Home > मॅक्स ब्लॉग्ज > गोविंद पानसरे : डोंगराला भिडणारा म्हातारा

गोविंद पानसरे : डोंगराला भिडणारा म्हातारा

कॉ. गोविंद पानसरे यांनी बहूजनांची मोट बांधून जातीयवादी आणि धार्मिक धृवीकरण करणाऱ्यांच्या विरोधात कशा पध्दतीने लढा दिला, याविषयीच्या आठवणी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त व्यक्त केल्या होत्या. त्या आज पुन्हा प्रदर्शित करीत आहोत.

गोविंद पानसरे : डोंगराला भिडणारा म्हातारा
X

Source: Jayant patil official facebook page

घटना २००४ च्या मे महिन्यातली आहे. करवीर पीठाच शंकराचार्य विद्याशंकर भारती निवृत्त होऊन त्यांच्याजागी श्री विद्यानृसिंहभारती हे सूत्रे घेणार होते. त्यानमित्त आयोजित केलेल्या समारंभासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन उपस्थित होते. यावेळी शंकराचार्यांनी भाषणात, 'लोकशाही ही या देशातली अंतिम व्यवस्था नसल्याचे' म्हटले होते. स्वाध्याय आण‌ि संस्कारांवर आधारित नवी घटना देशासाठी लिहिण्याची गरज असल्याचे तारेही मावळत्या शंकराचार्यांनी तोडले होते. समारंभाला सरसंघचालक पाहुणे असल्यामुळे शंकराचार्यांच्या भाषणाकडे कुणाचे लक्ष नव्हते.

मी तेव्हा लोकमतमध्ये काम करीत होतो. मला शंकराचार्यांच्या भाषणाचे गांभीर्य जाणवले होते. त्यावर 'शाहूंच्या भूमीत परिवर्तनाचे चक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न' असे वृत्तविश्लेषण लिहिले. त्याचा समारोप करताना असे म्हटले होते की, 'कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही, त्याप्रमाणे कोल्हापूरच्या भूमीतली धगही पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळेच शंकराचार्य असे घटनाविरोधी विधान करायला धजावतात…'वगैरे.

त्यादिवशी भल्या सकाळी पानसरे अण्णांचा फोन आला. म्हणाले, तू लिहिलं आहेस, ते बरोबर आहे. पूर्वी एकत्र लढणारी सगळी मंडळी निवडणुकीचं राजकारण आण‌ि इतर काही कारणांमुळं असेल पण वेगळी झाली आहेत. पुरोगामी मंडळींची एकजूट राहिलेली नाही. तरीसुद्धा ही चांगली संधी आहे, पुन्हा सगळ्यांना एकत्र आणण्याची. प्रयत्न करूया. काही अवघड वाटत नाही मला…

माझ्यासारख्या पत्रकाराला हेच अपेक्षित होतं. मी जे लिहिलं होतं त्याचा आशय फक्त पानसरे अण्णाच समजून घेऊ शकतात, याची मला खात्री होती. त्यानुसार पुढचं सगळं घडत गेलं. अण्णांनी पुढाकार घेऊन माजी आमदार बाबूराव धारवाडे, शेकापचे प्रा. व‌िष्णूपंत इंगवले, काँग्रेसचे महादेवराव आडगुळे, माजी महापौर भिकशेठ पाटील, माकपचे चंद्रकांत यादव अशी सगळी मंडळी एकत्र आणली, म्हणजे मधल्या काळात विस्कळित झालेल्या सगळ्या लोकांची मोट बांधली.

कोल्हापूर शहरात शंकराचार्यांच्याविरोधात रान उठवलं. आठवडाभर कोपरा सभा घेतल्या. शेवटी एक मोठ्ठा मोर्चा शंकराचार्य मठावर काढला. त्यासाठी पुण्याहून भाई वैद्य वगैरे मंडळीही आली होती. मोर्चा सुरू होण्याच्या थोडावेळ आधी भवानी मंडपात पानसरे अण्णांसोबत काही प्रमुख कार्यकर्ते मंडळी गप्पा मारत होती, तिथं मी पोहोचलो. तेव्हा माझ्याकडं ‌निर्देश करून अण्णा सगळ्यांना म्हणाले, 'आज इथं जे काही आपण जमलो आहोत, त्याला हा कारणीभूत आहे… कुणीतरी डिवचल्याशिवाय आपल्याला राग येत नाही. यानं ते बरोबर केलं.'

