TRP स्कॅमच्या निमित्ताने...
X
टीआरपी स्कॅमच्या निमित्ताने, सिस्टीमच्या कातडीखाली शिरून तेथे नक्की काय होतं? याची अंतर्दृष्टी आली पाहिजे. सिस्टीम नेहमीच निरनिराळी मॅथेमॅटिकल मॉडेल्स विकसित करून, काही फॉर्म्युले बनवते आणि त्याला समाजासमोर पेश करते. कारण त्यातून शास्त्रशुद्धतेचा आभास तयार करता येतो; मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंटसाठी ते गरजेचे असते. वर्गीय हितसंबंध लपवता येतात.
जीडीपी, सेन्सेक्स, शेअर प्राईस आणि पीई मल्टिपल, क्रेडिट रेटिंग, इझ ऑफ डुईंग बिझिनेस रेटिंग, गिन्नी कोइफिशण्ट, नेट ऍसेट व्हॅल्यू, दारिद्र्य रेषा असे अगणित निर्देशांक सांगता येतील. अशा कितीतरी गोष्टी सिस्टीम वर्षभर प्रसृत करत असते आणि आपल्याला तो वर गेला का? खाली गेला याच्या चर्चेत अडकून पडतो. पण प्रत्येक मॅथेमॅटिकल मॉडेल नेहमीच काही एका गृहीतकांवर आधारित असते; ती गृहीतके कोण ठरवते; त्यात नेहमीच मॅन्युप्युलेशनला वाव असतो; ते मॅन्युप्युलेट केले देखील जातात; ते कोण करतात?
शेअर प्राईस एवढी शास्त्रशुद्ध पद्धतीने काढली जात असेल. तर शेअर दोन महिन्यात अर्ध्यावर का येतो. ट्रिपल ए रेटिंग वाली कंपनी एका रात्रीत का कोसळते? असे प्रश्न आपण विचारतच नाही. सिस्टीमवर शोषक, क्रोनी, भ्रष्टाचारी, सट्टेबाज अशी लेबले लावून बोलणे सोपे आहे. लोक आपल्याला लेबले लावतात… "यांचे आपले नेहमीचे, हे आले तहहयात विरोधक" सूक्ष्म, न्यूअन्स्ड अंतर्दृष्टी देऊ शकलो तरच लोकांना आपल्या बोलण्यात काही तथ्य वाटेल.
संजीव चांदोरकर






