Home > मॅक्स ब्लॉग्ज > BJP and Hinduism : धर्माच्या नावाखाली भाजपने हिंदूची राजकीय दिशाभूल केली का ?

BJP and Hinduism : धर्माच्या नावाखाली भाजपने हिंदूची राजकीय दिशाभूल केली का ?

हिंदू धर्मांतर्गत निर्माण झालेली दुही शेवटी भाजपला सत्तेवरून खेचू शकते... धर्माच्या नावाखाली भाजपने हिंदूची राजकीय दिशाभूल केली का ? यासंदर्भात डॉ. सुभाष देसाई यांचा लेख

BJP and Hinduism : धर्माच्या नावाखाली भाजपने हिंदूची राजकीय दिशाभूल केली का ?
X

Shankaracharya vs Yogi Adityanath हिंदू धर्माचे गुरु शंकराचार्य आणि भगव्या वस्त्रातील मुख्यमंत्री योगी यांच्यातील वाद हा हिंदू धर्मातील मतदारांच्या मनात एक दुही निर्माण करणारा आहे. येत्या निवडणुकीमध्ये शंकराचार्यांनी BJP भाजपला मत देऊ नका कारण तो सत्ता सांभाळण्यासाठी धर्माचा दुरूपयोग करतो असे म्हटले तर भाजप भारतामध्ये कोसळायला वेळ लागणार नाही त्यामुळे हिंदू धर्मांतर्गतच निर्माण झालेली ही दुही शेवटी भाजपला सत्तेवरून खेचू शकते एवढी ताकद हिंदू धर्म मानणाऱ्या भारतीयांच्यात आहे याची जाण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मोहन भागवत यांना निश्चितच असावी त्यामुळे लवकरच सगळ्यांना कुंभमेळ्याच्या निमित्ताने चुचकारण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून होईल या शंका नाही.

भारतीय इतिहासात धर्म आणि सत्ता यांचे नाते नेहमीच संवेदनशील राहिले आहे. धर्माने सत्तेला नैतिक दिशा द्यावी, ही अपेक्षा होती; परंतु सत्ता धर्मावर स्वार झाली की समाजाचा ऱ्हास झाला, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. आज सर्व शंकराचार्य एकत्र येऊन जे बोलत आहेत, ते कोणतेही नवीन विधान नाही तो भारतीय परंपरेतून आलेला, काळाच्या कसोटीवर उतरलेला इशारा आहे. आदि शंकराचार्यांनी जेव्हा चार पीठांची स्थापना केली, तेव्हा त्यांचा उद्देश सत्ता मिळवणे नव्हता, तर वेदांत परंपरेचे रक्षण करणे हा होता. संन्यास हा राजकीय प्रभावासाठी नव्हे, तर वैराग्य, विवेक आणि आत्मज्ञानासाठी होता. शंकराचार्यांनी कधीही राजसत्तेशी संधान बांधून धर्माचा प्रसार केला नाही. उलट, राजे धर्माचे रक्षणकर्ते असावेत धर्माचे चालक नव्हेत, हा स्पष्ट संकेत त्यांनी दिला.

वेद, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे या ग्रंथांनी कधीही सत्ताकेंद्रित धर्म मांडलेला नाही. ऋत सत्याचा मार्ग हा त्यांचा गाभा आहे. राजा हा धर्माच्या अधीन असतो, धर्म राजाच्या अधीन नसतो, ही वैदिक भूमिका होती. म्हणूनच प्राचीन भारतात राजाला ऋषींचा सल्ला घ्यावा लागे; ऋषींना राजाची मान्यता घ्यावी लागत नव्हती.

