताबा कितीही 'लिंबू मिरच्या' टाकल्या तरी या जन्मात उतरणार नाही..जी जनता साधी भोळी आहे ती आणि मनूप्रेमी आहे ती- हे दोन समुह वगळता इतर आता वेगळी भुमिका घेऊ लागलेत, बोलू लागलेत, चुकांवर नापसंती व्यक्त करु लागलेत.

खरं तर २०१४ मध्ये मोदींना ३१ टक्के मतं मिळाली होती आणि २०१९ मध्ये ४१ टक्के.. म्हणजे संपुर्ण देश सोबत आहे हा दावा पहिला येथेच उघडा पडतो. यापैकी किती असे मतदार असतील ज्यांनी भाजपला हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यासाठी निवडून दिले आहे..? असतील संघवाले... ते वगळून यातील असे किती टक्के लोक असतील ज्यांनी देशाच्या समस्या दूर करुन विकास-समृद्धीसाठी मत दिलं आहे..? असे असंख्य लोक आहेत. ज्यांनी मागच्या बदनाम सरकारला बदलून नव्यांना संधी देण्यासाठी मतदान केलं आहे, अनेक असेही आहेत. ज्यांनी जाहिराती-भूल-थापा-१५ लाख मिळतील, काळा पैसा देशात येईल, चीन- पाकिस्तानला उत्तर मिळेल म्हणून तेव्हाच्या विरोधी पक्षाला सत्तेत बसवले आहे.

महागाई-शिक्षण-रोजगार-आरोग्य- अशा सर्व समस्या सोडवाव्यात, या अपेक्षेनेही कोट्यवधी जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली.. पुलावामाचा हल्ला झाल्याने चीड म्हणून कितीतरी मतदार २०१४ नंतर झालेला अपेक्षाभंग विसरुन २०१९ ला समर्थनार्थ उतरले होते.. अर्थात पुलवामाच्या घटनेभोवतालचं संशयाचं धुकं अजूनही पुर्णपणे हटलेलं नाही. त्यामुळे यामागे गेलेला मतदार देखील कायम राहील की नाही? याची शाश्वती नाही. थोडक्यात मतदारांनी हिंदुत्व आणि कथित हिंदूहृदयसम्राट म्हणून नाही तर वेगवेगळ्या कारणाने या सत्ताधाऱ्यांना २०१९ मध्ये समर्थन दिले आहे.

२००४ साली मनमोहन सरकारला सत्ता मिळाली आणि २००९ ला वाढीव जनादेशाने पुन्हा तेच सरकार आले..शांत सुसंस्कृत माणसावर लोक असा विश्वास ठेवू शकतात तर मग निवडणुकीत सगळे फंडे वापरणा-या, त्यासाठी कोणत्याही थराला जाणा-या, वारेमाप बोलणाऱ्या, हुशारीने खोटे पेरणा-या आणि सतत भावनिक विषय चघळणाऱ्या, त्यासाठी सर्व प्रसिद्धी माध्यमं कामाला लावणाऱ्या माणसाला दुसऱ्यांदा निवडून दिले, यात फार काही विशेष घडले नव्हते. मोदींना पुन्हा दिलेली संधी एवढाच त्याचा अर्थ होता.

मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू-मुस्लिम द्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचे भरते येत असे, पुढे अर्थव्यवस्था कोसळली, मुलांच्या नोकऱ्या गेल्या, आधीच बेरोजगार तरुण आणखी निराश झाले.. अशी स्थिती घरात घुसल्यावर पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालं आहे..मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता, तर काम करण्यासाठीही होता हा सुर आता निघू लागलाय..

तरीही चर्चेसाठी तूर्तास हे समजू की, विरोधक वगळता संपुर्ण देश संघ-भाजप सोबत गेला.. मग सरसकट त्यांच्या भल्याचा असा एक तरी धोरणात्मक निर्णय गेल्या ६ वर्षांत घेतला गेला आहे का..? जर हिंदू राष्ट्र झाले तर इतर धर्मीयांना वाईट दिवस येतील म्हणून आनंदीत झालेले लोक, त्यांचे तरी काय भले झालेय..? हिंदु विरुद्ध मुसलमान या चर्चा घडवून आणखी किती दिवस काढता येणार होते..? ती धार्मिक अफुची नशा कधीतरी उतरणारच होती, अर्थव्यवस्था कोलमडली, अनेक समस्या समोर आल्या आणि खरं रूपही दिसू लागलं. कशाचेही आणता येईल पण पैशाचे सोंग आणता येत नाही.

