Home > मॅक्स ब्लॉग्ज > भाजप राज ठाकरे यांचा Use & Throw करतील का?

भाजप राज ठाकरे यांचा Use & Throw करतील का?

मनसे आणि भाजप युती होईल का? आणि झाल्यास काय होईल? भाजपला इतक यश मिळाले असतांनाही ते अपयशी मनसेबरोबरच्या युतीला सकारात्मक प्रतिसाद का देतंय? त्याचे मनसेवर काय परिणाम होतील..? मनसेला भाजपची गरज आहे का? मात्र भाजपला मनसेची नाही तर राज ठाकरेंची गरज आहे? वाचा राजकीय विश्लेषक हेमंत पाटील यांचं विश्लेषण...

भाजप राज ठाकरे यांचा Use & Throw करतील का?
X

सध्या मनसे व भाजप युतीचे संकेत काही दिवसांपूर्वीपासून मिळत आहेत. 6 ऑगस्टला राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटीलांची अर्धा तास चर्चा झाली. गेले काही महीने युतीची चर्चा चालू आहे. मनसे नेत्यांच्या मते अशी युती होण्याची शक्यता जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर दहा दिवसांपूर्वी पुण्यातील मनसे नेत्यांनी अशी युती व्हावी असा आग्रह धरला. त्यानंतर राज ठाकरे जेंव्हा पुण्यात आले होते तेंव्हा त्यांनी पुणेकर नेत्यांना स्पष्ट शब्दात अजून नक्की नाही या आशयाची आज्ञा केली होती.

भाजपला राज ठाकरे हवेत, मनसे नकोय....! मनसेला मात्र भाजप हवीय ...!

याचा अर्थ भाजपला राज ठाकरेंची महाविकास आघाडीच्या विरुद्ध भाषणे हवीत. त्यांच्या विरुद्ध टी आर पी हवाय, महाविकास आघाडी विरुद्ध नाराजीचे वातावरण करण्यासाठी राज ठाकरेंसारखा खंदा सवंगडी हवाय... परंतु सत्तेच्या वाटेत मन सैनिकांची लुडबूड नको. मरगळलेल्या अवस्थेमधील मनसेला मात्र भाजपचा आधार हवाय. तीन सदस्यांचा एक प्रभाग झाल्याने त्याची गरज त्यांना जास्तच जाणवते आहे.

ह्या परिस्थितीचा अभ्यास करायचं झाल्यास मनसेची आज पर्यंतची वाटचाल बघावी लागेल.

२००६ साली मनसेची स्थापना झाली. शिवसेनेतील एक गट राज ठाकरेंबरोबर आला आणि मनसेचा उदय झाला. सुरवातीला राज ठाकरेंना प्रचंड यश मिळाले. त्यांच्या सभेला लाखांची गर्दी होत होती. राज ठाकरेंची बोलण्याची पद्धत – त्यांचा हजर जवाबीपणा – त्यांचा अनुभव – त्यांचा अॅटीट्यूड – त्यांचे राजकीय टायमिंग – त्यांचे व्यक्तिमत्व लोकांना आवडले. त्यांच्यावर शिवसेनेत अन्याय झालाय ही भावना लोकांच्यात पसरली होती. त्याची सहानभूती त्यांना मिळाली. तरुणांच्यात एक वेगळीच क्रेझ निर्माण करण्यात राज ठाकरे यशस्वी झाले. ती क्रेझ आजही टिकून आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढण्यास लोकांना एक सक्षम नेता मिळाल्याची भावना सगळीकडे पसरली. २००७ साली झालेल्या राज्यातील मनपाच्या निवडणुकीत मनसेला चांगले यश मिळाले. पुण्यात ८ नगरसेवक – मुंबई – ७ नगरसेवक निवडून आले. नाशिक, ठाणे, कल्याण डोंबिवली येथेही यश मिळाले.

