क्रिकेटपटू जेमिमा का होतेय ट्रोल ?
X
जेमिमाचा Depressionचा प्रवास सरळसोट नाही. एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये जेव्हा डिप्रेशनमध्ये जाते तेव्हा अनेक अशा घटना घडून जातात की ज्यातून मनावर ओरखडे पडत जातात आणि त्याचा परिपाक म्हणून डिप्रेशन उगवते !
जेमिमाच्या आयुष्यात यश येण्यापूर्वी अनेक हादशांना तोंड द्यावे लागलेलं आहे. २०२३ मध्ये मुंबई जिमखान्याची सदस्य म्हणून तिला संधी मिळाली. पहिली महिला क्रिकेटर जिला हे सदस्यत्व मिळाले म्हणून ही मानाची संधी होती. पण इथे जे भारतात सध्या चालू आहे तेच घडले. तिचा धर्म काढला गेला. आणि त्यावरून तिने आणि तिच्या वडिलांनी धर्मांतराचे प्रयत्न म्हणून धार्मिक कार्यक्रम आयोजित केला असा ठपका ठेवून तिचे सदस्यत्व रद्द केले गेले.
हिंदुत्ववादी राजकारणाचा हा गलिच्छ परिपाक गेली अनेक वर्षे आपण पाहतो आहोत. जेमिमा ख्रिश्चन आहे म्हणून हिंदुत्ववाद्यांची कारस्थानं सुरू झाली. आयुष्यात जेव्हा जाणून बुजून एखाद्याला टारगेट केले जाते तेव्हा त्याचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम तमाम केले जाते. मन फुटायला इथून सुरुवात होते. मग ख्रिश्चन धर्म डोक्यात गेलेल्यांनी दुसरा व्हिडिओ काढला. जिथे ती पास्टर बरोबर धार्मिक प्रार्थना करताना दिसते.
वास्तवात क्रिकेटचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. बहुसंख्य हिंदू असलेल्या क्रिकेटरांचा अनेक बाबा-बुवांबरोबरचा फोटो किंवा व्हिडिओ दिसून येतो. पण तिथे मात्र तो कट्टर हिंदू आहे असा गौरव केला जातो. मग ते खेळाचे क्षेत्र असो गाण्याचे क्षेत्र असो, कलाकार असो, नाहीतर सामाजिक कार्यकर्ता! हिटलरी वृत्तीच्या हिंदुत्ववाद्यांची हिंदू सोडून सर्व धर्मावर असलेला राग-द्वेष जेव्हा बाहेर पडतो तेव्हा समोर व्यक्ती कोण आहे याचे भान ते ठेवत नाहीत. त्याचा दुसरा फटका जेमिमाच्या मानसिकतेला बसला. इथे संविधान, लोकशाही, वगैरे गोष्टी तुच्छ बनल्या गेल्यात.
भारतात सर्वधर्म एकोप्याने राहतील याची गॅरंटी नसलेले धर्मराष्ट्र उभे राहत असल्याने हिंदू सोडून इतर धर्मियांचा वापर राजकारणासाठी करायचा हा फंडा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
...जेमिमा अशा रितीने डिप्रेशनची तयारी करत होती. यावर्षीच्या वनडे मध्ये तिने आई-वडील आणि तिचा देव यांची मदत घेत मानसिक आधार निर्माण करून सफाईदार कामगिरी केली. तिच्या हिंदू मैत्रिणी तिच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. अरुंधती असो नाहीतर स्मृती मानधना असो हे उभे राहणे क्रिकेटसाठी खूप गेम चेंज करणारे ठरले असले तरी हिंदुत्ववाद्यांसाठी ते राष्ट्रद्रोही कृत्य असते.
जेमिमा जेव्हा काळजी विकृती मध्ये प्रवेश करते तेव्हाच डिप्रेशनचा दरवाजा उघडला गेलेला असतो. सांस्कृतिक दुस्वास आणि छळ हे डिप्रेशनचे एक महत्त्वाचे कारण आहे. तसं पाहिलं तर आज कार्पोरेट किंवा व्यावसायिक जगामध्ये पावलोपावली विविध अविष्कार असलेली छळाची उदाहरणे वाढत चाललेली आहेत.
