जिवंतपणी प्रेत यात्रा काढूनही न डगमगलेले आगरकर
धर्मकल्पना, मूर्तिपूजा या मानवी समाजात कशा आल्या? धर्म कल्पनेने कोणाचं पोट भरतं? मूर्ती पुजेचे प्रकार कोणते? वाचा 18 व्या शतकात सनातनी विचारसरणीला पुरुन उरणाऱ्या समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे विचार... सुनील सांगळे यांच्या लेखणीतून...
X
महाराष्ट्रातील समाजसुधारकात गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. अवघ्या एकोणचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी समाजसुधारणेबाबत एवढे मूलगामी विचार मांडले की, त्या काळातील सनातनी लोकांनी त्यांची जिवंतपणी अंत्ययात्रा काढली होती. टिळक आणि आगरकर सुरवातीला जरी एकत्र असले तरी नंतरच्या काळात समाजसुधारणेच्या विषयावर ते परस्परांसमोर विरोधक म्हणून उभे ठाकले होते.
टिळक सामाजिक विषयांच्याबाबत सनातनी विचारसरणीचे नेतृत्व करीत तर आगरकर पुरोगामी गटाचे नेतृत्व करीत होते. आगरकरांनी "सुधारक" हे साप्ताहिक १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केले आणि १७ जून १८९५ रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते त्यात सातत्याने लिखाण करीत. यात अल्प कालावधीत त्यांनी हजारो पृष्ठे भरतील एवढे लिखाण केले आहे. धर्मकल्पना कोठून आली, मूर्तिपूजा कशी सुरु झाली, मूर्तिपूजेचे प्रकार आणि उच्च धर्मकल्पना म्हणजे काय यावरही त्यांचे विचार आजही वाचण्यालायक आहेत.
आत्मा, मृतात्मा, पिशाच्चे आणि धर्म यांचा जवळचा संबंध आहे असे सांगून आगरकर म्हणतात की एकदा पुनर्जन्म मानला की दुसरे शरीर मिळेपर्यंत मृतात्मा भटकत राहतो हे मान्य करणे भाग आहे. त्यामुळे भुते-खेते असतात यावर विश्वास ठेवावा लागतो. याची वेगवेगळ्या देशात उदाहरणे आहेत.
अंदमानातील लोक पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबाला आत्माच समजतात. अनेक रानटी लोक आवाजाच्या येणाऱ्या प्रतिध्वनीला एक पिशाच्च समजतात. वैज्ञानिक कार्यकारणभाव माहित असल्याने आपल्याला हे हास्यास्पद वाटले तरी तो त्यांचा विश्वास आहे, जसा आपला आपल्या देवावर आहे. इथे आगरकर म्हणतात की भुतांवरच्या या विश्वासामुळे नरसोबाची वाडी, औदुंबर या क्षेत्री देवऋषी, पंचाक्षरी यांचे धंदे सुरु आहेत.
मनुष्याच्या सावलीलाही आत्मा समजणारे लोक आहेत. तसेच फेफरे, अपस्मार, वेडाचे झटके यात आत्म्यास असामान्य उन्नतावस्था प्राप्त होते. असाही अनेक अडाणी लोकांचा समज असतो. आगरकर म्हणतात की हे जर हास्यास्पद वाटत असेल, तर मग मनुष्य जाळून राख झाल्यावर त्याचा आत्मा इथेच कुठेतरी असतो असे मानणारे आपणही वन्यावस्थेत किंवा प्रथमावस्थेत आहोत असे बेलाशक समजावे.
मृतात्म्याची सरबराई करण्याची अनेक उदाहरणे आगरकर देतात. अंदमानात लहान मुल दगावले तर त्याच्या थडग्यापाशी त्याची आई स्वतःचे दूध कटोऱ्यात ठेवते. निकाराग्वेमध्ये दहनापुर्वी शरीराला शिधासामुग्री बांधली जाते. मृतात्म्यास थंडी वाजू नये म्हणून आहट लोक थडग्यात कांबळी ठेवतात. उरुआ लोक त्यांचा नायक गेला तर त्याच्याबरोबर त्याच्या बायका मुलांनाही पुरत. हे आपल्या विचित्र वाटले तर मग आपले पिंड देणे, शय्या देणे, पितरांना जेऊ घालणे हे काय वेगळे आहे? असे सांगून आगरकर म्हणत की…
"आज आमचे वडील येऊन ब्राह्मणमुखाद्वारे खीर खाऊन गेले, पुढच्या अष्टमीस आमच्या मातोश्री त्याच द्वाराने पिंड घेण्यास येणार आहेत असे उद्गार श्रेष्ठ म्हणविणाऱ्या ब्राह्मणांनी काढण्यापेक्षा" इतर अशिक्षित लोकांनी काढणे अधिक उचित होते.
