Home > मॅक्स ब्लॉग्ज > "चित्रपटाची सुरुवात, मध्य, शेवट त्याच क्रमाने असला पाहिजे असं काही नाही"

"चित्रपटाची सुरुवात, मध्य, शेवट त्याच क्रमाने असला पाहिजे असं काही नाही"

एखाद्या सिनेमाला सुरूवात, मध्य आणि शेवट असतोच पण तो त्याच क्रमाने असला पाहिजे असे नाही, असे मत मांडून सिनेमाच्या तंत्राशी खेळणारा दिग्दर्शक जॉ लूट गोदार्द यांच्या कार्याची ओळख करुन देणाऱ्या मेघनाद कुलकर्णी यांच्या लेख मालिकेतील दुसरा आणि अखेरचा लेख...

चित्रपटाची सुरुवात, मध्य, शेवट त्याच क्रमाने असला पाहिजे असं काही नाही
X

चित्रपट हा आपला श्वास असल्याप्रमाणे गोंदर्द चित्रपट बनवत राहिला. १९६० (ब्रेथलेस) ते १९६९ (वीकएंड) हा चित्रपटातील कालखंड हा गोंदर्दचा 'न्यू वेव्ह्' कालखंड किंवा 'सिनेमॅटिक' कालखंड समजला जातो. गोदार्द चे पुस्तक 'गोंदार्द ऑन गोंदार्द' हाच कालखंड लक्षात घेते. त्या पुढील कालखंडात गोंदार्द राजकीय चित्रपट-निबंध करू लागला, नंतर तीहीपुढे जाऊन चित्रपटातून चिटपटची भाषा, संस्कृतीचा नश्वरपणा, भाषेचा तोकडेपणा, खुद्द प्रतिमांचा अव्यक्तपणा यावर चिंतन करू लागला, तो सतत प्रगल्भ होत गेला, पण त्याची चित्रपट भाषा अधिकाधिक अत्ममग्न (Idiosyncratic) होत गेली. पण या सर्वांची मुळं आपल्याला त्याच्या या 'न्यू वेव्ह्' कालखंडात दिसतात.

आपल्या पुढच्या फिल्म मध्ये The little soldier मध्ये त्याला त्याची आवडती नटी, (आणि पुढे होणारी पत्नी) आना करीना सापडली. 'ब्रेथलेस' चिटपटसाठी तिने नकार दिला होता. लिटिल सोल्जर करताना तिने गोंदार्द ला विचारलं होतं "सर मला कपडे तर काढावे लागणार नाहीत ना?" यावर गोदारदचं उत्तर होतं " मुळीच नाही, ही राजकीय फिल्म आहे" आना करीनाला गोदर्दने एका जाहिरातपटात पाहिले होते. तिला चित्रपटाचा अनुभव नव्हता, पण गोंदार्दची पारख किती उत्तम होती याची प्रचिती तिने पुढील अनेक फिल्ममध्ये शेवटपर्यंत दिली. गोंदार्दचे करीना बरोबरचे नातेसंबंध एक नटी म्हणून आणि पत्नी म्हणून बर्गमन आणि लिव उलमनच्या नातेसंबंधा इतकेच उत्कट आणि गुंतागुंतीचे आहेत, (वैयक्तिक आयुष्यातले संबंध इथे नमूद करण्याचे कारण म्हणजे ते चित्रपटातून दिसतात, आणि कधी कधी चित्रपटावर परिणाम देखील करून जातात.) लिटिल सोल्जर आलजेरियाच्या मुक्ती संग्रामावर आहे, फ्रेंच राष्ट्राने आलजेरियावर अतिक्रमण केलं होतं. १३ मे १९५८ मध्ये त्यविरुद्ध उठाव झाला होता. ( जेते राष्ट्र अशा मुक्ती संग्रामाला उठावच म्हणतात.) गोंदार्द अशा प्रकारच्या अतिक्रमणा विरुध्द्ध होता. त्याची धारणा सदैव अॅंटी-वॉर राहिलेली आहे. पुढे आपल्या la Chionese चित्रपटात तो हे अधिक अणकुचिदार पणे मांडतो. लिटल सोल्जर मधला बृनो एक फोटो-जर्नलिस्ट आहे त्याचे फ्रेंच सरकारच्या उजव्या गटाशी संबंध आहेत. तो वेरोंनीका ड्रेअर(आना करीना) या युवतीच्या प्रेमात आहे. त्याला आलजेरियन क्रान्तिकारक गटाला मदत करणाऱ्या एका प्रोफेसरला मारण्याचा हुकूम आहे. बृनो पकडला जातो, त्याचा छळ केला जातो, वेरोंनीकाचा सुध्धा छळ केला जातो. अशी तोंडी लावायला गोष्ट आहे. बाकी सबकुछ गोंदार्द! चित्रपट सरळ सुचवतो की फ्रांसने आलजेरिया विरुध्द्ध एक घाणेरडे युध्ध खेळले होते. त्यामुळे जानेवारी १९६३ पर्यन्त तिच्यावर फ्रांस मध्ये बंदी होती.





