सातारकर छञपतींचे, इतिहासकार महादेव डोंगरेनी पाहिलेले दप्तर कुठे आहे ?

इतिहासाचा डोलारा उभा राहतो तो कागदपञांच्या पायावर! अनेक इतिहास संशोधकांनी तर No Document No History! अशी विधानेही करून ठेवली आहेत. आज असेच कागदपञांचे अवलोकन करत असताना आम्हाला राजर्षी शाहू महाराजांचे विश्वासू सहकारी आणि तत्कालीन इतिहासकार रावबहाद्दूर महादेव डोंगरे (या डोंगरे यांनी भोसले कुळाचा वंशवृक्ष, सिद्धांत विजय अशा ग्रथांचे लेखन संपादन केले आहे.) यांचे एक पञ वाचण्यात आले.

इतिहास संशोधक डोंगरे यांना शाहू महाराजांनी वेदोक्त संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इतिहासाच्या मांडणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी तत्कालीन हिंदूस्थानातील सर्व दप्तरखान्याची पाहणी करण्याची आज्ञा केली होती.
रावबहाद्दूर डोंगरे ही फारच परिश्रम घेऊन शाहू महाराजांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडत होते. अशाच कागदपञांचा शोध घेण्यासाठी डोंगरे सातारा छञपतींच्या दप्तरखान्यातही गेले होते. त्यावेळी सातारा छञपतींच्या गादीवर आबासाहेब महाराज होते. त्यांनी अत्यंत उदार मनाने त्यांच्या दप्तरखान्यातील कागदपत्रे पाहण्याची परवानगी डोंगरेंना दिली होती. त्यावेळी डोंगरे यांना या दप्तरात सर्व प्रकारचे कागदपत्रे असणारे २००० रूमाल एका खोलीत ठेवलेले आढळून आले होते.
या कागदपञांच्या खोलीत एक प्रकारचा वास येत होता. या खोलीतील ‘गॅस’ एखाद्या केमीकल तज्ञाला दाखवून तो तपासून घेतला पाहिजे असे रावबहाद्दूर डोंगरे यांनी गमतीने लिहिले आहे.

असो ! रावबहाद्दूर डोंगरे यांनी १९०२ च्या जून महिन्यांत हा सातारकर छञपतींचा दप्तरखाना स्वतः जाऊन तपासला होता. त्यावेळी २००० रूमाल ( जुन्याकाळी कागदपत्रे कापडी रूमालात बांधून ठेवली जात होती.) पाहिले होते. आमच्या माहितीप्रमाणे एका रूमालात साधारणतः १००० च्या आसपास तरी कागदपत्रे असतात. डोंगरे यांनी यातील काही त्यांना आवश्यक वाटलेली कागदपत्रे एका लाकडी पेटीत काढून ठेवली होती.
(माझ्या माहिती नूसार आज सातारा येथे असे दप्तर उपलब्ध नाही)

पुढे रावबहाद्दुर डोंगरे यांनी सातारा येथील चिटणीस घराण्यातील कागदपञांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना बोरगावकर चिटणीसांकडे काही कागदपञे मिळाली. पण चिटणीस घराण्यातील काही कागद गोविंदराव चिटणीसांनी उंटावर लादून ती कागदपत्रे ते बडोद्याला घेऊन गेले. अशी माहिती मिळाली. ही घटना १८५८ च्या दरम्यान सातारचे राज्य खालसा झाले. त्यावेळी घडली होती. हेही त्यांनी लिहून ठेवले आहे. ही कागदपत्रे प्रभुरत्न माला आणि शिवदिग्विजय चे संपादक मुजूमदार यांच्या ताब्यात असल्याचे ही डोंगरे यांनी लिहून ठेवले आहे.

सन १९०२ मध्ये सातारकर छञपतींच्या दप्तरखान्यात असलेली – डोंगरेंनी पाहिलेली कागदपत्रे मराठ्यांच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत. या कागदपञांचे मोल इतिहासाच्या अभ्यासकास सांगावे असे नाही. ही छत्रपती घराण्यातील कागदपत्रे आज कुठे आहेत ? (माझ्या माहिती नुसार आज असे दप्तर सातारा येथे उपलब्ध नाही.)

सातारा छञपतींची हजारो कागदपञे पूण्यातील पूरालेखागारात उपलब्ध आहेत. हे दप्तर शाहू दप्तर म्हणून ओळखले जाते. पण या दप्तरखान्यातील कागदपञे 1902 च्या आगोदरच पुण्यात पोहचली होती. तसेच गोविंदराव चिटणीसांनी उंटावर लादून बडोद्यास नेलेल्या कागदांचाही माग घेतला पाहिजे. अशी कागदपञे इतिहासाचा प्राण असतात.
एक अस्सल चिटोरे ही इतिहास बदलू शकते मग ही तर खास छञपती घराण्यातील! यांचा शोध लागलातर ? ? ?

इंद्रजीत सावंत यांच्या फेसबूक वरुन साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here