शंकराचार्यांच्या घटनाविरोधी वक्तव्याच्या विरोधात आंदोलन त्यांनीच संघटति केलं, परंतु आपल्या सर्व सहकारी मित्रांपुढं त्यांनी जाहीरपणे त्याचं श्रेय मला देऊन टाकलं. सार्वजनिक व्यवहारातला हा दुर्मीळ पारदर्शीपणा आहे.

पानसरे अण्णांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कम्युनिस्ट पुढारी असले तरी कम्युनिस्टांसारखे सतत कार वादलेले किंवा वैतागल्यासारखे नसत. त्यांचं कामाचं आण‌ि आस्थेचं क्षेत्र पक्षाच्या वर्तुळापुरतं मर्यादित नव्हतं. जातीयवादी-पक्ष आण‌ि संघटनांच्या संदर्भात त्यांची भूमिका अगदीच ठाम आण‌‌ि स्पष्ट होती. सगळ्या पुरोगामी घटकांनी त्याविरोधात एकत्र लढायला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. आपसातले किरकोळ मतभेद बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे, असं ते म्हणायचे. केवळ म्हणून थांबायचे नाहीत, तर त्यासाठी वेळोवेळी पुढाकार घ्यायचेत.

सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी पक्षाचा रंग अडचणीचा ठरतो, असं लक्षात आल्यावर ते पक्ष, झेंडा, लाल रंग सगळं बाजूला ठेवून वेगळाच मंच घेऊन पुढं आले. कोल्हापुरात स्थापन झालेले 'आम्ही भारतीय लोकआंदोलन' हा असाच एक प्रयत्न होता. बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या काळात आम्ही भारतीय लोकआंदोलन अस्तित्वात आलं आण‌ि वेळोवेळी त्या बॅनरखाली सगळे पुरोगामी घटक पक्ष-संघटनांचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र आले.

श्रमिक प्रतिष्ठान हा आणखी एक असाच प्रयत्न होता. कामगार-कष्टकरी वर्गाच्या श्रमाच्या पैशातून त्यांनी श्रमिक प्रतिष्ठानची उभारणी केली आण‌ि सांस्कृतिक मंच असं त्याचं स्वरुप ठेवलं. त्यामागंही त्यांची दूरदृष्टी होती. पक्षात कार्यकर्ते सक्रीय होते. विविध थरांतले कष्टकरी घटक होते. मूलभूत प्रश्नांसाठीच्या त्यांच्या लढाया सुरू असायच्या. कुठलंही सत्तेचं पद मिळणार नाही, याची खात्री असतानाही त्यांनी कधी हताशेचा सूर काढला नाही क‌िंवा लढाई थांबवली नाही. या प्रवासात त्यांच्या लक्षात आले की, पूर्वी डाव्या चळवळीत कवी, गीतकार, चित्रकार, साहित्यिक अशी वेगवेगळी कलावंत मंडळी असायची.

आज अशा लोकांची वानवा आहे. कैफी आजमी, नारायण सुर्वे यांची उदाहरणं किती काळ देत बसायचं? नवी मंडळी तयार झाली पाहिजेत. श्रमिक प्रतिष्ठानच्या कार्याची दिशा त्यांनी तशी ठेवली. कार्यकर्त्यांचं सांस्कृतिक आकलन वाढलं पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलावंत मंडळींनी चळवळीशी जोडून घेतलं पाहिजे यादृष्टीनं काम केलं. काव्यलेखन कार्यशाळा घेतली. स्वतःच्या अमृतमहोत्सवानिमित्त कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या लोकांच्या चरित्रपुस्तिका लिहून घेतल्या, जेणेकरून त्या माणसांचं काम नव्या पिढीपुढं यावं. हे करताना त्यांच्या लक्षात आलं की चांगले मुद्रितशोधक नाहीत, तर त्यांनी त्यासाठीची कार्यशाळा घेतली.