'वुमन इज अ वुमन' (१९६१) ही गोंदार्दची पहिली रंगीत फिल्म. यात गोंदार्द रंगाने रंगपंचमी खेळलाय! ( म्हणजे मोजके पाच सहा रंग आणि त्याची पेस्टल पॅलेट त्याने चित्रपटभर वापरली आहे.) लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर कारीनाचा मॅजेन्ता चेहेरा, पेस्टल शेड वर येणारे भडक; लाल, पिवळा,निळा असे 'बेसिक कलर्स',मॅजेंटा,लाल,अशा रंगातून काळ्याकडे जाणारे 'कलर ब्लीचेस' हे सर्व चित्रपटाच्या विषयाला, आणि पोताला साजेशे आहेत. गोंदार्दचा रंगाचा वापर रंगांचा वेगळा, युनिक आहे. जॉइस मध्ये लहान मुलाला जसा रंगाचा शोध लागतो ('फीनेगन्स वेक')तसा ताजा शोध आपल्याला गोदार्दचे रंग बघून लागतो. रंगाबरोबर येणारी associations गोंदार्द पूर्ण पणे नेस्तनाबूत करतो. लाल रंग म्हटला की रक्त, रेडबुक,सोविएत झेंडा अशा प्रतिमा आपल्यासमोर तरळतात.

गोदार्दचं पात्रं म्हणतं 'लाल रंग हा फक्त एक रंग आहे"(red is just a colour), गोदार्दचे रंग एखाद्या निऑन-साईन प्रमाणे ठळक अक्षरात लाल आणि निळ्या रंगात 'जीवन' 'सिनेमा' असं सांगत असतात. निळा,लाल,पिवळा हे बेसिक रंग गोंदार्द प्रभावीपणे वापरतो. धक्का देणारे,अंगावर चालून येणारे रंग असा त्यांचा वापर करतो. 'contempt' (Le Mepris- १९६३) मध्ये दिसणाऱ्या निळ्या भिंती, बेडरूम मध्ये यलो ऑकर रंगाच्या पार्श्वभूमीवर ब्रिजेट बारडॉट या नटीच्या अंगावरची लाल भडक चादर, 'ला चायोनिस' चित्रपटात सॅप-ग्रीन पट्ट्यावर येणारे लाल पट्टे, बुक-केस मध्ये लावलेली लाल पुस्तके, नट्याना दिलेले लाल आणि सॅप-ग्रीन पेहेराव. 'पिअरे' चित्रपटात नटाचा पिवळ्या रंगात रंगवलेला चेहेरा, 'contempt' मध्ये नट(बेलमोंडो) आपला चेहेरा निळ्या रंगात रंगावतो आणि त्यावर भडक पिवळ्या रंगाचे डायनामाइट्स गुंडाळून ब्लास्ट करतो. 'woman is a woman' किंवा ' made in USA' मध्ये वापरलेले लाल,पांढरा, निळा, हे अमेरिकन झेंड्याचे रंग अत्यंत कल्पकतेने वापरले आहेत.