सीमेवर पाकिस्तान सोबत धार्मिक मुद्दा चालतो. चीनसोबत चालू शकत नाही. कारण चीन यांच्यापेक्षाही अधिक लबाड आहे. त्यामुळे आता खोट्या शौर्याच्या बाताही उप-या ठरत आहेत. राम मंदीराचा मुद्दा संपल्याची असंख्य लोकांची भावना आहे. आता भावनिक मुद्दे पुरे झाले, जरा कामाचे पाहा- समस्या सोडवा, तरुणांना रोजगार द्या. व्यापाऱ्यांचा धंदा चालू द्या,शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, देशात शांतता नांदू द्या..

अशा मागण्या करणारे आवाज वाढू लागले आहेत. पण त्यावर प्रत्यक्ष काम होताना दिसत नाही, होणारही नाही. कारण ते चिंतन आणि तशा योजना सत्ताधा-यांकडे नाहीत आणि नव्हत्या कधीच. ती सकारात्मकता तर अजिबात नाही, नकारात्मकता खूप आहे पण त्याचा अधिकचा डोस आता उपाशी जनतेला पचेनासा झाला आहे- हे असंच चालत राहीले तर जनतेच्या रागाचा स्फोट ठरलेला आहे.

या सगळ्यांचा एकत्रित परिणाम हा की सोबतचा एक एक घटक आता दूर होऊ लागलाय. त्यातच राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपचे खरे रंग दिसू लागलेत. संघ स्थापन झाला होता, तो मुस्लिमांशी लढण्यासाठी नव्हे. तर देशाला स्वातंत्र्य मिळाले की मनूवादी विचारांची पूर्वीची व्यवस्था पुन्हा आणावी, यासाठी.. तशी आपली धर्मसत्ता आणि देवत्व पुन्हा यावे हा मूळ हेतू.. त्यात अडसर असणाऱ्या महात्मा गांधींची हत्या करण्यात आली, पण फक्त त्यामुळे संघाचा इरादा सफल झाला नाही. गांधीजी मशागत करुन गेले होते. त्यांच्या अनुयायांनी पेरणी केली.

भारताने लोकशाही स्वीकारली, डॉ. बाबासाहेबांनी नेमके संविधान निर्माण केले. .मग स्थिती बदललेली पाहुन संघाने हळुहळू वेष बदलला. लोकांपुढे जाताना विचारांची नव्याने मांडणी केली, स्वत:कडे एकही महापुरुष नव्हता. त्यामुळे सगळे विरोधातले खेचून घेऊन मोट बांधली. कालांतराने सत्ता मिळवली पण मन-मेंदू तोच आहे. खरे विचार बदललेले नव्हतेच कधी. सत्तेसाठी जनतेमध्ये जाताना विचारांची मांडणी वेगळी होती. खरा हेतू वेगळा. त्यामुळे तो छुपा अजेंडा कधी ना कधी बाहेर काढावा लागणार होता. तो आता हळूच काढला गेलाय. देशातला आजचा गोंधळ त्यातून निर्माण झाला आहे. हा गोंधळ समजण्यासाठी उदाहरण म्हणून चंचल मनोवृत्तीच्या उत्तर प्रदेशचे उदाहरण पाहता येईल.