मूर्तिपूजा तीन प्रकारची आहे आणि ती म्हणजे जड वस्तूंची पूजा, प्राण्यांची पूजा आणि वनस्पतींची पूजा. जड वस्तुत दगड, लाकूड, माती, यांचे विविध प्रकार (मूर्ती वगैरे) येतात आणि ही यादी अगदी चंद्र-सूर्य, इतर ग्रह इथपर्यंत जाते. माती, दगड, लाकूड यांच्यापासून एखाद्या देवाची मूर्ती वा प्रतिमा केली तर तिच्यात देवाचे गुणधर्म उतरतात हा ग्रह मूर्तिपूजेच्या मुळाशी आहे. पूज्य प्राणिवर्गात हवेत उडणारा, पृथ्वीवर चालणारा आणि पाण्यात पोहोणारा अशा कोणत्याही पक्षी, प्राणी आणि मासा यांच्या जातीचा अंतर्भाव करता येतो. जगातील विविध जमाती गरुड, गाय, बैल, घोडा, हत्ती, देवमासा, सर्प, इत्यादी प्राणी-पक्षी यांची पूजा करतात. वनस्पतीवर्ग तर अमर्याद आहे आणि त्यातही अनेक वनस्पती आणि वृक्ष यांच्यात औषधी गुणधर्म असल्याने ते पूजनीय समजले जाणे सोपे आहे.
त्यातही दोन प्रकार असतात. वड, पिंपळ आदी भव्य वृक्ष पडके वाडे, स्मशाने, नदीकाठ या ठिकाणी सहजगत्या वाढतात आणि त्यामुळे त्यांच्यावर मृतात्मे वास करतात या समजाने ते भारतात विशेष पूजनीय समजले जातात.
याच कारणाने स्मशानात आणि पडक्या वाड्यात राहणारी घुबडे, पाकोळ्या साप वगैरे प्राणी हे भीतीदायक समजले जाऊन भीतीने त्यांची पूजा केली जाते. हे फक्त भारतातच नाही. पोलंडचे लोक आपल्या नागपंचमी प्रमाणेच एका जातीच्या काळ्या सर्पाला अंडी खाऊ घालतात. आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका या चारही खंडात हा प्रकार आढळतो. फ्रेंच लोकही आपल्या अश्वमेधाप्रमाणे घोडा बळी देत आणि आपण अजूनही रेडा, शेळी, कोंबडी वगैरे बळी देतो.
ह्या सगळ्या कल्पना आणि मूर्तिपूजा इत्यादी मानवाच्या प्रथमावस्थेतील असून पुढे जसा बुद्धीचा विकास होतो तसतसे भूत, पिशाच्च, देव-दानव या कल्पनांची असत्यता लक्षात येऊन त्यांच्या पूजेस व प्रार्थनेस ओहोटी लागते. त्या जागी ब्रह्माण्ड उत्पन्न करून त्याचे परिपालन आणि नाश करणाऱ्या एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो आणि पुढे हे द्वैतही लयाला जाऊन अहं ब्रम्हास्मि एवढाच विचार मागे राहतो. धर्माच्या कल्पनेचा या सर्वोच्च आविष्कार आहे असे आगरकर सांगतात.
हे विचार १२५ वर्षांपूर्वीचे आहेत हे लक्षात घेतले की, आगरकर काळाच्या किती पुढे होते आणि तिन्ही त्रिकाळच्या पूजा, नैवेद्य, नवस करणे, साग्रसंगीत अंत्यविधी, नारायण नागबली, कालसर्प इत्यादी पूजा, ज्योतिषी, कुंडल्या, वास्तुशास्त्र, बळी देणे, इत्यादीत आजही गुरफटलेला समाज त्यांनी सांगितलेल्या परमेश्वराच्या प्रगल्भ कल्पनेपासून किती दूर व प्राथमिक अवस्थेतच आहे हे लक्षात येईल.
सुनील सांगळे