Home > मॅक्स ब्लॉग्ज > संघाच्या रेशीम बागेत राष्ट्रध्वज लावण्यास कायद्याने मनाई होती का?

संघाच्या रेशीम बागेत राष्ट्रध्वज लावण्यास कायद्याने मनाई होती का?

हर घर तिरंगा' अभियान पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्यानंतर अनेकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकत नव्हता याची आठवण करुन दिली. त्यावर सोशल मीडियामध्ये या टीकेला उत्तर देणारी आणि संघाची बाजू मांडणारी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमधील दावे खोटे असल्याचा दावा करणारा प्रा.शेखर सोनाळकर यांचा लेख नक्की वाचा...

संघाच्या रेशीम बागेत राष्ट्रध्वज लावण्यास कायद्याने मनाई होती का?
X

सध्या सोशल मीडियामध्ये एक पोस्ट संघ परिवाराच्या मिडिया सेलकडून फिरवली जात आहे. संघावर एक आरोप आहे की संघाला सुरवातीपासून राष्ट्राध्वजाचे वावडे होते. २००२ पूर्वी संघ मुख्यालय रेशीम बाग येथे राष्ट्रध्वज फडकाविला जात नव्हता असाही आरोप आहे.

याचा खुलासा करणाऱ्या ह्या पोस्टमध्ये सांगितले आहे की २००२ मध्ये पंतप्रधान वाजपेई यांनी ध्वज संहिते (Flag Code on India) मध्ये बदल केला. त्यापूर्वी सरकार सोडून इतरांना राष्ट्रध्वज फडकावीता येत नव्हता. ह्या कारणाने संघमुख्यालयावर तिरंगा लावला जात नव्हता.

माझ्या आठवणी ह्या माहितीच्या विपरीत होत्या. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक. आमच्या घरी १५ ऑगस्ट-२६ जानेवारी सण असत. सकाळी लवकर उठून अंघोळ करून घड्याकडे नजर लावून बसायचे बरोबर सूर्योदयाच्या वेळी घरावर एक लांब काठीवर तिरंगा लावायचा. दुपारी घरी गोड स्वयंपाक करून गांधीजींच्या शिकवणीनुसार एक मुस्लीम आणि एक भंगी जमातीची व्यक्ती घरी जेवायला असे. घरी दोन चांदीची ताटे होती. ती ह्या पाहुण्यांना जेवायला दिली जात आम्ही घरातील मंडळी कल्हई केलेल्या ताटात जेवत असु. त्याकाळी जेवण जमिनीवर बसून आणि बसायला पाटावर असे. पाहुण्यांच्या तर ताटाखाली देखील पाट असे. त्यांच्या पाटाभोवती आई रांगोळी काढत असे. सायंकाळी घड्याकडे नजर लावून नेमक्या सूर्यास्ताच्या वेळी तिरंगा उतरवायचा. वडील आणि भाऊ समोरासमोर उभे राहायचे आणि तिरंगा झेंडा विशिष्ट पध्दतीने व्यवस्थित घडी घालून एका कापडी पिशवीत कपाटात जपून ठेवणे अशी काळजी घेतली जात असे. तिरंगा झेंडा खादीचा असे. १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला कोणत्याही परिस्थितीत शाळेतील झेंडावंदनाची वेळ चुकवायची नाही असा संस्कार होता. आजवर कधीही १५ ऑगस्ट-२६ जानेवारीचे झेन्दावंदाला मी उशिरा गेलो नाही किंवा चुकविले नाही. ह्यामुळे संघ परिवाराचा दावा खटकत होता.

एक स्मरणात होते की उद्योगपती व काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांनी न्यायालयात कोणत्याही दिवशी ( केवळ १५ ऑगस्ट-२६ जानेवारी नाही) राष्ट्रध्वज उभारणे हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे असा खटला दाखल केला होता, आणि ते जिंकले होते ह्या स्मरणामुळे देखील संघ परिवाराचा दावा खटकत होता.

थोडी माहिती मिळवली असता पुरावा मिळाल की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे २००२ ला नवीन ध्वज संहिता (Flag Code on India, 2002) पूर्वीच्या ध्वज संहितेनुसार १५ ऑगस्ट-२६ जानेवारी-गांधी जयंती आणि राष्ट्रीय महत्वाच्या दिवशी कोणीही घरावर-कार्यालयावर तिरंगा लावू शकत होता. ( पान १२) भारतीय गृह मंत्रालयाच्या १५ जून १९७१ च्या पत्रानुसार, याचाच अर्थ असा की कायद्याच्या बंधनामुळे राष्ट्रध्वज फडकावीत येत नव्हता, असा संघ परिवाराचा दावा खोटा आहे. अधिक माहिती घेतली असता दिसते की,