भाजपला प्रचंड बहुमत मिळालेल्या या राज्यात सत्ताधाऱ्यांचा, सुरुवातीच्या निर्णयातून मुस्लिम विरोध दिसला. नंतर दलितांवर अत्याचार वाढत गेले, त्यांची जागा दाखवण्याची मानसिकता वाढत गेली. नंतर थेट ब्राम्हणांवर हल्ले सुरु झाले..! सत्ताधारी पक्षाने अनेक दिग्गज नेत्यांना बाहेर काढले, व्यवस्थेतल्या बाहुबलींना एन्काऊंटरमधे मारून टाकले. समाजाच्या अनेक निरपराध्यांनाही थेट गोळ्या घालून संपवण्याची मालीका सुरु झाली. संख्येने मोठी जमात दबंगाई करु लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मूळ नाव अजय बिश्ट आहे. बिश्ट हे नेपाळी ठाकूर म्हणजे उच्च जमातीचे मानले जातात. यापुर्वी मायावती (दलित), मुलायमसिंह व अखिलेश यादव ( ओबीसी) असे दिर्घकाळ मुख्यमंत्री पाहिलेल्या उत्तर प्रदेशात खूप दिवसांनी ठाकूर मुख्यमंत्री झाला आहे. स्वतः मुख्यमंत्रीच ठाकुर समाजाचे असल्याने त्या जमातीकडुन इतरांवर अन्याय वाढला आहे, त्याला ठाकुर मुख्यमंत्र्यांची सहमती आहे, हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल.

भविष्यात आपल्याला हिंदुत्वाचा आवाज म्हणून राजकीय पर्याय निर्माण होऊ नये. म्हणून अनेक कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या हत्या सुरु आहेत, आज उत्तरप्रदेशमध्ये ब्राम्हण विरुद्ध क्षत्रिय विरुद्ध दलित विरुद्ध इतर समाज असा उघड संघर्ष सुरु आहे. या हत्या आणि सत्तेसाठी सुरु असलेल्या स्पर्धेची तुलना फक्त मागास इस्लामिक राष्ट्रामधील मुस्लिम टोळ्यांशी करता येईल. एकमेकांमध्ये उच्च-निचता आणि धार्मिक मतभेदातून ते हत्याकांड घडवतात, मशीदीत नमाज पठण करणारे भाविक असो की, शाळेतली लहान मुलं, त्यांचा उन्माद कुणाला सोडत नाही.

धार्मिक म्हणवणाऱ्या उलट्या काळजाच्या त्या हिंसक पशूंच्या टोळ्या आजही अस्तित्वात आहेत. भारतातही धर्माचे शस्त्र बनवुन मिळवलेली सत्ता आज त्या दिशेनेच चालली आहे. भलेही त्याचे आजचे स्वरुप छोटे असेल, पण इतिहास साक्षीदार आहे की, आंधळी धार्मिकता कालांतराने आपापसात व्यापक हिंसाचार घडवतेच घडवते. भविष्यकाळात हे भीषण होणार आहे, धर्माच्या आधारावर राष्ट्र उभे राहत असते, धर्माने देशाचा विकास होत असता तर पाकिस्तान जगातला सर्वाधिक संपन्न देश असता, धर्म देश घडवत असता तर नेपाळ हिंदूराष्ट्रावरुन लोकशाही राष्ट्र झाला नसता.

अयोध्या वादानंतर देशात वाजपेयी सरकार आले, धार्मिक उन्मादाच्या पार्श्वभुमीवर ते सत्तेत आले तरीही ते अनेक अर्थाने विचाराने आणि कृतीने व्यापक होते, महाराष्ट्रातही ९२ च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपची सत्ता आली, दोन्ही सत्ता फक्त पाच वर्षे होत्या, त्यानंतर कॉंग्रेसची देशात दहा वर्षे आणि राज्यात १५ वर्षे सत्ता होती, त्यासाठी मोदीप्रमाणे नियोजन, माध्यमांची साथ, दबंगाई करण्याची गरजही नव्हती. कारण धार्मिक रंग लगेच चढतो, तसा उतरतोही लगेच. प्रतिकार हे ही त्याचे एक कारण आहे. तो रंग उतरला की लोक भानावर येतात. जातीय रंग मात्र, कायम राहतात कारण धर्माचे राजकारण करणा-यांचा आणि इतर बहुसंख्याकांचा तो मुळ विचार आहे, ते रंग हजारो वर्षाचे पक्के आणि संस्कृती-जीवनपद्धतीने बांधले आहेत. राजकारण,समाजकारण आणि अर्थकारणाची तशी रचना करुन त्यांच्या बापजाद्यांनी हजारो वर्षे हा विचार जपलेला आहे..! हा विचार कायम ठेवण्याचा 'त्यांचा' आजही प्रयत्न सुरु आहे..

Updated : 11 Oct 2020 7:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top