हे रंग गोंदार्द आपल्या चित्रपटातील मथळयाना देखील वापरतो. गोंदार्द चे मथळे अत्यंत वैशिष्टयपूर्ण असतात. (बॉन्ड चित्रपटांची मॉरिस बिंडरने केलेली, किवा हिचकॉक च्या टायटल सिक्वेन्स मधली अक्षरं आठवतात.) पडद्यावर एकेक अक्षर 'अॅट रॅन्डंम' उजळत जाते, पडद्याच्या विविध भागात ती उमटतात, फेड-इन ,फेड-औट होतात, लुकलुकतात, अंगावर येतात, डिसटॅार्ट होतात. पण ते कधीही इतर चित्रपटांच्या मथळयाप्रमाणे येणाऱ्या 'सिक्वेन्स'चा सारांश सांगत नाहीत. कधी कधी तो पुस्तकं देखील मथळया प्रमाणे वापरतो. 'contempt' चित्रपटात waves या मथळ्याखाली लाटांचा प्रसंग येतो, लाटा किनाऱ्याकडे येतात तेंव्हा व्हर्जिनिआ वूल्फचे त्या नावाचे पुस्तक दिसते.





गोदार्दचा रंगांचा वापर बघून आंतोनिऑनी किंवा तारकोवस्किच्या चित्रपटातील रंग पाहून आपण कसे थक्क होतो, तसे थक्क व्हायला होते. गोंदार्दचा हा रंगांचा वापर एकमेवाद्वितियम, युनिक आहे. भाषेतला खंडीतपणा, Discontinuity दाखवायला गोंदार्द रंगांचा वापर करतो. (गोंदार्द रंगांच्या बाबतीत इतका जागरूक होता, की जेंव्हा त्याच्या लक्षात आलं की कोडॅक च्या इस्टमनकलर मध्ये गडद तपकिरी रंगाची 'रेंज' (latitude) मिळत नाही तेव्हा त्याने कोडॅक कंपनीला जाहीरपणे वंशवादी, racist म्हटले. आणि ते खरे निघाले कारण कोडॅकची फिल्म खरोखरच कॅाकेशीयन गोऱ्या रंगांसाठी बनवली होती. याला अर्थात अर्थकारण कारणीभूत होतं, कारण 'काळे' लोक हॉलीवूड चित्रपटात येतच नव्हते. १९८५ पर्यन्त कोडॅकच्या या फिल्ममध्ये बदल झाला नाही. गोंदार्दला आपली तांत्रिक सामग्री पूर्णपणे माहिती होती हेच यातून दिसतं.)

इथे आपण थोडे 'रिवाईंड' करून पुन्हा त्याच्या'वुमन इज अ वुमन' या चित्रपटकडे येऊ. अमेरिकन संगितीकेला मानवंदना' म्हणून गोदार्दने ही फिल्म केली.यात संगीत,नृत्य,नग्नता आहे, अमेरिकन 'म्युझिकल'चा गोषवारा त्यात आला आहे. (त्यात एक चित्रपट इतिहासात गाजलेली चुंबनपूर्व तयारी आणि चुंबन देखील आहे.) पण हे तुम्हाला गोंदार्द अर्थातच नीट पाहू देत नाही, तुम्ही त्यात गुंतून पडण्याच्या आधीच तो त्याचं 'प्रहसन'सुरू करतो.आणि तुम्हाला त्या दृष्यापासून आलिप्त करतो. चार भिंतीत गुदमरलेलं संसारिक जीवन, कलाकाराच्या मनात सदैव असलेलं भावनिक आणि कलात्मक द्वंद्व, चित्रपट- सृष्टिच्या 'शो-बिझ'पार्श्वभूमीवर, प्रकर्षानं जाणवतं. करिनाचं आणि गोंदार्दचं कौटुंबिक आयुष्य बिनसलेलं होतं, त्याचे अंधुक पडसाद अनेकाना यात दिसतात. पण तरीही आना करीनाने कमालीचं काम केलय. My life to live (१९६२) या पुढच्या चित्रपटात देखील आनाने कमाल केलीय. अर्थात गोंदार्द शैली मध्ये काम करून! (आणि ते जास्त कठीण आहे.) गोंदार्द कडे पूर्ण स्क्रीन-प्ले कधीच नसायचा, तो सेट वर संवाद लिहायचा. Improvise करायचा, नट नट्याना सूचना किंवा 'डिरेक्शन' न देता 'जाणीव' करून ध्यायचा. (संपूर्ण स्क्रीन-प्ले त्याने फक्त 'ब्रेथलेस' साठी लिहिला होता पण तो ही त्याने वापरला नाही.एक मुलाखतीत त्याला स्क्रीन-प्ले संबंधी प्रश्न विचारला, गोंदर्द म्हणाला आताही दोन स्क्रीन-प्ले माझ्या खिशात आहेत. आणि त्याने हाताच्या तळव्यात मावतील अशा दोन डायरी खिशातून काढल्या. ) अशा मनस्वी दिग्दर्शका बरोबर काम करणं किती कठीण असेल बघा. गोदार्दच्या चित्रपटात अॅक्टिंग, किंवा व्यक्तिरेखा खुलवण्याला वाव होता का? तर बिलकुल नव्हता. हेच तर त्याला टाळायचं होतं. तरीही त्यात अॅक्टिंग येई, भावना येत,पण त्या विशिष्ठ पत्रांच्या नसून सार्वत्रिक असत. अमूर्त असत.