त्या नंतर २००९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मनसेला चांगली मते मिळाली. मुंबईत काही सेनेचे उमेदवार मनसेच्या मतांमुळे पडले अशी चर्चा झाली. मनसेने पडद्याआड कॉंग्रेस – राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली अशी टीकाही त्यांच्यावर झाली. २००९ च्या विधानसभेत मनसेचे १३ आमदार निवडून आले. तीन वर्षात केलेली फार मोठी प्रगति म्हणावी लागेल. २०१० साली कल्याण डोंबिवली मनपामध्ये २७ नगरसेवक, नवी मुंबईला ७ नगरसेवक निवडून आले. २०१२ साली झालेल्या राज्यातील मनपाच्या निवडणुकीत मनसेला खूप चांगले यश मिळाले. पुण्यात २९ नगरसेवक – मुंबई – २८ , नाशिक - ४० - , ठाणे –७ नगरसेवक निवडून आले. नाशिक महानगरपालिकेत मनसेची सत्ता आली. सहा वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पक्षाला 13 आमदार व शहरी भागात इतके नगरसेवक – एका मोठ्या महानगरपालिकेत सत्ता...! खूप मोठं यश मनसेला मिळाले होते. यात सिंहाचा वाटा राज ठाकरेंचा होता. कोणत्याही पक्षाशी युती न करता मनसेने एकट्याने मिळवलेले हे यश होते हे विशेष...! त्यावेळेस राज ठाकरेंना सवंगडी सुद्धा चांगले मिळाले होते. त्यात त्यांनी अनिल शिदोरेंच्या अधिपत्याखाली कार्यकर्त्यांसाठी अकादमी सुरू केली होती. २०१२ च्या मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांची एक परीक्षा घेण्यात आली. लोकांना काही प्रमाणात हे वेगळेपण आवडले होते.


मराठीच्या मुद्यावर स्थापन झालेल्या या पक्षाने काही हिंसक आंदोलने केली. परराज्यातील विशेषत: हिंदी भाषिक लोकांची मुजोरी मुंबई – ठाणे परिसरात फार वाढली होती. तिला काही प्रमाणात आळा घालण्याचे काम राज ठाकरेंनी केले. रेल्वे परीक्षा किंवा टोल नाका ही आंदोलने यशस्वी झाली. काही टोल नाके राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे राज्य सरकारला बंद करावे लागले हे विशेष! त्यावर सेटलमेंट केल्याची टीका देखील झाली, परंतु टोल नाके बंद झाले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या नंतर स्वतंत्र पक्ष काढणार्‍या एकाही नेत्याला कमी वेळात इतकं यश मिळाले नाही...!

अपयश पचवणे सोपं आहे परंतु यश पचवणे अवघड आहे....!

या नंतर राज ठाकरे जाहीर सभा, उद्घाटणे व टी आर पी पुरते राहिले.

२०१४ च्या लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींचे कौतुक केले आणि मनसेसाठी मते मागितली. लोकांनी विचार केला की या पेक्षा थेट मोदींना म्हणजे भाजपलाच मते देतो.

दुसरी गोष्ट अशी घडली की उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे खाणे काढले. ते सेनेला आवडले नाहीच परंतु बर्‍याच लोकांना आवडले नाही. परिणामी मनसेने सपाटून मार खाल्ला.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी असेच घडले. त्या आधी काही वर्षे राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार केलीय आणि महाराष्ट्र बदलेल असे वक्तव्य वारंवार करीत होते. २५ सप्टेंबर २०१४ ला निवडणुकीच्या रणधुमाळीत ही ब्लु प्रिंट त्यांनी जाहीर केली. बरोबर याच दिवशी भाजपने सेनेशी युती तोडली. राष्ट्रवादी सुद्धा कॉंग्रेस बरोबर घटस्फोट घेण्याच्या तयारीत होता. त्यामुळे राज ठाकरेंच्या ऐतिहासिक ब्लु प्रिंटची फारशी कोणीही दाखल घेतली नाही. मनसेला परत एकदा सपाटून मार खावा लागला. त्यांचे जुन्नर तालुक्यात शरद सोनवणे नावाचे एकमेव आमदार निवडून आले.

२०१५ नंतरच्या सर्व महानगरपालिकेच्या सर्व निवडणुकीत मनसेचा पराभव झाला. कल्याण डोंबिवली – नाशिक – पुणे – मुंबई – ठाणे येथे दखल घेण्या इतके ही नगरसेवक निवडून आले नाही.

मनसेने त्यांच्या इंजिनाची दिशा दोन वेळा बदलली, हिंदी भाषिकांचा मेळावा घेवून त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला, हिंदूवादी भूमिका घेतली. मशिदीवरील भोंगे हटवण्याची भूमिका घेतली. नुकतचे शिवाजी महाराजांची राज मुद्रा वापण्याचा प्रयोग करतायत. तरी म्हणावे तसे यश मिळत नाही.

याला कारण त्यांचे धरसोड धोरण, राज ठाकरेंच्या भोवतालची लोकं व त्यांचे चुकीचे सल्ले, संघटनेचा अभाव, दुसर्‍या फळीतील नेतृत्वाची कमी, फक्त निवडणुकीच्या काळात सक्रिय वगैरे आहेत.

मनसेचा जन्म सेनेतून झालाय. मनसेचे राजकारण नकारात्मक गोष्टींवर चालते. कधीही सत्तेत नसल्याने सतत विरोधी पक्षाची भूमिका त्यांना घ्यायला लागते. तशी त्यांनी ती सतत घेतली.