जानेवारी २००१मध्ये सकाळी ११ वाजता राष्ट्रप्रेमी युवादलाचे बाबा मेंढे २०-२५ कार्यकर्त्यांना घेवून टाटा सुमो आणि मारोती व्हॅनमधून रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराच्या आवारात दाखल झाले होते. प्रवेशद्वारातून स्मृती मंदिराच्या आत प्रवेश घेतल्यानंतर लागलीच या कार्यकर्त्यांनी 'पहिले तिरंगा, बाद मे रंगबिरंगा', 'पहले राष्ट्रध्वज फिर सभी ध्वज' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आणि राष्ट्रध्वज फडकावला. राष्ट्रध्वज फडकावत असताना त्यांना स्वयंसेवकांनी रोखण्याचा प्रयत्न केला असताना दोन्ही गटांत हाणामारी होऊन दंगलसदृश्य वातावरण निर्माण झाले. कथले यांच्या तक्रारीवरून बाबा मेंढे, रमेश कळंबे आणि दिलीप छत्तानी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. उर्वरित कार्यकर्ते फरारी झाले होते. पोलीस हवालदार वामनराव जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या युवादलाच्या तीन कार्यकर्त्यांची प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती आर.आर. लोहिया यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी सुटका केली आहे. तब्बल १२ वर्षांनी संशयाचा लाभ देवून त्यांची निर्दोष सुटका केली. राष्ट्रप्रेमी युवादलाचे संस्थापक अध्यक्ष बाबा मेंढे, रमेश कळंबे आणि दिलीप छत्तानी, अशी सुटका झालेल्यांनी नावे आहेत.

आणखी एक अनुभव असा की आणीबाणीतील तुरुंगवासानंतर आम्ही जीवाच्या कराराने इंदिराजी-काँग्रेस विरोधात प्रचार केला. जनता दल निवडून आले. आमच्या सोबतचे संघाचे तरुण सांगू लागले आता राष्ट्रध्वज भगवा होणार, काँग्रेस भवनवरील झेंडा उतरवून भगवा लावला जाणार.

संघप्रमुख माधव गोळवलकर हे तिरंग्याला राष्ट्रध्वज मानण्याच्या विरोधात होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी तिरंग्याला मानण्यास नकार दिला होता.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा संघाने स्वातंत्र्यदिन काळा दिवस ठरविला होता. नागपूरला २४ जुलैला १९४५ ला गुरुपौर्णिमेच्या सभेत सरसंघचालक गोळवलकरांनी स्वयंसेवकांना सांगितले की "भगवा ध्वज आमच्या महान संस्कृतीचे पूर्ण प्रतिनिधित्व करतो. हा ध्वज म्हणजे मूर्तिमंत परमेश्वर आहे. आमचा ठाम विश्वास आहे की एक दिवस शेवटी सगळे राष्ट्र भगव्याला प्रणाम करेल."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र ऑर्गनायझरने १४ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र होणार असतांना, सर्व भारतीय पारतंत्र्यातून मुक्तीच्या आनंदात असतांना आपला जळफळाट व्यक्त करतांना तिरंग्यामागील कोडे' ह्या शीर्षकाखाली लिहिले होते, "दैवयोगाने सत्ताप्राप्त झालेली मंडळी आपल्या हाती तिरंगा देतील. परंतु तो ध्वज हिंदू कधीही आपला मानणार नाहीत, त्याचा आदर करणार नाहीत. तिरंग्यातील तीन हा आकडा सैतानी आहे. ध्वजातील तीन रंग अतिशय वाईट मानसिक परिणाम निर्माण करतील. हे तीन रंग देशासाठी घातक ठरतील."

बंच ऑफ थॉटस ह्या त्याच्या पुस्तकात (जे संघपरिवारासाठी गीता आहे) ते लिहितात, 'हमारे नेताओं ने हमारे लिये एक नया ध्वज चुनने का फैसला किया है। उन्होंने ऐसा क्यों किया? यह हमारी समृद्ध विरासत को अस्वीकृत करने और बिना सोचे-समझे दूसरों की नकल करने का एक स्पष्ट उदाहरण है। कौन इसे सही और राष्ट्रवादी दृष्टिकोण मानेगा? यह सिर्फ एक जल्दबाजी में लिया गया राजनीतिक समाधान है। हमारा देश समृद्ध विरासत से भरपूर प्राचीन और महान देश है। क्या तब भी हमारे पास अपना एक झंडा तक नहीं है? बेशक हमारे पास है। तो फिर यह दिवालियापन क्यों?'

