Home > मॅक्स ब्लॉग्ज > मराठवाडा पूरग्रस्त भागातील सद्यस्थिती : नदीपात्रातील विहिरी, नदीत साचलेला गाळ आणि सुगरीण पक्ष्याचा खोपा

मराठवाडा पूरग्रस्त भागातील सद्यस्थिती : नदीपात्रातील विहिरी, नदीत साचलेला गाळ आणि सुगरीण पक्ष्याचा खोपा

नुकसानीचं बायांना काय कळतंय? ते तर गडी माणसांच काम! असं बोलता बोलता सोयाबीनच्या शेंगापण तुटून गेल्या, दूधदुभतंही नाही, कपाशीने तर मानचं टाकलीय अश्या परिस्थितीत कसा संसार चालवायचा ? वाचा मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात दौरा करणाऱ्या सिरत सातपुते यांचा अनुभव

मराठवाडा पूरग्रस्त भागातील सद्यस्थिती : नदीपात्रातील विहिरी, नदीत साचलेला गाळ आणि सुगरीण पक्ष्याचा खोपा
X

सुगरीण पक्ष्याने खोपा बांधायला घेतला आणि अर्ध्यावरच बांधकाम सोडून निघून गेला. माणसांच्या राज्यात पक्ष्यांनाही सुरक्षित वाटू नये अशी परिस्थिती! मराठवाड्यातील महापूरग्रस्त भागातील नदीकाठच्या शेतजमिनी बरोबरच नदीकाठची परिसंस्थाही उध्वस्त झालीय. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतेय. नदीपात्रातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेलही, शेतीही पूर्ववत होईल. पण आपल्या हव्यासासाठी आपण एक जिवंत परिसंस्था उध्वस्त करतोय हे माणसाच्या लक्षात येईल तो सुदिन!



मराठवाडा पूरग्रस्त भागात पाहणी करत फिरत असताना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बोरगाव बुद्रुक इथे नदीने प्रवाह बदलल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असे सांगण्यात आले. नदीपात्रात विहिरी दिसत होत्या. हे काय आहे हे विचारल्यावर उसाच्या बागायतीसाठी नदीपात्रातच विहिरी बांधलेल्या समोर आल्या.



या विहिरीतून होणारा वारेमाप उपसा आणि त्यातून बागायतीसाठी होणारी नदीच्या पाण्याची लूट ही त्या भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मुळावरच उठणारी आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी उपसा झाल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना रब्बीची पिके घेणे मुश्किल झाले आहे. तसेच अमर्यादित पाणी उपशामुळे नदीपात्रातील वाळूचे प्रमाण वाढले आहे. वाळू हे गौण खनिज असल्याने ही अतिरिक्त वाळू शेतकरी परवानगी शिवाय काढू शकत नाहीत. कमी वेळेत ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी अचानक वाढली आणि लगतच्या शेतांत पाणी शिरले. हे पाणी ओसरले पण खरीपाच्या पिकांचे नुकसान करून गेले. आणि आता रब्बी पिके घ्यायची तर शेते वाळूने भरलेली. बागायतीचे नुकसान झाले आहेच पण त्याचबरोबर सामान्य गरीब शेतकरी नाडला गेला आहे.



हीच परिस्थिती आहे दैठन गावातील सामान्य शेतकऱ्यांची. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील हे गाव बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील.

नदीतला गाळ गेल्या कित्येक वर्षात काढला नसल्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि बघता बघता गावात पाणी शिरले. दिड महिन्यानंतर अजूनही शेतात सोयाबीनचे वाळलेले सराटे बघायला मिळतात. दिवसाला 2 हजार लिटर दूध गोळा होणाऱ्या या गावात जनावरांना घालायला चारा शिल्लक नाही. चारा छावण्या हा तातडीचा उपाय करणे आपल्या असंवेदनशील सरकारला अद्याप जमले नाही.










स्वयंसेवी संस्थानी केलेल्या मदतीला मर्यादा आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा खवा बनवणे हा जोड धंदा आहे. केज तालुक्यातील सर्वात जास्त खवा बनवणारे गाव ही ओळख असलेल्या या गावात खवा बनवण्याच्या कढया रिकाम्याच राहिल्यात आणि जनावरांना बाजारची वाट दाखवली गेलीय.











पाहाणी करताना भेटलेल्या कावेरीबाई सातपुते झालेल्या नुकसानीचं बायांना काय कळतंय? ते तर गडी माणसांच काम! असं बोलता बोलता सोयाबीनच्या शेंगापण तुटून गेल्या, दूधदुभतंही नाही, कपाशीने तर मानचं टाकलीय अश्या परिस्थितीत कसा संसार चालवायचा असा निरुत्तर करणारा सवाल विचारतात. पुढच्या मोसमासाठी करु काहीतरी असं चेहऱ्यावर हसू कायम ठेवत बोलत असल्या तरी त्यामागची वेदना काही लपत नव्हती. मराठवाड्यात नेहमीच कमी पाऊस म्हणता म्हणता अचानक पडलेल्या पावसाने हाहाकार माजवला आणि सरकारी अनास्थेला बळीराजाच बळी पडला. वेळीच गाळ काढला असता तसेच हव्यासापोटी बेकायदेशीर मार्गाने नदीतील पाणी उपसून नदीकाढचे वाळवंट झाले नसते तर कदाचित बळीराजा आज विवंचनेत नसता!

#मराठवाडाडायरी

#महापूर

सिरत सातपुते

(लेखक)

(साभार - सदर पोस्ट सिरत सातपुते यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 12 Nov 2025 9:56 AM IST
Next Story
Share it
Top