Home > मॅक्स ब्लॉग्ज > विनोदसम्राट सोंगाड्या गुलाब बोरगावकर

विनोदसम्राट सोंगाड्या गुलाब बोरगावकर

तमाशा म्हटला की सोंगाड्या आलाच... सोंगाड्याच्या करमणूकीमुळे तमाशाला वेगळीच जान मिळते. हास्य, विनोदी, मनोरंजन करणारा तमाशा, नाटक यांचा इतिहास आणि इतिहासातील मज्जेशीर असलेल्या कलाकरांचे किस्से... त्याचबरोबर एका विनोदसम्राट सोंगाड्याची कहाणी... जाणून घ्या प्रा. डॉ. संपतराव पार्लेकर यांच्याकडून...

विनोदसम्राट सोंगाड्या गुलाब बोरगावकर
X

गण, गवळण, लावणी, बतावणी आणि वग या मुख्य घटकातून सादर होणारा तमाशा शुद्ध मनोरंजन आणि लोकप्रबोधन करीत आला आहे. या तमाशाची लोकप्रियता कलावंताच्या यशस्वी कारकीर्दीवर अवलंबून असते. पेशवेकालीन शाहीर अनंतफंदी, रामजोशी, सगनभाऊ, परशराम आणि होनाजी-बाळा या शाहिरांची लोकप्रियता खरोखरच वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे तमाशाला प्रतिष्ठा तर मिळालीच,पण त्याची भरभराट होत गेली.

पेशवेकालीन तमाशात फडाचा प्रमुख शाहीर स्वतः लावण्या रचत असे. त्याच्या जोडीला नाच्या पोऱ्या मिसरुड न फुटलेला तरुण असे. तर त्याच्या जोडीला सोंगाड्या विनोद करून लोकांना हसवीत असे. त्यामुळे हजरजबाबीपणा, प्रसंगावधान राखून तो बोलत असे. आतापर्यंतच्या नामांकित सोंगाड्यांची तमाशाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.

खरे तर तमाशातील सोंगाड्या, सर्कशीतला विदुषक, नाटकातील विनोदी नट आणि दशावतारातील शंकासूर यांची जातकुळी एकच असल्याचे सांगितले जाते. गंभीर प्रसंगातही विनोद निर्माण करण्याचे काम सोंगाड्या करतो. त्यामुळे तमाशाची लोकप्रियता टिकून राहते. तमाशातला पहिला सोंगाड्या बाकेराव पेशवेकालीन परशरामाच्या तमाशात होता. नंतरच्या काळात अनेक सोंगाडे नावारूपाला आले.

त्यामध्ये दगडू साळी शिरोलीकर, शंकर अवसरीकर, दादू इंदुरीकर,सावळा महागावकर,संभा कवलापूरकर, रामा कुंभार वर्धनगडकर, हरिभाऊ वडगावकर, दत्ता महाडिक पुणेकर, गुलाब बोरगावकर,काळू-बाळू, दत्तोबा तांबे,जयवंत सावळजकर या सारखे असंख्य सोंगाड्यांचा उल्लेख करावा लागेल.

यापैकीच स्वातंत्र्योत्तर काळात गुलाब बोरगावकर या सोंगाड्याचा जीवन प्रवास आणि यशस्वी कारकीर्द पहाणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यानंतर काळू-बाळू कवलापूरकर,गुलाब बोरगावकर, दादू इंदुरीकर या हजरजबाबी सोंगाड्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो.

त्यापैकी गुलाब बोरगावकर म्हणजे प्रत्येक शब्दाला, स्वभावाला आणि अंगविक्षेपाला हास्याचे फवारे उडवणारा तमाशातला अवलिया सोंगाड्या. एखादा माणूस आपण हसायचे नाही असे ठरवून तमाशा पहायला आला तर हसून हसून मुरकुंडी वळेल इतके या सोंगाड्यात हसविण्याचे कसब होते. या सोंगाड्याचे नाव गुलमोहम्मद खाजेखान जमादार. त्यांची गुरुपरंपरा कलगी पक्षाची. पठ्ठे बापूराव यांचा प्रभाव असलेले गब्रू लाडेगावकर यांचे शिष्य अहमदभाई इस्लामपूरकर यांचे गुलाब पट्टशिष्य.

असा हा गुलाब सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील बोरगाव या गावी मुस्लिम कुटुंबात जन्माला आला. गुलाबचे वडील खाजेखान जमादार कुंभोजच्या सत्यापा भोसलेच्या बंडात होते. त्यामुळे बोरगाव परिसरात त्यांना वस्ताद म्हणून ओळखले जाई. अशा कुटुंबात मुलाचा जन्म झाला. लहानपणी आईने लाडाने वाढवले. पुढे तमाशाचा नाद लागला. भाऊ बाबालाल तमाशात काम करीत होता. त्यामुळे गुलाबही तिकडे आकर्षित झाला. पुढे ही आवड इतकी वाढत गेली एकविसाव्या वर्षी आईच्या मृत्युनंतर तो अहमदभाई इस्लामपूरकर यांच्या तमाशात दाखल झाला.

गुलाब बोरगावकर आपले नशीब तमाशात आजमावत असताना त्या काळात त्याला तमाशात गेल्याबद्दल कुटुंबात दोष दिला जात होता. त्याच्या छंदाला आळा घालण्यासाठी त्याचे लग्न करण्यात आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

१९५२ साली त्याने तमाशा जवळ केला. तेंव्हा अहमदभाई इस्लामपूरकर आणि बाबुराव पुणेकर यांचा एकत्रित असणारा तमाशा गावोगावी लोकरंजन करीत होता. गुलाब अडचणीच्या काळात स्टेजवर गवळणीत उभा राहू लागला. त्याचे वागणे-बोलणे यावरून काहींना त्याच्यातला गुणवंत कलावंत दिसत होता.

