Home > मॅक्स ब्लॉग्ज > माणसाने माणसाशी माणसासम वागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

21 व्या शतकात काळानुसार जातीच्या भिंती तोडून माणसं माणसांशी माणसारखं वागत आहेत का? जो काळानुरुप बदलला नाही. त्याचा डायनासोर होतो असं म्हणतात. ज्या प्रथांनी, जातीधर्माने माणसा-माणसांत भेद तयार होतात. ते आज आपण विसरलो नाही तर आपला डायनासोर झाल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देणारा प्रा. डॉ. आर.जी. सोनकवडे यांचा लेख…

माणसाने माणसाशी माणसासम वागणे
X

भारतात आढळणारी जातपात आधारीत समाजरचना व आचारसंहितेची विविधता जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही पाहावयास मिळत नाही. भलेही नेहरूंनी 'विविधतेतून एकता' अशा शब्दात भारतीयांचे कौतुक केले असले तरी भारतीयांच्या प्रगतीस हिच विविधता अपायकारक तर ठरत नाही ना? शिक्षणाचा प्रचार विज्ञान- तंत्रज्ञानाचा प्रसार व जागतिकीकरणामुळे आपला बदलेल्या शिष्टाचाराबरोबरच जन्माधिष्ठित उच्च-नीचता अधिकाधिक घट्ट होत आहे.

जात-धर्म, वर्ण म्हणताच स्व-घोषित सुशिक्षित, तज्ज्ञांची मते कवडीमोल जाणून स्वदृष्टिकोनातून वक्तव्य करतात. मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याला जात-पात, धर्म-पंथ जोडणे हे मानवनिर्मित व्यवस्थेचे काम आहे. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. कारण सामाजिक प्रवाहाविरुद्ध पोहणे. हे अगदीच रॉकेट सायन्स प्रमाणे कठीण काम आहे. असेच सामान्यांना वाटते, म्हणूनच ते सामान्यच राहतात. मग कोणाच्यातरी असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या खंबीर नेतृत्वाची, त्याच्या दातृत्वाची वाट पाहणे व त्यांचा जयजयकार करत बसणे. यात स्वतःला धन्यता मानणे हाच जणू हा भारतीयांचा मूळ स्वभाव बनला आहे.

मानवतावादी कवितेच्या ओळी गुणगुणत आपण एखाद्याला जाती-धर्मावरून अपशब्द वापरताना मागेपुढे पाहत नाही. अशा प्रकारे विज्ञान युगात सुद्धा जाती, धर्माचे अवडंबर माजवणे अजून सुरूच आहे. विचारधारा कितीही मॉडर्न झाली तरी संकुचित विचारधारा बाळगून जाणते-अजाणतेपणी इतरांना दुखावणाऱ्या प्रथा परंपरा यांना आजही डोक्यावर घेतले जाते याला आपण सुशिक्षितांचा अशिक्षितपणा म्हणूया.

भारतामध्ये आज ३५००च्या आसपास एकूण जाती आहेत. यापैकी ७५१ अनुसूचित जाती आहेत. खरे तर caste हा स्पॅनिश भाषेतील शब्द असून इंग्रजांनी समाजाचे वर्गीकरण करताना तो प्रथम वापरला. पूर्व वैदिक काळापासून समाज हा व्यवसायाधिष्टीत सामाजिक वर्णपद्धतीच्या बाबतीत ताठर नव्हता पण काही काळाने पवित्र आणि अपवित्र या कल्पनांवर आधारलेल्या जातिव्यवस्थेत अंतर्गत विवाहाची सक्ती, धार्मिक आचार विधींना प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व, जाती जातींमधील अत्यंत कडक सीमा यामुळे जाती स्तरांची उतरंड खोलवर रुजत गेली.