महात्मा गांधीजींना मारण्याच्या कटात सहभागी असल्यावरून संघावर सरदार पटेलांनी बंदी घातली होती. संघबंदी उठवण्यासाठी संघप्रमुख माधव गोळवलकर यांनी भारत सरकारला माफीनामा लिहूल दिला, ह्यापुढे वर्तन सुधारण्याचे वचन दिले. गृहमंत्री सरदार पटेलांचे समाधान झाले नाही. नेहरूंना लिहिलेल्या पत्रात सरदार पटेल लिहितात 'हमें देश के विभिन्न हिस्सों से ऐसी रिपोर्ट प्राप्त हो रही हैं जो आरएसएस की अवांछनीय गतिविधियों के बारे में बता रही हैं। इसलिये मेरा सुझाव है कि हमें मौजूदा परिस्थितियों में आरएसएस से संबंधित कोई भी निर्णय लेते समय अत्याधिक सावधान रहने की आवश्यकता है।'

सरदार पटेलांच्या संघाला टाकलेल्या अटीनुसार तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार, राज्यघटनेचा स्वीकार आणि संघाची लिखित घटना अश्या अटी होत्या, त्या माधव गोळवलकर यांनी स्वीकारल्या आणि मग पटेलांनी संघावरील बंदी उठवली होती. १९ नोव्हेंबर १९४८ च्या गृहमंत्रालयाच्या प्रेसनोट नुसार गोळवलकर यांनी पंतप्रधान (पंडित नेहरू) आणि गृहमंत्री (सरदार पटेल) यांनी पत्र लिहून आरएसएसने धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना आणि राष्ट्रध्वज स्वीकारल्याची कबुली दिली आहे. ह्यामुळे संघावरील प्रतिबंध हटविण्याची शिफारस गृहमंत्रालयाने केली आहे.

संघ परिवाराकडे एकही त्यागी-स्वातंत्र्यसैनिक नाही, ह्यामुळे त्यांना सावरकरांना मानण्याशिवाय पर्याय नाही. २२ सप्टेंबर १९४७ रोजी म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांसाठी जारी केलेल्या निवेदनात सावरकर म्हणतात, "हिंदूडम उद्घोषित करणारा कुंडलिनी-कृपाणांकित ओम आणि स्वस्तिका सहितच्या भगव्या ध्वजाखेरीज अन्य कोणता राष्ट्रध्वज असू शकतो? हिंदू महासभेच्या सर्व शाखांवर हाच ध्वज फडकला पाहिजे. तिरंगी झेंडा खादी भांडारांवरच काय तो शोभेल! "

स्वातंत्र्य चळवळीतील अनुभव देखील संघाचा तिरंग्याबाद्दलचा द्वेष दाखवितात. ब्रिटीशांविरुध्द चळवळ न करणारे हिंदुत्ववादी स्वातंत्र्य चळवळीला विरोध करीत असत. प्रसिध्द समाजवादी नेते ना. ग. गोरे १ मे १९३८ रोजीच्या एका प्रसंगाचे साक्षीदार होते. हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी कामगार दिनाच्या संचलनावर हल्ला केला. तिरंगा फाडुन टाकला. सेनापती बापट आणि गजानन कानिटकर या थोर स्वातंत्र्यसेनानींना मारहाण केली. ना. ग. गोरे लिहितात, "आमच्या मिरवणुकीवर हल्ला कोणी केला? तिरंगा कोणी फाडला? हिंदू महासभा आणि हेडगेवारांच्या मुलांनी हे दुष्कृत्य केले. हेडगेवार आणि सावरकरांनी आपल्या अनुयायांना मुसलमान देशाचे शत्रू क्रमांक एक आहेत असे शिकवले आहे, काँग्रेस आणि तिरंगा मुस्लीमधार्जिणा आहे असे सांगून त्याचा व्देष फैलाविला आहे. समाजवादी आणि कम्युनिस्ट हे हिंदूद्रोही आहेत असे सांगितले आहे. मुस्लिमव्देष, काँग्रेसव्देष आणि तिरंग्याचा व्देष शिकवला आहे. त्यांचा स्वत:चा भगवा ध्वज असून अन्य ध्वजाचा आदर करीत नाहीत. आपल्या नेत्याला ते फुरर (हिटलर) म्हणजे राष्ट्रधुरीण समजतात."

म्हैसूर हे हिंदू संस्थान होते. या संस्थानात काँग्रेसी सत्याग्रहींनी तिरंग्याला अभिवादन केले, ''वंदे मातरम्' घोषणा देत मिरवणूक काढली, म्हणुन म्हैसूर संस्थानाच्या पोलिसांनी २६ सत्याग्रहींना गोळ्या घालून ठार केले. या गोळीबारानंतरही काँग्रेसची चळवळ सुरूच राहिली. पुनश्च जीवाची पर्वा न करता शांततामय सत्याग्रह सुरु झाला. अखेरीस जनतेचा उठाव पाहून दिवाण रामस्वामी मुदलियार यांनी काँग्रेसशी सन्मान्य तडजोड केली. यावर १७ एप्रिल १९४७ रोजी सावरकरांनी शिमोगा येथील हिंदू महासभेच्या कार्यकारिणीला पत्र लिहिले, त्यात स्पष्टपणे म्हटले आहे, "म्हैसूर राज्य हिंदूसभेने हिंदू संस्थानिकांचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करत अहिंदू अथवा वाट चुकलेल्या राष्ट्रवादाचे सोंग आणणाऱ्या हिंदुंना विरोध केला पाहिजे."

शेखर सोनाळकर

Updated : 9 Aug 2022 4:46 AM GMT
Next Story
Share it
Top