ह्या सर्व पार्श्वभूमीचा विचार केल्यास एक प्रश्न पडतो की भाजपला इतक यश मिळाले असतांनाही ते अपयशी मनसेबरोबरच्या युतीला सकारात्मक प्रतिसाद का देतय ? त्याचे मनसेवर काय परिणाम होतील..?

आज तरी फडणवीसांचा अति आत्मविश्वास, जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळा, गेल्या पाच वर्षातील उघडकीस आलेला खोटारडेपणा, काही मंत्र्यांवर आरोप, सत्ता नसणे ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या बद्दल जनतेत नाराजी आहे.

दुसरी गोष्ट सेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या मतदारांनी एकत्र येऊन त्यांच्या उमेदवाराला मते दिली तर ...? त्या मुळे त्यांना सुद्धा फक्त आणि फक्त राज ठाकरेंची गरज आहे.

मनसेच्या दृष्टीने खूप अवघड आहे.

१. २०१९ ला मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नाही. परंतु कॉंग्रेस - राष्ट्रवादीबरोबर पडद्याआड युती करून राज ठाकरेंनी राज्यात १० जाहीर सभा घेतल्या. या सभेत मोदी – शहा यांचा खोटारडेपणा उघडकीस आणला. प्रत्येक सभेत विविध विषय पुराव्यासहित घेवून लोकांच्यात मोदी – शहा यांच्या विरुद्ध जन जागृती केली. त्याला तूफान प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवून मोदी शहा यांचे वाभारे काढले. राज ठाकरेंचे "लाव रे व्हिडिओ" हे वाक्य खूप फेमस झाले. केवळ राज्यात नाही तर देशात राज ठाकरेंचे नाव झाले. ही घटना फक्त सव्वा दोन वर्षा पूर्वीची. आता जर मनसेने भाजपा बरोबर युती केली तर राज ठाकरेंवर परत एकदा भूमिका बदलल्याचा आरोप नाही का होणार..?

'लाव रे व्हिडिओ चे कुठचा रे व्हिडिओ" मध्ये परिवर्तन होईल. जनतेत हसे होईल.

२. मनसेची हिंदी भाषिकांबरोबरची भूमिका सर्वांना माहीत आहे. उत्तर परदेशात सहा महिन्यात निवडणुका आहेत. नुकत्याच एका उत्तर भारतीय व्यक्तीने अतिक्रमण हटवायला गेलेल्या महिला अधिकार्‍यावर चाकू हल्ला केला. राज ठाकरेंनी त्यांना भेटून त्यांचे सांत्वन केले व हिंदी भाषिक फेरीवाल्यांकडे आम्ही बघतो या आशयाचे वक्तव्य केले. ही गोष्ट भाजपला कशी परवडेल...?

३. मनसेचे धोरण नकारात्मक मुद्यांवर आहे. केंद्रात भाजप सरकार, राज्यात महाविकास आघाडी सरकार व १६ महानगरपालिकेत भाजप सरकार अशी परिस्थिति आहे. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या महानगरपालिकेत टीका कुणावर करणार...? स्थानिक निवडणुकीत स्थानिक मुद्दे असतात. राज्याने रस्ता केला नाही किंवा कचरा हलवला नाही असे म्हणू शकत नाही. मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली येथे ठीक आहे. परंतु पुणे – पिंपरी चिंचवड – नाशिक – सोलापूर – नवी मुंबई – नागपूर येथे राज ठाकरे टीका कुणावर करणार…? कारण तेथे भाजपची सत्ता आहे.

४. अशीच गोची स्थानिक उमेदवार व कार्यकर्त्यांची होईल. त्यांनी विरोध कुणाला करायचा...? सत्ता भाजपकडे आणि टीका राष्ट्रवादी – कॉंग्रेस – सेनेवर. लोकांना कसे पटेल ते...?


५. कोरोना काळात उद्धव ठाकरे – राजेश टोपे – अजित पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी चांगल्या प्रकारे परिस्थिति हाताळली. उद्धव ठाकरेंचे कौतुक डब्ल्यू एच ओ – सुप्रीम कोर्ट – मोदी आणि आंतरराष्ट्रीय मीडियाने केले. मग राज ठाकरे त्यांच्यावर ह्या मुद्यावर काय टीका करणार ..? व्हेंटिलेटर – पी पी इ किट – ऑक्सीजन – औषधे – लस या सर्वांचा कंट्रोल केंद्र सरकारकडे होता आणि आहे. त्यांच्या आदेशा प्रमाणे सर्व घडत होते. मग टीका कुणावर करायची…?