खरंतर मराठी भाषा, शुद्धलेखन, व्याकरण हे काही त्यांचे विषय नव्हते. मात्र, अण्णांना कुठल्या क्षेत्राचं वावडं नव्हतं. याचा अर्थ, ते सगळ्या क्षेत्रात लुडबूड करायचे असा नव्हे. नेते असूनही ते सतत कार्यकर्त्याच्या भूमिकेत असायचे. स्थानिक पातळीवरील त्या त्या क्षेत्रातल्या जाणत्या मंडळींना मोठेपणा देऊन काम करायचे. सामान्य कार्यकर्त्यांना मंचावर संधी द्यायचे. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमालेत नव्या कार्यकर्त्यांना स्वागत-प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख आण‌ि आभार मानण्याची संधी द्यायचे. मंचावर बोलण्यासाठी कार्यकर्ते तयार व्हावेत, असा त्यामागचा त्यांचा हेतू होता.

महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत कोल्हापूरचे नेतृत्व फारसे ठळकपणे दिसत नाही. रत्नाप्पा कुंभार, बाळासाहेब देसाई अशी नावे चटकन लक्षात येतात. सत्तेच्या राजकारणात कोल्हापूर पिछाडीवर असले तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी मात्र, कोल्हापूरने सातत्याने महाराष्ट्राला नेतृत्व दिले.

राजर्षी शाहू महाराज, भाई माधवराव बागल, कॉम्रेड संतराम पाटील, कॉम्रेड यशवंत चव्हाण, प्रा. एन. डी. पाटील, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, राजू शेट्टी या नावांवर नजर टाकली तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी, कष्टकऱ्यांच्या लढाईसाठी कोल्हापूरने महाराष्ट्राला काय दिले आहे, याची कल्पना येते.

वयाची अमृतमहोत्सवी वाटचाल केलेल्या पानसरेअण्णांच्या आयुष्यातील सहा दशके कोल्हापुरात गेली. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार हे त्यांचे गाव. कोल्हार ते कोल्हापूर असा त्यांचा विलक्षण प्रवास आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले अण्णा पंधराव्या वर्षी पत्की गुरुजींच्याबरोबर अंगावरच्या कपड्यानिशी कोल्हापूरला आले. सुरुवातीच्या काळात कधी बिंदू चौकात कम्युनिस्ट पुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानात तर कधी फुले आणि आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुतळ्याखाली झोपून त्यांनी रात्री काढल्या. पुढे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांची शिक्षणाची गाडी रुळावर आली. शिक्षण घेत असतानाच अनेक लढे आणि चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला.

सोपे बोलणे आणि सोपे लिहिणे हे त्यांचे वैशिष्ट्य. कामगारांपुढे बोलताना कधी ते चीन, रशियाच्या बाता मारीत नसत. कितीही अवघड विषय असला तरी त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधतच मांडणी करत. कार्यकर्त्यांपुढे बोलताना मात्र,. काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. त्याबद्दल ते म्हणायचे,

'कार्यकर्त्यांना प्रश्न पडले पाहिजेत, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, त्यासाठी अशा काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवायच्या असतात.'

जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर यासंदर्भातील एकूण चर्चेमध्ये त्यांनी 'खाऊजा धोरण' हा नवा शब्द दिला. 'खाऊजा' म्हणजे खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण.

अण्णांचा मुलगा अविनाशचा २००३ मध्ये अकस्मात मृत्यू झाला. अविनाश डाव्या चळवळीत सक्रीय होता. तरुण नेत्याच्या मृत्यूमुळे सगळेच हादरून गेले होते. अविनाशची अंत्ययात्रा बिंदू चौकातील 'रेड फ्लॅग बिल्डिंग' जवळ आली, तेव्हा सन्नाटा पसरला. काय करायचे कुणालाच कळेना, अशावेळी ७० वर्षांचे अण्णा पार्थिव असलेल्या गाडीवर चढले आणि पक्षाचा झेंडा अविनाशच्या पार्थिवावर अंथरून आपली मूठ आवळली.

'अविनाश पानसरे - लाल सलाम' असे म्हणून 'अविनाश का अधुरा काम कौन करेगा ? ' – अशी घोषणा दिली आणि पाठीमागून शेकडो लोकांनी 'हम करेंगे, हम करेंगे.' असा प्रतिसाद दिला. उपस्थितांच्या अंगावर काटा आला आणि अनेकांच्या गळ्यात हुंदका दाटून आला.