या चित्रपटात ती नॅना नावाची होतकरू नटी आहे. पुढे तिला परिस्थितीमुळे वेश्या व्यवसायाकडे वळावं लागतं. तरीही ती आपलं स्वातंत्र्य जिवापाड जपते. हा चित्रपट खूप चालला. (कदाचित त्यामुळे गोंदार्दला वाटलं असेल की आपले काहीतरी चुकले आहे.चित्रपट चालतो म्हणजे... 'लानत है ! ) Les Carabiniers मध्ये पुन्हा युद्धातील फसवेगीरी समोर येते. अलजेरियन युध्द्ध, व्हिएतनाम याबाबत तो अणकुचिदार कॉमेंट 'लिटल सोल्जर'




' ला चाओनिझ' 'पिअरे ले फौ' या चित्रपटातून करतो.

गोंदार्दच्या चित्रपटात अनेक आवर्ती, पुन्हापुन्हा येणारे, recurring, पॅटर्न्स,थीमस, आकृतिबंध आहेत. त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करून गोदार्ददचे चित्रपट-चिंतन, चित्रपट, चित्रपट-भाषा, भाषा,संस्कृति,राजकारण, साहित्य इत्यादीकां विषयीं धारणा समजण्याचा प्रयत्न करु. त्यासाठी त्याचे वेगवेगळ्या कालखंडातले मोजके चित्रपट घेतले तरी पुरेसं आहे. {गोंदर्दच्या करकीर्दीचे तीन महत्वाचे कालखंड मानले जातात. १. न्यू वेव्ह् किंवा सिनेमॅटिक कालखंड (१९६०-१९६८) २. क्रांतिकारी/राजकीय कालखंड (१९६८-१९७९) ३. चित्रपट भाष्यकार/

चिन्हमीमांसाकार कालखंड ( १९८०-२०२२)}

अनेक महत्वाच्या चित्रपटांचे विश्लेषण आपण आतापर्यंत केलेलेच आहे. त्याने चित्रपट रचने बद्दल, आणि आशयाच्या संदिग्धपणा वर केलेले प्रयोग त्याच्या 'weekend'(१९६७) First name Carmen(१९८३) ' king Lear' (१९८७) या चित्रपटातून ठळकपणे दिसतात. ते बघू. आणि हे आपण चित्रपटांच्या क्रमानेच केलं पाहिजे अशी काही सक्ती नाही!

