First Republic Day Celebrations : ...असा साजरा झाला पहिला प्रजासत्ताक दिन !
दिल्लीसोबत मुंबईत कसा साजरा झाला होता पहिला प्रजासत्ताक दिन ? जाणून घ्या महाराष्ट्र लोकभवन जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याकडून
X
First Republic Day Celebrations दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी भारत सर्वार्थाने स्वतंत्र व आत्मनिर्भर झाला. दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला तरी देखील संविधान तयार होईपर्यंत भारत ब्रिटनचे स्वतंत्र अधिराज्य (dominion) होता.
दिनांक २४ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना समितीची शेवटची बैठक झाली. बैठकीत डॉ राजेंद्र प्रसाद यांची देशाचे राष्ट्रपती म्हणून सर्वसंमतीने निवड झाली. दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी सकाळी साडेदहा वाजता 'गव्हर्मेंट हाऊस' नवी दिल्ली (कालांतराने त्याचे नाव 'राष्ट्रपती भवन' झाले) येथील दरबार हॉल येथे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
त्यानंतर भारताचे सरन्यायाधीश न्या. सर हरिलाल कानिया यांनी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. राष्ट्रपतींना यावेळी ३१ बंदुकींची सलामी देण्यात आली. आपली शपथ झाल्यावर राष्ट्रपतींनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य, ज्यांनी राष्ट्रपतींना शपथ दिली ते सरन्यायाधीश न्या. कानिया आणि लोकसभेचे अध्यक्ष यांना प्रजासत्ताक शपथ दिली.
मुंबईतील प्रजासत्ताक दिन
भारत प्रजासत्ताक झाला त्यावेळी मुंबई प्रांताचे राज्यपाल होते राजा महाराज सिंह. देशाने राज्यघटना स्वीकारल्यामुळे राज्यपाल हे सार्वभौम अश्या प्रजासत्ताकाचे प्रतिनिधी झाले होते. त्यामुळे सर्वच राज्यपालांना शपथ घेण्याचे सांगण्यात आले होते. दिनांक ७ जानेवारी १९५० रोजी केंद्र शासनातर्फे 'द कॉन्स्टिट्यूशन : रिमुव्हल ऑफ डिफिकल्टीज ऑर्डर' हा आदेश विशेषत्वाने जारी करण्यात आला. त्यानुसार मुख्य न्यायमूर्तींना राज्यपालांना पदाची शपथ देण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले.
दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी 'टाऊन हॉल' म्हणजे आजचे एशियाटिक सोसायटीचे सभागृह येथे सकाळी दहा वाजता झालेल्या या पहिल्या प्रजासत्ताक शपथविधी सोहळ्यात सुरुवातीला राज्यपालांनी राज्यघटनेची उद्देशिका वाचली. त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती न्या. एम सी छगला यांनी राज्यपाल राजा महाराज सिंह यांना राज्यघटनेनुसार नवी शपथ दिली. राज्यपालांना त्यावेळी १७ बंदुकीची सलामी देण्यात आली. याच सोहळ्यात राज्यपालांनी मुख्यमंत्री बी. जी. खेर, त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना व न्या. छगला यांना राज्यघटनेनुसार शपथ दिली.
मुंबईत जल्लोष
त्यावेळच्या वृत्तपत्रानुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी प्रभातफेऱ्या काढण्यात आल्या, सर्वत्र राष्ट्रभक्तीपर गाणे वाजवण्यात येत होते. रस्त्यांवर गर्दी होती. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत लोकांचा जल्लोष सुरु होत्या. लोक गाड्यांचे हॉर्न वाजवत होते.
ब्रेबॉर्न स्टेडियम येथे परेड आणि संचलन
प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी राज्यपाल राजा महाराज सिंह आणि राणी महाराज सिंह यांना मिलिटरी कॉन्व्हॉयने राजभवन येथून ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या समारंभीय परेडसाठी नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांनी परेडचे निरीक्षण केले व मानवंदना स्वीकारली. अश्या प्रकारे पहिलावहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि प्रजासत्ताकाची वाटचाल सुरु झाली. भारतीय राज्यघटनेने देशाला आणि जनतेला लोकशाही मूल्यांवर आधारित एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळख दिली. राज्यघटनेने नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांची हमी दिली. राज्यघटनेने मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि शासनव्यवस्थेची रचना प्रदान करून देशाला एकसंध राखण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
Republic Day India, Indian Constitution, January 26, Dr. Rajendra Prasad, Jawaharlal Nehru






