Home > मॅक्स ब्लॉग्ज > ये दिल मांगे हॅपिनेस मोर....

ये दिल मांगे हॅपिनेस मोर....

तुम्हाला आनंदी राहायचं आहे... फक्त या एकाच कारणासाठी तुम्ही गजानन हरणे याचं हे मोर हॅपिनेस देणारं आर्टिकल वाचा...

ये दिल मांगे हॅपिनेस मोर....
X

Photo courtesy : social media

आज मला बोलायचंय...एका अशा आजरावर बोलायचंय की जो खूप सामान्य आहे पण त्यावर सामान्यतः बोललं जात नाही. कारण हा आजार ज्याला होतो त्याला एकतर काय बोलावं हे कळत नाही किंवा त्याचं बोलणं जगाला कळण्याआधीच तो जग सोडून जातो. जे लोक या आजारातून बरे होतात तेच याबद्दल बोलू शकतात. पण दुर्दैव हे की, असे लोक खूप कमी असतात आणि लोकोपवादाच्या भीतीने सहसा तेही बोलत नाहीत. तुम्हाला आतापर्यंत कदाचित कळलं असेल, की मी कोणत्या आजाराबद्दल बोलतोय.

होय, मी नैराश्याबद्दल बोलतोय, ज्याला आपण इंग्रजीत 'डिप्रेशन' (depression) असं म्हणतो. हा आजार इतका कॉमन आहे की कुठलीही शारीरिक लक्षणे घेऊन डॉक्टरकडे गेलेल्या ४० टक्के लोकांना तर कुठलाही दुसरा आजार नसतो. त्यांची शारीरिक लक्षणे म्हणजे त्यांच्या शरीरावर त्यांच्या नैराश्याचा किंवा चिंतेचा झालेला परिणाम असतो. नुसत्या मानसोपचारानेही त्यांची लक्षणे ठीक होतात.

टाइम्स ऑफ इंडियाच्या २०२० मधील एका सर्वेनुसार कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर भारतातील ४३% लोक नैराश्याने ग्रासले गेले होते. यातील ३६ टक्के लोकांमध्ये सौम्य, ११ टक्के लोकांमध्ये मध्यम, तर ६ टक्के लोकांमध्ये तीव्र स्वरूपाचं नैराश्य होतं. म्हणजेच प्रत्येक तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती ही मानसिक रुग्ण असण्याची दाट शक्यता असते. ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या दोन वर्षांच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य चार सरकारी दवाखान्यांना (केटीएम, सायन, नायर आणि कूपर) ५.६ लाख रुग्णांनी भेट दिली. त्यापैकी ३१ टक्के म्हणजेच १ लाख ७४ हजार रुग्ण हे केवळ मानसोपचारासाठी आले होते.

नैराश्य कुणालाही येऊ शकतं, अगदी कुणालाही. स्त्री-पुरूष, गरीब-श्रीमंत, काळा-गोरा यातल्या कुठल्याच भेदाला नैराश्य जुमानत नाही. त्याला कुठलं कारण लागेलच असं नाही. केवळ मेंदूत रासायनिक असंतुलन झाल्यामुळेही नैराश्य येतं. तरी कौटुंबिक दबाव, वारंवार पदरी पडणारं अपयश, प्रेमात अपयश, लग्नात अपयश, गरिबी, आर्थिक मंदी, अमान्य सरकारी धोरण, एकटेपणा, शारीरिक-मानसिक-लैंगिक छळ, कामाचा ताण, मासिक पाळी किंवा गर्भधारणेतून झालेले हार्मोनल चेंजेस, परीक्षेचा ताण, निकालाचा ताण, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, हुंडा पद्धत, कर्जबाजारीपणा, नपुंसकता, प्रचंड आर्थिक नुकसान, पालकांच्या पाल्याकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा, नोकरी जाणे, निवृत्ती, दीर्घकालीन आजार, रॅगिंग, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, ही आणि अशी असंख्य कारणे नैराश्यास कारणीभूत ठरतात.

स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा अतिवापर, त्यातून निर्माण होणारे फोमो (फिअर ऑफ मिसिंग आऊट), फँटम फोन रिंगिंग सिंड्रोम (फोनची रिंगटोन वाजल्याचा किंवा फोन व्हायब्रेट झाल्याचा भास होण्याचा आजार), नोमोफोबिया (मोबाईल जवळ नसल्याची किंवा बंद असल्याची भीती) हे आजार सुद्धा एखाद्याला नैराश्यग्रस्त बनवतात.

नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती एकाच गोष्टीचा वारंवार विचार करते. आपण किंवा इतरांनी केलेल्या एखाद्या चुकीमुळे आपलं आयुष्य कसं बरबाद झालं हे ही व्यक्ती स्वतःला सांगत असते. प्रत्येक बाबतीत ही व्यक्ती स्वतःला दोष देते. भूतकाळात घडलेल्या घटना आणि त्यांना कसं बदलता आलं असतं, याचाच विचार ती करते. आपलं आयुष्य अर्थहीन झालंय आणि भविष्यही अंधकारमय असेल, ही भावना मनात पक्कं घर करते. आपण खूप काही साध्य करू शकलो असतो पण आपण काहीच केलं नाही, आपण आपल्या कुटुंबीयांच्या अपेक्षांना खरे उतरलो नाही, असं वाटायला लागतं. आणि आता झालेल्या गोष्टी बदलता येणार नाही, याची जाणीव झाल्यावर हे नैराश्य कित्येक पटीने वाढतं.