वीकएंड ( १९६७) मध्ये तर गोंदर्द मानवी संस्कृतीच उसवून टाकतो. इथे कोणीही काहीही असू शकतं, जर बँकर्स मारेकरी असतील, शाळेत जाणारी मुलं बंदिवासात असतील,फोटोग्राफर्स भडवे (Pimps) असतील, कर्मचाऱ्यांवर त्यांचे बॉस दैनंदिन लैंगिक अत्याचार करत असतील, माणसं ससे, डुकरं याच्या मांसा बरोबरच माणसाचं मांस देखील खात असतील तर मानवी संस्कृति,civilization उरलीच कुठे? गोंदर्द संस्कृतीतील प्रत्येक संस्थांवर हल्ला चढवतो आणि त्यांना नेस्तनाबूत करतो. यात साहित्य,संगीत,तत्वज्ञान,राजकारण,प्रचलित आचार-विचार कशालाही तो सोडत नाही. ही त्याच्या 'सिनेमॅटिक''न्यू वेव्ह्' किंवा कालखंडातील शेवटची फिल्म आहे. त्यात तो सिनेमाचा अंत झाला आहे अशी घोषणा करतो.






चित्रपटाला कथन narrative आहे. एक बुर्जवा दांपत्य पत्नीच्या मरणासन्न वाडिलांकडून त्यांची संपत्ति हडप करण्यासाठी कार मधून प्रवासास निघलेत. प्रसंगी वडिलांचा खून करण्याची देखील त्यांची तयारी आहे. प्रवासात त्यांना अनेक चमत्कारिक प्रसंगांना आणि माणसांना सामोरे जावे लागते.यात वर नमूद केलेली माणसं आहेत. चित्रपटात १० मिनिटे चालणारा ट्राफिक जाम आहे. सतत हॉर्न वाजत आहेत. कर्कश्यपणे. कधी एकदा हे हॉर्न थांबतात असं असं प्रेक्षकांना वाटत राहतं. इतके ते असह्य होतात. जागोजागी अपघात झालेल्या मोटारी उलट्या पडल्या आहेत.जाळताहेत.जागोजागी प्रेतं पडली आहेत. लोकं प्रेतं ओलांडून जात आहेत. प्रेतांच्या अंगावरच्या वस्तु,बूट चोरत आहेत.

वडिलांच्या घरी ते पोहोचतात तर वडील आधीच मेलेले आहेत. आई त्याचा संपत्ति मधला वाटा देण्यास नकार देते. हे तिचा खून करतात. परतीच्या प्रवासात ते हिप्पी 'क्रांतिकारकांच्या' तावडीत सापडतात. ही चळवळ चोऱ्या आणि नरभक्षकपणावर पोसलेली आहे.हे दांपत्य पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण हिप्पी लोक नवऱ्याची खांडोळी करतात आणि शिजवून खातात.





शांत निसर्गाच्या प्रतिमा आणि हिंस्त्र कार-प्रवासाच्या प्रतिमा चित्रपटभर सतत एकमेकाशी भिडत रहातात,एकमेकाना छेद देत राहतात.

First name Carmen (१९८३) मध्ये लिंग लियर प्रमाणे गोदार्द स्वतः काम करतो. त्याला एका वेड्यांच्या इस्पितळात ठेवलेलं आहे, तो एक गोंधळलेला चित्रपट दिग्दर्शक आहे, आणि त्याचे डॉक्टर त्याला सतत सांगत आहेत की त्याने लवकरात लवकर आजाराची लक्षणं दाखवली नाहीत तर त्याला काढून टाकण्यात येईल. तो कारमेनचा काका आहे. करमेन ही अशी युवती आहे की जिला "करमेन म्हणता कामा नये"

चित्रपटात पुन्हा गॅंगस्टर फिल्मचा ढाचा वापरलेला आहे. कारमेन तिच्या काका कडून त्याचे समुद्रकिनाऱ्या वरील घर वापरासाठी घेते. ती आणि इतर लोक मग एक बँक लुटण्याचा प्रयत्न करतात. लुटालुटीच्या सावळ्या गोंधळात कारमेन जोसेफ या कॉमिक बँक-रक्षकाच्या प्रेमात पडते. (पुन्हा एकदा तरुणी आणि पिस्तूल.) या सिक्वेन्स मधील जंप-कटस् पाहाण्या सारखे आहेत. पूर्ण सिक्वेन्स बिथॉवेन च्या स्ट्रिंग सिंफनी वर improvise केला आहे. बॅक लुटीच्या प्रसंगात काही माणसं शांतपणे पुस्तकं वाचत बसलेली आहेत. गोंदर्दने त्याला मुद्दाम लुटुपुटीचं (stage-managed) स्वरूप दिलं आहे. जोसेफला अटक,सुटका, असे अनेक प्रसंग येऊन जातात.जोसेफ आणि कारमेन पुन्हा काकाच्या अपार्टमेंट मध्ये येतात. कारमेन तिच्यावर झालेल्या लैंगिक प्रयत्नाची (Incest) ची कहाणी सांगते. तिच्या तोंडी एक वाक्य आहे "if I love you, that's the end of you."

