Home > मॅक्स ब्लॉग्ज > बेल्जियमचा लिटल आइनस्टाइन Laurent Simons !

बेल्जियमचा लिटल आइनस्टाइन Laurent Simons !

आपल्या ज्ञानाचा जगाला लाभ झाला पाहिजे आणि त्यासाठी आपले ज्ञान कामी आले पाहिजे असं म्हणणारा हा लिटल आइनस्टाइन लॉरेंट सिमॉन्स खूप भारी आणि परिपक्व वाटतो.

बेल्जियमचा लिटल आइनस्टाइन Laurent Simons !
X

हा फोटो 2021 सालचा आहे. फोटोतल्या मुलाचे तेव्हाचे वय होते अकरा वर्षे! त्याचे नाव आहे Laurent Simons लॉरेंट सिमॉन्स. त्याने वयाच्या सहाव्या वर्षी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं, आठव्या वर्षी त्याचे शालेय शिक्षण संपले. अकराव्या वर्षी त्याने भौतिकशास्त्रात पदवी अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पहिल्या क्रमांकाने पूर्ण केला. जगभरातील माध्यमांनी त्याची दखल घेतली, हा फोटो तेव्हाचाच आहे.

नुकतेच काही दिवसापूर्वी वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने अँटवर्प विद्यापीठातून क्वांटम फिजिक्समध्ये पीएचडी PhD in quantum physics प्राप्त केलीय. त्याला लोक कौतुकाने 'बेल्जियमचा लिटल आइनस्टाइन' Little Einstein of बेल्जियम म्हणतात, त्याचा आयक्यू 145 आहे! Bose polarons in superfluids and supersolids हा त्याच्या प्रबंधाचा विषय होता. त्यात त्याने डॉक्टरल थीसिस केला आहे.

लॉरेंट सिमॉन्स हा डॉक्टरेट मिळवणाऱ्या सर्वात तरुण व्यक्तींपैकी एक झाला आहे, क्वांटम फिजिक्स मध्ये डॉक्टरेट करणारा तो सर्वात तरुण युवक आहे! आपल्या उपलब्धीचा त्याला गर्व नाही, आपले यश तो विनम्रतेने स्वीकारतो आणि त्याचे क्रेडिट शिक्षण प्रणालीसह, पालक, शिक्षक यांना देतो. आपले ज्ञान भौतिकी वैद्यकीय संशोधनात वापरुन मानवी आयुष्य वाढवायचे, अमरत्वावर संशोधन करायचे आणि मानवी आरोग्यात क्रांतिकारी बदल घडवून मानवतेस पूरक असे संशोधन करण्याचा त्याचा मानस आहे. जगभरातील वैज्ञानिक त्याचे तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत.

आपल्या ज्ञानाने जगाला काही लाभ होत असतील तर ते ज्ञान कामी आले मानता येईल असे त्याचे विचार आहेत. त्याच्यापासून आपण काय शिकावे आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न, आवड असू शकते. आपण काय डोक्यावर घ्यावं हा देखील ज्याच्या त्याच्या जडणघडणीचा विषय असू शकतो.

आपल्या ज्ञानाचा जगाला लाभ झाला पाहिजे आणि त्यासाठी आपले ज्ञान कामी आले पाहिजे असं म्हणणारा हा लिटल आइनस्टाइन खूप भारी आणि परिपक्व वाटतो. तिथल्या शिक्षण प्रणालीने आणि समाजाने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. जग जेव्हा काही नवीन करत होतं तेव्हा आपण काय करत होतो याच्या काही तौलनिक नोंदी मांडाव्याशा वाटतात.

पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये 1784 च्या आसपास वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादनाला वेग मिळाला. विजेचा शोध लागल्यावर खूप बदल झाले. वेगाने वस्तू निर्माण करण्यासाठी उत्पादन साखळ्या तयार झाल्या. तेव्हा आपल्याकडची सामाजिक स्थिती दयनीय होती, तेव्हा आपण अस्पृश्यता पाळत होतो!

दुसरी औद्योगिक क्रांती 1923 च्या आसपास घडली. मोठ्या क्षमतेचे यांत्रिक कारखाने उदयास आले. कालांतराने त्यात सातत्याने विकास आणि सुधारणा होत गेल्या. या काळात आपला देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता आणि आपल्या देशातला एक मोठा समाज पाणवठ्यावरच्या अधिकारासाठी झगडत होता!

तिसऱ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात साधारणपणे 1969 च्या आसपास झाली. यामध्ये संगणकाचा वापर सुरू झाला. याच वर्षी आपल्याकडे इस्रोची स्थापना झाली आणि चौदा प्रमुख खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. राजकीय विरोध असूनही 1985 मध्ये आपल्याकडे सार्वजनिक जीवनात संगणकांचा चंचूप्रवेश झाला. म्हणजे जग धावू लागले होते आणि आपण रांगत होते!

तिसरी क्रांती अतिशय वेगाने डिजिटलायझेशन आणि रोबोटिक्सपर्यंत येऊन ठेपली. वेगवान इंटरनेटने चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात 2014 मध्ये झाली. याचाच पुढचा टप्पा म्हणजे, 2020 पासून पाश्चात्य जग कृत्रिम बुद्धीमत्तेने पुढे काय काय होणार यांचे आडाखे बांधण्यात दंग आहे, त्यावर मूलभूत संशोधन वेगाने सुरू आहे, त्यासाठीची संसाधने त्यांनी वाढवली आहेत.

या पार्श्वभूमीवर आजघडीला आपण काय करत आहोत, कशाला प्राधान्य देत आहोत आणि कुणाला डोक्यावर घेत आहोत या प्रश्नाचे उत्तर त्या त्या व्यक्तीच्या विचारसरणीनुसार, जडणघडणीनुसार येईल सबब इथे त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही. कारण अनेकांना मध्ययुगीन काळात जगण्याची घाई झाली आहे, यावर ऊर्जा खर्च करण्यात अर्थ नाही!

तूर्तास लॉरेंट सिमॉन्सचे कौतुक करतो! जगाच्या कामी येईल असे काही या मुलाच्या हातून घडले तर तो दिवस त्याच्यासाठी किती अभिमानाचा असेल नाही का!

- समीर गायकवाड, लेखक

Updated : 4 Dec 2025 10:28 AM IST
Next Story
Share it
Top