Home > मॅक्स ब्लॉग्ज > जॉ लूक गोदार्द, चित्रपटाची वीण उसवून टाकणारा दिग्दर्शक

जॉ लूक गोदार्द, चित्रपटाची वीण उसवून टाकणारा दिग्दर्शक

फ्रेंच सिनेमामध्ये १९६०च्या दशकात नवी लाट निर्माण करणारे दिग्दर्शक जॉ लूट गोदार्द यांचे नुकतेच निधन झाले. सिनेमातील प्रस्थापित गृहीतकं मोडून काढणाऱ्या गोदार्द यांनी कोणता इतिहास घडवला आहे, याचे विश्लेषण मेघनाद कुलकर्णी यांनी केले आहे. दोन भागांच्या लेखातील पहिला भाग....

जॉ लूक गोदार्द, चित्रपटाची वीण उसवून टाकणारा दिग्दर्शक
X

तुम्ही एखादा विचार करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लक्षात येईल की आपण आपल्या भाषेत विचार करत आहोत. आपले आकलन हे भाषेतूनच होत असतं. सपिर-वॉर्फ गृहीतक देखील हेच सांगतं.

गोंदार्द देखील भाषेतून विचार करायचा, फरक इतकंच कि तो चित्रपट भाषेतून विचार करायचा. आणि ती भाषा देखील चित्रपटाची प्रचलित किंवा प्रमाण भाषा नव्हे तर त्याने उसवलेली,बनवलेली, पुनर्रचना केलेली भाषा!

या भाषेत तो मांडणी करायचा, मनन करायचा,चिंतन करायचा, लिखाण करायचचा,वाद करायचा, आणि वितंड वाद देखील करायचा ( वितंड वाद म्हणजे जे प्रमेय पुढे खोटे ठरेल ते मुद्दामून मांडणे.) गोंदार्दला चित्रपट हे सर्व काही होतं. दोन शब्दात तो म्हणून गेलाय "Only Cinema" ! ब्रेक्थ चं एपिक थिएटर आणि आंद्रे बाझा यांचा 'टोटल सिनेमा' या दोन्ही संकल्पनानी गोंदर्द प्रभावित आहे, ब्रेक्थ यांचं alienation (अलिप्तता) तंत्र तो चित्रपटात सदैव वापरतो मात्र बाझा यांचा टोटल सिनेमा, त्यातील वास्तवदर्शन हे समजावून घेऊन त्या पासून 'कलटि' मारतो.त्याचा टोटल सिनेमा हा वेगळा होता.






चित्रपटाची चिन्ह मीमांसा (film semiotics) , आणि प्रतिमा (image) या बाबतीत स्वतःचा असा खास दृष्टीकोन घेऊन गोंदार्दचा चित्रपट उभा ठाकतो. तो तुम्हाला आव्हान करत असतो, हा चित्रपट समजाऊन घेण्याचं 'डेअरिंग' तुम्ही कराच! हा चित्रपट पाहताना तुम्ही काहीही गृहीत धरू शकत नाही, सिनेमाची कुठलीही प्रचलित भाषा किंवा 'व्याकरण' तुमच्या कामी येत नाही गोंदार्द एक ठिकाणी म्हणतो त्या प्रमाणे लाल आणि निळ्या निऑन साईन मध्ये अक्षरं दिसतात "जीवन' "सिनेमा' ! गोंदर्दचा सिनेमा हा उच्चशिक्षित सिनेमा आहे. त्यात तत्वज्ञान, साहित्य, समाजशास्त्र, राजकारण, संगीत, भाषाशस्त्र, चिन्ह-मीमांसा याचे मुबलक संदर्भ येतात. ते ज्याना कळतात त्यानाच कळतात. यात विडगीनस्टाइन सारखा भाषातज्ञ, फ्रिट्ज लाँग सारखा सिने-दिग्दर्शक, मोझार्ट, बिथॉवेन सारखे संगीतातील 'उस्ताद', मार्क्स, माओ सारखे राजकारण-तज्ञ आणि इतर अनेक महत्वाचे मूलभूत विचारवंत यांचे नुसते उल्लेखच नाहीत तर त्याची उधृते (Quotes) देखील येतात. कधी पात्रांच्या तोंडून तर कधी स्वतंत्र आवाजात. त्यामुळे गोंदार्द बघताना तुम्ही कधीही डोकं बाहेर ठेऊन सिनेमा-गृहात शिरू शकत नाही. बाहेर एक अदृश्य निऑन साईन असते. " धोका" (कवटी आणि दोन हाडां सकट) आत गेल्यावर गोदार्द तुमच्या मेंदूला चालना देतो, त्याला मिक्सर् मध्ये टाकून गरागरा फिरवतो, त्याचा भेज फ्राय करतो, त्यावर फोडणी देतो, धक्के , शॉक्स देतो, चित्रपट बघून तुम्ही बाहेर येता तेव्हा तुम्ही गोल गोल फिरवून भोवळ येते त्या प्रमाणे भिरभिरलेले असता. चित्रपट विषयक तुमची सर्व गृहीते उलटी सुलटी झालेली असतात, आतून बाहेरून ढवळून निघालेली असतात. पण नंतर तुम्ही विचार करता आणि आपण काही मूलभूत, आणि महत्याचं पहिले आहे याची तुम्हाला खात्री पटते.