काका जॉनेटवर मग त्या गॅंगस्टरवर फिल्म दिग्दर्शित करण्याची जबाबदारी टाकतात.

एका फ्लॅश-बॅक मध्ये कारमेन सांगते की बँक लुटणे आणि काका जॉनेट यांनी गँगस्टर फिल्म दिग्दर्शित करणे हा अधिक मोठ्या कारस्थानाचा भाग होता. एका मोठ्या उद्योजकाला किंवा त्याच्या मुलीला पळवून नेण्यासाठी पैसे उभे करण्यासाठी काकानी दिग्दर्शित केलेली 'फेक' गॅंगस्टर फिल्मचा दिखावा/बनाव करायचा होता.




शेवटी किडनॅपिंगचा दिवस उजाडतो. फिल्म दिग्दर्शित करायला काका गोंदार्द आहेतच. पार्श्वभागावर वाजणारी सिंफनी आता पडद्यावर दिसू लागते. जोसेफ कारमेनवर पिस्तूल रोखतो, गोळी उडते,कारमेन खाली कोसळते. ती मेलेली आहे असे समजून पोलिस जोसेफला अटक करून घेऊन जातात. भोवळ येऊन पडलेली कारमेन हॉटेल कर्मचाऱ्याला म्हणते. "What it is called when the innocents are on one side and the guilty on the other, when everything has been lost but you are still breathing and the sun is still rising." कर्मचारी उत्तर देतो. "Daybreak,"

चित्रपटाची रचना अशी आहे की त्यातील दृश्ये कशीही लावली तरी फरक पडणार नाही.

गोदार्दच म्हणून गेलाय " चित्रपटाला सुरुवात, मध्य, शेवट असावा.. पण तो त्याच क्रमाने असला पाहिजे असं काही नाही" प्रचलित कथनात्मक चित्रपटाना, त्यांच्या चित्रपटाच्या घाटाला उद्देशून ही गलातल्या गालात कोपरखळी आहे. चित्रपट रचनेची, कथनाची, पोताची कशी उलथपालथ करता येते हे त्याने आपल्या 'king Lear' चित्रपटातून दाखवून दिलं. १९८३ मध्ये कॅनन कंपनीच्या मुख्य निर्मात्याने गोलानने (Menahem Golan ऑफ Golan & Globus ) ने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या दरम्यान गोंदर्दशी डील केलं। (हे कॉंन्ट्रॅक्ट त्यांनी एका हातरुमालावर केलं) त्यांना आपल्या सिनेमावर पडलेला बाजारू,commercial हा शिक्का पुसून टाकायचा होता. डील होतं १ मिलियन डॉलर, आणि गोदार्दने काय करायचं होतं तर त्याने शेक्सपियरच्या King Lear वर फिल्म बनवायची होती. (यालाच म्हणतात स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं) गोलान म्हणाला "I love this project! I believe in it, I think it will be a great movie!"

