Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेले पारधी देशद्रोही कसे ?

स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेले पारधी देशद्रोही कसे ?

जो फुगा विकून आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा खर्च भागत होता. त्याच फुग्याने पारधी समाजाचे कुटुंब उद्ध्वस्थ केले आहे. स्वातंत्र्य लढ्यात रक्त सांडलेल्या पारधी समाजावर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसतो न पुसतो तोच देशद्रोहाचा नवा शिक्का मारण्याचे षडयंत्र सुरु आहे. काय आहे सोलापूर येथील घटनेमागील तथ्य वाचा या विशेष रिपोर्ट मध्ये...

स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेले पारधी देशद्रोही कसे ?
X

“खेळणी, फुगे, लिंबू-मिरची आम्ही हेच विकतो. काल ईदचा सन आलाय म्हणून मी माझ्या लेकराला घेऊन गेलो. त्याच्या हातात फुगे दिले. त्याला सांगितलं संध्याकाळी पोटाला खायचं असेल तर हे विक. त्याने ते फुगे विकले तर आमच्यावर आज हा देशद्रोहाचा आरोप आलाय. आम्ही शाळा शिकलेलो नायी काय नाय. आमी अनपड असल्यामुळे ते फुगे आलेले आमाला माहित नाय पडलं”.

सोलापूर येथील ईदगाह मैदानावर ‘लव्ह पाकिस्तान’ लिहिलेले फुगे विकले म्हणून गुन्हा दाखल झालेल्या पारधी समाजातील अल्पवयीन मुलाच्या बापाची ही प्रतिक्रिया आहे.

ते ज्या वस्तीत राहतात त्या पारधी वस्तीतील नागरिकांना दररोज पोटाची चिंता असते. या वीतभर पोटाची आग विझवण्यासाठी कुणी लिंबू मिरच्या विकतं, कुणी खेळणी विकतं, कुणी भीक मागतं तर कुणी वेगवेगळ्या रंगाचे फुगे विकतं. दररोज संध्याकाळी आपल्या पोटाची तजवीज करणारा हा फुगाच पारधी कुटुंबाला उद्ध्वस्थ करणारा ठरला आहे.





या गुन्ह्यामध्ये फुगे विकणाऱ्या अल्पवयीन मुलाबरोबरच ६५ वर्षाच्या वृद्ध पारधी व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील वृद्ध आरोपी शिवाजी पवार यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रने प्रत्यक्ष संपर्क केला असता ते सांगतात, “चार पाच लोक माझ्याकडे आले. त्यांनी मला हिरव्या फुग्यांची मागणी केली. वाढदिवस असेल म्हणून मी माझ्याकडील पिशवीत असलेले २ हिरवे फुगे त्यांना दिले. अजून हवे असतील तर दुसऱ्याकडे मिळतील हे देखील त्यांना सांगितले. फुग्यावर काय लिहिले आहे मला वाचता येत नाही. माझा दहा हजाराचा इतर माल उद्ध्वस्थ झाला. वरून माझ्यावर केस दाखल करण्यात आली आहे”.

या पारधी कुटुंबाचे अशिक्षित असणे हे त्यांच्यावर झालेल्या या गुन्ह्याचे कारण ठरले आहे. आरोप झालेल्या दोघांनाही वाचता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या वस्तीत राहणाऱ्या सुधा काळे सांगतात, “ आमच्या गल्लीमध्ये तीनशे मतदार आहेत.आम्ही शिकलो नावो आम्ही अनपड हावो. जर शाळा शिकलो असतो तर त्या पाकिटंमधले दोन फुगे आम्ही काढून फेकून दिलो असताव. शिकलो असतो तर आमच्यावर एवढी कारवाई झाली नसती. यामध्ये आमची काहीही चुकी नाही”.

पुनर्वसन करण्यात आलेल्या या पारधी कुटुंबांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. शहरामध्ये लिंबू मिरच्या विकणे, राष्ट्रीय सन आले की तिरंगा झेंडे विकणे, विविध धर्मातील सन उत्सवात खेळणी विकून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सन उत्सव यात्रा नसलेल्या काळात ते दगड फोडणे, चरी खंदणे, अशी कामे करतात. या पैशातून त्यांच्या कुटुंबाचाच खर्च भागात नाही. तर आता न्यायालयात चकरा मारायला, वकिलांना द्यायला पैसे आणायचे कुठून हा प्रश्न त्यांना पडला आहे.

दुकानातून फुगे आणून विकणे हा नित्यक्रम

सकाळी दुकानातून फुगे खरेदी करायचे आणि त्याची विक्री करायची हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. ईदच्या दिवशी देखील त्यांनी आर. के. या मधला मारुती गल्लीतल्या दुकानातून फुगे आणलेले होते. आणलेल्या पाकिटातील सर्व फुगे आक्षेपार्ह नव्हते. प्रत्येक पाकिटात दोन ते तीन फुगे असे होते. या दुकानात हे फुगे नक्की आले कुठून? या फुग्यांची निर्मिती कोणत्या कंपनीमध्ये झाली?हे फुगे तयार करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता? यामागे खरा सूत्रधार कोण आहे? हे तपासून त्याच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. या घटनेमध्ये पोलीस विभागाने तथ्य समोर आणून या पारधी आरोपींची अजाणतेपणी घडलेल्या या गुन्ह्यातून मुक्तता करणे गरजेचे आहे. अन्यथा स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची परवा न करता देशासाठी रक्त सांडणाऱ्या या लढाऊ जमातीवर देशद्रोहाचा खोटा शिक्का बसेल. गुन्हेगारीचा पारंपारिक शिक्का पुसून मुख्य प्रवाहात येऊ पाहणाऱ्या या समुदायाला पुन्हा प्रवाहाबाहेर ढकलण्याचे हे षडयंत्र तपास यंत्रणांनी, न्यायव्यवस्थेने हाणून पाडण्याची आवश्यकता आहे.


हे हि पहा...

Updated : 1 July 2023 2:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top