Home > Top News > आयजीच्या जीवावर बायजी उदार…

आयजीच्या जीवावर बायजी उदार…

आयजीच्या जीवावर बायजी उदार…
X

सोबत दिलेला तक्ता आणि त्यातली आकडेवारी नीट वाचून घ्या. भारतातल्या राज्यांची लोकसंख्या, देशाच्या एकूण लोकसंख्येत असलेली टक्केवारी, लोकसंख्येमध्ये असलेले स्त्री-पुरुष गुणोत्तर, बेरोजगारीचा दर, साक्षरता आणि जीडीपीमध्ये योगदान अशी माहिती आहे. ही माहिती इंटरनेट वर सहजपणे उपलब्ध आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश ह्या राज्यांची एकत्रित लोकसंख्या जवळपास ४२ टक्के आहे. या गायपट्ट्याचा साक्षरता दर ६८.१८ टक्के आहे. जो देशाच्या ७७.३३ टक्क्याच्या तुलनेत ९ टक्के कमी आहे. या राज्यात लिंग गुणोत्तर ९३८ आहे. जे देशाच्या ९४३ पेक्षा कमी आहे.

जीडीपी बद्दल बोलताना भारताचे सहा भाग केलेले आहेत. दक्षिण भागात केरळ, कर्नाटक, पुद्दुचेरी, तामिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश आहेत. दक्षिण भागाचा वाटा ६२.२० लाख कोटी रुपयांचा आहे.

पश्चिम भागात गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दमन, दादरा आणि नगर हवेली आहेत. या भागाचा वाटा ४३.७० लाख कोटींचा आहे.

उत्तर भागात चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आहेत. या भागाचा वाटा ३१.२० लाख कोटी आहे. मध्य भारतात छत्तीसगड,मध्य प्रदेश,उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश आहेत, त्यांचा वाटा २५.९० लाख कोटींचा आहे.

पूर्व भागात बिहार, झारखंड,ओडिशा, पश्चिम बंगाल आहे, त्यांचा वाटा २५.९ लाख कोटींचा आहे. पूर्वोत्तर भागात अरुणाचल, मणिपूर,सिक्कीम, मेघालय,नागालँड, मिझोरम,त्रिपुरा आणि आसाम आहेत, त्यांचा वाटा ५ लाख कोटींचा आहे.

दक्षिण भारताच्या ६२.२० लाख कोटीत महाराष्ट्राचे २४.९६ लाख कोटी जोडले तर ८७.१६ लाख कोटी होतात. देशातली उत्तराखंड, हिमाचल, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, ओडिशा, जम्मू काश्मीर, आसाम, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार ही राज्ये मागास समजली जातात.

महाराष्ट्र, गुजरात, हरियाना, तामिळनाडू ही चार राज्ये जर भारताच्या महसुलात १०० रुपये देत असतील तर केंद्राकडून त्यांना ३० पेक्षा कमी रुपये मिळतात. बिहार आणि उत्तर प्रदेशाला अनुक्रमे १०० रुपयांच्या बदल्यात २०० आणि १५० रुपये मिळतात. सध्या कर भरणा करायला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही टॅक्स साठी, म्हणजे जीएसटी आणि इन्कम टॅक्स साठी भरणा केंद्रीय पद्धतीने होतो,

जीएसटी चा एसजीएसटी चा वाटा केंद्राकडून राज्य सरकारला परत मिळतो, मात्र बाकीचा जो महसूल केंद्राकडे जमा होतो. त्याच वितरण होताना नेमकं काय होत ?

समजा महाराष्ट्र राज्याच्या वतीने केंद्राच्या तिजोरीत १०० रुपये टाकले गेले. तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केंद्राकडून राज्याला मिळणारा निधी महाराष्ट्राला मिळणारा निधी ३० रुपये आहे, तोच बिहार आणि उत्तर प्रदेशाला १०० रुपये कराच्या रुपात केंद्राला दिले तर योजनेच्या स्वरूपात मिळणारा निधी अनुक्रमे २०० आणि १५० इतका आहे. वादाचा मुद्दा नेमका इथेच आहे.

१५ व्या वित्त आयोगाने ४२ टक्के महसुलाची रक्कम राज्यांना आणि ५८ टक्के केंद्राला अशी विभागणी केलेली आहे. मात्र, ह्या ४२ टक्के कराची नेमकी किती टक्केवारी कुठल्या राज्याला द्यायची? हे वित्त आयोग ठरवतो आहे. आणि ह्याच नेमक्या टक्केवारीला दक्षिणेकडील राज्यांचा विरोध आहे.

त्याला कारणीभूत आहे लोकसंख्येचा निकष. पूर्वी १९७१ च्या जनगणना आकडेवारीचा आधार घेतला जात होता, १४ व्या वित्त आयोगाने २०११ च्या जनगणना आकडेवारी पैकी १० टक्के आणि १९७१ चा ९० टक्के डाटा गृहीत धरलेला आहे. वरवर पाहता २०११ ची जनगणना गृहीत धरणे संयुक्तिक वाटत मात्र, दक्षिणेकडील राज्यांचा नेमका आक्षेप त्याच गोष्टीला आहे.

दक्षिणेकडील राज्यात १९७१ ते २०११ ह्या कालावधीत लोकसंख्यावाढीच्या दरात लक्षणीय घट झालेली आहे. मात्र, उत्तरेकडील राज्यात लोकसंख्या वाढीचा दर तसाच आहे. दक्षिण भारतातल्या राज्यांनी नेमक्या ह्याच मुद्द्यावर केंद्राशी भांडण काढलेलं आहे.

दक्षिण भारताने ह्या उत्तर भारतातल्या राज्यांचा भार का म्हणून ओढायचा ? उत्तर भारतातल्या गायपट्ट्याची लोकसंख्या ह्या एकमेव निकषावर निवडून देणाऱ्या खासदारांची संख्या जास्त आहे. म्हणून सत्तेच्या खेळात ही राज्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतील तरीही हा भार का म्हणून सोसायचा ?

हिंदी भाषेची सक्ती, हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा आव आणून ती सगळीकडे थोपण्याची सक्ती कशासाठी? केंद्राने दक्षिण भारताशी सतत दुजाभाव करायचा, महाराष्ट्राला तीच वागणूक द्यायची. मात्र, महसूल गोळा करून केंद्राची तिजोरी भरायला ह्याच राज्यांनी का म्हणून खस्ता खाव्यात ?

दक्षिण भारतातल्या राज्यांची सांस्कृतिक, भाषिक, राजकीय, धार्मिक सगळ्याच बाबतीत उर्वरित भारताच्या पेक्षा नेहमीच वेगळी भूमिका असते. जरी दक्षिण भारतात हिंदू बहुसंख्य असले तरीही त्यांच हिंदुत्व कट्टर नाहीये.सगळ्यात जास्त साक्षर असलेल, सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर असलेल केरळ राजकीय कल कुठल्या बाजूने दाखवत ?

ही गायपट्ट्याशी विसंगत भूमिकाच दक्षिणेच्या मुळावर येतेय का ? मग या भारंभार पोर जन्माला घालणाऱ्या, डोक्यात शेण भरलेल्या गायपट्ट्यात राहणाऱ्या बैलांचा भार आम्ही का उचलावा ?

Updated : 28 Sep 2020 3:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top