नंतर जेंव्हा फिल्मला उशीर होऊ लागला तशी गोलांनने घोषणा केली " दीड वर्षापूर्वी कॅनन फिल्म्स ने गोदार्दच्या किंग लियर या चित्रपटाची घोषणा केली होती. आता शंका वाटते आहे की तो चित्रपट कधी होईल तरी का ? आम्ही आमचा विश्वास आणि पत गमावून बसलोय" हे वाक्य गोदर्दने टेप केलं आणि चित्रपटाच्या सुरवातीस





जसं च्या तसं वापरलं! शेक्सपियर हा गोंदर्दच्या दृष्टीने फक्त टेक्स्ट होता. त्यामुळे शेक्सपियरचं adaptation तो करेल अशी सुतराम शक्यता नव्हती. त्याला शेक्सपियरच्या गाजलेल्या संवादापेक्षा त्यातील सार्वत्रिक थीमस मध्ये स्वरस्य होतं. सत्ता आणि सतसत विवेकबुद्धी, वडील आणि मुलगी, शेक्सपियरचा fool (विदूषक) आणि व्यवहारीक जग, भाषा आणि भावना, शब्द आणि प्रतिमा यांच्यातील परस्पर संबंध यात त्याला इंट्रेस्ट होता. त्यामुळे तो शेक्सपियरच्या टेक्स्टला मूलभूत minimalistic पातळीवर घेऊन येतो.

किंग लियर चा मग माफिया डॉन लियरो होतो. लियर,कॉर्डेलिया, आणि एडगर सोडून सर्व इतर पात्राना डच्चू मिळतो.

शेक्सपियरच्या नाटकातल्या फारच कमी ओळी चित्रपटात येतात. त्याही थेट पात्राच्या तोंडी, नाहीतर पडद्याबाहेर किंवा निवेदानातून येतात. प्लॉटचे " Fear and Loathing" "play the thing" " no thing "अशा प्रकारचे मथळे होतात. चिटपटच्या सुरवतीसच आपल्याला सांगितलं जातं की लेखक आणि त्याची मुलगी चित्रपट सोडून पळून गेलीय.(ते खरंच होतं) ते पळून जाण्या आधीचे दोन शॉटस गोंदर्द दाखवतो.

चेर्नूबील मधील अणू-भट्टी फुटल्याने सर्व संस्कृति नष्ट झाली आहे.'काय हा हादरा" " मानवाने मानवतेचे काय धिंडवडे काढलेल" अशा अर्थाची वाक्य येऊन गेल्यावर आपला मूळ protagonist दिसतो. तो ओळख करून देतो (पडद्या बाहेरील आवाज)" मी आहे विल्यंम शेक्सपियर ज्युनिअर-पाचवा." एकीकडे टेबलवर मुलगी सहज म्हणून शेक्सपियरच्या ओळी म्हणत आहे " so young my lord ..and true" एकीकडे डोक्यावर वायर बांधलेला गोंदार्द (शेक्सपियरचा विदूषक) बसलेला आहे. ते बऱ्याच टाइमपास म्हणून अनेक गोष्टी करत आहेत आणि कधीतरी शेक्सपियरच्या ओळी देखील म्हणत आहेत.

हा शेक्सपियरचा पाचवा वंशज त्याच्या पूर्वजाने लिहिलेले नाटक शोधून काढण्याच्या प्रयत्नात आहे.





असा हा प्लॉट,खरं तर न-प्लॉट आहे. सुसंगत अशी कुठलीही गोष्ट तो सांगत नाही. प्रतिमा,आवाज,माथळे, टेक्स्ट, इतर कलाकृती,चे संदर्भ इतर अनेक प्रांतातून घेतलेले संदर्भ घेऊन चित्रपटाची जडण-घडण होत जाते.

पाचवा शेक्सपियर कॅननच्या सांस्कृतिक विभागाच्या ड्यूटी वर आहे. पण आता काहीच उरलेले नाही. मथळा येतो 'No Thing' शेक्सपियरच्या किंग लियर मध्ये जेव्हा कॉर्डेलिया म्हणते तिला काही नको, तेव्हा किंग लियर म्हणतो Nothing comes out of nothing, गोदर्दने मानवी संस्कृतीलाच 'no Thing' करून टाकलंय!