गोंदार्द मध्ये अनेक विरोधाभास आहेत, (आणि ते तो कधीच काढून टाकत नाही. उलट त्याची पुनरस्थापना करतो) माझ्या मते मुख्य विरोधाभास म्हणजे (तात्विक दृष्ट्या) ज्या उच्चारित भाषेला तो तोकडी समजतो तीच त्याला वापरावी लागते. भाषा ही तकलादू (Arbitrary) आहे. 'पाणी' हा शब्द आणि पाणी ही 'वस्तु' यांचा थेट काहीही संबंध नाही. जल, उदक, वॉटर आशा अनेक चिन्हा द्वारे पाणी ही 'वस्तु' निर्देशित करता येते. दृश्याचे किंवा प्रतिमांचे तसे नाही, पाण्याचे दृश्य थेट पाणी दाखवते, स्थल-काळ-अवकाश या सर्वा सहीत.



गोंदार्द म्हणतो, आणि त्याची तशी ठाम धारणा आहे की 'प्रतिमा फक्त प्रतिमा आहे' (Image is just an image) आणि या धारणे पासून तो आपल्या चित्रपटात कुठेही ढळत नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का? तो दृश्याला, image ला, भाषे प्रमाणे Arbitrary बनवत आहे. चित्रपटाची कवच कुंडले तो आपणहून दान करत आहे. "मी जे म्हणेन ते चित्रपट होऊ शकतो" असा आत्मविश्वास आणि गुर्मी त्याच्यात ठासून भरलेली आहे.

गोंदार्द एकदा जाहीर पणे म्हणाला होता " मोझेस हा माझा मूळ शत्रू आहे, कारण त्याने काही अलौकिक दृश्ये बघितली, पण नंतर त्याने ती दृश्ये (vision) शब्दात आणि अक्षरात (Text) मांडण्याची चूक केली."

हे अर्थात त्याने अलंकारीत भाषेत म्हटले होते. पण ते एका लेखकाने शब्दशः घेतले, इतर लोकानी ते quote केले आणि गोंदार्द वर ज्यू द्वेष्टा असल्याचे आरोप झाले. त्यात काहीही तथ्य नव्हते. दृश्य प्रतिमा शब्दांकित केली की खरा अर्थ, मर्म गमावून बसते हे त्याला म्हणायचे होते. काहीसं विडगीनस्टाइन प्रमाणे! विडगीनस्टाइनची 'Picture theory ऑफ language" किंवा "Language Games" theory प्रसिद्धच आहे. शब्द चित्र उभं करतात आणि विचार,चित्र आणि भाषा याची रचना(structure) एकच असतं. या विडगीनस्टाइनच्या विचाराना गोंदार्द उभा छेद देतो. त्याचं चित्र हे फक्त चित्र असतं आणि ते वेगळी 'भाषा''परिभाषा' (Vocabulary) घेऊन येतं. कधी कधी (म्हणजे बऱ्याच वेळा) पडद्यावर ऐकू येणाऱ्या भाषे पेक्षा वेगळा किंवा उलट अर्थ चित्र दाखवत असतं.



गोंदार्द दुर्बोध का होतो? कारण तो अनेक "language games' एकाच वेळी खेळत असतो. Language-games म्हणजे विशिष्ट संदर्भ घेऊन आलेली भाषा. "पाणी" हा शब्द उच्चारला तर तो कुठल्या संदर्भात याला महत्व आहे. अग्निशामक दलाने उच्चरलेला 'पाणी' स्वयंपाक घरात उच्चारलेला 'पाणी' पूरग्रस्त माणसाने उच्चरलेला 'पाणी' याचा संदर्भ आणि अर्थ वेगळा आहे. दैनंदिन जीवनाची भाषा शास्त्रीय भाषे पेक्षा वेगळी आहे.बुद्धिबळाची भाषा, तत्वज्ञानाची भाषा, गणिताची भाषा हे भिन्न 'language Games' आहेत. मी सुताराकडे एक घन Solid लाकडाचा तुकडा मागितला तर तो काढून देईल, अणू शास्त्रज्ञ म्हणेल हा पोकळ आहे, सर्व अणू रेणु यापासून बणलेलेले आहे, सॉलिड असं काहीच नाही. तर हे व्यावहारिक दृष्ट्या दुर्बोध आहे. गोंदार्द इतक्या वेगवेगळ्या प्रांतातून (Disciplines) मधून संदर्भ देतो की नेमकेपणाने अर्थ लागत नाही.(आणि नेमकं हेच त्याला अभिप्रेत असतं.) गोंदार्दचं वाचन अफाट आहे. विडगीनस्टाइन, लेवी-स्त्रास, याकोबसन असे तत्वज्ञ त्याने पचवलेले आहेत.जेम्स जॉइस, जॉ जेने, बेकेट असे लेखक, नाटककार तर त्याला फारच जवळचे आहेत. बिथॉवेन, मोझार्ट याची लज्जत त्याने घेतलेली आहे. पण एखादा चित्रकार पॅलेट घेऊन रंगांची सरमिसळ करतो त्या प्रमाणे गोंदार्द या सर्वांची सरमिसळ करतो. त्याला आपल्या चित्रपटातून 'सर्व काही' करायचं आहे. दैनंदिन संवादात गोंदर्द तत्वज्ञानाची भाषा वापरतो. साध्या प्रसंगाना राजकीय 'डूब' देतो. अशा वेगवेगळ्या प्रांतातील Language Games तो सतत वापरत असतो. त्यामुळे अनेकदा त्याच्या वाटेला जी , अवहेलना,आलेली आहे, ती मराठी साहित्यिक/सांस्कृतिक कद्रूपणाला देखील लाजवेल अशी आहे.