मध्ययुगीन काळात जेव्हा धर्म सत्तेच्या अधीन गेला, तेव्हा मंदिरांवर राजकीय नियंत्रण आले, मठ संपत्तीचे केंद्र बनले आणि संन्यास वैराग्याऐवजी प्रतिष्ठेचे साधन ठरू लागला. याच काळात धर्माचे अधःपतन सुरू झाले, हे नाकारता येत नाही. इतिहास स्पष्ट सांगतो धर्म सत्तेच्या जवळ गेला की त्याची धार बोथट होते. आज शंकराचार्य जो मुद्दा मांडत आहेत, तो याच ऐतिहासिक अनुभवातून आलेला आहे. भगवी वस्त्रे परिधान करून राजकारण करणे, किंवा राजकीय सत्तेसाठी धार्मिक भावनांचा वापर करणे हे हिंदू धर्मपरंपरेला धरून नाही. संन्यास आणि सत्ता यापैकी एकाची निवड करावीच लागते; दोन्ही एकत्र आणणे म्हणजे दोन्हींचा अपमान होय, असा त्यांचा ठाम आग्रह आहे.

या पार्श्वभूमीवर आरएसएस आणि सत्ताधाऱ्यांचे मौन अधिक बोलके ठरते. शंकराचार्य थेट प्रश्न विचारत असताना संघप्रमुख मोहन भागवत कोणतीही भूमिका घेत नाहीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन पाळतात. हे मौन केवळ राजकीय नाही; ते वैचारिक आहे. शंकराचार्यांचा आरोप गंभीर आहे हिंदू धर्माच्या नावाखाली राजकीय दिशाभूल केली जात आहे.

मंदिरांचे व्यवस्थापन, मठांची स्वायत्तता, धार्मिक परंपरांवर वाढता सरकारी हस्तक्षेप हे सर्व हिंदू धर्माच्या संवर्धनासाठी नव्हे, तर नियंत्रणासाठी चालले आहे, अशी भीती या बैठकीतून व्यक्त होते. धर्म जर प्रशासकीय फाईलमध्ये अडकला, तर तो आत्मिक उंची गमावतो. भारतीय संविधानानेही धर्म आणि राज्य यांच्यात स्पष्ट सीमारेषा आखली आहे. ही भूमिका कोणत्याही धर्मविरोधी नाही; उलट ती धर्माच्या स्वातंत्र्यासाठी आहे. शंकराचार्यांचा आग्रह संविधानविरोधी नसून, परंपरेशी सुसंगत आहे. धर्म सत्तेपासून स्वतंत्र राहिला, तरच तो जिवंत राहतो.

आज हिंदू धर्मासमोरचा खरा धोका बाहेरून नाही, तर आतून आहे. धर्माला ओळख, मतपेढी आणि सत्तेचे साधन बनवण्याचा. म्हणूनच शंकराचार्यांचा इशारा गांभीर्याने घ्यावा लागेल. इतिहास सांगतो : धर्माने सत्तेला प्रश्न विचारले, तेव्हा समाज उभा राहिला; धर्माने सत्तेची सेवा केली, तेव्हा तो कोसळला.



(या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक आहेत. त्याच्याशी मॅक्स महाराष्ट्र सहमतच असेल असे नाही.)

Updated : 27 Jan 2026 4:26 PM IST
author-thhumb

डॉ. सुभाष के देसाई

वयाच्या 19व्या वर्षापासून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, पर्यटक, गिर्यारोहक, संशोधक, धर्म आणि विज्ञान विषयातील तज्ञ अशा विविध भूमिकेतून कार्यरत असणारे डॉक्टर सुभाष के देसाई हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. गुलमोहर आर्ट गॅलरी येथे संस्थापक आहेत दैनिक सिंहवाणीचे संस्थापक संपादक, पीटीआय, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, सकाळ, पुढारी अशा विविध वृत्तपत्रात लिखाण केले अकॅडमी ऑफ रिलीज युनिटी या विविध धर्मांना एकत्र आणणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात त्यांनी 25 वर्षे योगदान केलेले आहे. जवळजवळ 30 देशांमध्ये, साऱ्या हिमालयात त्यांनी भ्रमंती केली आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले जगातील आणि देशातील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला याशिवाय स्वामी विवेकानंद या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर आजन्म प्रभाव राहिला ते अविवाहित असून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे त्यांनी जीवनाचे ध्येय ठेवले.


Next Story
Share it
Top