(आणि फिल्म मध्यमाला देखील) protagonist इतर दिग्दर्शकांची चित्रं पाहत असताना येणारा शेक्सपियरच्या सॉनेट चा आवाज, पुढील काही दृष्या नंतर येणारा 'टेबल-टॉप' शॉट (टेबलावर पडलेल्या खेळण्यावर हलणारा प्रकाश) अशी कित्येक सिनेमॅटिक दृश्ये यात मुबलक आहेत, पण त्या अर्थहीन प्रतिमा आहेत. गोंदर्दमध्ये दिसणारा भाषा आणि विचार यावरील चिंतन देखील आहे. आपल्या या चित्रपटातून गोंदर्द जणू म्हणतोय ओरिजिनल विचार, भाषा, consciousness यातील संबंध अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. शब्द,प्रतिमा,आवाज आदिम आहेत आणि तेच आपलं मानस घडवतात.. एक पात्र (नटी) म्हणतं त्या प्रमाणे " भाषा हे एक घर आहे ज्याच्यात आपण राहतो"

शेक्सपियरच्या लियर च्या पहिल्याच अंकात मोठी मुलगी म्हणते "सर, शब्द आवाक्यात घेऊ शकत नाहीत त्या पेक्षा मी तुमच्यावर प्रेम करते. दृष्टीलाही झेपणार नाही, अवकाश, स्वतंत्र्य याच्याही पलीकडे जाणारे प्रेम मी करते."

कॉर्डेलिया, म्हणते Nothing कारण तिचे प्रेम हे तिच्या भाषेपेक्षा मोठे आहे. हा तात्विक धागा गोदर्दने चित्रपटभर पकडला आहे. लियरची शोकांतिका एका दृष्टीने भाषेची शोकांतिका आहे. कॉर्डेलिया काय म्हणते आहे हे लियरला तिने वापरलेल्या भाषे पलीकडे जाऊन कळलं असतं, आणि इतर मुलीच्या भाषेतून आलेल्या प्रेमाचा पोकळपणा त्याच्या लक्षात आला असता तर कदाचित ही शोकांतिका टळली असती. गोंदर्दला 'नावात काय आहे असा प्रश्नच पडत नाही (रोमिओ अँड जूलिएट मध्ये रोमिओ म्हणतो "नावात काय आहे? गुलाबाला काहीही नाव दिलं तर ते तेव्हडेच सुगंधित असणार!) गोंदार्द मात्र पडद्यावर म्हणतो, आणि अक्षरं येतात " i ain't interested in names" पाचवा शेक्सपियर त्याला गदागदा हलवून म्हणतो " look, no names,no lines, no lines no story, no story no plot" गोंदर्दला चित्रपटातून हेच तर करायचं आहे! चिन्हांचा भूलभुलैया त्याला तयार करायचाय!

आत्म-कथन आणि स्मृति, संस्कृति आणि इतिहास, चित्रपटाचा आणि चित्रपटातून इतिहास, भाषा आणि प्रतिमा,भाषेचा तोकडेपणा, निसरडे मानवी संबंध,सौंदर्यमीमांसा आणि आत्मभान,नैतिकता आणि

चित्रपट,राजकारण आणि संस्कृति,चिन्ह-मीमांसा आणि तत्वज्ञान,दृक प्रतिमा आणि त्यांची जडण-घडण आणि प्रवास अशा कितीतरी विषयांवर गोंदर्द चित्रपटातून चिंतन करत राहीला.





तो समीक्षक होता,तत्वज्ञ होता,समाजशास्त्रज्ञ होता,चिन्ह चिकित्सक होता,राजकीय विचारवंत होता, बंडखोर होता. आणि इतर बरंच काही होता. मुख्य म्हणजे तो गोंदर्द होता!

असा एक सदोदित समकालीन, चिरतरुण, चित्रपटाची भाषा मूळापासून ढवळून टाकणारा एक 'या सम हाच' दिग्दर्शक वयाच्या ९१ व्या वर्षी एक जंप-कट मारून सिनेविश्वातून निघून गेला यावर विश्वास बसत नाही.

कुणी सांगावं आपण त्याच्या आयुष्याला The End टायटल लावायचो आणि त्याची एखादी कधीच प्रकाशित झाली नाही अशी फिल्म सापडायची आणि तो पुन्हा सुरू व्हायचा!

Updated : 30 Sep 2022 9:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top