अगदी मध्ययुगापासूनच शिक्षणाचे दरवाजे हे उच्चवर्णीय जातीतील लोकांना खुले होते. पुढे ब्रिटिश प्रशासन सत्तेत असताना मात्र, हे निर्बंध कुठेतरी मुक्त झाले. खरे तर या प्रकारचा भेदभावास ग्रामीण भागांमध्ये खतपाणी मिळाले. दैववादी वृत्ती, पितृसत्ताक मूल्ये यामुळे पिढ्यानुपिढ्या आलेल्या परंपरा ग्रामीण भागात भक्तिपूर्वक पाळल्या जातात. येथे अर्जित दर्जापेक्षा अर्पित दर्जास महत्त्व दिले गेल्यामुळे येथे शिक्षण व व्यावसायिक स्थानापेक्षा किंवा स्व-बळ, गुणवत्तेपेक्षा जन्मत: प्राप्त होणाऱ्या स्थानास जास्त महत्त्व असते.

अर्थातच शिक्षण व कौशल्यांची निपुणता याबद्दलच्या आत्मविश्वासाचा अभाव असणारा हा वर्ग इतरांचे दास्यत्व पत्करतो. एकंदरीत जातीयवादाची पाळेमुळे ग्रामीण भागातच खोलवर घट्ट रुजलेली आहेत. याबरोबरच प्रादेशिकतावाद, भाषावाद, संप्रदायवाद, आर्थिक विषमता यांसारखी अनेक आव्हाने आजही आपल्या भारत भूमी पुढे आहेत.

सर्वधर्म समभाव या तत्त्वांचा आदर करणाऱ्या भारतात संविधानाच्या प्रती जाळण्याची कृष्ण-कृत्ये केली जातात. काही विद्वान व पूर्वजांनी काही विशिष्ट परंपरा व धार्मिक विधींना जन्म दिला कदाचित यामागे काही कारणे त्यावेळच्या परिस्थितीशी अनुकूल असतीलही, पण काळानुरूप बदलानुसार या विधीमध्ये नको ते बदल झाले व हे बदल लोक एखाद्या अज्ञानी माणसांसारखे आहेत. तसेच डोळे झाकून स्वीकार करू लागले.

एकविसाव्या शतकातील मॉडर्न भारतीय, एखाद्या माणसाने धार्मिक विधी पाळले नाहीत तर त्याला वाळीत टाकतो तर कधी त्याच्या जिवावर उठतो. जे काळानुसार बदलत नाहीत त्यांचा डायनासोर होतो आणि बदलले ते उत्क्रांतीवादी आयुष्य जगतात. ज्या प्रथांनी, जातीधर्माने माणसा-माणसांत भेद होतात. त्यांना त्याज्य समजणारा हाच खरा सुशिक्षित. खरं तर समाजात फूट पाडण्याचे काम करणारी ही स्वार्थ, खुर्चीचा हव्यास, धनसुख, आणि प्रसिद्धीचा मोह या तत्त्वांचा आधार घेणारी 'राजनैतिक श्रेणी' आज समाजात अस्तित्वात आहे. येथील लोक गरजेप्रमाणे आपली घरं सोडून कुणाच्याही घरी प्रवेश करतात पण याला आंतरजातीय प्रवेश म्हणायची कुणाची बिशाद? तर याला 'पक्षांतर' हा गोंडस शब्द वापरला जातो.

मागील काही वर्षात जातीच्या राजकारणात आणि धर्मांधतेने समाजाला एवढं पोखरलं आहे की, आम्ही सारे भारतीय बांधव आहोत हेच आपण विसरून गेलो आहोत. जातीचा अभिमान हा अस्मितेचा भाग मानला जात असला तरी यामुळे समाज विभाजनाचं महापाप घडतंय. जातीपातीच्या संकुचित भिंती उभारल्या जातात तेव्हा माणुसकी, मानवत धर्माचा श्वास गुदमरू लागतो.