अण्णा किती धीरोदात्त होते, याचे उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहता येते. व्यक्तिगत आयुष्यात आणि सार्वजनिक जीवनातील वाटचालीत अशा धीरोदात्तपणाबरोबरच खंबीरपणा आणि व्यावहारिक शहाणपणाचे दर्शन त्यांनी अनेकदा घडवले. त्याचमुळे डाव्या चळवळीचे संख्याबळ घटत गेले तरी चळवळीची ताकद कमी झाली असे कधी जाणवले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकीय दुकानदारी आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याचे उद्योग जोरदारपणे सुरू झाले, तेव्हा पानसरे अण्णांसारख्या लोकशिक्षकाने ते मूकपणे पाहणे शक्य नव्हते. जातीयवादी राजकारण करणाऱ्या शिवसेना आणि तत्सम पक्ष-संघटनांच्या विरोधात त्यांनी अनेक सभांमधून तोफा डागल्या आहेत. परंतु ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी एक पुस्तिका लिहिली. 'शिवाजी कोण होता ?' ही पुस्तिका शिवरायांनी सामान्य माणसांसाठी केलेले कार्य सोप्या भाषेत उलगडून दाखवते.

या पुस्तिकेच्या पाचेक लाख प्रती तरी आतार्पयत विकल्या गेल्या असतील. या पुस्तिकेसंदर्भात एक गंमतीशीर घटनाही घडली होती. पुस्तक न वाचता केवळ नावावरून गोंधळ घालणाऱ्यांची आपल्याकडे कमतरता नाही. तसेच या पुस्तकाबाबत घडले. नावामध्ये शिवाजी महाराजांना एकेरी संबोधण्यामागे अण्णांची काही एक भूमिका आहे. परंतु त्यावरून कुणीतरी कथित शिवप्रेमींने पोलिसांमध्ये तक्रार केली आणि पोलिस अधिकाऱ्यांनीही या पुस्तिकेच्या प्रती जप्त करून आपल्या अगाध ज्ञानाचे दर्शन घडवले होते. आतासुद्धा शिवसेना आणि मनसेचे काही कार्यकर्ते या पुस्तिकेच्या नावावरून आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन करीत असतात.

एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात आंदोलन करताना कुलगुरूंच्यासमोर जरा जास्तीच आगाऊपणा केला होता. त्याविरोधात कोल्हापूर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या आणि अर्थात त्याला राजकीय रंग होता.

पानसरेअण्णांसारख्या डाव्या पक्षाच्या नेत्यासाठी तर अभाविपवर टीका करण्याची ही मोठी संधी होती. परंतु आयुष्यभर रस्त्यावरच्या लढाया करणाऱ्या अण्णांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून वेगळी भूमिका घेतली. ते म्हणाले होते,

'आंदोलनाच्या जोशात कधीतरी असे घडून जाते. ते विसरून जायचे असते. मी ही मागे एकदा तर्कतीर्थाच्या गळ्यात मेलेला साप घातला होता. माझी ती कृती चुकीची होती, हे आता माझ्याही लक्षात येते, परंतु त्या त्या वेळी असे काहीतरी घडून जाते.'

पानसरेअण्णा नेहमी शाहू महाराजांच्या परंपरेचा उल्लेख करायचे. कोल्हापूरची ती परंपरा पुढे चालवली पाहिजे, यासाठी सतत काहीतरी करत राहायचे. त्यांच्या या चळवळ्या स्वभावामुळेच कोल्हापूर शहराचा जिवंतपणा टिकून राहिला. तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात सतत काहीतरी घडत राहिलं. शाहू महाराजांबद्दल त्यांना कमालीची कृतज्ञता वाटत होती. या कृतज्ञतेपोटीच त्यांनी 'शाहू महाराज-वसा आण‌ि वारसा' नावाची छोटीशी पुस्तिका लिहिली, जी शाहूंच्या कार्याची नेमकी ओळख करून देते.

