Home > मॅक्स ब्लॉग्ज > डॉ गेल ऑम्वेट यांना क्रांतीकारी गाण्यातून अखेरचा निरोप

डॉ गेल ऑम्वेट यांना क्रांतीकारी गाण्यातून अखेरचा निरोप

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट यांचं नुकतंच निधन झालं. डॉ. गेल यांची अंत्ययात्रा देखील क्रांतीकारकच ठरली. आपल्या कामाने समाजात क्रांती घडवणाऱ्या गेल यांना क्रांतीकारक गाण्यांनी अखेरचा निरोप दिला. गेल यांच्या अंत्ययात्रेचं सागर गोतपागर यांनी केलेलं वर्णन

डॉ गेल ऑम्वेट यांना क्रांतीकारी गाण्यातून अखेरचा निरोप
X

सूर्योदयापासून कासेगावच्या दिशेने लोकांचे जत्थे हळु हळु पोहचत होते. यातील बहुतांश लोक काखेत बॅगा पकडून आलेले कष्टकरी दिसत होते. कासोटा बांधलेल्या दूरदूरच्या बाया घाई गडबडीत पुढे सरकत होत्या. गेल यांचे पार्थिव घरासमोर ठेवलेले होते. एक एक करून लोक त्यांच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेत होते. हात जोडून अभिवादन करत होते.

त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीत ठेवण्यात आले. पार्थिवाच्या शेजारी डॉ. भारत पाटणकर हे खुर्चीवर बसलेले होते. डॉक्टर आणि गेल यांची हि सोबत बैठक शेवटचीच आहे. हे पाहून पाहणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. येरळा काठावर बळीराजा धरणाच्या बाजूला कार्यक्रमात बसलेले गेल आणि भारत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना गाडीत बसलेले गेल आणि भारत, निघताना कार्यकर्त्याचा निरोप घेताना स्मित हास्य करत हात उंचावलेले गेल आणि भारत या प्रसंगानंतर एकत्र कधीच दिसणार नाहीत. या दोघांच्या सहवास जवळून अनुभवणारे संतोष गोठल तिथेच घुटमळत होते. कावरे बावरे झालेले होते. त्यांना इथून पुढे धावत येऊन गेल यांना आधार द्यावा लागणार नव्हता.




अंत्ययात्रा हळू हळू पुढे सरकत होती. या प्रचंड दुःखातदेखील कार्यकर्ते " गेल आॅम्वेट को जय भीम, लाल सलाम" गेल ओमवेट अमर रहे अशा घोषणा देत होते. या देशातल्या बायांना, आया बहिणींना सांगाया जायाच हाय गं... एकी करून आणि लढा पुकारून ह्यो तुरुंग फोडायचा हाय .. अशा गाण्यांनी लोकांना भविष्यातील लढ्यासाठी स्वयं प्रेरित करत होते. जय भीम च्या घोषणांनी कासेगाव परिसर दणानत होता. रस्त्यात ट्रॅक्टर थांबवून आया बाया फुल वाहून अभिवादन करत होत्या. दारातून महिला अभिवादन करत होत्या.

अंत्ययात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते.कुणी सातपुड्याच्या डोंगररांगातून तर कुणी विदर्भ मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून. आपापल्या भागात गेल यांनी भेट दिल्याचे तसेच लढा उभारल्याच्या आठवणी कार्यकर्ते एकमेकांना सांगत होते.

अंत्यविधीच्या ठिकाणी पार्थिव पोहाचताच लोकांचा गलका वाढला. जो तो अखेरचे दर्शन घेण्यासाठी टाचा उंच करून तसेच तेथील इमारतीवर चढून प्रयत्न करत होता. क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकसंस्थेचा परिसर माणसांनी फुलून गेला होता. पार्थिव ट्रॉलीतून खाली घेण्यात आले. बाजूला कासेगावच्या मातीवर सरण रचण्यात आले होते. अमेरिकेत जन्मलेल्या गेल यांचे भारताच्या मातीत होत असलेले निर्वाण हा त्यांचा बुध्दाच्या मार्गावरील शरीराचा अखेरचा थांबा होता. त्यांचे पार्थिव सरणावर ठेवले गेले.



पाहता पाहता गेल पूर्ण शरीर लाकडानी झाकले गेले. केवळ तोंड दिसत होते. त्यांची मुलगी प्राची हुंदके देत होती. डॉक्टर आवंढा गिळून तिला धीर देत होते. काही क्षणात त्रिसरण म्हणण्यात आलं. बुद्धं सरणं गच्छामी.... अत: दीप भव म्हणत डॉक्टर आणि प्राची पुढे सरकले. समता सैनिक दलाने अखेरची मानवंदना दिली. प्राचीने सरणावर लाकडानी आच्छादलेल्या आईचे शेवटचे चुंबन घेतले. डॉक्टर आपल्या प्रियतमेचे अखेरचे चुंबन घेण्यास सरणातील लाकडावर डोके टेकवताच सर्वांचा हुंदका दाटून आला. लोकांनी त्यांना बाजूला केले. प्राचीने मुखाग्नी दिला. लोक बाजूला झाले. धडाधड चीता जळत राहिली. काही क्षण त्या अग्नीचा प्रकाश बाजूच्या लोकांवर पडत राहिला.




गेल यांनी त्यांच्या कर्तुत्वाने, संशोधनाने, लढ्याने निर्माण केलेला प्रकाश हा येणाऱ्या अनेक पिढ्यांना अंधारातून वाट दाखवेल. पाठीमागे जळत असलेले आपल्या जीवनासाथीचे पार्थिव या स्थितीत डॉ भारत पाटणकर बोलायला उभे राहिले. गेल मेलेली नाही ती मरणार नाहीच.... डॉ. भारत पाटणकर

सब्ब दुःख ते सब्ब मंगल हे बुद्धाचे वचन त्याच लोकांच्या दुःख मुक्तीसाठी गेल अखेरपर्यंत लढल्याचे सांगत ते म्हणाले " गेल मेलेली नाही, ती मरणार नाहीच. ती जिवंत आहे. ती तुम्हाला शहादा तालुक्यातील उपेक्षित भिल्ल समाजातील ठगीबाईच्या आठवणीत, वाहरू भाऊंच्या आठवणीत, गेल तिच्या पुस्तकरूपात कायमस्वरुपी जिवंत राहील." शेवटी आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान हे गीत म्हणत गेल यांची पुस्तके उंचावत या अंत्ययात्रेच्या शेवट झाला.

Updated : 27 Aug 2021 8:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top