Home > मॅक्स ब्लॉग्ज > पंडित नेहरुंचा राज्यांशी संवाद कसा होता?

पंडित नेहरुंचा राज्यांशी संवाद कसा होता?

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी आर्थिक शिक्षण आणि संशोधन यावर दिलेला भर, तसेच संघराज्य पद्धतीचे महत्व ओळखत राज्यांशी ठेवलेला संवाद, याचे विश्लेषण करणारा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचा लेख....

पंडित नेहरुंचा राज्यांशी संवाद कसा होता?
X

स्वतंत्र भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी. स्वातंत्र्य मिळाल्यावर दोन वर्षांतच व्ही के आर व्ही राव यांना त्यांनी 'दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' ची स्थापना करण्यास प्रवृत्त केले. देशाच्या उभारणीमध्ये आर्थिक शिक्षण व संशोधनाचे महत्त्व किती आहे हे त्यांनी जाणले होते. स्वातंत्र्यानंतर चार वर्षांतच त्यांनी खरगपूर येथे पहिल्या आयआयटीची स्थापना केली. नेहरूंचा संघराज्य पद्धतीवर पूर्ण विश्वास होता आणि म्हणून दर पंधरवड्याला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते पत्र लिहीत असत. अर्थकारण, सरकारी प्रशासन, परराष्ट्र धोरण, विकास अशा अनेक विषयांवर ते या पत्रांतून उहापोह करत असत. या पत्रांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, आपली मते व्यक्त करावीत, असा त्यांचा आग्रह असे.

केवळ मी काय तो शहाणा आणि फक्त मीच माझी 'बात' करणार, इतरांनी केवळ माझे विचारग्रहण करायचे, असा पवित्रा नसे. 15 ऑक्टोबर 1947 रोजी सर्व मुख्यमंत्र्यांना उद्देशून नेहरूंनी एक पत्र लिहिले. फाळणीनंतर धार्मिक संघर्षापासून भारताला कसा धोका आहे, हे त्यांनी त्यात सांगितले. फाळणीच्या वेळी जर दंगे पश्चिम उत्तर प्रदेशात रोखले गेले नसते, तर ते बिहारसह संपूर्ण उत्तर भारतात तसेच प. बंगालात ते पसरले असते. संपूर्ण देशात अराजक निर्माण झाले असते व देशातील घटनात्मक सरकारला धोका निर्माण झाला असता, असे नेहरुंनी म्हटले होते. 1 नोव्हेंबर 1951 रोजी लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात राष्ट्रवाद आणि संस्कृती यांच्या नावाखाली जमातवाद कसा वाढत आहे, याबद्दल त्यांनी खेद प्रदर्शित केला आहे.

पाकिस्तान तेथील अल्पसंख्याकांशी कसाही वागला, तरी आपल्या देशातील अल्पसंख्याकांबद्दल आपण सुसंस्कृतपणेच वागले पाहिजे आणि त्यांना सुरक्षा दिली पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचे अधिकार जपले पाहिजेत, असे मतही त्यांनी नोंदवले आहे. एका विशिष्ट विचारसरणीचे मधुरभाषी किंवा गोडबोले लोक नेहरुंचा पराकोटीचा द्वेष करतात. त्यांना आपण मोठ्या मनाने माफ करू या. भारताच्या या महान सुपुत्राला, पंडित नेहरूंना आदरांजली. - हेमंत देसाई

Updated : 27 May 2022 7:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top