Home > मॅक्स ब्लॉग्ज > "भूजल पातळीच्या सूरक्षिततेची पूर्ण खात्री ठेवूनच शेततळ्यांचा विचार झाला पाहिजे"

"भूजल पातळीच्या सूरक्षिततेची पूर्ण खात्री ठेवूनच शेततळ्यांचा विचार झाला पाहिजे"

भूजल पातळीच्या सूरक्षिततेची पूर्ण खात्री ठेवूनच शेततळ्यांचा विचार झाला पाहिजे
X

बोअरवेल तंत्रज्ञान आले तेव्हा सूरूवातीच्या काळात शेतकरी प्रचंड खूश होता. मात्र आज जमिनीची अक्षरशः चाळणी झाली, भुजल पातळी खोल जावून भुगर्भ कोरडा होवू लागला म्हणून सरकारला आता बोअरवेलच्या खोलीवर नियंत्रण ठेवण्यासाठीचा किंबहुना काही भागात तर बोअरवेलबंदीचा कायदा करावा लागत आहे. असेच काही शेततळ्यांचे देखील होणार हे अपेक्षेपेक्षाही लवकर दिसू लागले आहे. शेततळ्यांचा भुजल पातळीवर होणारा परिणाम पहाता भूजलसाठा हि “गरीबांची ठेव कि श्रीमंतांची चैन” याचा निश्चितच विचार केला पाहिजे.

सततच्या दुष्काळाने शेतकरी पुरता हतबल आहे, पाणीटंचाईमुळे वाढत्या आत्महत्या यामुळे शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेती उत्पादनात शाश्वतता आणणे गरजेचे झाले आहे. म्हणूनच “राज्यातील पर्जन्यावर आधारित शेतीसाठी (कोरडवाहू) पाणलोट-जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित-शाश्वत सिंचनाची सोय करणे” अशा उदात्त हेतुने सरकारतर्फे “मागेल त्याला शेततळे” ही योजना जाहीर केली गेली. राज्यभरातील शेतकऱ्यांकडे स्वत:ची सिंचनव्यवस्था असावी यासाठी पहिल्या टप्प्यात 51,500 शेततळ्यांची निर्मिती असे महत्वाकांक्षी धोरण आखले गेले.

‘पावसाचे भूपृष्ठावरील वाहून जाणारे पाणी शेततळ्यात साठवून त्याचा उपयोग जलसिंचनासाठी व्हावा, अनियमीत पावसामूळे जेंव्हा पिकास ताण पडतो अशा वेळी शेततळ्यात साठवलेल्या पाण्याने एखादे दुसरे आवर्तन पिकास देता आल्यास पिक हमखास येईल’ हा शेततळ्याचा मुख्य उद्देश. आजवरच्या जलसंधारणाच्या योजना जास्त करुन सरकारी खर्च आणि सामुहिक हित अशा प्रकारच्या होत्या परंतु शेततळ्याची योजना शासकीय अनुदान आणि वैयक्तिक लाभ अशा प्रकारची आहे. शेततळ्यात साठवलेल्या पाण्याचा तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करून हमखास पाण्याची खात्री होऊन पीक-उत्पन्न मिळत असल्याने असा ‘वैयक्तिक लाभ’ हेच या योजनेचे मुख्य आकर्षण ठरतेय असे चित्र पहायला मिळत असले तरी माझ्या दृष्टीने हिच या योजनेतील मुख्य त्रुटी होय, ती कशी हे जाणून घेण्याआधी आपण 'मागेल त्याला शेततळे' योजना अंमलबजावणीसाठी जी मार्गदर्शिका आहे, त्याबाबत थोडी माहिती घेऊ.

शेततळे म्हणजे काय?

पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी शेतजमिनीत खोदलेल्या मोठ्या खड्ड्यास शेततळे असे म्हणतात. पडीक क्षेत्रात शेततळे घेतात. शेततळ्यात पावसाचे पाणी साठण्यासाठी शेततळ्याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राची आवश्यकता असते. (याव्यतिरिक्त इतर ठिकाणांहून पाणी आणून शेतात तळे करून साठवितात त्याला साठवणूक तळे असे म्हणतात).

