काळा पैसा नेमका कसा तयार होतो?
नोटाबंदीनंतर काळ्यापैश्यावर टाच आली असा दावा केंद्र सरकार वारंवार करत असतं. मात्र, नोटाबंदीनंतर खरंच काळा पैसा बंद झाला का? काय आहे सत्य वाचा आनंद शितोळे यांचा लेख
 X
X
औषध कंपनीच्या कपाटात ठेवलेली कोट्यावधी रुपयांची रोकड बघितली ? वर्तमानपत्रात वेळोवेळी येणाऱ्या लाखो रुपयांच्या लाचखोरी च्या बातम्या वाचल्यात ? नोटाबंदी झाली की काळा पैसा नष्ट होणार असा भ्रम सगळ्यांना झालेला होता, त्याचवेळी " काळा पैसा गादीखाली, उशीच्या खोळीत आणि बाथरूममध्ये टाइल्सखाली दडवून ठेवलेला असतो अस ज्यांना वाटत त्यांच्या बुद्धीला दोन मिनिट मौन पाळून आदरांजली" असं लिहीलं होतं.
अजूनही लोकांचे गैरसमज तसेच आहेत. काळा पैसा नेमका कसा तयार होतो ? एक पगारदार माणूस ज्याला टीडीएस वजावट होऊन पगार मिळतो असा माणूस पगारातली रक्कम खिशात रोख ठेवून बाहेर पडतो.
बाजारात भाजी विकत घेतो आणि रोख पैसे देतो. हॉटेलात जाऊन नाश्ता करतो रोख पैसे देतो. चहाच्या टपरीवर चहा पितो आणि शेजारच्या पानटपरीवर सिगरेट विकत घेतो. चारही ठिकाणी पैसे रोख देतो. त्याचा पांढरा पैसा काळा झाला ?
भाजीविक्रेता अश्या साठवलेल्या पैशातून एक टीव्ही खरेदी करायला दुकानात जातो, टीव्ही घेतो आणि रोख पैसे देऊन बील घेऊन बाहेर पडतो. हॉटेलवाला हॉटेलसाठी फ्रीज घेतो आणि रोख पैसे देऊन बिल घेतो. चहावाला आणि पानवाला रोख पैसे देऊन दुचाकी शोरूममध्ये जाऊन गाडी खरेदी करतात.चौघांचे काळे पैसे पुन्हा पांढरे झाले ? हा नोकरदार इसम कर्ज काढतो आणि घर विकत घ्यायला जातो.
घरासाठी बिल्डरला पैसे बँक देते ग्राहकाच्या वतीने. बिल्डर ह्या प्लंबर, सुतार, गवंडी, फरशीवाला, रंगवला, वायरमन ह्या सगळ्यांना मजुरी रोख देतो. पांढरा पैसा काळा झाला ?
नेमकं काय झाल ? जेव्हा आपण पैसे कुठल्याही माध्यमातून देतो तेव्हा जर त्या व्यवहाराचा कर भरला गेला आणि नोंद झाली तर व्यवहार कायदेशीर अन्यथा तो काळा पैसा? हे पैशाच काळा-पांढरा-काळा-पांढरा हे सतत सुरु असतंय आणि ही समांतर अर्थव्यवस्था कायमच सगळ्या ठिकाणी काम करते किमान आपल्या देशात. हे पैसे खर्च करणारे-देणारे-घेणारे कोण लोक आहेत? हे तुम्ही आम्ही आहोत सर्वसामान्य नागरिक जे काही मुद्दाम विनापावती व्यवहार करत नाहीत. पण चहा नाश्ता, भाजी, पान टपरीवरच्या वस्तू ह्या कुणी पावती करून विकत नाही म्हणून ते व्यवहार आपण थेट काळे पैसे ठरवतो का?