गुलाबने मात्र, आपण एक चांगला सोंगाड्या व्हायचे असे मनात ठरवले होते. गुलाबला त्यानंतर शिरसी आंबी याठिकाणी माधवराव नगरकरांच्या तमाशात प्रवेश मिळाला. त्याच्याच गावचे बाबुराव शिंदे बोरगावकर यांच्या सहकार्याने तो माधवराव नगरकर सह गणपतराव सविंदणेकर या तमाशा सामील झाला. येथे बिगारी काम करताना दत्ता महाडिक पुणेकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. रंगनाथ आबा पारगावकर या नामांकित सोंगाड्याला जवळून पहाता आले. आणि एक दिवस दत्ता महाडिक त्या पार्टीतून अचानक निघून गेल्याने गुलाबला 'गवळ्याची रंभा' या वगनाट्यात भूमिका मिळाली. या दिवशी या भूमिकेचे कौतुक झाले आणि तिथेच रात्रीच गुलाबचा सोंगाड्या म्हणून उदय झाला.

गुलाबला या तमाशातील सोंगाड्या रंगनाथ आबा पारगावकर यांच्या बोलण्यातला सडेतोडपणा, हजरजबाबीपणा, प्रसंगावधान साधून बोलण्याची पद्धत, शब्दफेक करण्याची कला या नावीन्यपूर्ण गोष्टी शिकता आल्या. पुढे त्याप्रमाणे तो प्रेक्षकांशी संवाद साधू लागला. तेव्हा टाळ्यांचा पाऊस पडू लागला. इथे चंद्रकांत ढवळपुरीकर या अभिनयसंपन्न कलाकाराला त्यांना जवळून पाहता आले. चंद्रकांत आणि गुलाब यांच्या अभिनयावर नगरकर यांचा तमाशा पुढे नावारूपाला आला. १९६१ साठी मुंबईच्या लालबाग थिएटरवर या तमाशाला सुवर्णपदक मिळाले.

माधवराव नगरकरांच्या मृत्यूनंतर गुलाब तुकाराम खेडकर यांचा तमाशात गेला. तिथे दत्ता महाडिक यांच्याबरोबर त्यांनी जोडी जमली. तिथेही त्यांना नाव मिळाले, पण तुकाराम खेडकर यांच्या मृत्युनंतर १९६५ साली नव्याने उभा राहिलेल्या चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर तमाशा तो दाखल झाला. तिथे पुन्हा दत्ता महाडीक यांच्याबरोबर त्यांची जोडी इतकी जमली की, महाराष्ट्रभर आपल्या सोंगाड्यांनी धुमाकूळ घातला. तिथे त्याला लेखणीसम्राट गणपत व्ही.माने चिंचणीकर यांच्या वगनाट्यातील भूमिकेमुळे आणखीच लोकप्रियता मिळाली.

१९७४ सालानंतर गुलाब बोरगावकर आणि गणपत व्ही.माने चिंचणीकर यांनी तमाशा फड उभा केला तेंव्हा माने यांची असंख्य वगनाट्ये नावारूपाला आली. या काळात अनेक सुखदुःखाच्या गोष्टी घडल्या तरी तमाशा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला. १९८२ साली परत संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर सह विनोदसम्राट गुलाब बोरगावकर लोकनाट्य तमाशा उभा राहिला. आणि तोही १९८४ साली गुलाब बोरगावकर यांच्या मृत्यू पर्यंत एक मोठा महाराष्ट्रातला अवजड वाहनांचा तमाशा म्हणून उल्लेख केला गेला. १८ जानेवारी १९८४ साली गुलाबराव यांचे निधन झाले असले तरी त्यांच्या नावाने तमाशाचा फड कित्येक वर्षे दत्ता महाडीक चालवित होते. असा हा अवलिया सोंगाड्या महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेत होऊन गेला.

कोणताही कलावंत कलंदर असतो. जनरितीचे बंध तो आवळू शकत न ही. हे सिद्धांत त्याला माहीत असतील त्यांनी ते स्वीकारले नाहीत. खेड्यातल्या दीन-दलितांना, विवंचनग्रस्तांना क्षणभर का असेना त्याने हसायला लावले. दुःखापासून परावृत्त केले. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन दिले. पैशाचा हव्यास धरला नाही. येणाऱ्या दुखाना तोंड दिले आणि सुख सढळ हातानी वाटून टाकले.

मूळातच गुलाबराव यांचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न आणि हजरजबाबी होते. कलावंत घडवून म्हटला तरी घडत नाही. त्याच्या अंगी उपजत कला असावी लागते. गुलाब खऱ्या अर्थाने श्रेष्ठ कलावंत होते आणि माणूस म्हणून ते त्याहून श्रेष्ठ होते. १९६० नंतरच्या लोकनाट्य तमाशात विनोदी सोंगाड्या म्हणून यशस्वी कारकीर्द अनुभवणारा हा एक कलावंत होता.

या गुलाबराव बोरगावकर यांची ही कलेची परंपरा चिरंजीव मुबारक बोरगावकर व शिष्य मुरली शिंदे बोरगावकर हे चालवित आहेत.

प्रा. डॉ. संपतराव पार्लेकर/ पलूस

९६२३२४१९२३

Updated : 7 Aug 2021 3:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top