जागतिक कला संस्कृती खरी तर संहिष्णु आहे. कलाकार कितीही वेगळे करत असला तरी ते समजाऊन घेण्याची प्रवृत्ती तिच्यात आहे. लैंगिकतेच्या मुद्द्यावरून वाद झालेले आहेत. पण ही कलाच नाही असा सुर कधी काढलेला दिसत नाही. गोंदर्दचा चित्रपट चित्रपटच नाही म्हणणे, इतक्यावर समीक्षक थांबलेले नाहीत तर तो कचरा, ट्रॅश आहे इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. हे अत्यंत अन्यायकारक आहे. मुळात जो दिग्दर्शक सिनेमाची भाषाच आमूलाग्र बदलायला निघाला आहे, त्याला सिनेमाची भाषाच कळलेली नाही असा आरोप करणं हा नुसता असंहिष्णुपणा नाही तर तद्दन मूर्खपणा आहे. आणि याचं कारण एकच! पारंपरिक सिनेमाच्या चौकटीत, भाषेत आणि व्याकरणात गोंदर्दचा चित्रपट बसंत नाही.

चित्रपटाच्या भाषे बद्दल गोंदार्दने काय केलं? जेम्स जॉइस याने आपल्या 'युलिसिस' आणि 'फीनेगनस वेक' या कादंबऱ्यातून केलं तसंच! जॉइस आपल्या कादंबऱ्यातून संज्ञाप्रवाही भाषा वापरतो. (stream of consciousness) रचना, विरामचिन्हे यांना पूर्ण फाटा देतो. मनात येतात तसे विचार मांडतो, त्याला बंधेसुद स्वरूप देण्याचा प्रयत्न करत नाही. जॉइस किंवा गोंदार्द सारखी माणसं जेव्हा स्वतःची अशी एक भाषा,परिभाषा तयार करत असतात तेव्हा आधी तो प्रयत्न समजावून घेणे महत्वाचे असते. प्रारंभी कठीण जाते, त्या 'क्रेओल' सादृश्य भाषेशी झगडावे लागते. पण एकदा तुम्ही त्या व्यूह रचनेत आत घुसला की हळू हळू त्याची 'उपज' होत जाते. कुठलाही लेखक, तत्वज्ञ( कांट, चोमस्की, ई.) काही मूलभूत नवी प्रणाली देतो तेव्हा पारंपरिक धारणांची आपल्याला प्रथम अडचणच होते. पण तरीही तो खुद्द माणूस थेट वाचल्याने आपल्याला जास्त कळतो. (चोमस्की किंवा कांट वर मराठीतून वाचण्यापेक्षा ते थेट वाचणं अंतिमतः जास्त सोपं आहे.)

चित्रपट भाषेच्या बद्दल गोंदार्दने काय केले? हे समजून घेण्यासाठी आपल्याला thermo-dynamics मधील entropy ची संकल्पना उपयोगी पडेल. Entropy हा प्रणाली, सिस्टम; मधील विस्कळीतपणाचा निर्देशांक आहे. जितका विस्कळीतपणा जास्त तेवढा Entropy जास्त ! विचार करा एका त्रिकोणी काचेच्या बॉक्समध्ये खाली काळे आणि वर पांढरे चेंडू व्यवस्थित रचून ठेवलेले आहेत. त्रिकोणाचे टोक वरती आहे साहजिकच पायापासून टोकापर्यंत उतरंड निमुळती होत जाते. ही एक सूत्रबद्ध, हार्मोनियस प्रणाली आहे. आता त्याला तुम्ही जितके धक्के ध्याल तेवढे पांढरे आणि काळे चेंडू विस्कळीत होत जातील, आणि कदाचित एक पांढरा चेंडू आणि दोन काळे चेंडू एका रांगेत अशी नवी पण संयुक्तिक रचना होईल, जितके धक्के अधिक ध्याल तेवढा विस्कळीतपणा आणि entropy वाढत जाईल. अंतिमतः गोंधळाची (Chaos) परिस्थिति निर्माण होऊ शकते.





गोंदर्द असे धक्के चित्रपट भाषेतून देतोच पण तो थेट त्रिकोणाची उतरंड (Paradigm) चक्क उलटी करून टाकतो. त्रिकोणाचं टोक खाली करून टाकतो. एकमेकां समोर येणाऱ्या दृष्यामध्ये एक स्वाभाविक, समांतर साखळीयुक्त (Syntagmatic) संबंध असतात त्यालाच तो छेद देतो, आणि त्याला उभ्या उतरंडीच्या संबंधाचे (Paradigmatic) स्वरूप देतो. कधी कधी वाटून जातं की गोंदर्दला प्रेक्षकाशी संवाद तरी साधायचा आहे का? किंवा विसंवाद तरी साधायचा आहे का? का मुळात असा संवाद मानुष्यात शक्य नाही, मानवी अवस्था, ज्ञान, ग्रहणशक्ती 'केओटीक' आहे हेच त्याला ठसवायचे आहे. पण या विस्कळीतपणा मध्ये देखील एक संगती आहेच. 'There is a method in his madness'