मुळातच जातिव्यवस्था हा असा महाभयंकर शाप आहे की, हा समाजाच्या शोषणाला, सामाजिक विषमतेला कारणीभूत ठरतो आहे. या जातिव्यवस्थेला नाकारण्यासाठी श्री दयानंद सरस्वती, ब्राह्मो समाज, शीख पंथ तसेच एकोणिसाव्या शतकात फुले, आगरकर, कर्वे, आंबेडकर, साने गुरुजी या समाज सुधारकांनी व राजकीय नेत्यांनी आवाज उठवले. या साऱ्या समाजसुधारकांना देखील आपण आता जातीच्या कोंडवाड्यात बंद केलं आहे. कुसुमाग्रजांनी म्हणूनच तर सांगितलं:

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे

एका चौथऱ्यावर बसले, आणि टिपं गाळू लागले

ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा

शिवाजी राजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा

आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा

टिळक उद्गारले ,मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले,तुम्ही तरी भाग्यवान

एकेक जातजमात तुमच्या पाठीशी आहे

माझ्या पाठीशी मात्र

फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंतीच

समानतेचा मार्ग दाखवणाऱ्या नेत्यांची जयंती साजरी करणे हेच आपले इतिकर्तव्य समजतो. फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या जाती निर्मूलनाच्या कार्याचा अष्टोप्रहर जयजयकार करणाऱ्या नेत्यांचं सारं राजकारण जातीच्या आधारे सतत सुरू असतं. शाळांमध्ये सुद्धा ओबीसी, अल्पसंख्यांक भटक्या-विमुक्त याचबरोबर अनेक उपजाती पोटजाती यांबद्दल बाळकडू, शाळा सोडल्याच्या दाखल्यापासून ते प्रवेश घेतेवेळी सुद्धा दिले जाते. आणि मग हे भूत मानगुटीवर बसते.

भारतीय संविधानाची उद्देशिका वाचतानाच समजते की, घटनेने सर्वांना विकासाची समान संधी दिली आहे. अंतिमत: जातिव्यवस्था नाहीशा व्हाव्यात हाच उद्देश राज्यघटनेच्या शिल्पकारांचा होता, पण समाजात नवीनच प्रक्षोभ निर्माण होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना केली. लोकांना लोकांशी जोडण्याचे कार्य त्यांनी यातून केले, म्हणूनच त्यांना इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

'भेदाभेद भ्रम अमंगळ'

हा संत तुकाराम महाराजांचा समतेचा संदेश महाराजांनी शिरोधार्य मानला होता, म्हणूनच जोपर्यंत इतिहास असेल, तोवर शिवाजी महाराज असतील. कारण, त्यांचं राज्य घराण्याचं राज्य नसून 'रयतेचं राज्य' होतं. या दृष्टिकोनाची गरज आपणासारख्या 'जाति'वंत भारतीयांना खरंच आहे. जातीचा प्रोग्रॅम आपल्या मेंदूच्या कॉम्प्युटरमधून निघावयास हवा. आईच्या गर्भात लिंग निश्चिती ठरताना एक्स वाय गुणसूत्र जोडीचं माहीत नाही. पण जातीची गुणसूत्र तयार करण्याचं काम आहे ते आज थांबावयास हवं. हे जात, धर्मांतरण या संकल्पना कागदावरून पुसण्यापेक्षा मनातून पुसण्यासाठी काही ठोस प्रयत्न व्हावयास हवेत.

आजही आपण माणसाला आडनावावरून तो कुठल्या जातीचा आहे, मग उच्च की कनिष्ठ हे ठरवतो व पुढचा व्यवहार करतो आणि याला अपवाद असणाऱ्यांचं जिणं समाज मुश्किल करतो. आजही उच्च म्हटल्या जाणाऱ्या मुलांना कनिष्ठ मुलांशी मैत्री करावयाची म्हटली तरी एक ना अनेक प्रश्न भेडसावत असतात, ही मुले आपल्या बरोबर मिळूनमिसळून वागतील का? पण नंतर परिचय झाल्यानंतर समजतं की, जातीचं अवडंबर माजवलेल्या समाजात त्यांना कनिष्ठतेचा ठपका लावला असेल, पण त्यांच्या विचारातील श्रेष्ठता या कनिष्ठते पुढे फार महान असते.