शेततळ्याचे जागा निवडीचे तांत्रिक निकष

1. जमीनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी असावे.

2. काळी जमीन व चिकन मातीचे प्रमाण जास्त असावेत.

3. मुरमाड, वालूकामय, सच्छिद्ग खडक किंवा खारवट जमीन असू नये.

4. ज्या ठिकाणी जमीनीचा उतार 3 % पर्यंत असेल त्या ठिकाणी शेततळे घेण्यात यावे.

5. मागणी केलेल्या आकारमानाचे शेततळे लाभार्थीच्या स्वतःच्याच शेतात बसेल व चारही बाजूस किमान 10 फूट जागा राहील अशीच जागा निवडावी.

6. पाठबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात शेततळी घेण्यात येऊ नये.नाल्याच्या/ ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेऊ नये.

7. शेततळ्याचे इनलेट/प्रवेशद्वाराच्या अगोदर साधारण दोन मी. अंतरावर 2x2x1 मी. आकाराचा सिल्ट ट्रॅप (गाळ साठणारा पिंजरा) चे खोदकाम करावे व गवत लावावे शेततळ्याच्या दोन्ही द्वाराजवळ 2 मी लांबीपर्यंत दगडाची पिचिंग करावी.

शेततळ्याचे आकारमान

शेततळ्याच्या पाणलोट क्षेत्रावर पडणारे पावसाचे पाणी पावसाच्या अपधावामुळे शेतात येते. पावसाच्या अपधावेमुळे येणारे सर्व पाणी साठविण्याइतपत शेततळ्याचा आकार असावा. शेततळ्याची सर्वसाधारण खोली 2 ते 3 मीटर , शेततळ्याचा आतील उतार जमिनीच्या मगदुरानुसार 1:1 किंवा 1.5 :1 ठेवावा.

शेततळ्याचे फायदे

शेततळ्यामुळे भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते, आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते, पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग होतो.

शेततळ्याची निगा

शेततळे हे काळ्या खोल जमिनीवर तयार केले असेल तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते म्हणून शेततळे बनविण्यापूर्वी मृद व जलसंधारणाचे उपाय करावेत. जेणे करून पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर गाळ वाहून येणार नाही. तसेच शेततळ्यात गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी शेततळ्यात प्रवेश करतो, त्या अगोदर २ x २ x १ मीटर आकाराचे खोदकाम करावे आणि पाणी ज्या बाजूने निर्गमित होते, त्याठिकाणी गवत लावावे त्यामुळे गाळ खड्डयामध्ये साचेल.

मुख्य समस्या, आताची स्थिती

लहानशा 50 x50 फुट ते 150 x 150 फुटापर्यंत, रूपये 50,000 ते पाच लाख खर्च, सरकारी अनूदानातून वा स्वखर्चाने किंवा मग वर्गणीतूनही, शेतकरी अगदी झपाटून टाकल्याप्रमाणे शेततळी निर्माणाच्या मागे धावतो आहे असे चित्र. एक गाव पाहण्यात आले, जिथे 70 पेक्षा जास्त शेततळी होती. शेततळीधारकांनी उत्साहाने शेततळ्यांचे फायदे सांगितले, जसे की वर्षभर शाश्वत पाणी पूरवठा, ठिबकद्वारे उत्तम पीक उत्पादन. परंतु, त्याच गावात चौकशी करता पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू असल्याचेही दिसून आले.

शेततळ्यांमूळेच हि परिस्थिती उदभवली असे दाव्याने म्हणण्याकरिता काही गोष्टी कागदोपत्री आवश्यक आहेत जसे, त्याठिकाणच्या भूजल पातळीचा मागील 05 वर्षाचा हिशेब जो केंद्र अथवा राज्य शासनाचे भूजल निरीक्षण केंद्र असेल तर मिळु शकतो परंतु दूर्दैवाने त्या भागात नाही. दुसरे म्हणजे शेततळे संरचना, ते उताराच्या बाजूस आहे का? पाऊस काळात पाणी वाहण्याची दिशा, एकूण प्रमाण, ते शेततळ्यात पोचणार कसे , फिल्टर ईत्यादी.