मानवी भाषेचा सांभाषणा साठी किंवा परस्पर संबंध, वास्तव समजून घेण्यासाठीचा तोकडेपणा दाखवणारी Good Bye language ही फिल्म गोंदार्दने त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी शेवटी २०१४ मध्ये काढली. एका वाक्यात सांगायचं तर नवरा आणि बायको यांच्यातील भाषेचा विसंवाद यातून दिसतो. नवरा आणि बायको दोन वेगळ्याच Language Games मधील भाषा बोलताहेत. काय बोलतात ते एकमेकाना कळतच नाही. त्यांच्या कुत्र्याला interpreter चे काम करावं लागत आहे. (चित्रपटात गोंदार्दचा कुत्रा रॉक्सी याचं काम आहे. आणि त्याला या कामासाठी आंतरराष्ट्रीय कान फेस्टिवलचं बक्षीस देखील मिळालं आहे.) हा कुत्रा शहर आणि गाव असा भटकत राहतो. आणि दोन वेगवेगळ्या जोडप्यांच्या मध्ये येऊन बसतो. जोडप्याची सतत आदलबदल होत राहते, कोण काय आहे कळेनासं होतं. त्यांच्यातला एकमेव स्थिरांक (constant ) हा कुत्रा आहे. कुत्रा विचार करतो. पाणी आपल्याशी काय बोलत आहे? अशासारखे प्रश्न त्याला सतत पडतात. तो झोपला तरी त्याचे विचार नटी सांगते. दोन्ही भागात मुबलक साहित्यिक,तात्विक, राजकीय संदर्भ आहेत. मेऱ्री शेली आहे, रोडॉच्या थिंकर शिल्पाचे उल्लेख आहे, माओ च्या राजकीय विचारसरणीचा ऊहापोह आहे. आणि इतर मुबलक संदर्भ आहेत. गोष्ट काय? (गोंदार्दच्या चित्रपटाना रूढ अर्थाने गोष्ट किंवा प्लॉट असा नसतोच,) तरीही सांगायचं झालं तर गोष्टीचा सांगाडा असा सांगता येईल: लग्न झालेली बाई आणि एकता पुरुष भेटतात,प्रेमात पडतात, एक पुस्तकाचं दुकान काढण्याचा प्रयत्न करतात, पात्र अदलाबदल होऊन येतं, सोलझेनीतसिन च पुस्तक "Gulag Archipelago" बॅन केलं पाहिजे म्हणतो. जोडपी भांडतात, दूर जातात पुन्हा एकत्र येतात, बाईचा नवरा उरळसुरला पट उधळून लावतो, प्रेमीकाचा खून होतो. पुनश्च हरी ओम, आळतापालटीचं चक्र चालू राहतं. फिल्म दोन भागात विभागलेली आहे १. निसर्ग (Nature) २. अलंकृत (Metaphor) दोन भाग सतत आलटून पालटून येत राहतात, आणि वेगळाच अर्थ वेगळेच संदर्भ ध्वनित करतात. 'संभ्रम' हा चित्रपटाचा स्थायी भाव आहे.

तिसरा भाग आहे Epilogue: memory/Historical Misfortune: रॉक्सी कुत्रा पुन्हा घरी आलेला आहे. आरामात कोच वर झोपलाय, निवेदिका त्याचे विचार आपल्याला सांगते. कुत्र्याच्या भुंकण्यावर आणि तान्ह्या मुलाच्या रडण्याच्या आवाजावर फिल्म संपते. आपल्याला मिळालेली ऐतिहासिक स्मरणशक्ती हे खरोखरच दुर्दैव आणि संस्कृतीची शोकांतिका आहे. मानवी संस्कृती (Civilization) नश्वर आहे, आणि सिनेमा देखील त्यात येतो, हा विचार वारंवार गोंदार्दच्या चित्रपटात येतो, आणि त्याला मुळापासून हादरून टाकतो.

हा चित्रपट ३d होता. आणि गोंदर्दची ३d हाताळणी अत्यंत वेगळी होती. ३d चित्रपटात अनेक कॅमेरानी टिपलेली दृष्ये दोन डोळ्यातून एकत्र येऊन खोलीचा आभास निर्माण करतात, गोदर्दने दोन images विभक्त करण्यासाठी त्याचा उपयोग केला, दोन डोळ्यातून दोन वेगळी चित्रे पडद्यावर दिसतात आणि दोन्ही डोळे उघडले की एक होतात. गोदर्दने पुन्हा एकदा चित्रपट संज्ञावलीत एका पूर्ण नव्या शॉटचा शोध लावला. ही गोंदर्दची ४२ वी फीचर फिल्म होती, आणि १२१ वे व्हिडिओ प्रॉडक्शन! गोदर्दने फिल्म आणि व्हिडिओ यांचा एकत्रित उपयोग अत्यंत वेगळेपणाने आपल्या काही चित्रपटात केला आहे. भाषा, भाषेच्या मर्यादा, चित्रपटाची भाषा, चित्रपट भाषेची चिन्ह-मीमांसा,(Film-Semiotics) हा गोंदर्दचा सदैव चित्रपट-चिंतानाचा भाग राहिलेला आहे.

