Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोनाचा धडा...

कोरोनाचा धडा...

कोरोनाचा धडा...
X

कोरोना विषाणूचा उद्भव चीनमधील वुहान शहरात झाला आणि तिथून तो जगाच्या कानाकोपर्‍यात पोचला. चीननंतर कोरोनाने बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या इटलीत आहे, त्यानंतर इराणमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे कोरोना विषाणूचा अल्पावधीत फैलाव झाला. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे अर्थातच भांडवलशाही त्याला जबाबदार आहे अशीही अनेकांची धारणा आहे. आधुनिक भांडवलशाहीमुळे जगापुढे हवामानबदलाचं संकटही उभं राहीलं आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार, जागतिकीकरण आणि आधुनिक भांडवलशाही व्यवस्था यांच्यामध्ये घट्ट संबंध आहे, अशी टीका जागतिकीकरणाचे विरोधक करू लागले लागले आहेत. स्वयंपूर्ण वा स्वाश्रयी ग्रामरचना, मर्यादीत आंतरराष्ट्रीय व्यापार, उद्योगप्रधान वा कर्ब वायूचं उत्सर्जन करणार्‍या आधुनिक जीवनशैलीला पर्याय शोधणं म्हणजेच साध्या राहणीचा पुरस्कार करणं हे उपाय सुचवले जातात.

ही मांडणी अर्थातच सदोष आणि दिशाभूल करणारी आहे. इसवीसन १५२० च्या मार्च महिन्यात फ्रान्सिस्को डी इग्वा हा इसम मेक्सिकोला पोचला. त्याला देवी रोगाची लागण झाली होती. त्यावेळी मध्य अमेरिकेत रेल्वे नव्हती, विमानं नव्हती वा मोटारी नव्हत्या. गाढवंही नव्हती. तरी देखील ऑगस्ट महिन्यापर्यंत संपूर्ण मध्य अमेरिकेत देवी रोगाची साथ आली आणि सुमारे एक तृत्तीयांश लोकसंख्या या रोगाला बळी पडली. देवी रोग ज्या विषाणूमुळे होतो त्यावर मानवाने विजय मिळवला ऐंशीच्या दशकात. सूक्ष्मजंतू आणि विषाणू यामुळे रोग होतात हे ज्ञान झाल्यावर त्यांच्यावर उपाययोजना शोधण्यात आली. सदर औषधं व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आल्या. या सर्व यंत्रणा-संशोधन, औषधांचा शोध, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था त्यामध्ये प्रयोगशाळा, औषध, उपकरणं, यंत्र यांचे कारखाने, वैद्यकीय शिक्षण, दवाखाने, इस्पितळं इत्यादी, सर्व जगात एकसारख्याच आहेत. ह्यामध्ये अनेक उद्योग विशेषतः औषध उद्योगाचे हितसंबंध आहेत. त्यामुळे नफ्याच्या प्रेरणेने या सर्व यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो, अनावश्यक औषधं ग्राहकांच्या माथी मारली जातात. मात्र क्यूबा सारख्या काही देशांमध्ये नफ्याच्या प्रेरणेपेक्षा जनहिताला प्राधान्य देऊन सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभारली जाते. भांडवली मार्ग असो की समाजवादी, सार्वजनिक आरोग्य यंत्रणा केंद्रीय उत्पादन, वितरण आणि उपभोग या सूत्रावर उभारलेली असते. त्यामुळे ती अधिक कार्यक्षमपणे आरोग्याचं उत्पादन होतं. हे सूत्र टाळून आपल्याला स्वाश्रयी ग्रामरचनेकडे जाता येणार नाही.

कोरोना विषाणूचा प्रतिकार करायचा तर त्याची जनुकीय रचना काय आहे, तो कुठून आला, मानवी शरीरात शिरल्यावर त्याच्या जनुकीय रचनेत काय बदल झाले, त्यावर कोणती औषध योजना करायची, त्याला प्रतिबंध करणारी लस कशी शोधायची, त्याचा प्रसार वा लागण कशी होते, तिचा वेग काय असतो, त्याच्या साथीचं गतिशास्त्र नेमकं काय असतं, या आणि अशा अनेक विषयांचा अभ्यास विविध संशोधन संस्था करत आहेत. त्यांच्यामध्ये माहितीची देवाण-घेवाण होते आहे. विषाणूचा प्रतिकार करायचा तर माहिती, माहितीचं पृथःकरण आणि त्यावर आधारित उपाययोजनांची पद्धती विकसित करणं हे परस्पर सहकार्यानेच शक्य आहे. याच मार्गाने इबोला, एड्स यासारख्या घातक रोगांवर मानवजात नियंत्रण मिळवू शकली.

