वयाच्या ९व्या वर्षी जानवं घालण्यास विरोध करणारे गुरु नानक!
X
आज गुरु नानक जयंती… हा दिवस जगभरात खूप उत्साहात साजरा केला जातो. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. शीख बांधवांसाठी हा दिवस दिवाळीसारखाच असतो. या दिनी ठिकठिकाणी किर्तन,भजन, लंगर यांचे आयोजन केले जाते.
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त The Story of the Sikhs या पुस्तकाचे लेखक सरबप्रीत सिंह Sarbpreet Singh एका पॉडकास्ट मध्ये सांगतात की, गुरु नानक यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ ला रायभोई येथील तलवंडी गावात झाला. ते सध्याच्या पाकिस्तानात आहे. त्यांचे कुटूंब आर्थिकदृष्टया चांगले होते. प्रत्येक वडिलांप्रमाणे त्यांच्याही वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलाकडे पैसा, चांगलं काम असावं समाजात त्याने खूप नाव कमवावं. परंतु गुरु नानक साहेब यांचं लक्ष दुसरीकडे होते. समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा, जातीभेद त्यांच्या डोळ्याला सहन न होणारे होते.
हिंदु धर्मानुसार लहान मुलाच्या किशोरावस्थेच्या सुरुवातीला ‘जानवं’ म्हणजेच एक पवित्र धागा संस्काराचा भाग म्हणून घातला जातो. पंडितद्वारे धार्मिक विधी, मंत्रोच्चार करून ज्ञान आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्यासाठी लहान मुलांना ८ ते १६ या वयात धागा घातला जातो.
याच पार्श्वभूमीवर ९ वर्षांच्या गुरु नानक यांनाही जानवं घालण्याचा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबियांनी केला. गुरु नानक यांचा जानवं घालण्याचा दिवस आला तेव्हा त्यांना नवीन कपडे घालण्यात आले. त्यांच्या कुटुंबाचे पुरोहित पंडित हरदयाळ आले आणि मंत्र बोलून त्यांना जानवं घालू लागले तेव्हा ९ वर्षांच्या लहानग्या गुरु नानक यांनी त्या पंडितांना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि प्रश्न ही असे केले की, पंडित हरदयाळ यांच्याकडे त्यांच्या प्रश्नांचे उत्तरचं नव्हते.
गुरु नानक यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची नोंद ‘आसा दी वार’ या भजन संग्रहात आहे. गुरु नानक विचारतात की, आपण जे जानवं मला घालणार आहात तो कधी (मळू) खराब होऊ शकतो का? कधी तुटू शकतो का? आगीमध्ये जळू शकतो का? त्यावर पंडित हरदयाळ यांनी प्रेमाने उत्तर देत सांगितले की, बेटा हे मळूही शकतं, तुटू ही शकतं त्यावेळी गुरु नानक साहेब त्यांना सगळ्यांसमोर ठामपणे सांगतात की, "मला असा जानवं नकोय मला असा जानवं हवाय जो कधी खराब होऊ शकत नाही, जो कधी जळू- तुटू शकत नाही, जो मला समाजात चांगला माणूस बनवेल असा जानवं मला हवा आहे." जानवंला नकार देत त्यांनी खरी पवित्रता देवाच्या भक्तीतून, नैतिक आचरणातून येते. शारिरीक धाग्यातून किंवा सामाजिक असमानतेला बळकटी देणाऱ्या पुरोहित वर्गातून नाही.
वयाच्या ९ वर्षी त्यांचा असा विचार करणं आणि तो विचार सगळ्यांसमोर ठामपणे मांडणं हे खूप वेगळं ध्यैर्यशील होतं ते सामान्य मुलांसारखे तर अजिबातच नव्हते. एकंदरितचं त्यांचे विचार सुरुवातीपासून क्रांतीकारी होते.
समाजातील जाती भेदभाव संपूर्ण पणे नष्ट होण्यासाठी यापूर्वी अनेक संतांनी विचार आणि प्रयत्न केले परंतु गुरु नानक यांनी हा सामाजिक भेदभाव नाहीसा करण्यासाठी समाजातील तळागळातील प्रत्येकाला समानतेची, सन्मापूर्वक वागणूक मिळावी यासाठी अनेक संस्थात्मक रचना उभारल्या आणि आजवर त्या कायम सुरु आहे.