भाषेला अलविदा केल्यानंतर त्याच्या शेवटच्या चित्रपटात तो images कडे वळतो. 'The image Book (२०१८). हे देखील त्याच्या चित्रपट-चिंतनाला संयुक्तिक असेच आहे. प्रतिमा आणि आवाज यांनी संपृक्त असा हा कोलाज आहे. प्रतिमा एकमेकांवर कोसळतात, हिंस्त्रपणे एकमेकांशी ठोसाठोशी करतात.एकमेकाना नष्ट करतात. यात कृष्णधवल प्रतिमा आहेत, कलर 'पोश्च्रायझेशन' (दोन भिन्न रंगाना विभक्त करून त्याचा फिल्म निगेटिव्ह सारखा सारखा वापर –(उदा. Goodbye to Language मध्ये आलेले लाल फुलं आणि हिरवे गवत यांचे शॉटस) आहे, मुद्दाम वापरलेले 'glitches' आहेत. युद्धाचे शॉट आहेत, इतर दिग्दर्शकाना मानवंदना म्हणून त्यांच्या चित्रपटात वापरलेल्या प्रतिमा आहेत. इतरांच्या चित्राच्या, पेंटिग्स च्या प्रतिमा आहेत, गोदार्दच्या स्वतःच्या फिल्म मधील प्रतिमा देखील त्यात आहेत. हाताच्या प्रतिमा वापरलेल्या आहेत, एकमेकाना हळुवार स्पर्श करणारे हात, एडिटिंग टेबल वर फिल्मचे तुकडे जुळवणारे हात, बंदुका चालवणारे हात.सृजनशील हात आणि विध्वंस करणारे हात! प्रेम करणारे हात,आणि नफरत करणारे हात! हाताच्या प्रतिमांचा उपयोग तो एखाद्या मथळया प्रमाणे करतो. आणि चित्रपटाची पाच भागात विभागणी करतो. या प्रतिमाना स्थळ-काळाचा संदर्भ नाही. यातल्या प्रतिमां स्थल-काळ-अवकाश याच्या संदर्भाच्या पलीकडे रचलेल्या आहेत. जणू अनेक प्रतिमांचे तुकडे जोडून एक 'कॅलिडीस्कोप' तयार केलेला आहे. या प्रतिमा फिल्म वरची फिल्म बनवतात. (गोंदर्द चार वर्ष या फिल्मवर काम करत होता.) फिल्म चित्रपटाच्या इतिहासवरच मूलभूत प्रश्न उपस्थित करते. नुस्ता सिनेमाचा इतिहास नाही तर विसाव्या शतकाचा सांस्कृतिक/राजकीय/तात्विक/साहित्यिक इतिहास आणि त्याच्याशी असणारे चित्रपटाचे लागेबांधे याच्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या प्रतिमा आहेत. आणि त्या त्या प्रांतातील संदर्भ त्या घेऊन येतात.

गोंदर्दने चित्रपटाच्या पारंपरिक भाषेला paradigmatic shift दिला असं म्हटल्यावर सिनेमाची पारंपरिक 'भाषा' होती तरी कशी हे समजावून घेणं ओघानं आलंच! चित्रपट 'भाषेचा' प्रवास रोचक आहे. अत्यंत स्वभाविक, organic रित्या ती घडत गेली. रुळत गेली.

ल्युमियर बंधुनी आपला प्रोजेक्टर-कॅमेरा बनवला आणि चित्रीकरण करण्यास सुरुवत केली तेव्हा कॅमेरा एका जागेवर स्थिर असे. एक शॉट म्हणजे एक फिल्म अशा अनेक छोटेखानी फिल्म त्यांनी केल्या, आणि गंमत म्हणजे आज चित्रपटात दिसणाऱ्या सर्वच पठड्या त्यातून दृग्गोचर झाल्या. बतमीपट, कॉमेडी, गोष्ट, जाहिरातपट अशा सर्वच! लुमियर बंधू साठी सिनेमा हे प्रामुख्याने एक शास्त्रीय उपकरण होतं. त्यातील गोष्ट सांगण्याचं सामर्थ्य मिलिए सारख्या लोकांच्या तक्षणी लक्षात आले. मिलिए एक जादूगार होता त्याने त्याच्या चित्रपटातून जादू, सायन्स फिक्षन, स्पेशल इफेक्ट, मुख्य म्हणजे कथन, नरेशन आणले. लक्षात घ्या कॅमेरा अजून हलला नव्हता.

डि. डब्ल्यू. ग्रीफीथ याने त्याच्या 'Birth of a Nation' या चित्रपटात कॅमेरा प्रथम हलवला आणि Shot-Division किंवा दृश्य रचनेची सुरवात झाली. दूर दृश्य (Long shot ) समीप दृश्य (Mid-Shot ), क्लोजअप अशी रचना प्रचलित होऊ लागली.(ग्रिफिथ ने जेव्हा अति -क्लोजअप (extreme close –up) प्रथम वापरला तेव्हा निर्माते घाबरले, त्यांना वाटलं नुस्त मुंडकं बघून प्रेक्षकाना हा भुताटकीचा प्रकार वाटेल, आणि प्रेक्षक पळून जातील. पण तसं काही झाली नाही. कारण मुंडक्या खाली धड असतं हे त्यांना अनुभवातून माहीत होतं. प्रेक्षकाना देखील कॉमन-सेन्स असतो. नेमकं हेच आपण विसरतो. (अर्थात असा कॉमन-सेन्स गोंदर्द बघताना बिलकुल कामी येत नाही, ते एक सोडा!)

तर अशा प्रकारे दृश्ये संकलित करताना संकलनाचे पायंडे रुळत गेले. पुढे पुढे, अगदी आजतागायत; त्याच्या वर शिक्कामोर्तब होत गेलं. आजही बघितलत तर सर्व पात्रं, त्यांचा सभोवताल, त्यात येणाऱ्या वस्तु, फर्निचर वगैरे, त्या अनुरूप केलेली प्रकाश योजना, असा सर्व 'मिसोंसिं', चित्रिकरणास लागणारे घटक establish करणारा एक लॉन्ग शॉट, किंवा मास्टर-शॉट, त्यानंतर पात्रांच्या हालचाली प्रमाणे, सांभाषणा प्रमाणे येणारे मिड-शॉट, जो नट बोलत असेल त्याचे क्लोजअप्स, दूसरा नट किंवा नटी ते ऐकत आहे हे दाखवणारे रिअॅक्शन-शॉटस, संभाषणात बोलत असलेल्या व्यक्तीच्या सांभाषणानुसार होणारे रिवर्स शॉट किंवा 'ओवर द शोल्डर शॉटस',दोन दृश्यांच्या मध्ये येणारे इन्सर्ट्स, किंवा 'कट-अवे' शॉटस, नट/नटयांची हालचाल 'फॉलो' करणारे पॅन शॉटस, एखादी वस्तु फ्रेम मध्ये आणण्यासाठी केलेले 'टिल्ट', पात्राच्या दृष्टीकोनातून घेतलेले 'पॉइंट ऑफ व्ह्यू ' शॉटस , एखाद्या दृश्याला अधोरेखित करणारे ,जवळ जाऊन निरीक्षण करणारे 'झुम' अशी दृश्य योजना रुळत गेली. अगदी दृश्य-बदलाचे transition-effects, चे ठोकताळे देखील साचेबद्ध होत गेले. दृश्य बदलासाठी 'डिसोल्व', वेळ बादलासाठी फेड-इन, फेड-आउट'. एखादी व्यक्ति पडद्यावर वेगळी करून अधोरेखित करण्यासाठी वापरलेले गोल मास्क वगैरे. चित्रपटाचे कथन ओघवत्या शैलीत होईल असे 'अदृश्य संकलन' (Invisible editing ) वापरण्याकडे कटाक्ष होता.