विषाणू आणि मानवजात यांच्यातील हा संघर्ष आहे. हा संघर्ष केवळ एका देशात वा प्रदेशात नसतो. कारण एका व्यक्तीला एखाद्या अज्ञात विषाणूचा वा जंतूचा संसर्ग झाला तर अल्पावधीत त्याची लागण संपूर्ण देशात नाही तर जगात होऊ शकते. त्यासाठी जगभरची सार्वजनिक आरोग्य यंत्रणा, अन्न पुरवठा यंत्रणा आणि सार्वजनिक स्वच्छतेची यंत्रणा कार्यक्षम हवी. गरीबातल्या गरीब व्यक्तीलाही सर्वोत्तम आरोग्य, अन्न आणि सार्वजनिक स्वच्छता यांचा लाभ मिळायला हवा. संपूर्ण जगाच्या स्वास्थ्यासाठी हे गरजेचं आहे. विषाणू आणि मानवजात यांच्या युद्धाची भूमी संपूर्ण जग आहे. सार्वजनिक आरोग्य, अन्न पुरवठा आणि स्वच्छता यंत्रणा ही मानवजातीच्या बचावाची भिंत आहे. ही भिंत काही देशांमध्ये जीर्णशीर्ण आहे तर काही देशांमध्ये जमीनदोस्त झालेली आहे. तिथून विषाणू मानवी शरीरात घुसखोरी करतात. ही भिंत भक्कम करण्याशिवाय मानवजातीपुढे अन्य पर्याय नाही. कोरोनाच्या साथीमुळे विविध देशांच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान पाहाता, ह्या भिंतीच्या डागडुजीचा, मजबूतीकरणाचा खर्च मामुलीच असेल.

मात्र हे घडून यायचं असेल तर संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक व्यापार संघटना यापेक्षा वेगळ्या आंतरराष्ट्रीय रचनांची गरज आहे. भांडवल, वस्तू व सेवा यांच्या चलनवलनावरील निर्बंध काढून टाकणं हा सध्याच्या जागतिकीकरणाचा आशय आहे. मात्र त्यामध्ये सध्याचे सत्ताधारी म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांचे दलाल म्हणजे राष्ट्र-राज्य ह्या संस्था चालवणारे घटक, यांचा वरचष्मा आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ असो की जागतिक व्यापार संघटना, या संस्था पूर्णपणे निष्प्रभ होत आहेत. लोककेंद्री जागतिकीकरणाकडे जाण्याचा रस्ता प्रशस्त करण्याची गरज आहे. त्याशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने मानवजातीचं भवितव्य सुरक्षित होऊ शकणार नाही.

आजच्या प्रश्नांची उत्तरं शोधताना पुढे जाण्याशिवाय अन्य मार्ग नाही. जागतिकीकरणाच्या आधीच्या म्हणजे ९० च्या दशकात आपण जाऊ शकत नाही. किंवा त्याच्याही आधीच्या म्हणजे एकोणिसाव्या शतकात जाता येणार नाही. मध्ययुगात पसरलेल्या देवीच्या साथीचं उदाहरण वर दिलंच आहे. त्यामुळे आपल्याला मागेच जायचं तर पार पाषाण युगाकडे जावं लागेल जे अशक्य आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक व्यापार संघटना यांच्या पुढचा टप्पा लोककेंद्री जागतिकीकरणाला गाठावा लागेल. त्यासाठी कोरोनाच्या साथ उत्प्रेरकाचं काम करू शकेल.

कारण कोरोनाच्या साथीमुळे देशादेशांमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांची, अगदी युरोपियन युनियन आणि अमेरिकेतीलही समस्या ऐरणीवर आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या कक्षाही रुंदावत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. प्रत्येक देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, स्वच्छता-सांडपाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था आणि निर्जंतुक परंतु पौष्टिक अन्न सर्वांना मिळण्याची व्यवस्था भक्कम करण्याच्या दिशेने हे आंतरराष्ट्रीय सहकार्य हाकारण्याचा प्रयत्न करायला हवा.

Updated : 20 March 2020 1:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top