कौटुंबिक जगात एकमेकांच्या मतभेदांमुळे मानसिक छळ केंद्रस्थानी आलेला आहे आणि सामाजिक स्तरावर राजकारणामुळे सगळीकडे सुडाचा आणि अत्याचाराचा चिखल झालेला आहे. सामाजिक मानसिकता ही धर्मावर आधारलेली जेव्हा बनते तेव्हा दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या मानसिकतेचे खच्चीकरण करणे हे त्यांचे धर्मकृत्य बनते. अशावेळी ती व्यक्ती तिच्या क्षेत्रामध्ये तरबेज आणि गुणवान असली तर ती बळी पडते आणि तेथे सामाजिक एकोप्याचा नाश होतो. शिवाय राष्ट्र हित पायदळी तुडवले जाते. जी व्यक्ती बळी पडते तिला तणावग्रस्त अवस्थेत दीर्घकाळ स्वतःचा त्रास भोगावा लागतो. यातून मनावर जे आघात होतात त्याने आत्मविश्वासाचे खच्चीकरण सुरू होते.
आत्मविश्वासाचे खच्चीकरण याचा अर्थ असा आहे की, तुमचा स्वतःविषयीचा आदर आणि तुमचा तुमच्यावर असलेला विश्वास याचे तीन तेरा वाजतात. त्यातून आपण कमी प्रतीचे आहोत अशी पक्की समजूत तयार करून घेतो. आपल्या देशात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि अविष्कार यांना जेव्हा धर्माच्या चष्म्यातून पाहिले जाते तेव्हा तेथे सामाजिक दुफळी तयार होतात. ज्या समाजामध्ये कलेक्टिव्हिजम किंवा विशिष्ट समाज एक गठ्ठा एकत्र येऊन त्याचा पुरस्कार करु लागतात तेव्हा तेथे इतर कमी संख्येचे गट हे कमी लेखले जातात.
एवढेच नव्हे तर कायदा, राजकारण आणि अर्थकारण या तीनही क्षेत्रात बहुसंख्यांकांचे प्राबल्य विकृत मानसिकतेचे बनल्यास अल्पसंख्यांकांना अत्याचाराला तोंड द्यावे लागते. भारतात सध्या हेच घडते आहे. जेमिमा हे केवळ एक उदाहरण आहे. असे जेव्हा घडू लागते तेव्हा अल्पसंख्यांक गटातील गुणवान व्यक्तींचा स्व दुखावत राहतो आणि त्याचे तुकडे तुकडे व्हायला सुरुवात होते. इथेच सामाजिक काळजी विकृती किंवा सोशल ॲंक्झायटी सुरू होते.
बहुसंख्यांक सामाजाच्या मानसिक अत्याचारामुळे अतिशय दुःख आणि वेदना मनात निर्माण होतात. मनात गिल्ट तयार होतो आणि यातून डिप्रेशन व काळजी विकृती तयार होते. याला 'ओव्हरआर्चींग सायकॉलॉजिकल पेन' म्हणतात. जगभरात अमेरिकन आफ्रिकन, अमेरिकन इंडियन, वगैरे अनेक त्या त्या देशातील अल्पसंख्याक गटांना याचा अनुभव येतो. यावर उपाय हा एकमेकांच्या समजूती व विचार यांच्याशी जुळवून घेणे व त्याचे संवर्धन करणे हा असतो. ज्याला अकल्ट्रेशन म्हणतात. आणि हा त्यावरचा उत्तम उपाय आहे.
जेमिमाच्या बाबतीत हा उपाय झाला म्हणून तिने सेंचुरी ठोकली. तिने आपल्या मैत्रिणींचा, पालकांचा, समाजातील इतर सहकाऱ्यांचा एकत्रितपणे आधार घेतला. जरी तिने हा आधार घेतलेला असला तरी हा आधार सातत्याने मिळेलच याची खात्री नसते. म्हणूनच यासाठी उत्तम उपाय म्हणून कॉग्निटीव्ह बिहेव्हिएरल थेरपी Cognitive Behavioral घेणे आवश्यक असते. मुख्यतः ताण आणि समस्या-संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सातत्याने येत असतात. त्यांना तोंड देण्यासाठी घटनांना जबाबदार धरणे योग्य नसते. कारण एकतर घटना घडून गेलेल्या असतात आणि त्या घटनांमधील व्यक्ती या वर्तमान काळात आपल्यासमोर नसतात.
वर्तमान काळात आपण आपली समस्या सोडवायची असते. घटनेऐवजी आपण ती घटना डोक्यात ठेवलेली आहे हा विचार आपल्याला डिप्रेशन कडे नेत असतो. हा विचार बदलण्याची गरज असते. त्यासाठी अनेक कौशल्ये व मानसिक तयारी कराव्या लागतात. हाच गाभ्याचा उपचार असतो. ज्यांना ॲंक्झायटी किंवा काळजी विकृती व निराशा विकृती किंवा डिप्रेशन यांचा त्रास होत असतो त्यांनी रॅशनल विचार पद्धती स्वीकारणे हा सर्वोत्तम उपाय आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
-डॉ. प्रदीप पाटील
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व काऊन्सेलर