राजर्षी शाहूंच्या नगरीत आयुष्य व्यतीत करणारे अण्णा शाहूंच्या विचारांचे पाईक आणि कृतीशील अनुयायी आहेत. पानसरे म्हणजे नेमके कुठल्या जातीचे, याचे कोडे अनेकांना उलगडत नसे. जाती-पातींच्या पलीकडे जाऊन ते रस्त्यावरच्या माणसांसाठी. कष्टकऱ्यांसाठी लढाया करतात. त्यात रंगारुपानेही ओबडधोबड. मराठा समाजातला माणूस असे काही करणे शक्य नाही, त्यामुळे ते दलित आहेत, धनगर समाजाचे आहेत, असे अनेकजण छातीठोकपणे सांगत.

शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा होळकरांच्या कुटुंबात विवाह करून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. आजच्या काळात शेजारच्या घरी शिवाजी जन्माला यावा, अशी मानसिकता असताना पानसरे यांनी आपल्या दोन्ही मुलींचे आंतरजातीय विवाह आनंदाने स्वीकारले. त्यांचे सगळे कुटुंब चळवळीत सक्रीय राहिले.

डाव्या चळवळीतल्या नेत्यांच्या एकूण व्यवहारातील रुक्षपणा पानसरेअण्णांच्याकडे नव्हता. जगण्यातले आनंदाचे क्षण छानपैकी साजरे करावेत, अशी धारणा असलेले ते कम्युनिस्ट होते. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन हा असाच एक त्यांनी सुरू केलेला वेगळा उपक्रम आहे. तो सुरू करताना त्यांचा निश्चित असा एक विचार होता.

अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या शाहिराला, साहित्यिकाला एका जातीपुरते मर्यादित केले जाते, हे पाहिल्यानंतर त्यांनी अण्णाभाऊंच्या नावाने जागर सुरू केला. साहित्य संमेलन सुरू करण्याच्या खूप आधीपासून अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त शाहिरी पोवाडय़ांची स्पर्धा सुरू केली. त्यानिमित्ताने अठरापगड जातीच्या शाहिरांना अण्णाभाऊ साठे या शाहिराची नव्याने ओळख करून दिली.

स्वत: अनेक चांगल्या गोष्टी उभ्या केल्याच, परंतु जिथे जिथे काही चांगले उभे राहतेय, तिथे तिथे ते समर्थनासाठी उभे राहिले. आणि जिथे काही चुकीचे घडतेय त्याविरोधातही ठामपणे उभे राहताना त्यांनी कधी परिणामांची तमा बाळगली नाही. त्यासाठीची किंमत मोजली.

पानसरेअण्णांची वाटचाल पाहिली, की एक खंत सतत वाटत राहते, ती म्हणजे त्यांच्यासारख्या नेत्याला विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली नाही. कोल्हापूरमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यासाठी चांगली तयारीही केली होती. परंतु त्यामध्ये यश आले नाही.

पानसरेअण्णांचा पक्ष असा की, विधानपरिषदेसाठी कोणत्याही पातळीवरचे संख्याबळ त्यांच्याबाजूने कधीच नव्हते. ते विधिमंडळात गेले नाहीत, त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले असे वाटत नाही. नुकसान झालेच असेल तर ते विधिमंडळाचे झाले, असे म्हणता येईल. त्यांच्यासारखा कष्टकऱ्यांचा नेता, प्रभावी वक्ता विधिमंडळात गेला असता तर कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी धसास लावले असतेच, परंतु त्याचबरोबर त्यांच्यासोबत विधिमंडळात काम करणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचेही शिक्षण झाले असते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरेअण्णा हे दोघेही संस्थात्मक जीवन जगत होते. दोघांकडेही कार्यकर्त्यांचे मोहोळ होते, परंतु नेतृत्वाची सक्षम फळी नव्हती. दाभोलकर यांच्यानंतर पानसरे यांची हत्या का, याचे हेही एक कारण असू शकते. एखादी व्यक्ती संपवण्यापेक्षा संस्था संपवली तर आपल्या हल्ल्याचा परिणाम अधिक खोलवर होऊ शकेल आणि आपल्याविरोधात उठणारा आवाज क्षीण होईल, असेही कदाचित हल्ला करणाऱ्यांना वाटत असावे. परंतु त्यांना हे माहीत नसावे की गांधीजींना मारले म्हणून त्यांचा विचार संपला नाही. दाभोलकरांना मारले म्हणून जादूटोणा विधेयक लटकले नाही किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ थांबली नाही. पानसरेअण्णांवरील हल्ल्यामुळे पुरोगामी चळवळीला ब्रेक लागणार नाही.