६. आज अनेक मनसेचे कार्यकर्ते मोदींच्या ध्येय धोरणांना सडकून टीका करतात. मग विषय महागाईचा असो – सरकारी कंपन्या विकण्याचा असो की कोरोना हाताळण्यात अपयश. मोदींच्या सर्व खोटारड्या गोष्टींवर मनसैनिक सडकून टीका करतात. त्यांच्या समोर मोठी समस्या उभी राहील.


७. भाजपला त्यांच्या हक्काच्या काही जागांवर पाणी सोडावे लागेल. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारी भाजप मनसेला जागा सोडेल का हा खरा प्रश्न आहे.

८. जरी भाजपने मनसेला काही हक्काच्या जागा सोडल्या तर तेथे बंडखोरी करून आपल्याच कार्यकर्त्याला परत अपक्ष म्हणून निवडून आणून नंतर पक्षात घेतलं तर? भाजप तसे करणार नाही कश्यावरून ...? नुकत्याच झालेल्या विधानसभेला भाजपने शिवसेनेसोबत हेच केले.

९. वास्तविक पाहता आरक्षण हा विषय केंद्राच्या कोर्टात आहे. फडणवीस सरकारने किंवा मोदी सरकारने त्यावर घेतलेल्या भूमिका नागरिकांना चांगल्या ठाऊक आहेत. मग आरक्षणावर भाजपाच्या बाजूने कसा किल्ला लढवायचा ? हा प्रश्न नक्कीच राज ठाकरेंसमोर असेल. त्यांची भूमिका आरक्षण विरोधी आहे.

१०. भाजपचा इतिहास बघितल्यास भाजप इतर नेत्यांना फारसे किंमत देत नाही. त्यांचे फडणवीस – चंद्रकांत पाटील सारखे नेते गोड बोलून राज ठाकरेंचे एका मर्यादेपर्यंत कौतुक करतील, परंतु स्थानिक कार्यकर्त्याला अपमान करायला सांगतील. हे धोरण ते सर्वांबरोबर राबवितात. राज ठाकरेंबरोबर निवडणुकीत असे होणार नाही कश्यावरून ? असे झाले तर निवडणूक राहील बाजूला आणि कार्यकर्ते एकमेकांशी भांडत बसतील. पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे. तेथे भाजप - मनसे युती आहे. सोशल मीडियात एका उमेदवाराचे पत्रक व्हायरल झाले. राज ठाकरेंचा फोटो एका कोपर्‍यात स्थानिक नेत्यांच्या बरोबर टाकला आहे. असे वारंवार घडण्याची दाट शक्यता आहे.

११. तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने मनसेचा मतदार भाजपला जवळ करेल परंतु भाजपचा मध्यमवर्गीय मतदार मनसेला २०२१ मधील परिस्थितीत किती जवळ करेल...?

१२. पैसेवाला भाजप उमेदवार व त्याचे कार्यकर्ते गरीब मनसेच्या उमेदवाराला व त्याच्या कार्यकर्त्याला जवळ करेल...?

१३. भाजपा आपल्या सहकार्‍यांशी कसे वागते हे गेल्या सात वर्षात सर्वांना समजलय. नितीश कुमार – उद्धव ठाकरे यांची काय हालत केली हे बघितलय. मग उद्या तीच गोष्ट राज ठाकरेंबरोबर करणार नाहीत कश्यावरून...? ईडीचा अनुभव राज ठाकरेंनी घेतलाय. एका रात्रीत ईव्हिएम विषय त्यांनी बंद केला. अजून बर्‍याच गोष्टी सांगता येतील. असो.

शेवटी सारासार विचार केल्यास मनसेला भाजपची गरज आहे आणि भाजपला फक्त राज ठाकरेंची...!

हा गुंता कसा सोडवणार हे फडणवीस – राज ठाकरे ह्या दोघांनाच माहीत. ...?

भाजपाच्या दृष्टीने "चित भी मेरी , पट भी मेरी." असणार आहे. लढायला तुमचे जिंकायला आमचे ..!

एक मात्र नक्की.. युती नाही झाली तर मनसेचे अवघड आहे आणि युती झाली तर जास्तच अवघड आहे...!

मनसेचे " बुडत्याचा पाय खोलात" ही स्थिति होऊ नये म्हणजे मिळवलं ....!

धन्यवाद ...!

हेमंत पाटील

राजकीय विश्लेषक

कृष्णा कन्सल्टन्सी, पुणे

मो. 8788114603

व्हाट्स अप 8788114603 / 7774035759

Updated : 2021-10-03T19:01:48+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top