Home > मॅक्स ब्लॉग्ज > बामणाचं २२ वर्ष रान करणारा मुसलमानाचा रप्या...

बामणाचं २२ वर्ष रान करणारा मुसलमानाचा रप्या...

गावाकडची माणसं साधी भोळी, मात्र, जिवाला जीव देणारी... विश्वासू! शहरात म्हणतात विश्वास पानिपतात मेला. मात्र, गावाखेड्यातला माणसांमध्ये अजुनही तो जीवंत आहे. वाचा विनायक कदम यांनी सांगितलेला गावातील मुसलनमानाचा रप्या

बामणाचं २२ वर्ष रान करणारा मुसलमानाचा रप्या...
X

देशात राजकारण्यांनी मतांसाठी जाती जातींच्यात कळवंडी लाऊन टकुरी फोडायचं काम केलंय. पण गावाकडं आजून जातीवरन नाव घिऊन एकमेकासनी प्रेमानं हाळ्या माणसं आजून देत्यात. पण कुणाला तेज वंगाळ वाटत न्हाय. कोण कुटल्या बी जातीत आसुदी गडी येकमेकांच्या जीवाला जीव देणारं. बिनधास्त बोलणं,चालणं, वागणं म्हणून जातीच्या भिंती तेंच्या मदी कवा आल्याचं न्हायत.लोढ्यात मुसलमानाचा रप्या मजी लय फाटकाळ तोंडाचा गडी. लिजाम आप्पाची तीन पोर रप्या,सलम्या, झांगऱ्या. ईसभर माणसं येकात नांदनार घर. दुधाची डिरी, म्हसर, आचारी, शिती, बांगड्या, डायवर, घरात परतेकाच्या आंगात साऱ्या कला. मर मर राबणार, दणकून खाणार, गावातन पंढरीच्या वारीला जाणाऱ्या माणसांसंग सलम्या धा दिवस आचारी हुन वारकऱ्यांची सेवा करून यिठ्ठलं भक्ती कर्तुय. गावात कुणाच्याबी सण, कार्यक्रमात आचारी ह्योच. तेंच्या सणाला सारा गाव जेवाय तेंच्या घरात. जातीच्या नजरेतन गावांन बी त्यासनी आणि तेंनी बी गावाला कवा बगीटलं न्हाय. सार प्रामाणिक कुटुंब.
रप्या बोलाय लागला तर त्यो बुलतुय का भांडतुय कळत न्हाय. त्येज्या दोस्तांच्यासंग त्यो बोलाय लागला तर हाराभर शिव्या देणार. घरात आला म्हणलं की घरात पोर बायका बावारत्यात आसला दरारा. पोरासनी पोर झाली तरी चुकला की हानाय बी हायगय करत न्हाय. गावातल्या बामनाच शिरीतल रान रप्या १९९९ पासन निम्या निम्म्या वाट्यान कर्तुय.

बामनाची शिरी मजी चार गावात फेमस. शे दीडशे वर्षांची आंब्याची झाड. दिवसा ऊन भुईला याच न्हाय. झाडांच्या सावलीला शेरड, म्हसर, निम्मा गाव झोपाय याचा. आंब लागल्यावर तर शिरीचा काय ताल सांगावा. झाडं म्हवरली की नुसता घमघमाट. येग्येगळ्या चविची झाड. वाऱ्यानं पाड पडायचं. माणसं खाऊन डिरकायची. सकाळच तर शिरीत दोन चार ठिक्की पाड घावायचं. आख्खी शिरी येपाऱ्याला ठरवून दयायची. आंब उतरण म्हयनाबर चालायची.

निर्मला श्रीकृष्ण काळे या बामनाच्या काकींची ही ८ एकर शिरी. १९९९ पासण रप्या गेली २२ वर्ष इसवासान तेंची शिती कर्तुय. काय हुईल ती निम्मं निम्मं घरच्यागत. गेल्या २२ वर्षात तेंच्यात कधी वाद झाला नाय, जात म्हणून कधी कुणीच कुणाव येगळ्या नजरेनं बगिटलं न्हाय. ९९ च्या अगोदर वरसाला माणूस बदलाय लागायचा पण रप्याच्या ताब्यात रान आलंय तस तेज्याकडच हाय.

वड्याच्या कडलाच ही शिरी हाय. शिरीत ४० वर्षाच जुन्या काळातल घर हाय. आता तीत राह्यला कोण न्हाय पण शेतात रात्री काय काम आसली की मुक्काम आस्तुय. सात आठ माणसं निवांत मुक्काम करत्याल ईवडी सोय. पार्टीसाठी येगदा शिरीत जायाचा योग आला. घर बगीटलं तर ती घर न्हवतं तर जुन्या काळातल संग्रहालय हुतं. जर्मलच पावडर ठेवायच डब, दिवा, पळ्या, पत्र्याचं डब, घोळणा, चाड, बास्केट, जुन्यातली सुटकेस, लाकडाचा बेड, लाकडी कपाट, लाकडी पिटी, टेप, रिडीव, आसल बरंच काय काय जुन्यातलं ढीगभर सामान.

वड्याकडच्या त्या घरात प्रचंड शांतता आणि समाधान हुत. इसवास ह्यो शब्द आता दुर्मिळ झालाय. माणसं बोलताना म्हणत्यात इसवास पानिपतात गेला.पण शिरीत रप्यासारख्या माणसांनी त्यो आजून जिवंत ठेवलाय...

Updated : 24 Nov 2021 5:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top