परिस्थिती अशी आहे की, खात्रीने सिंचन होते त्यामुळे शेतकऱ्यांना शेततळे हवे आहे आणि शासनाने "मागेल त्याला शेततळे" योजनेअंतर्गत तसे उपलब्ध करवणेदेखील सूरू केले आहे. बडे शेतकरी त्याचा फायदा घेऊन अजून गब्बर होत आहेत.

जोवर आजूबाजूला भूगर्भात पाणी होते ते उपसून शेततळी भरणारे आता हि तळी भरलीच जात नाही आणि विनाकारण जागा आटतेय म्हणून चिंता करत आहेत. या सर्वात मोठे नुकसान होते आहे ते अल्पभूधारक, गरीब शेतकऱ्यांचे. तो ना शेततळी बांधु शकतोय, ना त्याच्या जमिनीत कूठे विहीर-बोअरवेलला पाणी. श्रीमंतांच्या शाश्वत सिंचनाकरिता गरिबांच्या भूजलाची पळवापळवी शेततळ्यांच्या माध्यमातून होत असेल तर हा न्याय म्हणावा का ? विचार करण्याची गरज आहे.

"मुळात 'शेततळी निर्माण' हि एक साठवण योजना म्हणावी कि भूजल पुनर्भरण योजना" याबाबत कुणी फारसा विचारच केलेला नाही असे वाटते. हि फक्त एक 'पिकसंरक्षण योजना' मानून शेतकरी त्यामागे धावतोय असेच दिसतेय. नोव्हेंबर - डिसेंबर नंतर पाऊस थांबण्याचे लक्षण दिसताच आपले शेततळे भरून ठेवले कि पुढचे दोन-तीन महिने पिकास पाणी देता येवू शकते, जी हमखास पीक उत्पन्नाची सोय ठरते हाच फक्त शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा भाग वाटतोय. परंतु यातला चिंतेचा भाग हा कि, "जर पाऊस आला नाही वा शेततळे भरून ठेवता आले नाही तर आजूबाजूच्या बोअरवेल मधून पाणी उपसून शेततळ्यात भरले जातेय". यामुळे जी बाष्पीभवनाद्वारे पाण्याची नासाडी होत आहे, भूजल पातळी झपाटय़ाने खाली जाते आहे, हि खरी चिंतेची बाब आहे.

या साठवणूकीचे आणि बोअरवेलद्वारे अनिर्बंध उपशाचे परिणाम पुढील वर्षांत भयानक असतील जर वेळीच उपाययोजना साधली नाही तर.

यावर उपाय काय?

भूजल पातळीच्या सूरक्षिततेची पूर्ण खात्री ठेवूनच शेततळ्यांचा विचार झाला पाहिजे. "मागेल त्यास शेततळे" योजनेअंतर्गत मंजूरी देताना परिसरातील भूजल पातळी काय आहे? शेतकरी शेततळे तांत्रिक योग्यतेने बांधतोय का? भूजल उपसून शेततळे भरले जातेय का? जलयुक्त शिवार योजना आणि सोबतच प्रामुख्याने भूजलपुनर्भरणासाठी म्हणून काही उपाय योजलेत का? याचा निश्चितपणे विचार व्हावा. घाईघाईने व फक्त पिकाच्या खात्रीसाठी उपाययोजना म्हणून केलेल्या शेततळ्यांचा भूजल पातळीवर अनिष्ट आणि दूरूस्त करता न येण्याजोगा परिणाम टाळायलाच हवा आणि फक्त थोडीशी काळजी घेऊन ते करणे शक्यही आहे.

Updated : 1 Nov 2018 8:54 AM GMT
Next Story
Share it
Top