Home > मॅक्स ब्लॉग्ज > राष्ट्रीय महामार्गावर अघोरी कृत्य, विटा पोलिसांची बघ्याची भूमिका ?

राष्ट्रीय महामार्गावर अघोरी कृत्य, विटा पोलिसांची बघ्याची भूमिका ?

राष्ट्रीय महामार्गावर अघोरी कृत्य, विटा पोलिसांची बघ्याची भूमिका ?
X

अपघातातून बरे व्हावे म्हणून अपघाताच्या ठिकाणीच बोकडाचा बळी देण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील विटा या शहरात घडला आहे. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने दिलेल्या माहितीनुसार विटा कराड या महामार्गावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने एक चारचाकी गाडी आली. गाडीतून उतरत काही अनोळखी इसमांनी तेथे एका लहान बोकडाचा बळी दिला. बळी दिलेल्या बोकडाचे मुंडके व दोन पाय तसेच बाजूला एका कागदावर तांदूळ, भाकरी,नारळ, औषधाच्या गोळ्या, अंडे, काजळ, पावडर, लिंबू, दारूची बाटली ठेवली आणि सदर व्यक्ती त्याच गाडीतून क्षणात पसार झाले.

ही घटना एका महिलेने पाहिली. लहान बोकडाचा आवाज ऐकून तिला लहान मुलाचा बळी दिल्याचा समज झाला. त्या भितीने सदर महिला बेशुद्ध पडली. तेथील नागरिकांनी हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांना कळवला. त्यांनी ही घटना विटा पोलीसांना कळवली. या गंभीर प्रकारानंतर सदर अनोळखी इसमांवर जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

घटना कळाली पण गुन्हा कधी ?

सदर गंभीर प्रकार पोलिसांना कळवण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत पोलिसांनी संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांनी केलेल्या दिरंगाईचा फायदा आरोपींना होणार असून सदर आरोपींनी राजकीय व्यक्तींना घेऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरु केल्याची प्राथमिक माहिती आहे. सार्वजनिक ठिकाणी केलेला हा धक्कादायक प्रकार पाहता पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे.

उताऱ्यात डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आणि गोळ्याची यादी

या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या उताऱ्यात डॉक्टरांनी दिलेली गोळ्याची यादी तसेच गोळ्या देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. आजवरच्या उताऱ्यामध्ये विविध वस्तू असायच्या पण यामध्ये गोळ्या आणि डॉक्टरची चिट्टी ठेवल्याने शिक्षित व्यक्ती अंधश्रध्देला बळी पडल्याचे दिसून येत आहे. या गोळ्या आणि औषधे कोणत्या डॉक्टरने दिली आहेत याचा शोध घेतल्यास आरोपी सापडण्यास मदत होणार आहे.

सदर आरोपींना हा सल्ला देणारा मुख्य आरोपी कोण ?

सदर आरोपी हे याच परिसरातील असून त्यांचा काही दिवसापूर्वी या जागेवर अपघात झालेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुखापतीतून वाचण्यासाठी त्यांना मांत्रिकाने हा सल्ला दिला असण्याची शकयता आहे. हा अघोरी प्रकार करण्याचा सल्ला देणारा मुख्य सूत्रधार असलेला मांत्रिक कोण हे शोधून काढणे पोलीसांपुढे मोठे आव्हान आहे.

यासंदर्भात मॅकस महाराष्ट्रने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात तसेच वाघेश साळुंखे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी खालील प्रतिक्रिया दिली, “विटा शहरात भर रस्त्यावर बोकड बळी देणाऱ्या व्यक्तीवर तसेच असे अघोरी कृत्य करण्याचा सल्ला देणाऱ्या मांत्रिकावर विटा पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Updated : 19 May 2023 4:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top