Home > मॅक्स ब्लॉग्ज > भाजपच्या नव्या राजकीय मॉडेलचा मुकाबला कसा करणार?

भाजपच्या नव्या राजकीय मॉडेलचा मुकाबला कसा करणार?

विरोधाची धार बोधक होणे सक्षम लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी व्यक्त केले असतानाच भाजपने जन्माला घातलेल्या नवीन राजकीय मॉडेलमध्ये कोणता विरोधी पक्ष तग धरू शकेल असा प्रश्न लेखक अभ्यासक डॉ.विनय काटे यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या नव्या राजकीय मॉडेलचा मुकाबला कसा करणार?
X

भाजपचे नवीन राजकारणाचे मॉडेल -

भाजप, काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी आणि बहुतांश पक्षांमध्ये जे नेते खूप जास्त प्रभावशाली आहेत ते पैशाच्या जोरावर आहेत; आणि त्यांनी हा पैसा अर्थातच कष्टाने न कमावता भ्रष्टाचारातून कमावलेला आहे. या नेत्यांच्या मागे असणारे मोठे उपनेते, कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, व्यापारी, विविध संघटनांचे पदाधिकारी वगैरे लोकही ह्या भ्रष्टाचाराचे लाभार्थी असतात. ही सर्वपक्षीय भ्रष्टाचारी यंत्रणा या देशात स्वातंत्र्यापासून अलीकडे काही वर्षांपूर्वीपर्यंत शांततेत सुरू होती, आणि पक्षापक्षांमधले विरोध फक्त निवडणुकीपुरते मर्यादित होते.

गेल्या 8-10 वर्षात पैशाचे व्यवहार, नवीन कंपन्यांची नोंदणी, जमिनीचे उतारे वगैरे गोष्टी प्रचंड वेगाने डिजिटल झाले आणि दुसऱ्या बाजूला आधार कार्ड, मोबाईल नंबर, PAN आणि बँक खाते एकमेकांशी जोडले गेले. नोटाबंदी करून अचानक मोठ्या नोटा बाद केल्या गेल्या आणि त्यानंतर लोकांना ते पैसे बदलून घ्यायला बँकेत जावे लागले. या सर्वातून एक प्रचंड मोठा transaction data निर्माण झाला जो थेट व्यक्तीच्या नावाशी जोडला गेला आहे. Big Data Analysis आणि Artificial Intelligence मधले नवनवीन टूल वापरून आता पैशाचा प्रवाह तपासयंत्रणांना सहज कळतो आणि एखाद्या माणसाची आर्थिक कुंडली क्षणात मिळते.

या सगळ्या माहितीचा वापर तपासयंत्रणा पाहिजे तसा करू शकतात आणि कुणाही व्यक्तीची पाळेमुळे खणून काढू शकतात. हेच करत भाजपने आपल्या सत्तेचा वापर करत आपल्या विरोधकांच्या भ्रष्टाचाराची इत्यंभूत माहिती गोळा केली आणि यंत्रणा त्यांच्या पाठीशी लावून दिल्या. आर्थिक गैरव्यवहार या माहितीच्या आधारे कोर्टात अगदी सहजपणे सिद्ध होवू शकतात आणि प्रत्येक गैरव्यवहाराची वेगवेगळी शिक्षा भोगावी लागली तर आयुष्य तुरुंगात जाण्याची पूर्ण खात्री आहे. ही भीती दाखवून मग भाजपने आपले कट्टर विरोधक गुडघ्यांवर आणले आणि त्यांना स्वतःच्या पक्षात सामील करून घेतले.

भाजपेतर पक्षातील नेत्यांनी 20-25 वर्ष नेटाने (पण भ्रष्ट मार्गाचे) राजकारण करायचे, संघटन उभा करायचे, माणसे जोडायची... आणि मग भाजपने यंत्रणा पाठीशी लावून त्या विरोधी नेत्यांना त्यांच्या समर्थकांसह आपल्यात सामावून घ्यायचे असे हे सुंदर मॉडेल आहे. तपासयंत्रणांची भीती नसावी, सुखाने झोप लागावी म्हणून तमाम विरोधी नेते भाजपवासी झाले किंवा त्यांच्याशी युती करून बसले. महाराष्ट्रात भाजपचे 80% मोठे नेते याच पद्धतीने आयात करून आणले आहेत. जोवर राजकारणात भ्रष्टाचार आहे आणि पैसे घेवून मते देणारे नागरिक आहेत, तोवर भाजपला हरवणे आता अशक्य आहे कारण त्यांनी देशातल्या प्रत्येक व्यवस्थेवर कब्जा केलेला आहे.

भाजप विरोधी राजकीय नेत्यांच्या बाबतीत तपासयंत्रणांचा गैरवापर करते असे मी चुकूनही म्हणणार नाही. विरोधी पक्षांमध्ये असणारे बहुतांश नेते भ्रष्ट आहेत म्हणून भाजप हे करू शकते हेच सत्य आहे. आणि भाजप जिथे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विद्वान लोकांच्या बाबतीत तपासयंत्रणांचा खरोखर गैरवापर करते तिथे मात्र विरोधी पक्षाचे नेते भीतीने तोंड उघडत नाहीत आणि त्यामुळे ते जनतेच्या मनातून अजूनच उतरत जातात. भाजपच्या या मॉडेलला हरवायला सध्या कुठलाही पक्ष सक्षम नाही कारण त्यांना जुन्या वळणाचे भ्रष्ट राजकारण करायचे आहे.

जोवर गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणात वैचारिक आणि आर्थिक बाबतीत प्रामाणिक लोकांना स्थान मिळणार नाही तोवर भाजप हरणार नाही, हेच सध्याचे सत्य आहे!

- डॉ. विनय काटे

Updated : 24 July 2022 11:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top