हा न्याय लावायचा ठरला तर देशातला प्रत्येक माणूस कधीतरी कुठेतरी काळा पैसा स्विकारतो अथवा देतो असं चित्र तयार होईल. मग काळा पैसा नेमका कुठे तयार होतो ? कपडे बनवणारा कारखानदार १०० कपडे तयार करतो, त्यापैकी ६० कपड्यावर उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर सगळ भरून बिल बनवून वितरकाला देतो, तो पुढे किरकोळ दुकानदाराला देतो.
४० कपडे त्याच वितरकाला कुठलेही कर न भरता सरळ विकतो आणि तो पुढे तसेच किरकोळ दुकानदाराला देतो. ह्या ४० कपड्यावर कुठलाही कर भरला नाही म्हणून काही रक्कम उत्पादन शुल्क अधिकारी आणि मूल्यवर्धित कर अधिकार्र्याला पोहोच होते.
त्यांच्याकडून पुढे पायरी पायरीने रक्कम थेट संबंधित खात्याच्या प्रमुखाला आणि मग मंत्र्याला पोहोचते. तीच अवस्था सरकारी कामात दिल्या जाणाऱ्या लाच किंवा कमिशनची. वेगवेगळी टेंडर, काम, सरकारी निर्णय आपल्या व्यवसायाला पूरक व्हावेत किंवा सरकारी परवानग्या सुलभपणे,नियम डावलून मिळाव्यात म्हणून जी लाचखोरी होते ती कधीच ज्याने पैसे घेतलेत तिथवर थांबत नाही. ह्या पैशाची वाटणी थेट वरपर्यंत पोहोचते हे उघड गुपित आहे.
हा काळा पैसा मग बेनामी मालमत्ता किंवा थेट परदेशात सायफन होतो.हवालामार्गे हा पैसा थेट परदेशात जातो जिथे छोट्या देशात कर आकारणी सुलभ असते तिथे एखाद्या कंपनीत गुंतवला जातो. ती कंपनी बहुतांशी आर्थिक व्यवहार करणारी असते. जी भारतात एखाद्या कंपनीत पैसे गुंतवते शेअर्समध्ये.
ज्या कंपनीचे शेअर्स घेतलेत ती कंपनी योगायोगाने ह्याच नेते अधिकारी लोकांशी संबंधित असते.अशा रीतीने देशातून बाहेर गेलेला काळा पैसा उजळ माथ्याने शेअर बाजाराच्या, भांडवलाच्या अथवा कर्जाच्या रूपाने राजरोसपणे पुन्हा अर्थव्यवस्थेत येतो.
आता विचार करा काळा पैसा रोखायचा असेल तर कुणाची इच्छाशक्ती हवीय आणि कोण कारवाई करणार? नोटाबंदी सारखा खेळ करून काळा पैसा नष्ट होईल अस गृहीतकच मुळात चूक असताना ह्या नोटाबंदीने तळाला असलेल्या सामान्य माणसाला सगळ्यात जास्त त्रास झाला आणि रांगेत उभ राहून धक्के खावे लागले.
मात्र, खाजगी बँकांत राजरोजपणे मोठ्या धेंडानी पैसे बदलून घेतले वरताण म्हणजे रोख स्वरुपात नसलेला काळा पैसा तसाच राहिला ज्यावर अंकुश ठेवायला जी यंत्रणा कार्यक्षम असायला हवीय तीच यंत्रणा हा काळा पैसा तयार करायला हातभार लावतेय.
मग नोटाबंदीने काळा पैसा नष्ट झाला किंवा होईल ह्या दाव्यात नेमकं तथ्य किती आणि हा प्रयोग किती यशस्वी झाला? ज्या सर्वसामान्य लोकांचे रोजगार केले ,काळ्या पैशाच्या नावाखाली रांगेत उभे राहून १०० पेक्षा जास्त लोक टाचा घासून मेले. त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? रोजगार गमावलेल्या लोकांच्या पोटापाण्याचे काय आणि त्याची जबाबदारी कुणावर ?
#प्रश्न_विचारा
#कामकीबात
#कामाचेबोला
















