Home > मॅक्स ब्लॉग्ज > ईस्ट इंडिया कंपनी:ऐतिहासिक वर्तुळ पूर्ती

ईस्ट इंडिया कंपनी:ऐतिहासिक वर्तुळ पूर्ती

लंडनमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्याला असताना तिथल्या जगप्रसिद्ध आक्सफर्ड स्ट्रिटवर एका जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक तितकाच जुना फलक बधितला : धी ईस्ट इंडिया कंपनी! मन भुर्रकन मागे इतिहासात गेले. व्यापाराच्या आवरणाखाली राजकीय प्रभुसत्ता कशी मिळवता व राबवता येते, याचे उदाहरण म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी! सांगताहेत ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत...

ईस्ट इंडिया कंपनी:ऐतिहासिक वर्तुळ पूर्ती
X

व्यापार करण्यासाठी येऊन नंतर हिंदुस्थानवर शंभर वर्षे सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा आज स्थापना दिन. १६०० साल संपत असताना शेवटच्या दिवशी ही कंपनी अस्तित्वात आली. इंग्लंडमध्ये स्थापन झालेल्या या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत म्हणजे पूर्व आशियात व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्यापार भारतातच झाला.

कंपनीचे सुरुवातीला १२५ भागधारक होते व ७२ हजार पौंडांचे भागभंडवल जमले होते. पोर्तुगीज, डच व फ्रेंच कंपन्यांनी हिंदुस्थानात विविध शहरांत बस्तान बसवल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने १६०८ सुरतेस प्रवेश केला. नंतर १६११मध्ये दक्षिणेत मछलीपट्ट्नमध्ये बस्तान बसवल्यावर १६१२ मध्ये कंपनीने सुरतेची वखार ताब्यात घेऊन आपले पंख पसरायला सुरुवात केली. १६१२मध्ये स्वालीच्या लढाईत कंपनीच्या सैन्याने पोर्तुगिजांचा पराजय करून बादशाह जहांगिराची मर्जी संपादन केली.

वॅारन हेस्टिंग हा कंपनीचा हिंदुस्तानातील पहिला गव्हर्नर जनरल. त्यानेच व्यापाराच्या नावाखाली विस्तारवादाला सुरुवात केली व एका बाजूला व्यापारात करसवलती मिळवत असताना वसाहती स्थापन केल्या. दख्खन प्रांतात छत्रपती शिवाजी महाराज होते, तोवर कंपनीचे महाराष्ट्रात काही चालले नाही. उलट महाराजांच्या राज्याभिषेक सोहाळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहून कंपनीच्या प्रतिनिधीने नजराणा बहाल केला व व्यापारासाठी संरक्षणाची याचना केली, असे संदर्भ सापडतात.

१६३९ मद्रास वखार कंपनीने घेतली. १६४७ पर्यंत कंपनीकडे २३ वखारी ९० कर्मचारी होते. नंतर १६६८ मध्ये त्यांनी मुंबई वखार मिळवली. १६७० मध्ये कंपनीने सैन्य बाळगण्याचे, युद्धाचे अधिकार ब्रिटीश सरकारकडून मिळवले. नंतर १६९० मध्ये कलकत्ता वखार घेतल्यावर भारतातील तीनही महत्त्वाच्या बंदरांवर कंपनीचे प्रभुत्व प्रस्थापित झाले.

पण त्यामुळेच कंपनीचे फ्रेंचांबरोबर वितुष्ट आले. त्याचे पर्यावसान १७५७ मध्ये प्लासी च्या लढाईत झाले. फ्रेंच सेनाधिकारी डुप्लेचा कंपनीच्या रॉबर्ट क्लाईव्हने सपशेल पराभव केला. अखेर १७६० मध्ये ईस्ट इंडिया कंपनी फ्रेंचांपेक्षा वरचढ ठरली.

नंतर विविध मार्गांनी व क्लृप्या करून कंपनीने देशातील लहान-मोठी संस्थाने खालसा करण्यास सुरुवात केली. त्यातूनच असंतोष खदखदू लागला व १८५७चा भारतीय स्वातंत्र्यसंग्राम पेटला. हे युद्ध कंपनीने जिंकले मात्र ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाने हिंदुस्तानचा कारभार कंपनीकडून ब्रिटिश सरकारकडे घेतला.

१७५७मध्ये स्थापन झालेली कंपनीची प्रभुसत्ता १८५८मध्ये बुडाली. आजही ही कंपनी केवळ नाममात्र रुपात अस्तित्वात आहे. मात्र तिची मालकी श्री संजय मेहता या एका भारतीय व्यापाऱ्याकडे आहे.

एक ऐतिहासिक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

- भारतकुमार राऊत

Updated : 31 Dec 2020 4:48 AM GMT
Tags:    
author-thhumb

भारतकुमार

Print & TV Journalist,Political Analyst and formerMember of Parliament (RS). Worked in India & abroad and in English & Marathi. Opinions are strictly personal.


Next Story
Share it
Top