म्हणजे संकलन केले आहे हे प्रेक्षकाना कळता देखील कामा नये याकडे विशेष लक्ष असे. नाहीतर प्रेक्षकांचे लक्ष गोष्टी वरून ढळून सांकलना वर केंद्रित होईल अशी भीती पारंपरिक सिनेमा दिग्दर्शकाना वाटत असे.

त्यातून काही तांत्रिक अवधाने कटाक्षाने पाळली जात. कॅमेरा imaginary line च्या पलीकडे जाता काम नये, (Eye line match), कॅमेरा अॅङ्गल बादलताना दोन अॅङ्गल मधील कोन ३० अंशापेक्षा जास्त असता कामा नये (कारण मग ते मॅच होत नाहीत.)पात्राची हालचाल समजा लॉन्ग शॉट आणि मिड-शॉट अशी चित्रित केली तर हालचाल 'कट' मध्ये मॅच झालीच पाहिजे,असे पायंडे इतके घट्ट रुजले की त्याची एक रिजिड निवमावलीच बनून गेली. Continuity editing हे चित्रपट तंत्राचे घट्ट नियम बनून गेले. जणू त्या चित्रपटांच्या commandments होत्या, आणि त्या तोडणे हे पाप होते.

६०च्या दशकात फ्रांसमध्ये काही सिनेमाप्रेमी तरुण आंद्रे बाझा यांच्या सिनेमास वाहून घेतलेल्या "काह्येदू सिनेमा' नियतकालिकात लिहू लागले. यात गोंदर्द, तृफो, छ्याब्रॉल सारखे चित्रपटाने रसरसलेले तरुण होते.

महायुद्धानंतर ची फ्रांस मधील तरुणाई जागतिक आकलन जवळ करू पाहत होती. जर्मन अधिपत्याखाली असलेल्या फ्रांस मध्ये युध्ध काळात अमेरिकन सिनमावर बंदी होती. आता ते येऊ लागले, आणि त्यात दिसणारी ऊर्जा, मोकळेपणा, प्रांजळपणा बघून हे तरुण प्रभावित झाले. तत्कालीन फ्रेंच सिनेमाचा बंदिस्तपणा, रूढीबध्द्धपणा त्यांना खटकू लागला. प्रचलित चित्रपट भाषा त्यांना साचलेली, आणि तोकडी वाटू लागली. त्यांना चित्रपटातून वेगळं काही दाखवायचं होतं, आणि त्यासाठी नवी भाषा आवश्यक होती. पारंपरिक चित्रपट दृध्द्धाचार्यांचे नियम त्यांना जाचक वाटत होते. दिग्दर्शक कॅमेरा द्वारे चित्रपटाचे लेखन करतो, चित्रपट सर्वस्वी दिग्दर्शकचा असतो, तो त्याचा Author असतो. (फ्रेंच मध्ये Auteur ) हीच ती ऑतेर थिअरी, हेच ते camera stylo, (कॅमेरा-पेन) आणि हीच ती फ्रेंच न्यू वेव्ह चळवळ! गोंदर्द या चळवळीचा अग्रणी होता. (इथे एक लक्षात घ्यावं लागेल, की साहित्यातील 'संज्ञा प्रवाह चळवळ' किंवा चित्रकालेतील 'इंप्रेशनिझम' किंवा जर्मन सिनेमातील 'जर्मन एक्सप्रेशनिझम' या चळवळी प्रमाणे ही 'well defined' चळवळ नव्हती. काही फ्रेंच तरुण दिग्दर्शकानी अत्यंत वेगळे, नावीन्यपूर्ण चित्रपट एका पाठोपाठ दिले. आणि ते प्रयत्न 'फ्रेंच न्यू वेव्ह्' म्हणून जागतिक सिने-विश्वात ओळखले जाऊ लागले.)




काही विशिष्ट 'आऱ्टी' चित्रपट दिग्दर्शकाना अभिजात ठरवून स्वतःची वैशिष्यपूर्ण शैली असलेल्या हिच्कॉक, हॉवर्ड हॉक सारख्या मुख्य प्रवाहातील दिग्दर्शकाना दुय्यम दर्जा देऊन वेगळ्या पंक्तीत बसवणे या लोकाना अन्यायकारक वाटले. त्यांनी अमेरिकन हॉलीवूड सिनेमाचे पुनरमूल्यांकन केले. या दिग्दर्शकांची पृष्टभागी दिसणारी शैलीच नव्हे तर त्यातून येणारे अंतस्थ 'मोटिफ' 'पटर्न्स' त्यातून साकार होणारा पोत या सर्वांचं त्यांनी बरकाईनं विश्लेषण केलं. या सर्वच मंडळीवर अमेरिकन सिनेमाचं गरुड होतं. गोंदर्दवर तर खासच! अमेरिकन जीवनशैली,चिन्हे, मोटिफ, प्लॉट गोंदर्द आपल्या चित्रपटात जागोजागी वापरतो.

