Home > मॅक्स ब्लॉग्ज > मालिकांमधील विकृतीच नाही, तर विकृतीची मालिका थांबायला हवी!

मालिकांमधील विकृतीच नाही, तर विकृतीची मालिका थांबायला हवी!

टीव्ही वरील मालिका पिढी घडवण्याचं काम करतात की बिघडवण्याचं? मालिकांमध्ये टीआरपीसाठी दर्शवलेले प्रसंग एखाद्या जीवावर कसे उलटू शकतात? माध्यमांवरील प्रसंग आणि त्याचा मानवी जीवनावर नक्की काय परिणाम होऊ शकतो? यावर प्रकाश टाकणारा ज्योत्स्ना गाडगीळ यांचा लेख नक्की वाचा...

मालिकांमधील विकृतीच नाही, तर विकृतीची मालिका थांबायला हवी!
X

टीव्ही मालिका पाहणं मी केव्हाच सोडलं, पण येनकेन प्रकारेण मालिकांची दृश्य, संवाद कानावर येतातच. त्यापैकी एका एपिसोडचा प्रोमो गेले चार-पाच दिवस झळकतो आहे. मालिकेचे नाव घेऊन कुप्रसिद्धी देण्याचीही इच्छा नाही, म्हणून सदर उल्लेख टाळते. जाणकारांना 'त' म्हणता ताकभात कळेलच!

प्रसंग आहे, ट्रेन प्रवास करणाऱ्या एका मुलाच्या हातावर, एका विकृत व्यक्तीने सेफ्टीपिन टोचण्याचा! प्रसंग इथे थांबत नाही, मुलाचा रॉडवरचा हात सुटतो आणि तो ट्रेनमधून खाली पडतो. पुढे त्या मुलाचं काय होणार हे सर्वस्वी लेखकाच्या, दिग्दर्शकाच्या आणि प्रोडक्शनवाल्यांच्या हातात आहे!

प्रत्यक्ष आयुष्यात मात्र, या घात-अपघाताची शिक्षा एकच- मृत्यू!

ट्रेनच्या ७० जणांच्या कंपार्टमेंटमध्ये रोजचा ७०० जणांचा प्रवास! त्यात अर्ध्याहून अधिक जण बाहेर लोम्बकळत असतात. त्यांना आधार असतो, तो कंपार्टमेंटमधल्या चंदेरी रॉडचा! तोच रॉड जो एकाचवेळी जवळपास शंभर मुठींनी आवळलेला असतो! पुढच्या गर्दीचा अंगावर येणारा भार, लोकांची भांडणं, चढण्या-उतरणाऱ्यांची वर्दळ, लोकांच्या बॅगांचे धक्के आणि पाऊल टेकायला कंपार्टमेंटच्या दाराची निमुळती पट्टी!

अशावेळी तो केवळ रॉड नाही तर मोठा आधारस्तंभ वाटतो! बऱ्याचदा हाताला घाम आल्याने किंवा पुढची गर्दी अंगावर लोटल्यामुळे तो हात सुटून मृत्यूच्या जबड्यात लोटले जाण्याची पूर्ण खात्री असते. तरीदेखील लोकांना जोखीम पत्करून दुर्दैवाने रोजची मृत्यूशी झुंज द्यावीच लागते. कशासाठी? पोटासाठी....!

अशात वाद झाले, भांडणं झाली, मारामारी झाली, तर त्याची किंमत चुकवावी लागते, ती रॉडवर भिस्त असलेल्या माणसांना! असे अनेकांचे हात सुटताना पाहिले, ऐकले, अनुभवले आहेत. दोन क्षण धस्स होतं. ट्रेन वेगाने पुढे जाते. भग्न अवस्थेत पडलेला निपचित देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळून पाकीट, आयडी कार्ड वगैरे तपासून घरच्यांच्या हाती सुपूर्द केला जातो.

हे एवढं सविस्तर लिहिण्यामागे कारण आहे, तो विकृत प्रसंग. जो केवळ टीआरपी मिळवण्यासाठी, मालिकेला रंगतदार(?) वळण देण्यासाठी, मूळ प्रसंगात काहीतरी बदल म्हणून दाखवला जाणार आहे. त्यांच्यासाठी हा केवळ एक एपिसोड असेल, पण ज्यांच्या आयुष्यात हे घडलं, त्यांच्या कुटुंबासाठी हे भीषण वास्तव पचवणं किती जड गेलं असेल, याची कल्पनाच केलेली बरी!

सूड उगवण्याच्या प्रसंगाचे रूपांतर म्हणून चित्रित केलेला हा प्रसंग समाजात किती जणांच्या विकृत मानसिकतेला खतपाणी घालत आहे, याची लेखकाला जाणीव तरी आहे का? उद्या ट्रेन पूर्ववत सुरू होतील, लोकांची झुंबड ट्रेनवर तुटून पडेल, वादावादीचे प्रसंग उद्भवतील, अशात कोणी रागाच्या भरात या एपिसोडमध्ये पाहिलेली कृती प्रत्यक्षात केली तर याला जबाबदार कोण?

टीव्ही, सिनेमा, वेबसिरीज यांची दिवसेंदिवस खालावत चाललेली पातळी पाहून हे माध्यम मनोरंजनाचे राहिलेले नसून विकृतीचा कंड शमवणारे साधन झाले आहे. वाचलेल्या गोष्टी एकवेळ लक्षात राहत नाहीत, परंतु पाहिलेल्या गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात, असे मानसशास्त्र सांगते. हे माहीत असतानासुद्धा दरदिवशी या विकृतीत भर पडत चाललेली आहे आणि त्यावर केवळ विनोद निर्मिती करून (मिम्स करून) आपण दुर्लक्ष करत आहोत. भविष्यात याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत यात शंका नाही.

या गोष्टींबद्दल केवळ निषेध न नोंदवता या थेट बंद पाडण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. अन्यथा उद्या याच माध्यमांच्या प्रभावातून घराघरात गुन्हेगार तयार झाले नाहीत, तर नवल!

Updated : 28 July 2021 3:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top