Home > मॅक्स ब्लॉग्ज > नापास झालेली परीक्षाव्यवस्था शिक्षणव्यवस्था:प्रा. राम प्रकाश किन्हीकर

नापास झालेली परीक्षाव्यवस्था शिक्षणव्यवस्था:प्रा. राम प्रकाश किन्हीकर

यंदाचे दहावी, बारावीचे निकाल खूप छान लागलेत. निकालानंतर इतक्या चांगल्या निकालाबद्दल एक चेष्टेचा, हेटाळणीचा सूर समाजमाध्यमांवर वाचायला मिळाला परंतू कोरोना महामारीच्या काळात नापास झालीय ती परीक्षाव्यवस्था आणि एकंदरीतच आपली शिक्षणव्यवस्था सांगताहेत‌ प्रा. राम प्रकाश किन्हीकर..

नापास झालेली परीक्षाव्यवस्था शिक्षणव्यवस्था:प्रा. राम प्रकाश किन्हीकर
X

आपण एक लक्षात घेतले पाहिजे की ही परिस्थिती, अशा पध्दतीची परीक्षा, यावर्षीच्या परीक्षार्थींनी स्वतःहून मागून घेतलेली नव्हती. अशा अभूतपूर्व परिस्थितीला त्यांना आणि त्यांच्या पालकांना अनपेक्षितरित्या सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सगळ्यांचे कौतुक आपण खुल्या दिलाने केलेच पाहिजे. त्यात कंजुषी नको.

एक शिक्षक म्हणून गेल्या दीड वर्षांपासुन सुरू झालेल्या या महामारीकडे आणि शिक्षण क्षेत्रातल्या तदनुषंगिक बदलांकडे डोळसपणे बघताना मला जाणवतय की यात नापास झालेली आहे ती आमची परीक्षाव्यवस्था आणि एकंदरीतच आपली शिक्षणव्यवस्था.
Online शिकवायचे आहे आणि online च परीक्षा घ्यायची आहे हे जर आपल्या व्यवस्थेला जर जून २०२० पासूनच माहिती होते तर त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची क्षमता विकसित व्हावी, घोकंपट्टीकडे कल नको, विद्यार्थ्यांच्या आकलनाची परीक्षा घ्यावी असा अभ्यासक्रम आणि तशी परीक्षा घेण्याचे आपल्या विद्यापीठांना, शालेय बोर्डांना सुचलेच नाही. विद्यार्थी २०२१ ची परीक्षा घरूनच देणार आहेत आणि कितीही बंधने घातलीत तरीही त्यांना परीक्षेदरम्यान संदर्भासाठी सगळी साधने (पुस्तके, internet व इतर संदर्भ) उपलब्ध असतील हे आमच्या शिक्षणव्यवस्थेने वर्षभरापूर्वीच ओळखायला हवे होते. त्या अनुषंगाने शिक्षणतज्ञांमध्ये विचारमंथन घडवून तशा प्रकारचा अभ्यासक्रम आणि तशी परीक्षा यांचे नियोजन व्हायला हवे होते.

आताही आपल्या एकूणच शिक्षणपध्दतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची एक सुसंधी या महामारीने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. Blessings in disguise.

पाश्चात्य शिक्षणतज्ञ ब्लूमने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेचे एक पिरॅमिड केलेय. खाली फोटोपण दिलाय. त्यात तळाशी आहे ती "लक्षात ठेवणे", "समजणे" ही क्षमता. आपली बहुतांश शालेय किंवा विद्यापिठीय शिक्षण व परीक्षाव्यवस्थाही याच दोन पातळींवर अडकून बसलेली आहे.याच्या वरच्या पातळीवर म्हणजे शिकलेल्या एखाद्या कल्पनेला apply करता येणे, उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचे विश्लेषण करून, त्यांच्यात उजवे डावे करून, त्यांच्यातला सर्वोत्तम पर्याय निवडण्याची क्षमता आणि त्याच्या वर आहे ती म्हणजे एखादी गोष्ट, एखादी संकल्पना, एखादी व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता विकसित होणे.

ही सर्वोच्च शिक्षण पातळी गाठणे हे आता आपल्या शिक्षण आणि परीक्षाव्यवस्थेचे उद्दिष्ट असायला हवेय. किमान विद्यापीठांचे तरी ? तरच आपण जागतिकीकरणात टिकू शकू, नवनिर्माण करू शकू. नोकरी शोधणार्‍यांइतकीच वाढ नोकर्‍या निर्माण करणार्‍यांमध्ये करू शकू.

पण आपल्या सगळ्या व्यवस्थांचा inertia च एवढा आहे की हे सगळे अंमलात आणेपर्यंत फार उशीर झालेला असेल, अनेक सुसंधी आपल्या एका संपूर्ण पिढीच्या हातून निसटून गेलेल्या असतील.

नव्या पिढीने या बदलांचा त्वरित स्वीकार व त्वरित अंमलबजावणी केली तरच तरणोपाय आहे. नाहीतर यावर्षी जसा आपण जुनाच syllabus जुन्याच पध्दतीने पण online शिकवण्याचा वेडेपणा केला, online पध्दतीने पारंपारिक परीक्षा घेण्याचा अती शहाणपणा आपण केलाय, तसाच वेडेपणा आपण गतानुगतिक होऊन पुढली अनेक वर्षे करत राहू यात शंकाच नाही. नंतर मग या व्यवस्थेचे बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांना दोष लावू नका म्हणजे झाले.

- गेल्या २७ वर्षात शिक्षणक्षेत्रात झालेल्या बदलांचा डोळस साक्षीदार व अभ्यासक आणि एक तळमळीचा शिक्षक, प्रा. राम प्रकाश किन्हीकर

Updated : 2021-08-05T09:36:24+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top