मानव समाजातील जात एक सामाजिक प्रणाली आहे. याच्यामध्ये व्यवसाय, स्व गटातील व्यक्तींशी विवाह, संस्कृती, सामाजिक वर्ग व राष्ट्रीय शक्ती यामध्ये गुंतलेल्या आहेत. साने गुरुजींची 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी सुचवलेल्या मार्गावर चाललो तर ऐक्याचा विजय व जातीयत्वचा पराजय होण्यास वेळ लागणार नाही. आज या वर्गास प्रोत्साहन देताना आपणास पाठवून देता आलं पाहिजे की अगदी पूर्वीपासूनच इतर उच्च वर्गाप्रमाणे तुम्ही फक्त हाडा-मांसाचा गोळा नसून निर्मितीक्षम मन असणारे जादूगार आहात. वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून तुम्ही आपलं जीवन व्यतीत केलं आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी म्हटल्याप्रमाणे, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून या लोकांच्या तळहातावर तरलेली असते. खरे तर अस्पृश्यता, निरक्षरता, गावकुसबाहेरील पशुसम जीवन, वेठबिगारी, सार्वजनिक सुविधांवर प्रतिबंध, दलित स्त्रियांचे शोषण यांसारख्या अनेक मरणासम यातना ते आजही सहन करतच आहेत. या लोकांना हीच जाणीव करून दिली पाहिजे की ते गुलाम नसून अवघे विश्व त्यांच्या हातावर आहे. एकंदरीतच फक्त समाज बदलण्यासाठी समाजशास्त्र विषयाची पदवी घेणेच अपरिहार्य नाही, एकवेळ नाही घेतली तरी चालेल पण समाज जीवनोपयोगी कौशल्ये आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाची जोड आपल्या वागणुकीत दिसावी.

भारताची समाज रचनेचे चित्र पालटायचे असेल तर औद्योगिकरण, साक्षरता, विज्ञान तंत्रज्ञान प्रसार, रोजगार संधी निर्मिती, सामाजिकीकरणात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन तसेच मानवी हक्क जनजागृती यांसारख्या ठोस कार्यकृतींना हात घातला पाहिजे. याकरिता निरनिराळ्या भाषा शिकून, चालीरीती समजून घेऊन, वेशभूषा, राहणीमान, संस्कृती, रूढी- परंपरा यांना आपलेसे मानून त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यास शिकलं पाहिजे. त्यांच्या संस्कृतीचा आदर करण्यास शिकून इतरांचे चांगले गुण, विचार आपण अंगी बानले पाहिजेत. खुलेपणाने आपल्या ज्ञानाची देवाण-घेवाण केली पाहिजे.

ना गोरा ना काळा, रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा असे महत्त्व सर्वांना पटवून दिलं पाहिजे. एकंदरित पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या जाती-धर्म, वर्ण- पंथ यांचा माज दाखवण्यापेक्षा आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करून आपण येथील रत्न बनून येथीलच मातीत चमकूया, आणि आपल्या जगण्यातून मानवजातीला खरा धर्म कोणता हे मर्म शिकवूया.

-प्रा. डॉ. आर.जी. सोनकवडे (प्राध्यापक,भौतिकशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर, माजी वरिष्ठ वैज्ञानिक,आय.यु.ए.सी. यु.जी.सी. ,नवी दिल्ली)
भ्रमणध्वनी:८३२९३७५२४८

(लेखक उच्च शिक्षण क्षेत्रात २५वर्षांपासून कार्यरत आहेत.)

Updated : 24 April 2021 11:15 PM IST
Next Story
Share it
Top