अशा परिस्थितीत जेव्हा ही व्यक्ती इतरांशी बोलते तेव्हा आपल्या चुका आणि अडचणींबद्दलच सांगत असते. मग तिचे प्रियजन किंवा मित्र तिला सकारात्मक विचार कर, अजून मेहनत कर, व्यायाम-योगासनं कर, कुठेतरी फिरून ये, ज्या गोष्टीत मन रमतं ती गोष्ट कर असे सल्ले देतात. त्यांचंही काही चुकत नाही, पण नैराश्यग्रस्त लोकांची अडचण हीच असते की त्यांना काहीच करता येत नाही. ज्या गोष्टी आधी करायला आवडायच्या त्या गोष्टी सुद्धा त्यांच्याकडून होत नाहीत. लाख समजून सांगितलं तरी हे लोक तेच ते बोलतात. सगळं काही सोडावंसं वाटतंय, जीव द्यावासा वाटतो असं हे लोक मित्रांना सांगतात.

सरळसरळ नाही सांगितलं तरी आत्महत्येचा एखादा इशारा तरी देतात. कालांतराने कंटाळून मित्रच भेटायचं बंद करतात. फोन कॉल्स देखील कमी होतात. आपली माणसं, आपली स्वप्नं दूर जाताना दिसतात. मग मृत्यूला जवळ करण्यावाचून काहीच पर्याय दिसत नाही.

नेहमीच्या विचारांनी माणूस थकून जातो, पण झोप लागत नाही. कशीबशी झोप लागली तरी उठल्यावर थकवाच जाणवतो. ब्रश करणे, आंघोळ करणे ही नित्यनियमाची कामेसुद्धा अवघड वाटायला लागतात. दिसतील ते कपडे माणूस घालायला लागतो. ते धूतलेलेच असावेत किंवा इस्त्री केलेलेच असावेत, अशी अपेक्षा राहत नाही. कामावर उशिरा जाणं किंवा न जाणं हे नित्याचं होतं. फक्त अंथरुणात पडून राहावंसं वाटतं. अंधार तर इतका आवडतो की कधी उजेड व्हावा असं वाटतच नाही. श्वास दिवसेंदिवस उथळ होत जातो. कुणाच्या मेसेजला रिप्लाय देण्यासाठी मोबाईलचे काही बटनच दाबायचे असतात. पण तेही काम हिमालय सर करण्याइतकं कठीण वाटतं. कॉल्स उचलावे वाटत नाहीत. कॉलबॅक करणेही जमत नाही. स्माईल तर सेल्फी काढण्याइतकिही देता येत नाही. लोकांना आपला चेहरा दाखवायची भीती वाटते. स्वतःचा चेहराही आरश्यात बघवत नाही. आजूबाजूला आपल्याला बघणारे जितके जास्त लोक असतात तितकाच जास्त त्रास होतो. गाडी चालवताना, स्वयंपाक करताना, जेवताना, कुणाशी बोलताना किंवा नुसतं बसलेलं असतानाही आपसूक रडू कोसळतं. जेवण आणि जीवन, कशातच रस उरत नाही. सगळं जग सुरळीत चालू असतं आणि यांचा वेगळाच संघर्ष सुरू असतो. एकेक पाऊल टाकायला अवघड जातं. मग काही लोक टोकाचं पाऊल उचलतात.

कुणाशीही संवाद साधायचा म्हणजे महाजिकिरीचं काम वाटतं. समोरचा काय बोलतोय हेच कळत नाही. आणि नैराश्याने ग्रस्त व्यक्ती फक्त हो, खरंय एवढंच बोलत असते. कारण बाकी शब्द तोंडून फुटतच नाहीत. आवाज खोल जातो. ऑफिसची कामं करताना खूप चुका होतात. काम संपवायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. बरीच कामं तर विसरली सुद्धा जातात. पैसे, चावी, कागदपत्रं कुठे ठेवलेत हे सुद्धा हा माणूस लगेच विसरतो. एखादी गाडी येऊन आपल्याला धडकावी, पाय घसरून खोल दरीत पडावं, जलाशयात पडून बुडून जावं जेणेकरून घरच्यांनाही वाटणार नाही आपण आत्महत्या केली, असे क्रूर विचार मनात येतात. जगण्यापेक्षा मरण सोपं वाटायला लागतं.

भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम ३०९ अंतर्गत आत्महत्येस गुन्हा मानलं जातं. आत्महत्येचा प्रयत्न करणार्या स एक वर्ष तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे. पण गुन्हा तर तेव्हा म्हणता येईल जेव्हा आरोपी तो पूर्ण शुद्धीत करेल. खरं तर आत्महत्या करणाऱ्यालाच कळत नसतं की तो स्वतःला किती हानी पोहोचतोय आणि त्याच्या कुटुंबियांना किती मोठ्या दुःखात टाकतोय.

