Home > मॅक्स ब्लॉग्ज > गणपतराव, हे मोह तुम्हाला का झाले नसतील...??

गणपतराव, हे मोह तुम्हाला का झाले नसतील...??

कुठल्या मातीची बनलेले असतात गणपत आबा देशमुख यांच्या सारखी माणसं? Google search करूनही याची उत्तरं मिळत का नाहीत? लाल डब्याच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या गणपत आबा देशमुख यांच्या एकूण जीवनशैलीबाबत सध्याच्या राजकारण्यांना सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी विचारलेले सवाल

गणपतराव, हे मोह तुम्हाला का झाले नसतील...??
X

असल्या लाल डब्यातून जाण्यापेक्षा लाखांच्या गाडीतून मग्रूर नजरेने आजूबाजूला बघत जावं असं का नसेल वाटलं ?

आमदार निधीच्या १० कोटीला टक्केवारीचे कोंदण का घालावेसे वाटले नसेल ?

मुंबईत समुद्र नजरेत घेणारा, आलिशान फ्लॅट टक्केवारीतून घेत, सामाजिक ताणाचा विरंगुळा का घ्यावासा वाटला नसेल ?

मतदार संघात अवैध धंदे,बिल्डर लॉबीच्या उद्योगाकडे फक्त 'दुर्लक्ष' करण्याच्या रकमेतून देश विदेशी पर्यटनाची शक्यता का अजमावली नसेल?

मुंबईत पंचतारांकित हॉटेलात बुद्धिजीवी घेऊन देशातील दारिद्र्यावर चर्चा का करावीशी वाटली नसेल..?

नष्ट होत चाललेल्या पक्षात थांबण्यापेक्षा जनतेच्या विकासाच्या नावाखाली पक्षांतर करून लाल दिवा का पेटवला नसेल..?

असे अनेक प्रश्न पडतात गणपतराव, ज्याची उत्तरे माहित असूनही नीट समजत नाहीत. की बेरीज वजाबाकी समजूनही हिशोब लागत नाही अशा अहिशोबी आयुष्याचा...

मोहाच्या क्षणावर ही माणसं कशी मात करत असतील? इतरांच्या गाड्या,वैध,अवैध संपत्ती बघून नसेल का मनात येत यांच्या असे असावे आपलेही काही...?

१० पिढ्याची सोय करणारे आजूबाजूला असताना किमान पुढच्या दोन पिढ्यांची सोय तरी करावी...? इतके निष्कलंक समर्पित जगून तुम्हाला समाधान सोडून काय मिळाले असेल गणपतराव....?

हे सारं सोडून तुम्ही काय मिळवता पैसे कमावणारे यंत्र झालेल्या आम्हाला कळत नाही

हे ऐहिक आनन्द गमावताना, तुम्ही काय कमावता ? हे आमच्या पिढीला कळत नाही

कळलं तरी वळत नाही..

आमच्या रेंजबाहेर जगणारी तुमच्यासारखी आयुष्ये आम्हाला अनरिचेबल वाटतात.....

हे सारे कुठून येते.....?

कुठल्या मातीची बनलेले असता तुम्ही....?

Google search करूनही याची उत्तरं मिळत नाही. संपत्ती उधळून देणारा कुसुमाग्रजांचा नटसम्राट गणपतराव आणि इथे आयुष्य उधळून देणारा हा गणपतराव.

नष्ट होणाऱ्या प्रजातीतील तुम्ही शेवटच्या काही वनस्पती...

नंतर उरेल फक्त वाळवंट,

इथे वनस्पती होत्या हे सांगणारे....

हेरंबकुलकर्णी (8208589195)

Updated : 31 July 2021 3:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top