Home > मॅक्स ब्लॉग्ज > भारत जोडो यात्रा हीच 'Idea of India', सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

भारत जोडो यात्रा हीच 'Idea of India', सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास संपला आणि यात्रा मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाली. यापार्श्वभुमीवर सतेज पाटील यांनी राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भारत जोडो यात्रा हीच Idea of India, सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
X

राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो यात्रेचा 14 दिवसांचा महाराष्ट्रातील प्रवास संपला आणि हि यात्रा मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाली. मात्र ही यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधी यांनी संतांच्या भुमीत क्रांतीची बीजे रुजवली, अशी प्रतिक्रीया सतेज पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात सतेज पाटील यांनी ट्वीट केले आहे.

सतेज पाटील यांचे ट्वीट

संतांच्या भूमीत रुजली नव्या क्रांतीची बीजे! राहुलजी, महाराष्ट्र आपला आभारी आहे...

ज्या ज्या वेळी देशामध्ये कोणतीही क्रांती घडते, त्या त्या वेळी त्या क्रांतीचे नेतृत्व करण्याचे, त्यामध्ये अग्रेसर राहण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. प्रबोधनाचा वारसा सांगणारी संत परंपरा, रयतेचे राज्य आणणारे छत्रपती शिवाजी महाराज, समतेचा विचार कृतीत आणणारे राजर्षी शाहू महाराज आणि विचारांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात गेले १५ दिवस २१ व्या शतकातील क्रांतीची वाटचाल सुरू होती आणि ती क्रांती म्हणजे "भारत जोडो" यात्रा!

समस्त भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून नांदेड येथे सुरू झालेला या यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा, संत भूमी शेगांव येथील लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या सभेने कळसाला पोहोचला. जणू भक्ती - शक्तीचा अनोखा संगम महाराष्ट्राने पाहिला. आज या यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा जरी संपत असला तरी या यात्रेने मनांमनात पेटवलेली समतेची, सहिष्णूतेची आणि क्रांतीची ज्योत कायम तेवत राहणार आहे.

या यात्रेत राहुलजीं सोबत चालताना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल असलेले प्रेम! द्वेषाला प्रेमाने जिंकता येते याचा वस्तुपाठ राहुलजींनी या यात्रेत घालून दिला आहे.

कोणी आपल्या मुलांना कमरेला बांधून त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी या यात्रेत स्व प्रेरणेने चालत होते तर कोणी ७३ वर्षाच्या आजी राहुल गांधीच देश बदलू शकतात या भावनेने चालत होत्या. काँग्रेसचे कार्यकर्ते तर या यात्रेत होतेच पण 'Idea of India'वर विश्वास असणारे व देश टिकवायचा असेल तर राहुलजींच्या नेतृत्वाला पर्याय नाही, असे मानणारे असंख्य सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लेखक, प्राध्यापक या यात्रेत सामील झाले होते. या सर्वांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे आम्हा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनाही देश बदलाच्या उंबरठ्यावर आहे, हे जाणवत होते.

राहुलजींना भेटल्यावर अबालवृद्धांचे भरून येणारे डोळे, त्यांना आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी आसुसलेली युवा पिढी व या सगळ्यांना शांतपणे ऐकून, हृदयाशी कवटाळून आश्वस्त करणारे राहुलजी, त्यांनी जवळ घेतल्यावर दिसणारी चिमुरड्यांचा डोळ्यातील चमक हे या १५ दिवसातले कॉमन चित्र होते. त्यामुळेच महाराष्ट्रातील हा प्रवास आणि या ऐतिहासिक भूमीतील समाजाने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आदरणीय राहुलजींना नवी प्रेरणा देणारा, वैचारिक दृष्ट्या समृद्ध करणारा आणि दिल्लीच्या तख्ताला हादरे देण्यासाठी नवे बळ देणारा ठरला असेल.

ज्या ज्या वेळी गांधी परिवारातील कोणीही चालू लागतो, त्यावेळी देशात क्रांती घडते आणि देश प्रगतीच्या वाटेवर वेगाने घोडदौड करतो, हा इतिहास आहे. राहुलजींची भारत जोडो यात्रा या इतिहासाची पुनरावृत्ती नक्की करेल. इतकेच काय तर ज्यावेळी २१ व्या शतकातील भारताचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी देशाच्या सामाजिक उन्नतीसाठी काढली गेलेली ही ३५०० किलोमीटर ची ही यात्रा आणि या यात्रेचे नायक म्हणून राहुल जींची नोंद सुवर्ण अक्षराने केले जाईल, हे नक्की.

भारतातील सामान्य जनता द्वेषाच्या आणि सुडाच्या राजकारणाला कंटाळली आहे, महागाई- बेरोजगारीने त्रासलेली आहे आणि भारताचे भविष्य हे राहुलजींच्याच हातात सुरक्षित राहील असा विश्वास निर्माण होत आहे आणि हे या १५ दिवसात सिद्ध झालेले आहे. माझ्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्याला या यात्रेने प्रचंड ऊर्जा आणि बळ मिळाले. या नव्या उमेदीने माझ्यासह सर्वच कार्यकर्ते भारत जोडण्यासाठी यापुढेही काम करत राहतील. राहुलजी, महाराष्ट्रातील जनतेला या लढ्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल तुमचे महाराष्ट्रवासीयांतर्फे मन:पूर्वक आभार!

Updated : 21 Nov 2022 5:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top