त्याचा "MADE IN USA" हा चित्रपट त्या दृष्टीने विशेष अभ्यास करण्याजोगा आहे.

कोकाकोला,बर्गर, बोगार्ट, हॉलीवूड, डिस्ने, सिगरेटस,पब्स, गन्स आणि गँगस्टर्स,सेक्स, अशी सर्व अमेरिकन मिथके, नट नटयांचे मास्कॉट (प्रतिमा), जीवन शैली, उच्चार पद्धती, बॉडी लॅंगवेज सर्व काही यात व्यत्यासाने येते! गँगस्टर फिल्म मध्ये येणारे आदिबंध (स्ट्रिरीओ-टाईप्स या अर्थाने) गोंदर्द अमूर्त रित्या वापरतो. जणू ही पात्रं अशा 'डार्क-चित्रपटाचे' (film-noir ) चे अमूर्त प्रतनिधी असावेत. गोंदर्द म्हणून गेलाय 'की एक तरुणी आणि एक गन घेऊन तुम्ही चित्रपट बनवू शकता" आणि हे त्याने त्याच्या अनेक चित्रपटात करून दाखवलं आहे. मेड इन यू.एस. ए. हा त्यातील एक. अमेरिकन चित्रपटाच्या या बाजा कडे गोंदर्द 'बाहेरून' तटस्थपणे पाहत आहे. दुकानात ठेवलेल्या रिवॉल्वरर्स, तरुणीच्या हातातील गन, अशी दृश्ये चित्रपटात वारंवार येतात. एखाद्या शाब्दिक खेळातील 'फास्ट राऊंड' मध्ये समोरच्याने एक शब्द उच्चरला की वेळ अजिबात न दवडता त्यावरून सुचणारे शब्द जसे बोलायचे असतात, तसे अमेरिका म्हटल्यावर जे जे सुचेल, जे जे दिसेल त्या सर्व प्रतिमा आपल्याला चित्रपटात दिसतात. त्यात अमेरिकन झेंड्याचे लाल,पांढरा आणि निळे रंग देखील आले !

बेख्त चे आलिप्तकरणाचे तंत्र गोंदर्द यात वापरतो. यातील पात्र खरी वाटू ना देता ती अमेरिकन गँगस्टर चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या साच्याचे अमूर्त प्रातिनिधिक रूप वाटावीत याची पूर्ण काळजी तो चित्रपटभर घेतो. जे काही संवाद ऐकू येतात ते पडद्यावरील इतर आवाजात बुडून कळेनासे होतात. आणि जे संवाद ऐकू येतात त्यांचा संदर्भ लागत नाही, अर्थबोध होत नाही. एक पात्रं बार मध्ये म्हणतं देखील "मी वाक्य बनवण्याचा प्रयत्न करतो. पण मला ती आवडत नाहीत." " कारण?" "कारण ती निरर्थक असतात." " त्यानंतर पत्राच्या तोंडी " टेबल ग्लासवर बसलेली आहेत," " खिडकी तुझ्या डोळ्यात पाहत आहे" " मी ते दार उघडतो आणि दार स्टूलावर बसतं" " सीलिंग दिव्याला लटकलं आहे" अशी व्याकरण दृष्ट्या योग्य, पण व्यवहारीक दृष्ट्या निरर्थक अशी वाक्ये येऊन जातात. आणि बाऱ्टेनडर मध्येच म्हणून जातो " वाक्याना अर्थच नसेल तर मी तुला दारू सुध्धा सर्व्ह करू शकणार् नाही" (आपण कुठल्या बार मध्ये असं काही बरळलो तर तिथला वेटर देखील हेच म्हणेल. पण जोक्स अपार्ट )

अमेरिका हे वैयक्तिक स्वातंत्र्य, सत्ता घेऊन येतं. आणि गोंदर्दच्या दृष्टीने " to be free is to exist'! असे संपूर्ण व्यक्ति-स्वतंत्र्य कमालीचा एकाकीपणा आणि आलिप्त भावना आणतं. आणि या गोष्टी गोंदर्दच्या चित्रपटात पदोपदी दिसतात. गोंदर्द म्हणून गेलाय " to be or not to be is not really a question"

अमेरिकेचे मिथक वापरताना गोंदर्द त्याला " Alice in wonderland' सारखे परिकथेचे स्वरूप देतो. नायिकेचे नाव देखील अॅलिस आहे. "अॅलिस तू लुई कॅरॉल बरोबर जाशील" या सारखी वाक्यं देखील आहेत. बोगार्ट, दिस्ने, अमेरिका म्हटल्यावर जे जे डोळ्यासमोर येतं ते, (मेरिलीन मनरो का नाही?) आणि ठासून भरलेले इतर तात्विक,समाजशास्त्रीय,साहित्यिक संदर्भ हे सर्व असूनही त्यातील विनोदबुद्धी,खेळकरबुध्द्धी जागरूक आहे. त्याचा अंतप्रवाह एखध्या Burlesque सारखे साधर्म्य दाखवत विडंबन करणारा आहे.

गोंदर्द जी थिअरी मांडतो ती तो त्याच्या चित्रपटातून प्रभावीपणे दाखवून देतो. ( जागतिक सिनेमात असं करणारे फक्त दोनच दिग्दर्शक आहेत. पहिला आयझेस्टाईन आणि दुसरा तारकोवस्की) आपल्याला चित्रपटातून, चित्रपटा बद्दल, चित्रपटाच्या भाषे बद्दल, रचने बद्दल काय करायचं आहे हे गोंदर्द आपल्या अगदी पहिल्या चित्रपटापासून दाखवून देतो.