हे सगळं आपण रोखू शकतो का? तर हो, रोखू शकतो. त्यासाठी आपणा सर्वांना थोडं जागरूक, थोडं संयमी आणि थोडं निस्वार्थी होण्याची गरज आहे. जागरूक यासाठी की आपल्या परिचयातील एखाद्या व्यक्तीत वर मांडलेल्या लक्षणांपैकी किमान पाच लक्षणे दिसून आल्यास आपण समजून घ्यावं की ती व्यक्ती नैराश्यात आहे. आपल्याला संयमाने त्याचं बोलणं ऐकून घ्यावं लागेल. कितीही कंटाळवाणं वाटतं तरीही. अशावेळी त्या व्यक्तीला कुटुंबीयांची सर्वात जास्त गरज असते. पण आपल्याकडे कुटुंबीयच या आजारापासून अनभिज्ञ असल्यामुळे ते समजू शकत नाहीत. आणि निस्वार्थी व्हायला यासाठी सांगतोय की ही व्यक्ती तुमच्या मदतीच्या मोबदल्यात तुम्हाला काहीच देणार नाही. कदाचित 'थँक्यू' सुद्धा म्हणणार नाही. तुम्ही केलेल्या सर्वात मोठ्या निस्वार्थ सेवांपैकी ही एक सेवा असेल.

नैराश्यग्रस्त व्यक्ती एखाद्या अशा बाळासारखी असते जे फक्त रडत राहतं, पण त्याला नेमकं काय होतंय हेच सांगता येत नाही. अशा वेळी त्या व्यक्तीस तुम्ही ताबडतोब एखाद्या मनोचिकित्साकडे घेऊन गेलं पाहिजे. कदाचित तो प्रतिकार करेल. पण तुम्हाला त्याला विश्वासात घेऊन सांगावं लागेल 'सगळं ठीक होईल'. तुम्ही स्वतः त्याच्यापर्यंत जाऊ शकत नसाल तर आजकाल ऑनलाईन समुपदेशन करणारे देखील मनोचिकित्सक आहेत. तुम्ही त्यांना ते उपलब्ध करून देऊ शकता. तुमच्यात तुम्हाला ही लक्षणे दिसत असतील तर तुम्ही दुसर्यातची मदत घेऊन स्वतःची मदत करू शकता.

सहसा रुग्ण औषधोपचारास घाबरतात. गोळ्यांची सवय लागेल असं त्यांना वाटतं. पण 'गोळ्या मुक्त होण्यापेक्षा आजार मुक्त कसे होऊ' असा विचार त्यावेळी झाला पाहिजे. आजारातून मुक्त झाल्यास गोळ्यांतून मुक्त आपोआप होता येतं.

लहानापासून मोठ्या स्तरापर्यंत मानसिक संतुलन राखण्याचं काम झालं पाहिजे. मनोचिकिस्तकांची संख्या वाढवली पाहिजे. सध्या आपल्या देशात प्रत्येकी १ लाख लोकसंख्येमागे एकापेक्षाही कमी मनोचिकित्सक आहेत. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास नैराश्यग्रस्त व्यक्ती आयुष्यभर नैराश्याशी झुंजत राहतो. रस्त्यांवर फिरणारे, फुटपाथवर लोळणारे मनोरुग्ण उगीचच दिसत नाहीत. "साऱ्याच चांदण्यांची जगतास जान नाही", ह्या उक्तीप्रमाणे गुमनाम होऊन ते फिरत असतात. ज्याप्रमाणे भूटान, युएई, व्हेनेझुएला या देशांमध्ये 'हॅपिनेस डिपार्टमेंट' आहे, त्याचप्रमाणे भारतातही असावे. मध्यप्रदेश मध्ये २०१७ पासून ते आहे. पण ते इतर सर्व राज्यांमध्येही असावं. सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा (जिडीपी) सकल राष्ट्रीय आनंदास (जीएनपी) जास्त महत्त्व दिलं जावं. प्रत्येक संस्था, कंपनी, शाळा, महाविद्यालयामध्ये दर महिन्याला स्ट्रेस टेस्ट व्हावी. त्यात नैराश्यग्रस्त आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर किंवा विद्यार्थ्यांवर योग्य उपचार व्हावेत. कुणीही एकटं पडणार नाही, याची काळजी घेतली जावी.

नैराश्याच्या लाटेला आपण सर्वांनी वेळीच थोपण्याची गरज आहे. नाहीतर पुढची महामारी ही नैराश्याचीच असेल हे नक्की. ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास माझी मदत करा, जेणेकरून मानसिक स्वास्थ्याविषयी जागरूकता पसरेल. आपला भारत देश नैराश्याच्या विळख्यातून मुक्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

ये दिल मांगे हॅपिनेस मोर....

ये दिल मांगे हॅपिनेस मोर....

Updated : 19 Aug 2021 10:47 AM GMT
Next Story
Share it
Top