दाभोलकर काय किंवा पानसरेअण्णा काय – व्यक्तिगत जीवनात ही अजातशत्रू माणसे होती. त्यांचे विरोधक होते ते वैचारिक पातळीवरचे. या वैचारिक विरोधकांची सहिष्णू म्हणून कधीच ख्याती नव्हती. त्यांना समाजात ज्या विषाची पेरणी करायची आहे, त्याची तीव्रता कमी करण्याचे काम दाभोलकर आणि पानसरेअण्णा करीत होते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरेअण्णा हे दोघेही केवळ व्यक्ती नव्हते तर संस्था म्हणूनच महाराष्ट्राच्या समाजकारणात वावरत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साधना ट्रस्ट आणि एकूण समाजवादी चळवळ सोबत घेऊन दाभोलकरांची वाटचाल सुरू होती. पानसरेअण्णाही लोकवाड्.मयगृह, श्रमिक प्रतिष्ठान, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, आम्ही भारतीय लोकआंदोलन अशा विविध संस्थांच्या माध्यमांतून कार्यरत होते. एकटेच कार्यरत नव्हते, तर आपल्या विचाराच्या सगळ्यांना सोबत घेण्याचा, कार्यप्रवण करण्याचा प्रयत्न करीत होते.

जातीयवादी शक्तिंविरोधात सतत काहीतरी सुरू राहिले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. त्याअर्थाने पानसरेअण्णा अधिक व्यापक लढाई करीत होते. एकाचवेळी अनेक शत्रूंशी लढत होते. शत्रुपक्षाला चौकात उभे राहून आव्हान देत होते. डोंगराला भिडण्याची हिंमत दाखवत होते. ऐंशी वर्षे उलटून गेलेला एक माणूस इतक्या आघाड्यांवर काम करू शकतो, हे विस्मयचकित करणारे होते.

लोक शहाणे झाले पाहिजेत. त्यांना चांगले आणि वाईट यातील फरक समजला पाहिजे, एवढीच त्यांची अपेक्षा होती आणि त्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. वाईट काम करणाऱ्यांना त्यांचे हेच काम पसंत नव्हते, हे अलीकडे अनेकदा दिसून आले होते. म्हणूनच तर ज्यांनी दाभोलकरांना मारले त्यांनीच पानसरेअण्णांना मारले, असे म्हणता येते. दाभोलकरांच्यानंतर पानसरेअण्णांनाच का, याचेही उत्तर त्यातच मिळते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त पानसरे अण्णांनी कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्षाच्या मित्रांचा मेळावा बोलावला होता. मंचावर त्यांच्यासह त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी विराजमान होते. बहुतेक ज्येष्ठ मंडळी होती. त्यांच्याकडे निर्देश करून मी जाहीर भाषणात म्हणालो होतो, 'तुमच्या नेत्या-कार्यकर्त्यांची निष्ठा, चारित्र्य आण‌ि सत्तेची शक्यता नसताना सतत सुरू असलेल्या लढाया याबद्दल आदरच आहे. परंतु अण्णा, तुमचा पक्ष म्हणजे वृद्धाश्रम बनलाय. तुमच्याकडे तरुण कार्यकर्त्यांना संधी नाही. तुमच्याकडे भगतस‌िंगासारखे मॉडेल असताना तुमची विद्यार्थी आण‌ि युवक संघटना नीट कार्यरत नाही. तुमच्या कार्यकर्त्यांना नीट पत्रके लिहिता येत नाहीत, प्रसिद्धीमाध्यमांकडे वेळेवर पोहोचवता येत नाहीत. पक्ष कसा वाढणार ?' वगैरे वगैरे.

जाहीरपणे कटू बोलण्याचा संस्कार खरेतर माझ्यासारख्याने पानसरे अण्णांकडूनच घेतला होता. मेळावा संपल्यानंतर ते म्हणाले होते, 'तू आमच्या नेमक्या बाबींवर बोट ठेवलेस. आम्ही दुरुस्तीचा प्रयत्न करू…'

एवढा मनाचा मोठेपणा पानसरे अण्णाच दाखवू शकतात…

साभार: विजय चोरमारे यांच्या पेजवरून

Updated : 20 Feb 2023 2:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top