१९६० साली त्याचा 'ब्रेथलेस' (breathless) हा पहिला चित्रपट आला, आणि एक मूलभूत वेगळा चित्रपट विचार, शैली, आणि रचना मांडणारा दिग्दर्शक सिने-पटलावर आलाय अशी दाखल जागतिक सिने-विश्वाने घेतली.

रुळलेल्या पारंपरिक चित्रपट तंत्राला, मंडणीला आणि विषयाला त्याने उभा छेद दिला होता. Continuity editing, eyeline-match, संवादा बरोवर येणारा एकजीव आवाज (synchronous sound) याला त्याने पूर्ण फाटा दिला होता. अदृश्य संकलन नाकारून उलट ते ठळक पणे दिसेल, जाणवत राहील असे वापरले!.





मॅच-कट चे उच्चाटन करून जंप-कट अस्तित्वात आणला होता. जप-कट ही गोदर्दने चित्रपट परिभाषेला (vocabulary) दिलेली देणगीच म्हणावी लागेल. मोंटाज म्हटला की जसे आयझेस्टाईन च्या 'ओडेसा स्टेप्स' चे

उदाहरण दिले जाते, तसं जंप-कट म्हटला की चित्रपट विश्लेषक गोंदर्द च्या 'ब्रेथलेस' चित्रपटातील 'कार-सिक्वेन्स' चे उदाहरण देतात. एका कार मधून एक तरुण व एक तरुणी प्रवास करत आहेत. दोघानाही पाठमोरे चित्रित केले आहे. कॅमेरा कधीही पुढे जात नाही. दोघांचा संवाद चालू आहे." Why are you sad?""Because I am" "That is sad" "But that is silly" संवाद करणारा तरुण फ्रेम मध्ये नाही. तरुणी ऐकत आहे, प्रतिसाद देत आहे, बोलत आहे, पण त्यातील मधल्या फ्रेमस गोंदर्द कापून टाकतो. आणि तो फेमस 'जंप-कट' सिनेमा-विश्वात अवतरतो. संभाषण एकजीव राहत नाही,a-synchronous होत जातं. मास्टर शॉट नाही, कुठेही हालचाली एकजीव करणारा 'मॅच-कट' नाही, कुणाचेही reaction shots नाहीत. कार मधून प्रवास चालूच आहे, पाठमोरा! (चित्रपटभर हँड-हेल्ड कॅमेरा वापरला आहे.प्रचलित सिनेमा त्याला शिकाऊ Amateurish समजत असे. अशा डॉक्युमेन्ट्री स्टाइल ने घेतलेले ट्रॅकिंग-शॉटस बघून थक्क व्हायला होतं.)थोडक्यात:चित्रपटाच्या प्रचलित पायंडयाना चक्क केराची टोपली दाखवली आहे.

नंतरच्या चित्रपटात फॅक्ट आणि फिक्शन यातील सीमारेषा गोंदर्द पुसून टाकतो. व्यक्तिरेखा,अॅक्शन,परिसर यांना तो प्रतिमांच्या पातळीवर घेऊन येतो. प्रतिमातून दिसणारा थेट संबंध, कार्यकारण-भाव तो काढून टाकतो, आणि प्रतिमांचा निव्वळ प्रतिमा म्हणून उपयोग करतो. चित्रपटात दिसलेली हंफ्रे बोगर्ट ची पोस्टर्स, अगदी त्यात वापरलेले जाझ संगीताचे तुकडे देखील चिन्ह म्हणून येतात. अमेरिकन संस्कृती बद्दल गोंदर्दची आस्था अशा images द्वारे पदोपदी दिसून येते. पण त्यातून दिसणाऱ्या पठडया गोंदर्द पूर्ण वेगळेपणाने वापरतो. हा वापर आणि एकंदर चित्रपटाचा 'फील' एखाद्या improvisation सारखा आहे. एका दृश्यात नायक पाठमोरा कारच्या डिकित डोकावताना दिसतो, तर पुढच्याच क्षणी त्याच्या हातात पिस्तूल दिसते. पॅन मध्ये हातातील पिस्तुलचा क्लोजप, पक्षी (सदृश काही तरी) गोळीने पडताना, पिस्तुलचा आवाज मात्र सिंक केलेला नाही. एकही establishing शॉट नाही, पुढे काय घडेल याची कुठलीही पूर्वसूचना नाही! (टिपिकल गोंदर्द) अशा दृष्यातून चित्रपटाला एक अस्तित्ववादी (Existentialist) पोत मिळतो.

एका दृश्यात एका बाथरूमच्या आरश्यासमोर नायक नायिकेचा संवाद चालू आहे, तेंव्हा गोंदर्द प्रत्यक्ष नायिकेचा नाही तर तिच्या आरश्यातिल प्रतिमेचा देखील नायकाच्या दृष्टी बरोबर eye-line-match (दृष्टी-भेट?) करतो. केवळ एका दृष्यातून नेमकेपणे आपल्याला दोन पात्रा मधील निसरड्या (elusive) संबंधांचा अंदाज येतो.

'ब्रेथलेस' प्रचलित चित्रपटपेक्षा इतका वेगळा होता की पदार्पणातच गोंदर्द जेष्ठ जागतिक सिने-दिग्दर्शकांच्या पंगतीत जाऊन बसला. एक 'ऑतेर' सिने-विश्वाला मिळाला होता.

Updated : 29 Sep 2022 11:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top